नरेंद्र मोदी
आणखी काय विकायचे राहिले
रोज विचार करत बसतो
बोटे मोजता चुकते बेरीज
स्वत:शीच मी परत हसतो
निर्णय घ्यायला हिंमत लागते
माझ्याशिवाय आहे कोणात?
फसली नोटबंदी तरीही
देश गेला नाही कोमात
बेपारी हा पेशा आमचा
बेपार नाही जमला कधी
तरीही विकल्या मोठ्या संस्था
टिकून आहे गफला-गादी
नवनीत राणा
मोदी भेटले, शहा भेटले
रामदास आठवलेही भेटले
माझा कित्ती छळ झाला
सार्यांनाही सारे पटले
कोर्ट कसली घालते बंदी
मी कुणाला नाही जुमानत
माझ्यासमोर उभा राहील
त्याची होईल जप्त अनामत
कधीही जाईन भाजपमध्ये
मोदी घेतील मला केंद्रात
जशी अलगद गेले होते
लीलावतीच्या सिटीस्कॅन यंत्रात
किरीट सोमय्या
आकडा माझ्या घोटाळ्यांचा
वाटत नव्हता इतका छोटा
कुणालाच ठाऊक नाही तो तर
आहे त्याहून कितीतरी मोठा
जर आमची सत्ता गेली
तर मात्र लागेल बांबू
आताच खटपट सुरू करू
भक्तही म्हणतात नकोस थांबू
जी ईडी माझ्या हातात
माझ्याच तालावर ती नाचते
तीच उद्या धडा शिकवणार
हीच सुई गालावर टोचते
देवेंद्र फडणवीस
तेच तेच बोलून बोलून
घसा पडला चक्क कोरडा
तरीही वरची ऑर्डर पाळतो
`आघाडीवर जोरात ओरडा’
माझ्याशिवाय बाकीच्यांचा
तसा काही उपयोग नाही
माझ्या जिभेला धार आहे
तरीही सध्या राजयोग नाही
चोवीस साली वाट पाहीन
धडपडत मी पुन्हा येईन
एकच स्वप्न किती पाहणार
कंटाळून मी झोपी जाईन
रामदास आठवले
बाईंना मी भेटलो तेव्हा
मला त्यांची दया आली
केवढी सहनशक्ती त्यांची
तरीही फुकट वाया गेली
केवढी मोठी मॉडेल नटी
माझीसुद्धा आहे फॅन
माझ्या वायफळ कविता ऐकून
डोलावते ती नेहमीच मान
आमच्या पक्षात असती तर ती
केवढा मिळाला असता मान
राखी सावंतपेक्षा नक्की
वाढली असती तिची शान