लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही प्रांतात मुशाफिरी करणारे अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव पक्के ‘छुपे रुस्तम’ आहेत… असं नेमकं त्यांनी काय केलंय? कसली लपवाछपवी करण्याची वेळ त्यांच्यावर आली?… काही नाही, ते दोघे एकत्र असलेलं ‘छुपे रुस्तम’ हे नवं नाटक नुकतंच रंगभूमीवर आलंय. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग नुकताच रविवार १५ मे रोजी दुपारी ४.१५ वाजता विलेपार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात आणि त्यानंतर सोमवार १६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात रंगला.
प्रवेश व दिशा निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या दोन अंकी नाटकात हृषिकेश आणि प्रियदर्शन ही जोडगोळी एकत्र आल्यामुळे नाटक खुमासदार असणार हे वेगळं सांगायला नको. फार्स, गंमत, गॉसिप, लपवाछपवी अशा सगळ्या गोष्टींनी हे नाटक रंगत जातं. खास विजय केंकरे टच असलेल्या या नाटकात काम करणे ही आपल्यासाठी पर्वणी असल्याचे हे दोघेही सांगतात.
आयुष्यात शंभर टक्के खरं कधीच कोणी बोलत नसतं. प्रत्येकजण काही ना काही लपवाछपवी करत असतो. ही लपवाछपवी जर नवरा बायकोमधली असेल तर मग सगळाच मामला कठीण होऊन बसतो. नेमकी नवराबायकोच्या नात्यातील लपवाछपवीचाच हा खेळ आणि त्यातून उडणारी तारांबळ, तारेवरची कसरत, झालेली गोची याची धमाल या नाटकात पाहायला मिळते. ‘द लाय’ या प्रâेंच नाटकावर हे नाटक बेतलेलं आहे. हृषिकेश आणि प्रियदर्शन या दोघांसोबत मयूरा रानडे आणि कृष्णा राजशेखर नायिका आहेत. विनोदाचा डोस देत नवरा बायकोच्या नात्यातील अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न हे नाटक करतं.
प्रिया पाटील आणि अनिता महाजन यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. या आधी या संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक नाट्यस्पर्धेमध्ये गाजलेलं ‘गलती से मिस्टेक’ या धम्माल विनोदी नाटकासोबत ज्वलंत, आशयघन व विनोदाची हळुवार फुंकर घालणारं ‘डोन्ट वरी हो जाएगा’ यासारख्या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. तेजस रानडे यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे.
`आमने सामने’ने गाठली शंभरी
खुसखुशीत मनोरंजनाला नाट्यरसिकांची हमखास पसंती मिळते. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘आमने सामने’ हे नाटक… या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. म्हणूनच तर या नाटकाने नुकताच १५ मे रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात शंभरावा प्रयोग त्याच दमात, त्याच उत्साहात रंगवला. विनोदी अंगानेसुद्धा अनेक महत्त्वाचे विषय मांडता येतात हे दाखवून देणार्या या नाटकातून लग्नसंस्थेवर भाष्य करण्यात आले आहे. गडकरी रंगायतनमध्ये पार पडलेल्या शतक महोत्सवी प्रयोगाला दै. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेता कवी जितेंद्र जोशी, आरजे दिलीप, दिग्दर्शक रवी जाधव, लेखक दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे उपस्थित होते.
झी नाट्य गौरव, आणि मटा सन्मान सोहळ्यात सर्वोत्कृष्ट नाटकासहित सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री अशा सर्व पुरस्कारांवर या नाटकाने नाव कोरले आहे. या शतकी महोत्सवी वाटचालीबद्दल आनंद व्यक्त करताना अभिनेते मंगेश कदम यांनी आंतरराष्ट्रीय संमेलनात नाटकाची झालेली निवड हुरूप वाढवणारी असल्याचे सांगितले. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद पाहता हे नाटक ५०० प्रयोगांचा सुद्धा टप्पा गाठेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर यांच्या अभिनयाने रंगलेल्या या दोन अंकी नाटकात मागच्या पिढीने काळानुसार नव्याचा स्वीकार करायला हवा हा विचार रंजकरीत्या मांडला आहे. दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळत प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले आहे. सादरकर्ते अवनीश व अथर्व प्रकाशित या नाटकाची निर्मिती ‘नाटकमंडळी’ यांनी केली आहे.