३८ कृष्ण व्हिला… या एका आलिशान बंगल्यातला दिवाणखाना.. भव्यता अन् प्रसन्नता जागोजागी नजरेत भरणारी.. मध्यभागी जिना.. बंद दरवाजा.. जवळच एका भिंतीला टेकून काचेचं कपाट. त्यात अनेक पुस्तके, फाइल्स.. देवदत्त कामत उर्फ यक्ष हा मराठीतील नामांकित कथा-कादंबरीकार. तो इथे वावरतोय. मंद गाणं, गोळ्या-पाणी, चहाचा थर्मास. तो वाट बघतोय. नंदिनी मोहन चित्रे या विवाहित महिलेनं कामत यांच्याविरोधात फसवणुकीचा कायदेशीर संघर्ष सुरू केलाय. त्याची नोटीस कामत यांच्यापर्यंत पोहचलीय. नंदिनी रिक्षा रस्त्यावर उभी ठेवून जाब विचारण्यासाठी आत प्रवेशते आणि सुरू होतं वादातून सुरू झालेलं एक दोन अंकी संवादनाट्य! जे एकेक वळणं घेत रसिकांना अक्षरशः गुंतवून ठेवतं आणि अखेरीस एका हादरुन सोडणार्या धक्कादायक वस्तुस्थितीपर्यंत पोहोचतं…
एका ज्येष्ठ साहित्यिकाच्या जीवनात आकाराला आलेल्या अंधारातल्या हृदयस्पर्शी नाट्यावर बेतलेले डॉ. श्वेता पेंडसे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या कथानकातील गुंता हा हळुवारपणे उलगडला आहे. सध्याच्या विनोदी नाटकांच्या भाऊगर्दीत ‘३८ कृष्ण व्हिला’ ही वेगळ्या वाटेवरली दर्जेदार भेट ठरतेय. साहित्यजगातला सर्वोच्च ‘अक्षररत्न’ पुरस्कार यंदा यक्ष यांना जाहीर झालाय. या पार्श्वभूमीवर नंदिनीचा आक्षेप आहे. त्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याची तिची पूर्ण तयारीही आहे. तिचा दावा असा की, ‘ही पुरस्कारविजेती कादंबरी कामत यांची नाही, तर ती तिचे पती मोहन चित्रे यांचीच आहे.’ या कादंबरीवर आणि पर्यायाने पुरस्कारावर तिच्या पतीचाच हक्क व अधिकार आहे. त्यामुळे कामत काहीसे चक्रावून जातात आणि एका अभिरूप न्यायालयाप्रमाणे त्यावर युक्तिवाद करण्यात येतो.
कामत यांची ‘बखर’ हे एकमेव कादंबरी वगळता बाकी सर्व साहित्य हे मोहन चित्रे यांचे आहे, असाही दावा करून हा मुद्दा पटविण्याचा प्रयत्न नंदिनी करते. पण त्याला पुरावा मिळत नाही. सवाल जवाब, प्रश्न-उत्तरे त्यातील खटकेबाजी याने दोघेही टोकापर्यंत पोहचतात. कामत यांचा गळा रागाने पकडण्यापर्यंत नंदिनीची मजल जाते, तर कामत हे स्पष्टपणे नंदिनीला मनोरुग्ण ठरवून वैद्यकीय सल्ला घेण्याचा आग्रह धरतात. दरम्यान, ज्यांच्यासाठी पत्नी हे कोर्टात खेचण्यापर्यंतचे पाऊल उचलते ते तिचे पती मात्र कुठेही कधीही याबद्दल बोलत नाहीत. किंवा या कादंबर्यांवर आणि पुरस्कारावर ते हक्कही सांगत नाहीत. अखेर सारे युक्तिवाद, दावे, पुरावे हे काही एक सिद्ध करू न शकल्याने नंदिनी हा कदाचित निव्वळ योगायोग किंवा मानसिक विकाराचा भाग असावा, असे समजून निघते खरी, पण तिथेच या कथानकाला नवी कलाटणी मिळते आणि अंधारातले सत्य प्रकाशात येते.
नवर्याचे साहित्य चोरले म्हणून कोर्टात खेचणारी आणि वैयक्तिक जीवनातही संघर्ष करणारी नंदिनी. जी एका प्रतिष्ठित लेखकाच्या घरी भांडण्यासाठी पोहचते. तिच्याकडे नवर्याने कुठलीही तक्रार केलेली नसतांना असा एकाकी लढा ती कशाला लढते? पुरस्कारविजेता साहित्यिक एकाकी जीवन आनंदात जगतोय. एका गाजलेल्या पुस्तकानंतर वाचकांकडून ‘पुढलं लेखन कोणतं?’ या प्रश्नामुळे हादरलेला. संभ्रमात अडकलेला. तिसरा जो संदर्भ म्हणून कथानकात आलेला, गर्दीपासून दूर राहणारा, माणसाचे भय मनात बसलेला, असा तिर्हाईक. अशा तिघांभोवतीचे हे नाट्य मानसशास्त्रीय वळणावर पोहोचते! तिथे पडदा खुबीने हलवण्यात येतो आणि थक्क करून सोडणारे नाट्य नेमकेपणाने पोहचते.
समर्थ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी साकारलेला देवदत्त कामत आणि अभिनेत्री व या नाटकाची लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांची नंदिनी मोहन चित्रे या दोघा व्यक्तिरेखांभोवती गुंफलेले हे संवादनाट्य. दोघेच रंगमंचावर दोन अंकांत असल्याने उत्कटपणे भूमिका साकार होते. नाट्य शिगेला पोहचते. डॉ. गिरीश ओक यांच्या नाट्यकारकीर्दीतले हे पन्नासाव्वे नाटक. त्यांनी सहजतेने आणि तपशिलांसह एक बुजुर्ग, अभ्यासू साहित्यिक पेश केलाय. यापूर्वीही डॉक्टर आणि इला भाटे यांची भूमिका असणारे ‘यू टर्न’ हे नाटक विविध पुरस्कारांनी गाजले होते. ‘यू टर्न’ भाग दोनही आला. नाटकात फक्त दोनच कलाकारांचा वावर हा अनुभव त्यांना पुरेपूर आहे. पूर्ण नाटक अंगावर घेण्याचा हा प्रकार. तो पेलविण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ती या नाटकातही ठळकपणे दिसून येते. रुबाबदार, संयमी आणि एका विचित्र मानसिक कोंडीत अडकलेला यक्ष अप्रतिमच!
कुणाला आधार देताना इतरांना मात्र ती अडचण वाटू लागते, जीवघेण्या शर्यतीत खोटा मुखवटा चढवून भाग घ्यावा लागतो, याचेही दर्शन त्यांनी प्रभावीपणे घडवलंय. नृत्य, नाट्य, चित्रपट, मालिकालेखन असा पंचरंगी वावर असलेल्या अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे यांनी संहितालेखन आणि अभिनय यातून बाजी मारली आहे. त्यांची मनाची अस्वस्थता सुन्न करून सोडते. दोघांचं ट्यूनिंग सुंदर जमलंय. संवादलेखनातील चमक नजरेत भरते. रहस्यनाट्य चांगले खेळवत ठेवलंय.
रंगमंचावर नसलेली तिसरी व्यक्तिरेखा मोहन चित्रे. जी कधीही रंगमंचावर प्रगटत नाही किंवा पडद्याआडून त्यांचा संवादही नाही पण त्याभोवती सारं नाट्य फिरतं. रंगमंचावरल्या दोघांचा विषय हा तो तिसरा माणूसच ठरतो. त्याच्या जीवनाचे प्रतिबिंब उमटतात. जे हेलावून सोडणारे.
कल्पक, दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हे ‘संवादनाट्य’ एक ‘नभोवाणी नाट्य’ न होऊ देण्याची कसरत ताकदीने साधली आहे. काही प्रत्यक्ष घडत नसले तरी त्यातील कुतूहल, रहस्य उत्कंठा रंगविण्यात कुठेही कसूर ठेवलेली नाही. भडकपणा टाळून प्रसंग संयमाने बांधले आहेत. दोनच पात्रे आणि एकच स्थळ, तसेच त्यातील सलगता यामुळे नाट्य जराही अडखळत नाही. पहिला अंक अधिक परिणामकारक ठरतो. त्याचा शेवट आतुरतेने वाट बघायला लावणारा उत्कर्षबिंदू ठरतो. दिग्दर्शकीय हुकमत नजरेत भरते.
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी पूरक असा देखणा दिवाणखाना तपशिलांसह उभा केलाय. दरवाजांची उघडीप नेपथ्य आणि प्रकाश यातून अर्थपूर्ण होते, बोलकी ठरते. गझलांच्या तुकड्यामुळे वातावरणनिर्मिती मस्त होते. मंगल केंकरे यांची वेशभूषा दोघा व्यक्तिरेखांना सुयोग्य ठरते. तांत्रिक बाजू उत्तमच.
नाटककार विजय तेंडुलकर यांचे आगळ्या शैलीमुळे एकेकाळी चर्चेतले ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक. ज्यात एक काल्पनिक खटला उभा करायचा आणि मग तो खर्यासारखा लढायचा, असा प्रायोगिक प्रकार होता. त्यातली बेणारे बाई आधी हसत-खेळत सामील होते खरी पण नंतर अखेरीस खर्याखुर्या जीवनातलं दुःख प्रगट करते. शोकांतिका म्हणून ‘शांतता’ची संहिता आणि प्रयोग हा गाजलेला. याही प्रयोगात तेंडुलकरांच्या संहितेची आणि बेणारे बनलेल्या सुलभा देशपांडे यांची आठवण पहिल्या काही प्रसंगात येतच राहते.
एका काल्पनिक मराठी साहित्यिकाच्या जीवनातील काही धक्कादायक घटनांवर आधारित हे नाटक. या संहितेत शक्यता-अशक्यता तसेच उणीवा या जरूर असू शकतात, पण नावीन्य नाकारून चालणार नाही. एक वेगळा विषय मांडून तो फुलविण्याचा प्रयत्न लक्षवेधी म्हणावा लागेल. आजच्या विनोदी नाटकांच्या महापुरात हा नाट्यपूर्ण उताराच ठरेल!
३८ कृष्ण व्हिला
लेखन – डॉ. श्वेता पेंडसे
दिग्दर्शन – विजय केंकरे
नेपथ्य – संदेश बेंद्रे
प्रकाश – शितल तळपदे
संगीत – अजित परब
वेशभूषा – मंगल केंकरे
रंगभूषा – राजेश परब
निर्माता – मिहिर गवळी
निर्मिती – मल्हार/रॉयल थिएटर