• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अनोखा काष्ठचित्र व्यवसाय

- चारुहास पंडित (मार्ग माझा वेगळा)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 19, 2022
in मार्ग माझा वेगळा
0

२००७ पासून सुरु झालेला हा अनोखा काष्ठचित्र व्यवसाय आता चांगला नावारूपाला आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली याच्यापासून ते प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्यापर्यंत ही चित्रे पोहोचली आहेत, त्यांनी या कलेचे तोंडभरून कौतुक केले आहे. नव्या प्रकारचे हे काम करताना आनंदही मिळाला. लाकडामधल मनमोहक रंगछटा या माध्यमातून खुलवल्या, तर ते खूपच मनमोहक दिसेल, याचा अंदाज मला प्रयोग करतानाच आला होता.
– – –

जाहिरातीच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत असताना एका क्षणाला मला आणि माझी पत्नी भाग्यश्री आम्हाला असे वाटले की आपण काहीतरी क्रिएटिव्ह करायला हवे, ज्यामधून आपल्या कलेमध्ये काम केल्याचा आनंद मिळेल. आयुष्य एकदाच मिळते, त्यामुळे आपण जरा वेगळ्या शैलीचे, लोकांना आणि आपल्याला आवडेल असे काम करायला हवे. २००३मध्ये मुंबईत एक इंडस्ट्रियल प्रदर्शन भरले होते, आम्ही दोघेजण ते पाहण्यासाठी गेलो होतो. तिथे आम्हाला लेझर टेक्नॉलॉजी पाहायला मिळाली आणि मनातली कल्पना आकार घेऊ लागली. २००५मध्ये आम्ही १२ लाख रुपये किंमतीचे लेझर मशीन विकत घेतले. त्या मशीनच्या माध्यमातून आम्ही वर्षभर काच, अ‍ॅक्रॅलिक, लाकूड यावर काम करून वेगवेगळे प्रयोग करत होतो. तेव्हा लाकडावर लेझरचा दिसणारा बर्निंग रिचनेस फारच अफलातून होता, त्यामुळे तोच धागा पकडून आपल्याला लाकडाचे नैसर्गिक सौंदर्य खुलवण्याची चांगली संधी आहे, हे लक्षात आले. नैसर्गिक रंगाची, वेगवेगळ्या जातीची लाकडे लेझरच्या साह्याने कट करून त्यांची चित्रे तयार करायचा नवा व्यवसाय आकाराला आला.
२००७पासून सुरु झालेला हा अनोखा काष्ठचित्र व्यवसाय आता चांगला नावारूपाला आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली याच्यापासून ते प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्यापर्यंत ही चित्रे पोहोचली आहेत, त्यांनी या कलेचे तोंडभरून कौतुक केले आहे. नव्या प्रकारचे हे काम करताना आनंदही मिळाला. लाकडामधल्या मनमोहक रंगछटा या माध्यमातून खुलवल्या, तर ते खूपच मनमोहक दिसेल, याचा अंदाज मला प्रयोग करतानाच आला होता. त्यामुळे काष्ठचित्र तयार करून त्याची फ्रेम तयार करण्याचा हा प्रवास सहजपणे जुळत गेला. २००७मध्ये आम्ही ५० चित्रे तयार केली होती, आता हा आकडा ३०० चित्रांपर्यंत जाऊन पोहचला आहे.
आम्ही लाकडाचा वापर करून पहिले चित्र केले होते ते घोड्याचे. त्यानंतर यामधून अनेक प्रकारची चित्रे तयार होऊ शकतात, हे समोर आले. त्यामध्ये अगदी इंडियन आर्टपासून ते वाइल्ड लाईफपर्यंतच्या चित्रांचा समावेश आहे. ही चित्रे तयार करताना आम्ही १६ ते १७ प्रकारच्या लाकडाचा वापर करतो. चित्रे तयार होतात ती लाकडाला असणार्‍या नैसर्गिक रंगामधेच. त्यामुळे ती पाहणार्‍यांना अधिक भावतात. काष्ठचित्र करण्यासाठी लागणारा कालावधी हा दोन आठवड्यांपासून ते दोन महिन्यापर्यंतचा आहे. काष्ठचित्राची संकल्पना टू डी आणि थ्री डी प्रकारात येते. या चित्रांमध्ये पुढून डेप्थ जाणवते. काहीतरी मागच्या बाजूला केलेले आहे हा भास लाकडावर निर्माण केलेला आहे. हे सगळे काम फार कुशलपणे करावे लागते. लाकडाचा थिकनेस कसा आहे, त्यानुसार ते कापण्यासाठी वेळ खर्च होतो. चित्र तयार करण्याआधी त्याचे कागदावर ड्रॉइंग तयार करण्यात येते. लाकूड कसे कापायचे हे ठरवून चित्र तयार केले केले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया फार किचकट आणि वेळखाऊ आहे. ती काळजीपूर्वक करावी लागते.

खास तयार केलेला ‘गम’

काष्ठचित्राची फ्रेम तयार करताना चित्रे खास गमच्या सहाय्याने चिकटवली जातात. या सगळ्याच उपक्रमात गम हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीन ऋतू असतात. या काळात हवेचा लाकडावर परिमाण होतो. ते प्रसरण किंवा आकुंचन पावू शकते. त्यामुळे आम्ही खास गम तयार करून घेतला आहे. विशेष म्हणजे लॅबमधून त्याची तपासणी करून घेतली आहे, त्याचे कोणतेही दुष्परिणाम आमच्या प्रोडक्टवर झालेले नाहीत. आमची ही चित्रे दुबई, मुंबईपासून ते लंडनपर्यंतच्या वातावरणात अनेक वर्षे अगदी सहीसलामत टिकून राहतात.
चित्रकलेची आवड मला लहानपणापासूनच होती. त्या काळात व्यंगचित्रावर विशेष प्रेम राहिले आहे. १९७०मध्ये माझ्या हातात पहिले व्यंगचित्राचे पुस्तक पडले होते, ते हरिश्चंद्र लचके यांचे ‘हसा आणि लठ्ठ व्हा’. कालांतराने माझी त्यातली रुची इतकी वाढत गेली की त्या काळात ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध होणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रं मला फारच भावायची, त्यांच्या चित्रांची जादू आजही माझ्या मनावर टिकून राहिलेली आहे. ही आवड अधिक दृढ होत गेली. इंग्लिश मॅड कॉमिक, इंद्रजाल, अमर चित्रकथा अशी कितीतरी पुस्तकं सांगता येतील, जी माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच बनून गेली होती. या आवडीपोटी पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयातून अप्लाइड आर्टस् पूर्ण केले ते १९७६ ते ८१च्या दरम्यान. शिक्षण सुरु असताना फ्रीलान्स कामे येत होती, त्यामधून मुखपृष्ठ, इलस्ट्रेशनची कामे करत होतो. शिक्षण संपल्यानंतर आर. ए. अ‍ॅडव्हर्टायझिंंगमध्ये पार्टटाइम आर्टिस्ट म्हणून नोकरी मिळाली. थोड्याच दिवसात नारायण पेठेत स्वत:ची जाहिरात एजन्सी सुरु केली. त्यानंतर किस्त्रीम, राजहंस प्रकाशन यांच्यासाठी कामे करत गेलो. १९८३ ते २००३ या काळात बालभारतीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील चित्र काढली. ग्रामीण भागातील मुले मधल्या सुटीच्या काळातही ही चित्र पाहत बसायची. माझ्या कार्टूनच्या आवडीतून प्रभाकर वाडेकर आणि मी मिळून चिंटूची निर्मिती केली. सकाळ वर्तमानपत्रात तो रोज प्रसिद्ध व्हायचा. अल्पावधीतच तो सगळीकडे फेमस झाला होता. त्या चित्रमालिकेचा ३८ पुस्तकांचा संच अजूनही लोकप्रिय आहे. २००३पर्यंत सगळ्याच कामाचा व्याप वाढत गेला. पत्नी भाग्यश्री पण याच क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे पहिल्या दिवसापासून मला तिची चांगली साथ मिळालेली आहे.
नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज घ्यायचा विचारही कधी माझ्या मनात आला नाही. जाहिरात व्यवसायात थोडी पुंजी जमवलेली होती. तिचाच वापर करायचा हे ठरले होते. कर्ज घेणे, या संकल्पनेपासून मी पहिल्यापासूनच लांब राहिलेलो आहे. यदाकदाचित काही कामासाठी कर्ज घ्यावे लागलेच, तर ते वेळेच्या अगोदर फेडायचे, हे माझे तत्व राहिलेले आहे.
काष्ठ चित्रांसाठी आम्हाला मार्वेâटिंग करावे लागले नाही. एखाद्याने हे चित्र कुणाला भेट दिले, तर ती व्यक्ती आमचा पत्ता शोधात आमच्या नारायण पेठेतील सृजन गॅलरीमध्ये येते. त्यामुळे माऊथ टू माऊथ पब्लिसिटी चांगली होत असते. आपल्याकडे राजस्थानमधून चित्रे येत असतात, पण आता ही चित्रे त्याच्या पसंतीला उतरली आहेत. भारतात चेन्नई, मुंबई, हैद्राबाद, बेंगळुरू या ठिकाणी या चित्रांना चांगली मागणी आहे. या शहरातील इंटरनॅशनल एअरपोर्ट्सवर या चित्रांची विक्री होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते रतन टाटा अशा अनेक मान्यवर मंडळींकडे ही चित्रे पोहचलेली आहेत.
सध्या आमच्याकडे ३५ जणांची टीम काम करत आहे. मागणी वाढत आहे, म्हणून आम्ही क्वालिटीबाबत कधीही कॉम्प्रमाईझ करणार नाही. ही चित्र युनिक आर्टच्या प्रकारात येतात, त्यामुळे याची ग्रोथ करत असताना ती टप्याटप्याने करणार आहोत. परदेशातील लोक देखील या चित्राच्या प्रेमात पडले आहेत, दरवर्षी ठरविक काळात ही मंडळी आमच्या गॅलरीला भेट देऊन ही चित्रे खरेदी करून नेतात.

शब्दांकन – सुधीर साबळे

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

डेअरिंगबाज दानिश

Next Post
डेअरिंगबाज दानिश

डेअरिंगबाज दानिश

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.