कोरोना काळात काढलेल्या छायाचित्रासाठी दानिशला नुकताच दुसर्यांदा पुलित्झर पुरस्कार घोषित करण्यात आला असून तो स्वीकारायला तो या जगात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. दानिशने काढलेल्या छायाचित्रांतून कोरोना काळात रुग्णालयात काय अवस्था होती. याची दाहक कल्पना येते.
– – –
मुंबईत आमच्या बरोबरीने वृत्तछायाचित्रकाराचे काम करणारा दानिश सिद्दीकी हा ३८ वर्षीय तरुण अफगाणिस्तानच्या हिंसाग्रस्त कंधार भागात झालेल्या रक्तरंजित संघर्षात तालीबानी सैनिकांकडून मारला जातो या वृत्ताने गेल्या वर्षी सर्वांना धक्काच बसला. दानिश हा रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेचा मुंबईतील मुख्य छायाचित्रकार होता. तो मुंबईत स्थानिक होता. भारतातील रॉयटर्स पिक्चर्सच्या मल्टीमीडिया टिमचा तो प्रमुख होता. रोहिंग्या निर्वासितांच्या संकटाच्या वृत्तांकनासाठी केलेल्या फिचर फोटोग्राफी श्रेणीत २०१८ साली त्याला छायाचित्रणातील सर्वोत्कृष्ठ पुलित्झर पुरस्कार मिळाला.
दानिशने दिल्लीमध्ये अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली होती. २००७ साली जनसंपर्क विषयात त्याने पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. पत्रकारितेला सुरुवात त्याने एका वृत्तवाहिनीवर प्रतिनिधी म्हणून केली. नंतर तो फोटो जर्नालिस्ट झाला. २०१० साली त्याने रॉयटर्समध्ये इंटर्न म्हणून कामाला सुुरुवात केली. दानिश अफगाणिस्तान सैन्यासोबत पाकिस्तान सिमेलगत स्विन बोल्डक भागात अफगाण-तालीबान संघर्षाचे वार्तांकन आणि छायाचित्रण करण्यासाठी गेला होता. हा भाग तालिबानच्या ताब्यात आहे.
अफगाण सैन्य आणि दानिश एका कस्टम पोस्टपासून काही अंतरावर होते. अफगाण सैन्य दोन तुकड्यामध्ये विभागले गेले. या दरम्यान अफगाणी सैन्यातले काही कमांडर आणि सैनिक दानिश याच्यापासून वेगळे झाले त्याचवेळी तालीबान्यांनी केलेल्या हल्ल्यात १६ जुलै २०२१ रोजी दानिश ठार झाला. त्याला प्राथमिक उपचारासाठी शेजारच्या मशीदमध्ये नेण्यात आले हे जेव्हा तालिबान्यांना समजले तेव्हा त्यांनी मशिदीवरही हल्ला केला. काहीजण असेही सांगतात की तालिबान्यांनी जेव्हा दानिशला पकडले तेव्हा तो जिवंत होता. त्याची चौकशी करण्यात आली. ओळख पटल्यानंतर आधी डोक्यावर वार केले मग गोळ्यांनी शरीराची चाळण केली.
त्यानंतर तालिबानने एक निवेदन प्रसिद्ध करून दानिशच्या मृत्यूला आपण जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. तालिबानचा प्रवक्ता म्हणतो की भारतीय पत्रकाराच्या मृत्यूबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो आहोत. या भागात रिपोर्टिंगसाठी येणार्या कुणाही पत्रकारांनी आम्हाला पूर्वसूचना द्यावी म्हणजे आम्ही त्याची काळजी घेऊ.
अफगाणिस्तानच्या विशेष पथकासोबत गेले आठवडाभर दानिश कंधहार प्रांतात होता. तेथून तो संघर्षाचे फोटो आणि बातम्या पाठवत होता. यापूर्वीही त्याच्यावर हवाई हल्ला झाला होता त्यात तो थोडक्यात बचावला होता. दानिशला फोटोग्राफीची खूप आवड होती. मोहरम सणाच्या दिवशी तो रजा घेऊन मोहरम कव्हर करण्यासाठी अमरोहाला गेला होता. तेथे त्याची भेट रॉयटर्सचे मुख्य फोटोग्राफरशी झाली. दानिशचे फोटो पाहून त्याला नोकरीची ऑफर देण्यात आली. त्याने दिल्लीतील हिंसाचार, शेतकरी आंदोलन, करोना लाटेत रुग्णांचे झालेले हाल इत्यादी महत्वाच्या घटना कॅमेर्यात कैद केल्या.
कोरोना काळात काढलेल्या छायाचित्रासाठी दानिशला दुसर्यांदा पुलित्झर पुरस्कार घोषित करण्यात आला असून तो स्वीकारायला तो या जगात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. दानिशने काढलेल्या छायाचित्रांतून कोरोना काळात रुग्णालयात काय अवस्था होती याची दाहक कल्पना येते. दानिशचे वडील प्राध्यापक अख्तर सिद्दिकी आणि आई शाहिदा यांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात तालीबान विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमन यांनी शोध आणि प्रभावशाली वृत्त छायाचित्रणातील कार्याबद्दल दानिश याला मरोणोत्तर ‘रेड इंक जर्नालिस्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार दिला. त्याची पत्नी फ्रेडरिक सिद्दिकी यांनी तो स्वीकारला.