अशी आहे ग्रहस्थिती : राहू-हर्षल मेषेत, मंगळ वृषभ राशीत, केतू तुळेत, बुध धनु राशीत, रवि-शुक्र-प्लूटो मकरेत, शनि-नेपच्युन कुंभ राशीत, गुरु मीन राशीत, चंद्र मकरेत त्यानंतर कुंभ मीनेत.
दिनविशेष – २१ जानेवारी रोजी दर्श अमावस्या, २५ जानेवारी गणेश जयंती, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन.
मेष : संततीच्या कर्तबगारीमुळे अभिमान वाटेल. त्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. आठवडा मस्त जाईल. धनभावात मंगळाला शनिची साथ मिळेल. बुद्धिकौशल्याच्या जोरावर यशाचे शिखर गाठाल. पत्नीचे सहकार्य मिळेल. नोकरीत विदेशात जाण्याचा मार्ग मोकळा होईल. घरात धार्मिक कार्य पार पडेल. नोकरीत विशेषाधिकार प्राप्त झाल्याने जबाबदारी वाढेल. विमा व्यावसायिकांसाठी चांगला काळ. बुधाच्या भाग्यातील भ्रमणामुळे पर्यटन होईल.
वृषभ : शुक्र भाग्यात, शनिचे कर्म भावातील राश्यांतर यामुळे शुभघटनांचा अनुभव येईल. समाजात मानसन्मान मिळेल. शिक्षणक्षेत्रात मोठा सन्मान मिळेल. सरकारी कामे होतील. शेतकर्यांना लाभदायक काळ आहे. शनि-मंगळ केंद्रयोगामुळे धावपळ वाढेल. व्यवसायात चांगली उलाढाल होईल. अनपेक्षित लाभाचे प्रमाण वाढेल. २० आणि २१ रोजी होणार्या चंद्र-मंगळ षडाष्टक योगामुळे मन अस्थिर राहील.
मिथुन : आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. हंस योगातील गुरूमुळे फक्त बुडत्याला काडीचा आधार मिळेल. शेअर बाजारातील गुंतवणुकीत नुकसानीची शक्यता आहे. २१ जानेवारीची अमावस्या खर्चाची राहील. वाहन सावकाश चालवा. व्ययभावातून मंगळामुळे अपघात घडू शकतो. शनीमुळे सकारात्मक स्थिती निर्माण होऊन परिस्थितीला सामोरे जाल. संस्मरणीय घटना घडतील. नवीन शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.
कर्क : लाभदायक संधींचा फायदा घ्या. कामे पुढे सरकतील. मात्र, तगादा लावावा लागेल. राहू-केतू अनुकूल नसूनही भाग्येश गुरूमुळे सहकार्य मिळेल. आरोग्यसमस्या निर्माण होतील, छोटी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. खेळाडूंसाठी, अभियंत्यांना काळ उत्तम आहे. नोकरीनिमित्ताने प्रवास घडेल. धार्मिक यात्रा घडतील. अमावस्येचा काळ दाम्पत्यजीवनासाठी क्लेशकारक आहे.
सिंह : फारसा प्रभावी आठवडा नाही. रवीच्या षष्ठातील भ्रमणामुळे कामात मन लागणार नाही. आळस जाणवेल. जमिनीच्या व्यवहारातून मोठा आर्थिक लाभ होईल. पदरात पडतंय ते घ्या. मंगळामुळे अनेक कामे मार्गी लागतील. काहीजणांची कामे लांबणीवर पडतील, उशीर होतील. सप्तम भावातील शनी-नेपच्युन युतीमुळे फसवणूक होऊ शकते. नेते मंडळींसाठी सन्मानाचा काळ राहणार आहे. मामाचे सहकार्य मिळेल.
कन्या : विविध मार्गांतून चांगले फायदे मिळतील. शनीचे राश्यांतर, मार्गी झालेला मंगळ यांच्यामुळे निर्णयाचे योग्य फळ मिळेल. बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह केंद्रयोगात आहेत. कौटुंबिक सौख्याचा काळ असला तरी भावाचे सहकार्य मिळणार नाही. मालमतेबाबत वादाचे प्रसंग घडतील. अमावस्या आर्थिक लाभाची राहील. कोर्टकचेरीचे निर्णय तुमच्या बाजूने लागतील. नोकरीत अपेक्षित बदल होतील. बांधकाम व्यावसायिकांसाठी उत्तम आठवडा आहे. घरात आजारपण येईल. व्यावसायिक उलाढाल चांगली होईल.
तूळ : शुक्राचे राश्यांतर शनिबरोबर पंचम भावात होत असल्याने सर्व कामांत यश आणि समृद्धी मिळेल. अनपेक्षित बदल घडून येतील. ध्यानीमनी नसणार्या कामात सहज यश मिळेल. संततीचा उत्कर्ष होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. अमावस्या विशेष लाभाची राहील. समाजात एखाद्या मोठ्या प्रसंगात महत्वाची भूमिका पार पाडाल. प्रतिष्ठा मिळेल. दूरचा प्रवास घडेल. झटपट कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : कटू-गोड अनुभवाच्या जोरावर घोडदौड सुरु राहील. शनि सुखस्थानात असल्याने अडकून राहिलेली कामे मार्गी लागतील. रवि पराक्रम भावात असल्याने व्यवसायात मोठ्या उलाढाली होतील. नव्या ओळखी होतील. त्यातून आर्थिक लाभ होतील. संततीची प्रगती होताना दिसेल. उच्चशिक्षणात, व्यवसायात नव्या संधी चालून येतील. करियरला नवीन दिशा मिळेल. भविष्यात त्यामधून चांगला आर्थिक लाभ मिळेल.
धनु : साडेसातीमधून झालेल्या मुक्ततेमुळे भविष्यात नवे मार्ग सापडतील. महिला वर्गाला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. पंचम भावात राहू-हर्षल, त्यावर शनीची दृष्टी त्यामुळे बेताने राहा. मुलांनी पुढील अडीच वर्षे शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, अन्यथा खंड पडू शकतो. नोकरीत उत्तम काम केल्याने वरिष्ठ खूष राहतील, भविष्यात फायदा मिळेल. नवीन गुंतवणूक होईल.
मकर : व्यवसायाच्या नव्या संधी मिळवून देण्यासाठी उत्तम काळ आहे. शनीचे धन भावातील राश्यांतर, २३ जानेवारीला होणारे शुक्राचे भ्रमण हे मकर जातकांसाठी खूपच उत्तम आहे. कौटुंबिक कार्यक्रमात रमाल. मिष्टान्नभोजनाचा योग जुळून येईल. सट्टा,
लॉटरीतून चांगली अर्थप्राप्ती होईल. धार्मिक कार्याच्या निमित्ताने प्रवास होतील. विवाहासाठी गुरु अनुकूल आहे, लग्न जमेल.
कुंभ : दशम भावावर शनिची दृष्टी असल्याने संमिश्र फळाचा अनुभव येईल. शुक्राच्या शनीबरोबरच्या भ्रमणामुळे कलागुणांना चांगला वाव मिळेल. शनि-मंगळाची सप्तमभावावर दृष्टी असल्यामुळे वैवाहिवâ आणि व्यावसायिक भागीदारांबरोबर हेवेदावे होतील. भांडणे होतील. मानसिक स्वास्थ्य बिघडेल. जमीन खरेदी विक्री व्यावसायिक, अभियंते, यांच्यासाठी चांगला काळ आहे. संततीला चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी मिळेल. लेखकांसाठी उत्तम काळ आहे. व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने दूरचे प्रवास घडतील.
मीन : प्रत्येक पाऊल टाकताना खूप विचार करा. शनिभ्रमण सुरु असल्यामुळे आर्थिक गणित चुकू शकते. उधार उसनवारी टाळा. गुरूमुळे सर्व स्थिती नियंत्रणात राहील. आरोग्याची काळजी घ्या. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल. देवदर्शन होईल. गुरुतुल्य व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत बढती होईल. महत्वाचे पद मिळेल. सरकारी सुविधेचा लाभ घेता येईल.