रात्री तीन वाजता मोबाइलची रिंग वाजली आणि सारंग खाडकन झोपेतून जागा झाला. कोणी तडफडायला फोन केलाय इतक्या रात्री? असा विचार करत सारंगने मोबाईल जवळ ओढला. स्क्रीनवर इन्स्पेक्टर राघवचे नाव चमकले, तसा तो सावध झाला. राघव आणि इतक्या रात्री?
’बोल राघव…’
’सारंग लगेच चौकीला ये.’
’काय झाले काय?’
’तू ये मग आपण बोलू. आणि येताना तुझ्या बॅरिस्टर मित्राला, धवल राजहंसला फोन करून येशील तर बरे होईल.’ गंभीर आवाजात राघव म्हणाला आणि सारंग चमकला. प्रकरण गंभीर दिसत होते.
’राघव एनिथिंग सीरियस?’
’प्रचंड सीरियस…’
पुढच्या आठ मिनिटात सगळं आवरून सारंगने बुलेट बाहेर काढली आणि तो चौकीकडे निघाला. दहाव्या मिनिटाला चौकीत हजर. आत चिंताग्रस्त चेहर्याने राघव बसलेला होता.
’राघव? काय झालं काय अचानक?’
’सारंग, रात्री ११ ते २ दरम्यान तू कुठे होतास?’
’पर्ल बारमध्ये’
’किती वाजेपर्यंत होतास?’
’रात्रीचा एक दीड वाजला असेल.’
’आणि घरी कसा आलास?’
’अरे यार तो एक किस्साच झाला. माझी गाडी अचानक बंद पडली. त्यामुळे मग झक मारत रिक्षा केली आणि आलो. रिक्षावाला पण साला असला माजोरी होता..’
’त्या रिक्षावाल्याला ओळखू शकशील?’
’चांगलाच..’
राघवने मोबाइल उघडला आणि एक फोटो सारंगसमोर धरला. सारंगने त्या फोटोतल्या रिक्षावाल्याला लगेच ओळखले. फक्त फरक इतकाच होता की फोटोत तो मरून पडलेला होता आणि छातीवर भला मोठा रक्ताचा डाग होता. सारंग चांगलाच हडबडला.
’रिक्षात बसताना या रिक्षावाल्याशी तुझे चांगले वाजले होते, असे स्टेटमेंट दिले आहे पर्ल बारच्या चौकीदाराने.’
’अरे पण एवढ्यावर काय खून करेन का मी त्याचा? काय बोलतो यार तू पण?’
’तुझी गन कुठे आहे?’
’ती रात्री मी गडबडीत गाडीत विसरलोय…’
’शाबास! चल आधी ती गन कलेक्ट करू,’ झटपट उठत राघव म्हणाला.
’राघव तुला खरंच माझ्यावर संशय आहे?’
’मला नाही! पण कायद्याला नक्की आहे,’ राघव सारंगच्या नजरेला नजर भिडवून म्हणाला.
पहाटेची वर्दळ सुरू झालेली होती, पण रस्ता बर्यापैकी मोकळा होता. राघवने गाडीला चांगलाच स्पीड दिला आणि पंधरा मिनिटात ते पर्ल बारच्या दारात हजर झाले.
’हँड ओव्हर द गन टू मी,’ सारंगच्या गाडीकडे जात असताना राघवने हुकूम सोडला. चडफडत सारंगने रिमोटने पुढचे दार उघडले आणि दाण्कन् दरवाजा उघडला. आतले दृश्य बघून तो आणि राघव दोघेही जागी उडाले. आतमध्ये एका तरुणीचे प्रेत पडलेले होते.
’दीपाली..’ अस्पष्ट शब्दात सारंग ओरडला.
– – –
’प्रसिद्ध गुप्तहेर सारंग दर्यावर्दी यांना डबल मर्डर केसमध्ये अटक’ शहरातल्या प्रत्येक पेपरची ही एकमेव हेडलाइन होती. विनावर्दीचा कायद्याचा रक्षक ही त्याची प्रतिमा क्षणात डागाळली होती. त्याच्या बेफामपणाचे चाहते आता त्याच्या वागण्याकडे बोट दाखवू लागले होते. क्षणात सारे चित्र बदलले होते. पण त्याला मुख्य चिंता होती स्वतःची मान वाचवायची. कोणीतरी त्याला मस्त लटकवले होते, हे नक्की? पण कोण?
’वा वा वा! गुन्हेगारांना गजाआड करणारे आज स्वतःच गजाआड?’ हसत हसत धवलने एंट्री घेतली आणि सारंगचा जीव भांड्यात पडला. आलम शहर ज्याच्या बुद्धीचे आणि न्यायचातुर्याचे दिवाने होते असा बॅरिस्टर धवल राजहंस आणि त्याचा जिवलग मित्र त्याच्या मदतीला धावला होता.
’थट्टा सोड धवल. जर माझ्यासारख्याला खुनात अडकवू शकतो, तर तो माणूस किती हुशार आणि कारस्थानी असेल, विचार कर. मला इथून बाहेर पडावे लागेल. तरच तो हाताला लागेल. मला नाही वाटत पोलिसवाले सहजासहजी त्याच्यापर्यंत पोहोचतील.’
’तुझी चिंता रास्त आहे. पण तूर्तास जामीन मिळणे अवघड आहे.’
’म्हणजे?’
’एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज. ज्या तरुणीचे प्रेत तुझ्या गाडीत सापडले तिचा दोरीने गळा आवळून खून झाला आहे, तर रिक्षावाल्याला सरळ गोळी घालण्यात आली आहे. ती गोळी तुझ्या गनमधून झाडल्याचे स्पष्ट झाले आहे.’
’ह्या दोन्ही बॅड न्यूज आहेत मित्रा,’ हताशपणे सारंग म्हणाला.
’तुला खून करायचे होते आणि तुझ्याकडे गन देखील होती, तर एक खून दोरीने आणि दुसरा गनने कशाला करायला जाशील? सरळ दोघांना गोळीच घालणार नाहीस का?’
’मला हे वकिली युक्तिवाद नको ऐकवू रे. मी बाहेर कधी येईन ते सांग!’
’सध्या अवघड आहे. सरकारी पक्षाकडे मजबूत पुरावे आहेत. त्यातून तू अडकलेला आहेस म्हणाल्यावर सरकारने जोशीसारखा तगडा वकील उभा केला आहे,’ जोशीचे नाव ऐकून सारंगची काळजी अधिकच वाढली.
’त्या मुलीची काही माहिती मिळाली धवल?’
’माझे प्रयत्न चालू आहेत, पण राघव हाताला काही लागू देत नाहीये. तू अडकल्यावर मी सर्वस्व पणाला लावणार हे त्याला माहिती आहे. त्याने प्रचंड मेहनत घेऊन जोशीसोबत केस उभी करायला सुरुवात केली आहे.’
– – –
’ऑर्डर ऑर्डर..’ जज प्रजापती गरजले अन कोर्टातली कुजबूज शांत झाली. जोशी वकील आपला गाऊन सावरत सावकाश उभे राहिले आणि त्यांनी कोर्टावर नजर फिरवली. पुरेसे नाटकीय वातावरण तयार झाल्याची खात्री पटल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली.
’युवर ऑनर, आरोपीच्या पिंजर्यात उभा असलेला हा तरुण ह्या शहराचा लाडका हीरो आहे. गणवेशाशिवाय पीडितांना न्याय मिळवून देणारा म्हणून प्रसिद्ध आहे. पण ह्या सगळ्या खोट्या मुखवट्यांमागे किती काळा चेहरा लपलेला आहे, हे आता उघड झाले आहे. अत्यंत थंड डोक्याने दोन दोन खून करून हा माणूस नामानिराळा झाला होता. मात्र शेवटी कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचले. ओपन एॅड शट अशी ही केस आहे. प्रत्येक पुरावा बळकट आहे. आता मी ह्या गुन्ह्याची पार्श्वभूमी विदित करतो.
आरोपी सारंग दर्यावर्दी बरेचदा विविध बारला जात असतो. अशाच एका बारमध्ये त्याची दीपालीबरोबर ओळख झाली. ती वेट्रेस म्हणून काम करायची. त्यांचे संबंध देखील लवकरच जुळले. पण काही अज्ञात कारणाने तिने आरोपीशी असलेले सगळे संबंध तोडले. आरोपीला ते फार जिव्हारी लागले. एका सामान्य वेट्रेसने केलेला अपमान त्याला सहन झाला नाही. त्यातच बहुदा त्याच्या त्रासाला कंटाळून तिने तो बार देखील सोडला. खुनाच्या रात्री आरोपीला दीपाली पर्ल बारमध्ये कामाला लागल्याचे समजले आणि तो लगेच तिकडे धावला. आधी त्याने भरपूर दारू प्यायली मात्र दीपालीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असावे. बार बंद व्हायच्या वेळेस तो आधीच बाहेर पडला आणि आपल्या गाडीत तिची वाट पाहत थांबला. त्याने नक्की दीपालीला काय भूल घातली माहिती नाही, पण बारबाहेर पडल्यावर ती त्याच्याशी बोलायला त्याच्या गाडीत शिरली. दोघांच्यात पुन्हा एकदा जोरदार वाद झाले आणि दीपालीने त्याला आपण लग्न करत असल्याचे सांगितले, ते देखील रोज तिला न्यायला, सोडायला येणार्या रिक्षावाल्याबरोबर. एका रिक्षावाल्यासाठी आपल्याला अव्हेरलेले पाहून आरोपीने रागाच्या भरात दीपालीचा गळा आवळला. त्याचवेळी नेमका दीपालीचा रिक्षावाला तिथे आला. आरोपीने आपली गाडी बंद पडल्याचे नाटक केले आणि रिक्षात बसला. काही दूर अंतरावर जाताच त्याने ह्या सगळ्याचे कारण बनलेल्या त्या बिचार्या निरपराध रिक्षावाल्याचा देखील अमानुषपणे खून केला आणि घराचा रस्ता धरला. मात्र, परत जाऊन गाडीतील प्रेत व इतर पुरावे नष्ट करण्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यासंदर्भातले सर्व पुरावे आणि साक्षीदार मी न्यायालयात हजर करेनच. दॅट्स ऑल!’
भलेमोठे भाषण करून जोशी साहेब बसले आणि शांतपणे धवल उभा राहिला.
’युवर ऑनर, माझ्या वकील मित्रांनी गोष्ट तर मोठी रंजक उभी केली आहे. पण हे हवेचे फुगे लवकरच फुटतील आणि खरे काय ते कोर्टासमोर येई, ह्याची मी खात्री देतो.’ दोनच वाक्यात जोशींच्या तासाभराच्या श्रमांची हवा काढून घेत धवल खाली बसला.
’युवर ऑनर, माझा पहिला साक्षीदार आहे अजय सिंग,’ एका दणकट आणि उंचपुर्या माणसाने स्टँड घेतला.
’तुझ्याविषयी कोर्टाला माहिती दे.’
’नाव अजय सिंग. मी पर्ल बारला पहारेकरी आहे साहेब.’
’खून झाला त्या रात्री कामावर तूच होतास?’
’हो साहेब.’
’आरोपीच्या पिंजर्यातल्या माणसाला तू ओळखतोस? किंवा कधी कुठे पाहिले आहेस? पर्ल बारमध्ये?’
’ऑब्जेक्शन युवर ऑनर! सजेस्टिव क्वेश्चन…’ पहिल्या दोन मिनिटात खाडकन पहिले ऑब्जेक्शन पडले आणि जनता सावरून बसली… अब आयेगा मजा…
’सस्टेंड…
’आरोपीच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या माणसाला तू ओळखतोस? किंवा कधी कुठे पाहिले आहेस?’ जोशींनी आपल्या प्रश्नात बदल केला.
’हो साहेब. त्या रात्री मीच त्यांना रिक्षा बघून दिली होती. रमेश जायला तयार नव्हता. मग हे साहेब त्याच्याशी भांडायला लागले. चांगल्या घरचा माणूस दिसतोय म्हणून शेवटी मीच रमेशला समजावले आणि पाठवले. मोठी चूक झाली साहेब माझ्या हातून.’
जोशींनी क्रॉसची खूण केली आणि धवल उठला.
’अजय सिंग, ह्या साहेबांची गाडी खरंच बंद पडली होती? किंवा गाडीत काही झटापट झाल्याचे आवाज? किंवा दीपालीला तू ह्या साहेबांच्या गाडीत बसताना पाहिलेस का?’
’नाही साहेब. पर्ल बारच्या पार्किंगचे काम चालू आहे. त्यामुळे चारचाकीवाले गेले काही दिवस बारच्या बाहेरच्या बोळात गाड्या लावतात. ते थोडे दूर आहे आणि तिथे सीसीटीव्ही पण तिथे नाहीये.’
धवल काही क्षण विचारात पडला.
’बरं हे साहेब जायच्या किती वेळ आधी दीपाली बाहेर पडली?’
’कल्पना नाही साहेब. बारचा स्टाफ मागच्या गेटने बाहेर पडतो.’
धवलने जाण्याची खूण केली आणि अजय बाहेर पडला.
अजय नंतर फोरेन्सिक एक्सपर्ट डॉ. रुबीन साक्षीला आले.
’डॉ. रुबीन, दीपाली आणि रमेशच्या खुनाबद्दल काय सांगता येईल?’
’वेल… दीपालीचा मृत्यू तिच्याच ओढणीने गळा आवळल्याने झाला. गळ्यावरच्या खुणांवरून तो खून आहे स्पष्ट होते. तर रमेशला पाठीमागून गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली आहे.’
’खुनाची वेळ?’
’दोन्ही खून रात्री एक ते पहाटे पाचच्या दरम्यान करण्यात आले आहेत.’
’खुनाच्या ठिकाणी काही अन्य पुरावे?’
’वेल.. गाडी आरोपीच्या मालकीची असल्याने त्याचे केस, हाताचे ठसे, शू मार्क्स सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होते. जी बंदूक मला तपासण्यासाठी दिली होती, तिच्यावर देखील आरोपीच्या हाताचे ठसे होते.’
’थँक यू!’ विजयी स्वरात जोशी चित्कारले आणि त्यांनी धवलला खूण केली.
’डॉक, मला सांगा दोन्ही लोकांच्या शरीरावर काही जखमा, मारामारी अथवा बळजबरी झाल्याच्या खुणा?’
’रमेशची बॉडी क्लीन होती पण…’
’पण?’
’दीपालीच्या उजव्या अंगठ्याचे नख अर्धवट तुटलेले होते.’
’ते गाडीत सापडले?’
’नाही.’
’म्हणजे ते खुन्याच्या कपड्याला अडकून राहिले असण्याची शक्यता आहे.’
’जर ते खुनाच्या वेळी तुटले असेल तरच. आधी कधी तुटलेले देखील असू शकते.’
’आरोपीच्या शरिरावर काही झटापट झाल्याच्या, ओरखडल्याच्या खुणा?’
’एकही नाही. अॅक्च्युअली दीपालीला मागून ओढणीचा फास दिला गेल्याने तिला फारशी झटापट करण्याची संधी मिळाली नसावी,’ खाडकन डॉ. रुबीन बोलले आणि धवल एकदम चमकला. त्याने जोशींकडे पाहिले, मात्र त्यांनी आपली नजर फिरवली.
’युवर ऑनर, सहसा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या गाडीत चर्चेसाठी आमंत्रण देतो, तेव्हा तिला आपल्या शेजारी बसवतो. दोघेच लोक असताना ते एकमेकांशी मागे पुढे बसून गप्पा का मारतील? काय म्हणता डॉ. रुबीन?’
’ऑब्जेक्शन युवर ऑनर! सजेस्टिव क्वेश्चन,’ आता जोशी किंचाळले. पण तोवर धवलचे काम झाले होते. जज आणि जनता दोघांच्या डोक्यात त्याने शंकेचा भुंगा सोडून दिलेला होता. कोर्टाचे कामकाज संपले आणि धवलने सारंगला गाठले.
’काळजी करू नकोस. आज रात्रीत मला महत्त्वाची दोन कामे उरकायची आहेत. माझा संशय खरा ठरला, तर उद्याच खुन्याला उघडे पाडतो बघ,’ विश्वासाने धवल म्हणाला आणि सारंगचा चेहरा उजळला.
– – –
आज पहिलीच साक्ष इन्स्पेक्टर राघवची झाली आणि त्याने सारंग चौकीत आल्यापासून सगळे काही खुलासेवार सांगितले. क्रॉससाठी धवल उभा राहिला, तसा राघव सावध झाला.
’इन्स्पेक्टर, तुम्ही दोन्ही मयतांचे मोबाइल कॉल रेकॉर्ड्स चेक केलेत? शेवटचे फोन कोणाचे होते?’
’दीपालीच्या फोनवर शेवटचा फोन रमेशचा होता आणि रमेशच्या फोनवर अजयचा होता. रमेश सुखरूप पोहोचला का नाही, हे त्याला बघायचे होते.’
’रमेशकडे फोन नव्हता? त्याने का फोन केला नाही?’
’तो आधीच हुज्जत घालून वैतागला असावा त्यामुळे…’
’रमेशचे प्रेत कुठे सापडले?’
’बारपासून पाच मिनिटाच्या अंतरावर…’
’आरोपी चौकीत किती वाजता आला?’
’साधारण साडे तीन वाजता.’
’आणि रमेशच्या लास्ट कॉलचे टायमिंग काय आहे?’
’दोन सत्तावीस…’
’म्हणजे दीड वाजता दीपालीचा खून करून पंधरा मिनिटे हुज्जत घालून आरोपीने पुढे पाच मिनिटांच्या अंतरावर रमेशचा खून करून पुन्हा स्वतःचे लांबचे घर गाठले? आणि दहा मिनिटांत चौकीत हजर झाला? पण दोन सत्तावीसपर्यंत तर रमेश जिवंत होता.’
घड्याळाची टिक टिक देखील भयाण वाटायला लागली अशी शांतता कोर्टात पसरली.
’युवर ऑनर, कोर्टाची परवानगी असेल, तर मी अजय सिंगला पुन्हा एकदा कोर्टात बोलावण्याची विनंती करतो.’
’अजय सिंग, मला फक्त एका प्रश्नाचे उत्तर दे. तू साक्षीत म्हणालास की हॉटेलचा सर्व स्टाफ मागच्या दाराने बाहेर पडतो. दीपाली देखील रोज तेच करायची.’
’बरोबर आहे साहेब.’
’मग त्या दिवशी तिला न्यायला येणारा रमेश पुढच्या गेटपाशी कोणाची वाट बघत होता?’ खाडकन् धवलने प्रश्न फेकला आणि पुन्हा एकदा सर्वजण स्तब्ध झाले. अजय सिंग आलटून पालटून जोशी आणि धवलकडे पाहत राहिला.
’तो माझी आणि ह्या साहेबांची हुज्जत बघून सोडवायला आला होता.’
’पण तू तर म्हणालास की आरोपीचे आणि रमेशचे भांडण झाले आणि तू मध्ये पडलास.’
’ते ते…’
’बरं ते जाऊ दे. मला सांग नोकरीला लागण्याचा आधी तू काय करायचास?’
’ऑब्जेक्शन युवर ऑनर. ह्या सगळ्याचा इथे काय संबंध?’
’संबंध आहे आणि तो मी सिद्ध करून दाखवणार आहे!’
’बोल अजय सिंग…’
’मी चोर होतो… पण दोन वर्षे झाली साहेब मी हे सगळे धंदे सोडले आहेत.’
’मला सांग अजय सिंग तू पर्लमध्ये नोकरीला लागण्याआधी कुठल्या बारमध्ये कामाला होतास?
‘मी कोणार्कला कामाला होतो.’
’दीपाली देखील तिथेच कामाला होती, बरोबर ना?’ पुन्हा एकदा गोळीसारखा प्रश्न आला आणि अजय सिंग आता पुरता भांबावला.
’हे सगळे काय चालले आहे कळेल का?’ जोशी धुसफुसत म्हणाले.
’युवर ऑनर, ह्या खुनांमागची कथा मोठी रोचक आहे. अजय सिंग हा आधी छोट्या मोठ्या चोर्या करायचा. घबाड हाताला लागले की त्याची धाव असायची कोणार्क बारला. इथेच त्याची आणि दीपालीची ओळख झाली. मात्र तो चोर आहे कळल्यावर दीपाली त्याला टाळायला लागली. प्रेम काय चीज असते बघा, प्रेमाखातर सगळे धंदे सोडून अजय सिंग चक्क त्याच बारमध्ये बाउन्सर म्हणून कामाला लागला. त्याला काही करून दीपालीला मिळवायचे होते. मात्र ती त्याला टाळायला लागली होती, कारण तिच्या आयुष्यात आता प्रामाणिक आणि मेहनती रमेश आला होता. बहुदा अजयलाच वैतागून तिने बार बदलला. मात्र तिचा माग काढत अजय देखील तिथे पोहोचला. खुनाच्या रात्री त्याचे आणि सारंगचे वाद झाले होते. सारंगला काहीतरी धडा शिकवावा, असे त्याला वाटत होते. त्याचवेळी ड्यूटी संपवून दीपाली बाहेर आली आणि सारंगच्या गाडीपाशी घुटमळणार्या अजयने तिला पकडले. त्या दिवशी तिने बहुदा ठामपणे त्याला नाकारले आणि आपल्या आणि रमेशच्या लग्नाबद्दल देखील कल्पना दिली. शेवटची ठिणगी पडली होती. संतापलेल्या अजयने तिच्याच ओढणीने तिला संपवले. त्या दिवशी सगळ्या जगावरच तो संतापला होता. त्याने आपले जुने कौशल्य वापरून सारंगच्या गाडीचे दार उघडले आणि दीपालीचे प्रेत आत टाकून दिले. त्याच्या दृष्टीने त्याने सारंगला देखील धडा शिकवला होता. ते प्रेत आत टाकत असतानाच त्याच्या हाताला सारंगची गन लागली आणि क्षणात त्याच्या डोक्यात रमेशचा काटा काढण्याचा विचार पक्का झाला. त्याने रमेशला फोन करून बारच्या पुढच्या चौकात बोलावले आणि त्याचा देखील काटा काढला.’
’काय अजय सिंग द ग्रेट, जवळपास असेच सर्व घडले ना?’ करड्या आवाजात धवलने विचारले, पण अजय सिंगची मान काही वर झाली नाही.