महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांमधून विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी मतदान घेण्यात आले आणि सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. त्याबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भर सभागृहात आपापली पाठ थोपटून घेत एकमेकांचे अभिनंदन करून महाविकास आघाडीला हिणवू लागले. जणू काही महायुतीने फार मोठी मर्दुमकी गाजवून हा विजयी पराक्रम गाजविला असावा.
दोन वर्षांपूर्वीच्या आपल्या तथाकथित मर्दुमकीच्या आठवणी सांगत ‘वर बसलेत ना दोघे, त्यांचा बुलडोझर फिरेल’, अशी अशोभनीय भाषाही भर सभागृहात करण्यात आली. मुळात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार उभे होते आणि त्यांना मतदान करणारे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांपैकीच मतदार होते. हे काही नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर निवडून आलेले आमदार नव्हते. २८८मधून काहीजण लोकसभेवर निवडून गेल्यामुळे मतदारांची संख्या २७४ झाली होती. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत पराभव झाला. त्यामुळे या विधानपरिषदेत लागलेल्या निकालामुळे ईडीए (एकनाथ देवेंद्र अजित) सरकारला भलेही दिलासा वाटत असला तरी वास्तव काय आहे हे या तिघांनाही माहित असूनही वेड घेऊन पेडगावला जाण्याचे बेमालूम नाटक त्यांनी वठविले आहे.
दोन वर्षांपूर्वी शिंदे आणि अजितदादा भारतीय जनता पार्टीच्या कळपात सामील झाल्यानंतर जे पक्षीय बलाबल महाराष्ट्र विधानसभेत आहे त्या आधारे जे निवडून आले ते येणारच होते. उलटपक्षी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेचे १५ आमदार असतानाही तब्बल २४ मते मिळवीत ठासून विजय मिळविला. शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील हे पराभूत झाले, त्यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. मुळात शेकापचे एकमेव आमदार असताना त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची १२ मते मिळाली. म्हणजे ते पराभूत होणारच होते. सर्वच राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन समन्वय राखला असता आणि बारावा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविला नसता, तर सगळेच द्राविडी प्राणायाम टळले असते; पण काहींचे लक्ष्मीदर्शन हुकले असते अशी चर्चा आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे-पालवे यांचे राजकीय पुनर्वसन झाले. भावना गवळी यांना लोकसभेची उमेदवारी दिली नव्हती, त्यांचे आणि कृपाल तुमाने यांचे पुनर्वसन करण्यात आले. सदाभाऊ खोत यांना निवडून आणून राजू शेट्टी यांना पर्याय उभा करणे भाजपासाठी अपरिहार्य होते. परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे (भाजप), राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे (अजित पवार गट) यांना संधी मिळाली. अर्थात हे सारे महायुतीचे उमेदवार निवडून आणून सत्ताधार्यांनी फार मोठी मर्दुमकी गाजविली असे मुळीच नाही.
शरद पवार लोकसभेच्या निवडणुकीनंतर म्हणाले की विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला २२५ जागा मिळतील, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मविआ एकजुटीने आणि जबरदस्त ताकदीने विधानसभा निवडणूक लढवून मंत्रालय आणि विधानभवनावर भगवा फडकवील, असा निर्धार बोलून दाखवला. त्यामुळे महायुती अस्वस्थ झाली. लोकसभा निवडणुकीतील जबरदस्त पराभवानंतर एकमेकांवर दोषारोप करण्यात आले. त्यामुळे ११पैकी ९ जागा जिंकल्याचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ही काही फार मोठी मर्दुमकी नव्हे. २०१९ साली निवडून आलेल्या आणि दोन वर्षांपूर्वी झालेल्या उलथापालथीमुळे जे २७४ आमदार जिथे आहेत त्यांनीच केलेल्या मतदानाच्या आधारे हा निकाल लागला आहे. हे तर होणारच होते, उगाच स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून, पेढे वाटून काही काळ आनंदाच्या नंदनवनात वावरायला हरकत नाही.
माध्यमांमधूनही वास्तव काय आहे हे समजून घेण्याऐवजी ‘महाविकास आघाडीवर महायुतीने केली मात’ अशा पद्धतीने पसरविले जात आहे, जे मुळीच वस्तुस्थितीला धरून नाही. घोडेबाजार झाला असल्याची चर्चा असली तरी घोडामैदान जवळच आहे.