बारामती एसटी स्टँडचा मुख्य गेट… झुंजूमुंजू अंधुकसा प्रकाश… टाळमृदंगाचे मंजुळ ध्वनींनी वातावरण भक्तीमय झालेलं… जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांच्या दिंड्या बारामतीकडून सणसरच्या दिशेने निघालेल्या… आणि याच दरम्यान एक एक वाहन बारामती एसटी स्टँडसमोर येत होतं… त्यातून उतरलेल्या लोकांनी असेल त्या ठिकाणी ठाण मांडलं… कुणी ढोलकी काढली… कुणी टाळ काढले… सुरू झाला अभंग आणि समतावादी गाण्यातून विवेकचा जागर… निमित्त होतं ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या अभिनव उपक्रमाचं…
‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम गेली ११ वर्षे सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्या पुण्यातून पुढे गेल्यानंतर पहिल्या रविवारी साहित्यिक, लेखक, पत्रकार, सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्ते मिळून संत ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज यांच्या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वारसा समजून घेतात. या वर्षी हा सोहळा जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात ७ जुलै रोजी बारामती ते सणसर या दरम्यान झाला.
या वर्षी हा सोहळा बारामती येथून सुरू होत असल्याने त्याची माहिती देण्यासाठी मी आणि हा उपक्रम ज्यांना सुचला ते राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. माझ्या कल्पनेतून गेली काही वर्षे निघत असलेली ‘संविधान समता दिंडी’ही या उपक्रमासोबत असल्याचे त्यांना सांगितले. पवार यांना हे दोन्ही उपक्रम आवडले आणि यात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
मुंबई, पुणे, सातारा, संगमनेर, मिरज, नाशिक, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, लातूर, बीड, संभाजीनगर, सिंधुदुर्ग आदी ठिकाणांवरून लोक या उपक्रमात सहभागी होण्यासाठी येणार होते. सकाळी साडेसातची वेळ सर्वांना दिली होती, परंतु सात वाजल्यापासूनच लोक जमा होऊ लागले. मिरज, संगमनेर, कोल्हापूरची टीम उतरली. सोबत टाळ, वीणा आणि मृदंग आणलेले. आपल्यासोबत आणलेली ताडपत्री रस्त्याच्या कडेलाच अंथरून समतेचा खेळ मांडला गेला.
खेळ मांडियेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाई रे ।
वर्ण अभिमान विसरली याती ।
एकमेका लोटांगणे जाती ।।
हा अभंग अनेकदा ऐकलेला असतो. पण दिंडीतील वातावरण पाहून त्याचा अर्थ उलगडायला लागतो. या वारीत संतांनी मांडलेल्या खेळाचा परिणाम काय झाला याचे गुह्य उलगडायला लागतं. वर्णाचा अभिमान विसरला… त्या वर्णव्यवस्थेतून आलेल्या जातीच्या उतरंडी ढासळल्या… परिणामी… एकेका लोटांगणे जाती या अवस्थेला वारकरी पोहचले.
वारकरी संप्रदायापूर्वी फक्त विशिष्ट वर्णाच्या व्यक्तीलाच लोटांगण घालावे लागत होते. वाळवंटात मांडलेल्या खेळाचा परिणाम इथे दिसत होता. कुणीच कुणाचा वर्ण, कुणीच कुणाची जात पाहात नव्हतं… सर्व एकाच पातळीवर असल्याची अनुभूती येत होती. जातीची, धर्माची जखडलेली बंधन गळून पडत होती. ही स्थिती पाहून लगेच कुणी तरी शंतनू कांबळेंचं… तू यावं तू यावं बंधन तोडीत यावं… हे गाणं गायला सुरूवात केली. वाद्यांच्या तालावर अनेकांनी कधी ठेका धरला कळलेच नाही. ठेकाच धरला आहे तर रिंगणच करू असं कुणी तरी सुचवलं… मग काय एक तरी वारी अनुभवण्यासाठी आलेल्या सर्वांनीच ‘गोल रिंगण’ करून ताल धरला.
रिंगण रंगात आलेलं असतानाच गाड्या येत होत्या. नवे सवंगडी जोडले जात होते. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, अभिव्यक्ती या चॅनेलचे रवींद्र पोखरकर, ‘लेक लाडकी’ अभियानाच्या वर्षा देशपांडे, मार्मिकचे स्तंभलेखक संतोष देशपांडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष माधव बावगे, राष्ट्रसेवा दलाचे राजाभाऊ अवसक, दत्ता पाखिरे, साधना शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर आदी ज्येष्ठ मंडळी पोहचली. तेव्हा शरद कदम यांनी सर्वांनाच रिंगणात उभे केले आणि रिंगणात आणखीनच रंग भरला. रिंगणाबरोबरच आता फुगड्याही रंगू लागल्या. इतक्यात ‘लेक लाडकी’च्या वर्षा देशपांडे आल्या आणि सर्वांना वेळेची आठवण करून दिली आणि मग सर्वजण प्रत्यक्ष तुकोबांच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी निघाले. दिंड्या थोड्या पुढे गेलेल्या असल्याने सर्वांनाच पाऊले वेगाने उचलावी लागली. काही वेळातच सर्वजण प्रत्यक्ष दिंडीत सहभागी झाले. गावखेड्यातून आलेले वारकरी तल्लीन होऊन काकड्याचे अभंग गात होते… जणू भगवंताशी संवादच साधत होत, त्याला प्रश्न विचारत होते…
का गा केविलवाणा केलो दीनाचा दीन ।
काय तुझी शक्तीहीन झाली से दिसे ।।
लाज वाटे मना तुमचा म्हणविता दास ।
गोडी नाही रस बोललिया सारिखी ।।
देवा अरे केविलवाणी माझी अवस्था का केलीस? मला दीनापेक्षाही दीन करून टाकलेस. तुझ्यामध्ये दैन्य दु:ख दूर करण्याची शक्ती होती ती आता क्षीण झाली आहे काय? खरं तर आता आम्हाला तुझा भक्त म्हणून घेण्याचीसुद्धा लाज वाटू लागली आहे.
एव्हाना या शहरी वारकर्यांचा सहभाग लक्षात येताच इतर वारकर्यांनी त्यांना आपापल्या रांगेत जागा करून दिली. कुणी त्यांच्या हातात झेंडे दिले तर कुणी टाळ दिले. गावाकडून आलेल्या महिला वारकर्यांच्या डोक्यावरील तुळशीने कधी शहरी महिला वारकर्याच्या डोक्यावर उडी मारली हे लक्षातही आले नाही. काही वेळातच शहरी-ग्रामीण, शिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, स्री-पुरुष सगळे भेद गळून पडले होते. मग दिंडीत सुरू झाला हरीनामाचा गजर. ‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषात दिंडी सणसरच्या दिशेने निघाली. कुणी फुगड्या घालीत होते तर कुणी दिंडीतल्या लोकांसमवेत नाचत होते. दुपारच्या विसाव्याजवळ जेव्हा एक दिवस वारीतील मंडळी थांबली तेव्हा सर्वांच्या चेहर्यावर एक समाधान दिसत होतं.
अकरा वर्षापूर्वी शरद कदम यांच्या डोक्यातून आलेल्या एक दिवस तरी वारी अनुभवूया या संकल्पनेला सुभाष वारे, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, राजाभाऊ अवसक, माधव बावगे, नितीन मते या सारख्या सहकार्यांनी साथ आणि सोबत केली. संतांनी सांगितलेले विचार आणि संविधानातील मूल्ये ही परस्पर पूरक आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये संताच्या अभंगातून आलेली आहेत. संतांनी समतेचा विचार दिला.
यारे यारे लहान थोर ।
याती भलते नारी नर ।।
असं म्हणत इथे सामील होण्याचे खुलं आमंत्रण दिलेलं आहे. वारी हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळा आहे. लाखो लोक यात स्वत:हून सामील होतात. कुठल्याही लाभाच्या अपेक्षेने नव्हे तर एका निर्मळ आणि डोळस भावनेने भक्तीपरंपरेशी नाते जोडण्यासाठी. हा संत विचार सामूहिकरीत्या नीट समजून घ्यावा. त्याचे संविधानाबरोबरचे नातेही समजून घ्यावे आणि सामूहिकरित्या त्या शिकवणीशी कृतिशील नाते जोडावे या नम्र भावनेने ही मंडळी या वारीत सामील होत असतात. दुपारपर्यंत वारकर्यांसोबत समतेचा उत्सव केल्यानंतर दुपारचा विसावा होतो. सकाळपासून चालल्यामुळे पोटात मस्त भूक लागलेली असते. मग जे काही जेवण असेल ते ‘अमृतातेही पैजा जिंके’ आहे असे वाटते. जेवणानंतर होतो वारीतील अनुभवकथन.
या वर्षीची एक दिवस तरी वारी अनुभवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सहकुटुंब म्हणजे प्रतिभाताई पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि इतर पवार कुटुंबियांसह सहभागी झाले होते. यावेळी मी साने गुरुजी यांच्या ‘जगाला प्रेम अर्पावे’ या गाण्याचे संत विचारांशी जोडून निरुपण करण्याचा संकल्प केला. भक्तीच्या वाटेने आनंदी, समतेच्या गावाला निघालेली वारी पाहून, त्यामागील उदात्त भूमिका समजून घेऊन शरद पवार खूपच समाधानी झाले. या सोहळ्याची नोंद महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तुषार गांधी, बापूसाहेब देहुकर, वर्षा देशपांडे, आदींनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद कदम यांनी या संपूर्ण उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.
जेव्हा हे समतेचे वारकरी परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा पुन्हा पुन्हा या वारीत सहभागी होण्याची ओढ त्यांना लागली होती. यावेळी या सर्वांच्या मुखात तुकाराम महाराज यांचा तो प्रसिद्ध अभंग असेल-
कन्या सासुर्याशी जाय ।
मागे परतोनी पाहे ।।