एका जिल्ह्याच्या गावी त्या दोघी जन्माला आल्या. एक सावळी, उंच, नाकेली, अंगापिंडाने चांगली पण शेलाटी, सहज पाहणार्या कोणाचेही लक्ष जाईल अशी. तर दुसरी लख्ख गोरीपान, शंभरात एक अशी देखणी, सगळ्यांच्या नजरा कुठल्याही कार्यक्रमात खिळवून ठेवणारी. दोघी शेजारीच राहायच्या. लहानपण बरोबरच गेले. दोघींचेही वडील एकाच कारखान्यात कामाला. ते दोघजण आलटून पालटून एकमेकांच्या बाईकवर जसे कामाला जात, तशीच यांची शाळा व एकमेकांच्या गळ्यात गळे घालून शाळेत जाणे व परत येणे. गमतीची गोष्ट म्हणजे सावळीची आई आणि गोरीची आई या दोघीही एकाच रंगाच्या, फारसे कोणाचे लक्ष जाणार नाही अशा, पण टापटिपीने राहणार्या पस्तीशीच्या गृहिणी.
या जिल्ह्याच्या गावाला फारसे मोठ्या शहराचे वारे लागले नव्हते. म्हणजे मोठमोठाल्या इमारती, चकचकीत दुकाने, मोठाल्या अपार्टमेंट आणि मुख्य म्हणजे भरभरून वाहणारी हॉटेले ही तिथे अजून सुरू झाली नव्हती. गाव तसं शांत. गावात एकूण तीन हायस्कूले. त्यातील एकच मुला-मुलींचे एकत्र. या मुलींना त्या मिश्र हायस्कूलात घातले होते. घरातून निघायचे हातात हात घालून, वर्गात बसायचे एकाच बाकावर, डबा खायचा तो दोघींनी एकमेकांचा एकत्रच, मधल्या सुट्टीत खेळताना सुद्धा यांची जोडी तशी अभंगच असायची. मुलींचा, शिक्षकांचा हा जरा कौतुकाचा विषय, तर मुलांचा मात्र टिंगलीचा. तसं प्रत्येक शाळेत घडतच असतं. अलीकडच्या काळात रियुनियनच फॅड सुरू झालं, तेव्हा सुद्धा अशाच आठवणी पुन्हा पुन्हा काढल्या जातात.
दोघींच्या जोडीचं कौतुक व साम्य मात्र इथेच संपते. शाळा असते अभ्यासाकरता, परीक्षेकरता आणि त्यात मिळणार्या मार्कांकरता. गोरी अतिशय हुशार. वर्गात सगळ्या विषयांत जवळपास कायमच पहिली. एकच विषय सोडून. तो म्हणजे मराठी. मराठीमध्ये मात्र सावळीला तिला कधीच मागे टाकता आले नाही. इतका मोठा फरक असे की किमान पाच मार्काचे अंतर दोघींत कायमच राहायचं, फक्त मराठीत. याउलट सावळीचे इतर विषयातील मार्क कधीच ७०चा आकडा गाठू शकले नाहीत. त्यामुळे सगळ्या वर्गातील क्रमांक तिचा क्रमांक कायमच शेवटून पाचवा किंवा सहावा राहत असे. याचा दोघींच्या मैत्रीवर अजिबात कधीच परिणाम झाला नाही. अगदी निकाल हातात आला तरी दोन्ही पुन्हा आनंदात एकमेकींना एकमेकींचे प्रगती पुस्तक दाखवत, एकमेकींचे कौतुक करत. दोघींचेही हस्ताक्षर तसे चांगले. पण सावळीचे मात्र कोरून काढल्याइतके देखणे. शाळेच्या फलकावर लिहिण्याचा सुविचार कायमच सावळीच्याच हस्ताक्षरात शिक्षक काढून घेत. तिला चित्रकलेत सुद्धा थोडीफार गती होती. पण त्यासाठी ना शिक्षकांनी ना तिच्या आई-वडिलांनी कधी प्रोत्साहन दिले. मराठी पुस्तके वाचनाचे वेड जरी दोघींनाही असले तरीसुद्धा वेगळा विषय, वेगळा लेख, वेगळे पुस्तक शोधून तसे काही वाचायचा जणू काही छंदच सावळीला होता. ज्याचे वाचन चांगले त्याचे विचार प्रगल्भ होतात हे वाक्य सावळीच्या बाबतीत हळूहळू खरे ठरू लागले होते. गावी नवीन आलेला मसालेदार सिनेमा चुकवायचा नसतो असे गोरीला वाटे. तर तो सिनेमा पाहताना सावळी बोअर झालेली असायची. अगदी याच्या उलट सावळीच्या आवडीचा सिनेमा पाहताना होत असे. काय चालले आहे पडद्यावर असा गोरीला कायम प्रश्न पडत असे. वयानुसार आलेला नटवेपणा सावळीत कधी रुजलाच नाही. तर गोरीला मेकअप केल्याशिवाय आरशात न पाहता घराबाहेर पडणे कधीही नको वाटायचे.
पाहता पाहता दोघीजणी त्यांच्या अभ्यासाला साजेश्या मार्कांनी दहावी झाल्या. म्हणजे सावळीला ६५ टक्के मिळाले तर, गोरीला ८५ टक्के. आजवरचा जोडी जोडीचा प्रवास आता इथे थांबणार होता हे तर स्पष्टच होते.
वाटा बदलल्या इथून पुढे
गोरीला जवळच्या मोठ्या शहरात सायन्सला प्रवेश मिळाला. सावळी मात्र आहे त्याच गावात कला शाखेत प्रवेश घेऊन कॉलेजला जायला लागली. तिचे शास्त्र, गणितासारखे कठीण विषय संपले होते आणि आवडते भाषा विषय सुरू झालेले होते. सविस्तर लिखाण हा तिचा हातखंडा होता. अक्षर तर देखणेच होते. अकरावीला पाहता पाहता टक्केवारी वाढून ७५ टक्क्याला पोचली. कधी नव्हे ते इतके मार्क पाहून तिचा आत्मविश्वास खर्या अर्थाने दुणावला. कॉलेजमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये तिचा सहभाग सुरू झाला. तिथे तिचे कौतुक पण होऊ लागले. तारुण्यावस्थेत येणार्या मुलीला अजून काय पाहिजे असते? महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामुळे ती अजिबात शेफारून न जाता मूळच्या स्वभावाला धरून सखोल वाचन करत कला, नाट्य, लेखन, समीक्षा अशा विविधांगी वेगळ्या दिशेने समृद्ध होऊ लागली. कॉलेजात बसवलेल्या नाटकामध्ये नायिकेची भूमिका मिळाली नाही म्हणून नाराज न होता मिळेल त्या भूमिकेचे तिने सोने केले व सगळ्या कॉलेजची वाहव्वा सुद्धा मिळवली. एकीकडे अभ्यास चांगला चाललेला होता. मार्क पण मिळत होते. दुसरीकडे तिच्या लेखनाचे कौतुक होऊ लागले होते.
इकडे शहरात तिची बालमैत्रीण गोरी बारावी सायन्सला चांगले मार्क मिळवून डॉक्टर बनण्याच्या रस्त्याला लागली होती. मेडिकलला गेल्यावर दुसर्या वर्षापासून कलागुणांना वाव देण्यासाठीचे आर्ट्स सर्कल नावाचा प्रकार सगळ्याच वैद्यकीय महाविद्यालयात खूप जोरात कार्यरत असतो. अलिकडची अदिती गोवित्रीकर किंवा जब्बार पटेल, मोहन आगाशे, आणि जुन्या काळातील काशिनाथ घाणेकर किंवा श्रीराम लागू ही सारी मंडळी मूळची डॉक्टरच. पण या आर्ट्स सर्कलने त्यांना सिने नाट्यसृष्टीमध्ये खेचून आणलेले. शंभरात एक देखणी असलेली गोरी स्वाभाविकपणे त्या आर्ट सर्कलची हवीहवीशी नायिका बनली. कोणताही कार्यक्रम असो, गोरी त्यात हवीच असे ही एक समीकरण त्या कॉलेजमध्ये बनले होते.
इथे मात्र कुठेतरी एक नको ती गोष्ट घडू लागली. मीच कॉलेज क्वीन अशी हवा गोरीच्या डोक्यात भिनू लागली. अभ्यासावर स्वाभाविक थोडासा परिणाम होणारच. शाळेपासून कायम असलेला पहिला नंबर मेडिकलच्या पहिल्या वर्षात पहिल्या पाचावर पोचला होता, तो आता पन्नासच्या आसपास रेंगाळू लागला. त्यातच गोरीला त्या शहरात असलेल्या ब्युटी कॉन्टेस्टसाठी तू भाग का घेत नाहीस? नुसतीच कॉलेज क्वीन असून काय उपयोग? असे तिच्या एका नवीन झालेल्या मित्राने सुचवले. एवढेच नव्हे तर त्या कॉन्टेस्टचा फॉर्म ऑनलाईन त्यानेच भरला. यथावकाश स्पर्धा झाली. त्यासाठी परीक्षक म्हणून विविध सिने-नाट्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी आली होती.
ब्युटी क्वीनची स्पर्धा संपली… आणि गोरीला प्रथमच नकार नावाचा प्रकार काय असतो त्याचा दणका अनुभवायला मिळाला. डोक्यावरचा मुगुट तर सोडाच, पण समोरच्या प्रेक्षकांकडूनसुद्धा कौतुकाच्या टाळ्या मिळाल्या नाहीत. निराश झालेली गोरी व तिचा मित्र स्पर्धेनंतर त्याच फाईव्ह स्टार हॉटेलच्या लॉबीत एकमेकांचे सांत्वन करत बसलेले असताना एका परीक्षकाचे तिच्याकडे लक्ष गेले. स्वतःहून तो तिच्याकडे गेला. स्वतःचे कार्ड काढून दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये येऊन भेटण्याची विनंतीवजा आज्ञाच त्याने केली.
हे कोण? कशाला भेटायचे? काय काम? कशा करता? यातील एकही प्रश्न विचारण्याची त्या दोघांची मन:स्थिती नव्हती. फक्त हात पुढे करून कार्ड हातात घेतले आणि ते परीक्षक निघून सुद्धा गेले. एका मोठ्या चॅनलवर विविध मालिकांचे कास्टिंग डिरेक्टर म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. एखाद्या मालिकेसाठी लागणारी पाच पंचवीस पात्रे जमा करताना त्यांना रोजच आटापिटा करावा लागत असे. चालू असलेल्या व नवीन येऊ घातलेल्या मालिकेमध्ये दोन-तीन पात्रे डोळ्यासमोर आल्यावर त्यांनी गोरीला त्यासाठी पक्के करून टाकले होते. दिलेले कार्ड पर्समध्ये टाकून गोरी रूमवर गेली. कसेबसे चार घास खाऊन झोपली. तिच्या स्वप्नामध्ये आजचे अपयश पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर नाचत होते. अपमान डाचत होता. दुःखाचे कढ पुन्हा पुन्हा उफाळत होते. सकाळी कडक कॉफी पिताना तिला अचानक त्या कार्डाची आठवण झाली. झोपाळल्या डोळ्यांनी तिने ते कार्ड वाचले आणि तिची झोप खाडकन् उडली. एवढ्या मोठ्या नामवंत माणसाचे कार्ड हाती आले आहे, ते सुद्धा त्यांनी दिलेले! हे पाहून तिचा उत्साह पुन्हा दुणावला.
‘मार्मिक’च्या सुज्ञ वाचकांना पुढे काय झाले असेल हे सांगायची फारशी गरज नाही.पण कहाणी वेगळीच आहे.
यथावकाश गोरी डॉक्टर तर झालीच. पण विविध मालिकांत दुय्यम भूमिका करत चकचकीत ग्लॅमरच्या जगात ती स्थिरावली. डॉक्टर म्हणून काम करण्याच्या संदर्भात आई-वडिलांचा आग्रह तिने निग्रहाने बाजूला टाकला. याचे कारण अगदी साधे सोपे होते. जेमतेम वर्षभरातच शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये तिने मला मोठा फ्लॅट भाड्याने घेतला होता. एक सेकंडहॅन्ड कार घेतली होती. एका मागोमाग मिळणार्या मालिकांतील छोट्या मोठ्या कामातून येणारे उत्पन्न मात्र चांगले घसघशीत होते. या सार्या निर्णयापुढे गोरीचे मध्यमवर्गीय आईवडील थक्क होऊन निशब्द होण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. मनातून हे फारसे आवडले नसले तरी कामाच्या जागी, गावात, नात्यांमध्ये सगळीकडे गौरीचे आई-बाबा म्हणून कौतुक मात्र त्यांचे वाट्याला येत होते. त्याचे अप्रूप त्यांना होते. पण डॉक्टर असून मुलगी डॉक्टरी करत नाही ही रुखरूख सुद्धा होती.
वाटचाल सावळीची
छोट्या गावातल्या कॉलेजमध्ये सावळीला पदवी हातात आली, त्याच वेळेला तिचे लेखन बहरात आले होते. तिने लिहिलेले एक छोटे नाटुकले विविध नाट्यस्पर्धांमध्ये गाजत होते. एका नामवंत दिवाळी अंकात तिची आलेली एक कथा एका मान्यवर समीक्षकाने उचलून धरली होती. तिच्याकडे उभरती नवोदित लेखिका असा पाहण्याचा एक दृष्टिकोन सुरू झाला होता. शांत, संयत, स्वभावाची सावळी यथावकाश डिस्टिंक्शन घेऊन मराठी साहित्य विषयातून पदवी घेती झाली. त्याच सुमारास एका गाजलेल्या नामवंत मराठी दिग्दर्शकाला वेगळ्या धर्तीची, गावातील संस्कृती मांडणारी, जुन्या मूल्यांना उभारून नव्या पिढीला काही सांगणारी कथा हाती लागली होती. पण त्या कथेतील विविध संवादांना उत्तम रुपडे देणारा, मनाजोगता संवाद लेखक सापडत नव्हता. त्याच्या वाचनात दिवाळी अंकातील सावळीची कथा व समीक्षकाने केलेले तिचे कौतुक आले. मासिकाच्या संपादकाकडून फोन मिळवून चक्क गाडी काढून तो तिच्या गावी दाखल झाला. मध्यमवर्गीय घरासमोर उभी राहिलेली भली मोठी गाडी व त्यातून उतरणारा रुबाबदार दिग्दर्शक पाहून सावळी चकित झाली होती. यापेक्षाही त्यांनी दिलेला प्रस्ताव ऐकून ती थक्कच झाली. सलग शंभर दिवस त्या दिग्दर्शकासमवेत राहून एकेका प्रसंगांनुरूप संवाद लेखन करण्याचे पूर्ण कॉन्ट्रॅक्टच सही करता त्याने तिच्यासमोर टाकले.
त्यांचे एक वाक्य बोलके होते. मला या सिनेमाकरता सगळे ताजे ताजे, नवीन, अनाघ्रात असे हवे आहे. सुरुवात तुमच्यापासून करत आहे. सावळीला नाही म्हणण्याचे काही कारणच नव्हते.
यथावकाश वर्षभरात त्या दिग्दर्शकाची मनोकामना रुपेरी पडद्यावर साकारली. एका छोट्या चित्रगृहात आयोजित केलेल्या मोजक्या मंडळींसमोरच्या खास शोसाठी दुसर्या रांगेत सहाजण बसली होती. सावळी व तिचे आई-बाबा होतेच, पण गोरी व तिचेही आई-बाबा दुसर्या बाजूला बसले होते. आपापल्या क्षेत्रामध्ये सावळी व गोरी यशाच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचल्या होत्या. त्यातील सावळीचे यश साजरे करताना दोघींचा हात एकमेकींच्या हातात घट्ट पकडलेला होता. …आणि गोरीवर त्या नामवंत दिग्दर्शकाची नजर खिळलेली होती.
तात्पर्य : रंग, रूप, देखणे पण किंवा अभ्यास, हुशारी, मार्क आणि मिळालेल्या पदव्या यापेक्षाही अंगभूत गुणांना पुरेसा वाव दिला तर मिळणारे यश हे निव्वळ आनंददायी असते, असे नव्हे तर ते उत्तम करिअर करण्यासाठी पायाभूतही ठरते. गोरीच्या घरातील आई-वडिलांची नाराजी किंवा सावळीचा शालेय अभ्यासातील प्रगतीचा आलेख या गोष्टी आता यापुढे निरर्थक ठरल्या नाही काय?