शिवसेना सत्तेत असो वा नसो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अथवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांचे नेते व मुख्यमंत्री भेटण्यास उत्सुक असतात. हा ‘ठाकरे’ नावाचा करिष्मा आहे, दबदबा आहे.
गेल्याच आठवड्यात २३ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भेट घेतली. त्यावेळी देशातील विविध विषयांवर चर्चा झाली. ‘‘बाळासाहेब वाघ होते. तुम्ही त्यांचे सुपुत्र आहात, तुम्ही लढा! संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबतीला आहे. त्यांनी तुमचा पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला तरी तुम्ही वाघच आहात. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत असून सुप्रीम कोर्टही न्याय देईल. तोपर्यंत महाराष्ट्रातील होणार्या प्रत्येक निवडणुकीत तुम्ही विजयी व्हाल,’’ असा ठाम विश्वास आपचे सर्वेसर्वा केजरीवाल यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात जे निर्णय घेतले; त्यातून दिल्लीला शिकायला मिळाले. ज्या पद्धतीने कोरोना स्थिती हाताळली आणि नियंत्रणात आणली ते कौतुकास्पद होते. त्या काळात बैठकीनिमित्त आपला संपर्क आला आणि म्हणून मुंबई-महाराष्ट्रापासून दिल्ली खूप काही शिकली, असे आश्वासक उद्गारही केजरीवाल यांनी काढले. याच भेटीत केंद्र-राज्य संबंधावर चर्चा होऊन राज्याचे अधिकार अबाधित राखण्यासाठी एकत्र लढू या, असे ठरले.
गेल्या आठ महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाविरूद्ध विरोधकांची एकजूट उभारण्यासाठी भाजपाविरोधी राज्य सरकारचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुखांना भेटले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर फोनद्वारे उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात असतात. बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमारही उद्धव यांच्या संपर्कात असतात. देशातील सद्य राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर चर्चा होते. सत्ता गेली तरी सच्च्या व निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे हे या नेत्यांनी ओळखले. ठाकरेंची ताकद काय आहे ते त्यांना माहिती आहे म्हणूनच या भेटी-गाठी होत असतात.
गेल्या वर्षाच्या सुरूवातीस १९ फेब्रुवारी २०२२ रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात एकत्रित लढण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी निर्माण करण्याची गरज आहे, असे मत दोघांनी चर्चेत मांडले. केंद्रीय यंत्रणेच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त करून यामुळे लोकशाहीला धोका वाढेल असे मत व्यक्त केले. के. चंद्रशेखर राव यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या गाठी-भेटी घेतल्या असल्या तरी उद्धव ठाकरे यांची भेट चर्चेत राहिली. या भेटीच्या वेळी एकनाथ शिंदेही उपस्थित होते. तेव्हा त्यांनी भाजप विरोधात एकत्र लढण्याला संमती दिली होती.
भाजपच्या विरोधात एकत्र येण्यासाठी, भाजपविरोधातील राज्यांचे मुख्यमंत्री, प्रादेशिक पक्ष शिवसेना पक्षप्रमुख यांना जसे आजही भेटत आहेत, त्याचप्रमाणे काँग्रेसविरोधात लढण्यासाठी २०१२पूर्वी भाजपाचे नेते ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत असत. सल्लामसलत करीत असत आणि निवडणुकीची रणनीती आखत. यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन, राम नाईक, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आदींचा समावेश असे. हिंदुत्वाच्या प्रश्नावर भक्कम एकजूट व्हावी असे दोन्ही पक्षांना वाटायचे. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांविषयी शिवसेना नेत्यांना आदर व आपुलकी वाटत होती. शंभर टक्के विचार जुळत नव्हते, तरी हिंदुत्वाचा चिवट धागा भाजपा आणि शिवसेनेला भक्कमपणे एकत्रित बांधून ठेवत होता. आताचे भाजपचे नेते सत्ता मिळवण्यासाठी आणि राजकीय महत्त्वाकांक्षेपायी जुन्या सहकारी पक्षांना एक-एक करून संपवत आहेत. पण सतत सत्तेच्या मस्तीत राहणार्यांना ते कळत नाही, तेव्हा जनतेने लोकशाही वाचवण्यासाठी पावले उचलायची असतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, लोकशाही टिकवण्यासाठी विरोधी पक्ष महत्वाचा आहे. विरोधी पक्ष संपला तर लोकशाही संपेल आणि हुकुमशाही देशात येईल. आज देशात तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी देश संकटात असताना संविधान वाचविण्यासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधकांची एकजूट महत्वाची आहे. याचे भान व जाण या विरोधी पक्षाच्या नेत्यांना आहे. विरोधी पक्षांनी एकमेकाला भेटणे किंवा सत्ताधार्यांनी विरोधकांना भेटणे हे केव्हाही चांगले. देशातील, प्रदेशातील प्रश्न, समस्या सुटण्यासाठी त्या भेटींचा उपयोग होतो. चर्चेद्वारे प्रश्न सुटू शकतात. लोकशाही सुदृढ राहण्यास मदत होते.
मुंबईत साठच्या उत्तरार्धात शिवसेनेने मराठी तरुणांना नोकरीत प्राधान्य मिळावे म्हणून उभारलेला लढा हा ऐतिहासिक होय. सर्व आस्थापनात दक्षिणात्यांची मुबलक भरती होत असे आणि योग्यता असतानाही भूमिपुत्र डावलला जात होता. तेव्हा त्यांच्या विरोधात शिवसेनेने स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन पुकारले, ते प्रामुख्याने दाक्षिणात्यांच्या विरोधात होते. त्यामुळे तामिळ-मल्याळम विरुद्ध मराठी हा वाद देशाच्या राजकीय पटलावर गाजला होता. नाही म्हटलं तरी दोन्ही समाजांत काही प्रमाणात दुरावा निर्माण झाला होता. अशावेळी द्राविडी चळवळीचे प्रणेते, द्रविड मुन्नेत्र कळघमचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दक्षिण मुंबईतील हॉटेल ऑबेरॉयमध्ये १६ मे १९७८ रोजी ३५-४० मिनिटे झालेली भेट लक्षवेधी ठरली. या भेटीत दोन्ही नेत्यात काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितले नाही. ‘‘ही सदिच्छा भेट होती, त्यात राजकारण नाही,’’ असा निर्वाळा करुणानिधी आणि बाळासाहेबांनी दिला. करुणानिधी यांच्याच खोलीत सायंकाळी ६.३० वाजता या दोन दिग्गज प्रादेशिक नेत्यांची भेट झाली. ‘वुई हॅव डिस्कस्ड एव्हरीथिंग अंडर दी सन…’ असे करुणानिधी तेव्हा गमतीने पत्रकारांना म्हणाले. राज्याला स्वायत्तता मिळावी यासाठी द्रमुकचा केंद्राशी लढा सुरू होता. त्यावेळी करुणानिधी यांनी राज्याच्या स्वायत्ततेवर एक पुस्तकही लिहिले होते. राज्याला सुबत्ता मिळण्यासाठी अधिक सत्ता मिळणे आवश्यक आहे. अशी करुणानिधींची मागणी होती. याला शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दर्शविला. केंद्राविरुद्ध लढण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे फेडरेशन असावे असे उभयतांचे मत झाले.
दोन विरोधक एकत्र भेटतात हे काहींना पाहवले नाही. काही राजकीय पक्षांनी शिवसेनेवर टीका केली, वृत्तपत्रातून तोंडसुख घेतले. असे असले तरी करुणानिधी आणि बाळासाहेब यांची ही ऐतिहासिक भेट नंतर बराच काळ वृत्तपत्रांतून गाजत राहिली.
प्रादेशिक भाषा, प्रादेशिक अस्मिता आणि राज्याची स्वायत्ता जपणे हा प्रादेशिक पक्षांचा मूळ उद्देश असतो. तो जपण्यासाठी त्याच्या रक्षणासाठी द्रमुक आणि शिवसेना हे पक्ष सतत जागरुक असतात. वेळप्रसंगी केंद्राशी दोन हात करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. हा त्यांच्यातील समान धागा आजही कायम आहे.
गेल्या जून महिन्यात महाविकास आघाडीची सत्ता गद्दारांच्या संगनमताने भाजपाने घालवली. मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. शिवसैनिक, महाराष्ट्रातील जनताच नव्हे तर देशभरातील जनता हळहळली. शिवसेनेवर अन्याय झाल्याची भावना सर्वत्र दिसली. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले नाही आणि उद्धव ठाकरे हे खचले नाहीत. या कठीण परिस्थितीत महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष-सामाजिक संघटना यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून पाठिंबा दिला. भाजपच्या या हुकुमशाही, दमनशाही विरोधात लढण्यासाठी उद्धवजींच्या पाठीशी उभे राहिले आहेत, लढा देत आहेत. हाती सत्ता नसताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी ‘मातोश्री’ येथे जात आहेत. हा शिवसेनेचा विजय आहे. ‘ठाकरे’ नावाचा जयजयकार आहे!