प्रबोधनकारांच्या एका जानी दोस्ताने, श्रीपाद केशव नाईकांनी श्रावण अमावस्येला मातृदिन साजरा करण्याची कल्पना मुंबईत रुजवली. जागतिकीकरणानंतर अमेरिकन मदर्स डे आपल्याकडे येईपर्यंत अनेक दशकं याच दिवशी मातृदिन साजरा होत होता. पण त्याचं श्रेय श्रीपाद नाईकांना प्रबोधनकार वगळता कुणीच दिलं नाही.
—–
ग्रामोफोन ऐकवत फिरण्यासाठी जळगावला सहा सात महिने मुक्काम केल्यानंतर प्रबोधनकार मुंबईला परतले. १९०६-०७ म्हणजे स्वदेशी चळवळ अजून मुंबईत तरी थांबलेली नव्हती. प्रबोधनकार त्या काळाचं वर्णन करतात, `स्वदेशी चळवळ आणि राजकीय खटल्यांचा धुमाकूळ सर्वत्र चालूच होता. मात्र यच्चयावत जनता, सारे भेदभाव विसरून एकदिल होती.’ आता यातली यच्चयावत जनता म्हणजे प्रामुख्याने गिरगावातली मराठी माणसं होती. ते चळवळ करत म्हणजे काय करत, याची यादी प्रबोधनकारानी दिलीय, `व्याख्याने, प्रवचने, पुराणे, शिवजन्मोत्सव, दसर्याच्या मिरवणुका वगैरे नित्यनैमित्तिक लोकजागृतीचे खटाटोप चालूच होते.’
या चळवळींमधल्या श्रीपाद केशव नाईक या अपरिचित कार्यकर्त्याची ओळख प्रबोधनकारांनी आत्मचरित्रात करून दिलीय. गिरगावातल्या विद्यार्थ्यांमधे स्वदेश, स्वधर्म आणि नीतिमत्ता यांचा प्रचार करण्यासाठी नाईकांची धडपड असायची. प्रबोधनकारांनी काही वाक्यांत त्यांना डोळ्यासमोर उभं केलंय. `माणूस अगदी गबाळ्या. ते मळकट धोतर. ती त्रेतायुगातील टोपी नि एक जुना लांब कोट कधी बदलल्याचे पाहिले नाही, उदरभरणासाठी काय उद्योग करायचा, त्याचा थांगपत्ता नसायचा. पण जेव्हा पहाल तेव्हा हसतमुख. विनोदी नि उत्साही. निराशेची सुरकुतीही चेहर्यावर कधी नसायची.’ नाईक आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या आंग्रेवाडीतल्या शाळेत शिक्षक होते, असं प्रबोधनकारांना आठवतं.
प्रबोधनकार सांगतात नाईकांची सगळी कामं `मुकाटतोंडी’ चालायची. मुकाटतोंडी म्हणजे चुपचाप, शांतपणे, प्रसिद्धीविन्मुख वगैरे. ते रस्त्याने जात असतील तर इतकी ओळखीची मंडळी भेटायची की प्रत्येक पावलाला त्यांना कुणाला न कुणाला नमस्कार करून बोलण्यासाठी थांबायला लागायचं. डॉ. रामकृष्ण भांडारकर, डॉ. भालचंद्र भाटवडेकर, जस्टिस नारायण चंदावरकर हे त्या काळातले देशपातळीवरचे नेते असणारे तिन्ही `सर` नाईकांच्या हातासरशी गाडी थांबवायचे.
हे श्रीपाद केशव नाईक काय काय करायचे? तर दर महिन्याला एक पाठपोठ पत्रिका छापायचे. त्यात ज्ञानेश्वरांपासून विविध संतांची वचनं आणि पौर्वात्य, पाश्चिमात्य तत्त्ववेत्त्यांचे सुविचार असायचे. त्याच्या हजारो प्रती ते प्रत्येक शाळेत जाऊन स्वतः विद्यार्थ्यांना वाटायचे. हा माणूस फाटक्या खिशाचा, रस्त्यावर भटकणारा आणि स्वतःच्या खर्चाने चहा पिणंही कठीण असणारा; मग हा पत्रिका वाटण्यासाठी पैसे कुठून आणतो, असा प्रश्न प्रबोधनकारांना पडला. त्यावर उत्तर आलं, `पैसा कशाला हवा? या गिरगावात चांगले पंधरावीस धनत्तर छापखाने आहेत. त्यांचा धंदाही जोरात आहे. प्रत्येकाने वर्षातून एकदा एक हॅण्डबिल फुकटात छापून द्यावे, अशी केली खटपट. देतात ते. मी वाटतो.’
नाईकांची स्वतःची आर्यन एक्सेलशियर लीग अर्थात आर्योन्नती मंडळ नावाची संस्था होती. युरोप अमेरिकेतून कुणी मोठा गोरा मुत्सद्दी, गवर्नर आला की त्याच्या स्वागतासाठी ते याच लीगचे प्रतिनिधी म्हणून अपोलो बंदरात हार घेऊन हजर असायचे. कोणी तत्त्वज्ञानी प्रचारक आला की त्याची व्याख्यानं आयोजित करायचे. तेव्हा स्टुडंट्स ब्रदरहूड संस्थेकडून चंदावरकर, भांडारकर अशांची व्याख्यानं गिरगावातल्या प्रार्थना समाजात दर रविवारी असायची. त्याच्या व्यवस्थेसाठीही नाईक हजर असायचे. त्यांनी अनंतराव गद्रे यांच्या `निर्भीड’ या नियतकालिकात मुंबईतल्या शंभरपेक्षा जास्त जुन्या पुढार्यांची थोडक्यात चरित्रं लिहिली होती.
प्रबोधनकार नाईकांची सगळ्यात मोठी ओळख सांगतात ती अशी, `पिठोरी अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा करण्याच्या योजनेचा मूळ उत्पादक नि आमरण पुरस्कर्ता श्रीपाद केशव नाईक. पहिला उत्सव त्याने सर्व शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनींचा मेळावा प्रार्थना समाजच्या हॉलमध्ये भरवून साजरा केला. नंतर आजकाल तो सर्वत्र होतच असतो. पण त्या योजनेचा पिता नाईक हे उत्सवकर्त्यांना ठावे आहे की नाही, देव जाणे.’ मातृदिनाच्या मेळाव्यात विद्यार्थ्यांना मिठाई वाटता यावी, म्हणून नाईक देणग्याही गोळा करत असत.
१९०६-०७च्या काळात प्रबोधनकारांची नाईकांशी जानी दोस्ती झाली. पुढे दोघेही दादरला राहायला आले. त्यामुळे नाईकांच्या मृत्यूपर्यंत ही दोस्ती टिकली. नाईकांनी मातृदिनाचा उपक्रम कधी सुरू केला, याचा उल्लेख प्रबोधनकारांनी केलेला नाही. पण तो १९०६-०७चा नसावा. तो तसा असता तर त्यांनी नोंदवला असता. त्याचा उल्लेख नाईकांच्या एकंदर समाजकार्याचा परिचय देताना आलेला आहे. मातृदिनाची सुरवात त्यानंतर थोडी किंवा बरीच उशिराची असावी. कारण एक सप्टेंबर १९२२च्या प्रबोधनच्या अंकात प्रबोधनकारांनी आवर्जून मातृदिनाच्या निमित्ताने आई नावाचा लेख लिहिला होता. त्याच्या चार ओळींच्या प्रस्तावनेत ते लिहितात, `मुंबईतील आर्योन्नती मंडळाचे एकनिष्ठ चालक श्रीयुत श्रीपाद केशव नाईक यांच्या खटपटीने दरसाल साजरा होणार्या `मातृदिन’ उत्सवाचे या अग्रलेखाने प्रबोधन अभिनंदन करीत आहे. हा उत्सव गेल्या २२ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगैरे ठिकाणी उत्साहाने साजरा करण्यात आला.’
प्रबोधनकारांचा ‘आई’ हा लेख वाचकांना खूप आवडला. गाजलाही. त्यामुळे प्रबोधनकारांनी त्याची छोटी पुस्तिकाही छापली. त्याचं नाव होतं, आई थोर तुझे उपकार. स्वाध्याय संदेश नावाच्या त्यांच्या लेखसंग्रहातही हा लेख समाविष्ट आहे. हा लेख त्यांच्या ठसकेदार शैलीचा उत्तम नमुना आहे. त्याचा हा तुकडा उदाहरणादाखल बघता येईल, `आग्य्राच्या लोकांना ताजमहालाच्या लोकोत्तरेपेक्षा मुषाफरांपासून मिळणार्या कवडी दमडी भिकेचे महत्त्व फार वाटते. पंढरपूरच्या बडव्यांना किंवा काशीच्या पंड्यांना विठोबाचे किंवा विरुपाक्षाचे महत्व लवमात्र वाटत नाही. त्यांची सारी महत्त्वाकांक्षा यात्रेकरूंच्या गाठोड्याभोवती आशाळभूत पिशाच्चाप्रमाणे वावरत असते. गंगानदीच्या पावित्र्याच्या महिम्याने हृदयांत भाविक भावनेचे मळे पिकलेले लोक गावोगांवहून धाव घेत काशीला जातात, पण तेच काशीचे लोक त्याच गंगेचा उपयोग नियमित प्रात:र्विधीसाठी करतात. याचे कारण अतिपरिचय.. आई हा एक असा चमत्कार आहे की त्याच्या निकट परियचामुळे त्यांतील गूढ प्रेमाच्या रहस्याचे महत्व आम्हाला वास्तविक उमजले तरी समजत नाही. उमगले तरी सापडत नाही व भासले तरी व्यक्त करता येत नाही.’
मातोश्रींचा सन्मान हा प्रबोधनकाराच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. त्यामुळे त्यांना मातृदिनाची संकल्पना आवडणं स्वाभाविक होतं. त्यांनी त्याचा प्रचारही केलेला दिसतो. महाराष्ट्रभर ज्या दिवशी बैलपोळा साजरा केला जातो, त्या दिवशी मुंबईसारख्या शहरात आईची पूजा करणं, हे आता आपल्याला फारसं पटत नाही. तरी अनेक वर्षं मातृदिनाचा हा उत्सव मुंबई आणि परिसरात साजरा होत होता. अगदी सगळ्याच पंचांगं आणि कॅलेंडरांवरही त्याने जागा मिळवली. ही कल्पना समाजात इतकी रूजली की त्यामुळे कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकरांनाही ती जुनी वाटली. `धर्मबोध’ या ग्रंथात ते लिहितात, `श्रावण अमावास्येला आपण मातृदिन साजरा करतो. ही प्रथा अतिप्राचीन नाही असे विद्वानांचे मत आहे. मात्र काहींच्या मते पाश्चात्यांच्या मदर्स डेवरून आपण हे फॅड उचलले, हा विचार मात्र न पटणारा आहे. इतर कोणाचीही नक्कल करणे वा इतरांच्या कल्पनेवरून एखादी प्रथा, उपचार, धर्माचार आपण नव्याने सुरू करू इतकी आपली संस्कृती उथळ व कमकुवत नाही.’
खरं तर साळगांवकर आणि श्रीपाद नाईक तसे समकालीन. दोघेही सामाजिक कामात सक्रिय. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी परिचय असायला हवा होता आणि श्रीपाद नाईकच मातृदिनाचे बाप आहेत, हे साळगांवकरांसारख्या बहुश्रुत माणसाला माहीत असायला हवं होतं. पण त्यांना माहीत नाही, याचा अर्थ बहुतेकांना या कल्पनेचं पितृत्व नाईकांकडे असल्याचं ठाऊक नसणारच. हा नाईकांच्या `मुकाटतोंडी’पणाचा सन्मानच म्हणायला हवा.
पण साळगांवकरांनी उपस्थित केलेला एक मुद्दा महत्त्वाचा आहे. नाईकांनी आणलेली मातृदिन ही संकल्पना पाश्चात्य आहे का? आज मागे वळून बघताना वाटतं ती अमेरिकेतून आपल्याकडे आली असणार. अमेरिकेत १९०५ सालीच `मदर्स डे’ सुरू झाला होता. त्याच्याही आधी चाळीस वर्षं तो वेगळ्या नावाने सुरू होता. अपोलो बंदरावर विलायती थोरामोठ्यांचं स्वागत करणार्या श्रीपाद नाईकांना विदेशी संकल्पनेचं वावडं असण्याचं कारण नव्हतंच. अर्थात त्यामुळे त्यांच्या कुशाग्र बुद्धीचं आणि कार्यकर्तेपणाचं मोल कुठेच कमी होत नाही. त्यातूनच प्रबोधनकारांचंही मोठेपण कळतं. कारण ते म्हणतात ते खरंच आहे, `इतर सटरफटर धनाढ्यांच्या जयंत्या मयंत्या साजर्या होतात. पण नाईकासारख्या अबोल लोकसेवकाची आठवण कोण करणार? मी करतो.’
– सचिन परब
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)