• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

युसूफ गेला, दिलीप कुमार जिवंत आहे?

संपादकीय (17 जुलै 2021)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
July 14, 2021
in संपादकीय
0

युसूफखान सरवरखान पठाण यांचं वयाच्या ९८व्या वर्षी नुकतंच निधन झालं…
…दिलीप कुमारचं काय झालं, ते आपण ठरवणार आहोत.
युसूफखान पठाण हे दिलीप कुमार यांचं मूळ नाव. त्या नावाच्या उचक्या अनेकांना लागल्याच होत्या त्यांच्या निधनानंतर. दिलीप कुमार हे नामकरण नंतरचं, बाँबे टॉकीजमध्ये झालेलं.
हिंदी सिनेमाच्या या पहिल्या महानायकाच्या निधनानंतर अनेक चाहते म्हणाले, युसूफ खान हा तो देह होता, तो गेला; दिलीप कुमार मात्र जिवंत आहे, त्याच्या भूमिकांमधून, त्याने हिंदी चित्रपटांच्या नायकांच्या अभिनयशैलीवर जी अमीट छाप टाकली तिच्यातून.
पण, दिलीप कुमार हे फक्त पडद्यावरच्या भूमिकांचं नाव नव्हतं… पडद्यापलीकडच्याही अनेक ‘भूमिका’ होत्या दिलीप कुमारच्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची ओळख होती नेहरूंच्या भारताचा नायक ही.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नेतृत्त्व स्वीकारलेला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा देश कसा होता? तो फाळणीच्या जखमांमधून सावरत होता. नुकताच स्वतंत्र झालेला एक गरीब देश ही त्याची ओळख होती. देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये मानसिक फाळणी झाली होती. अविश्वासाचं वातावरण होतं. त्याचबरोबर भाषावार प्रांतांमध्ये विखुरलेल्या प्रादेशिक अस्मिता होत्या. देशाच्या पाचवीला पुजलेली जात तर होतीच. या सगळ्या ओळखींचं विसर्जन करून भारतीयत्व ही एकमात्र अभिमानास्पद ओळख सगळ्यांच्या मनात रूजवण्याचं काम नेहरूंसमोर होतं.
हिंदी सिनेमा या कामी मोलाची भूमिका बजावू शकेल, हे पंडितजींनी ओळखलं होतं. त्यांनी जाणीवपूर्वक हिंदी चित्रपट कलावंतांना सन्मान दिला. त्यांच्याशी स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले. दिलीप कुमार यांना ते युसूफ असं संबोधत. दिलीप कुमार त्यांना पंडितजी म्हणत. हा क्रांतदर्शी नेता देशाला कोणत्या दिशेने घेऊन जाऊ पाहतो आहे, देशात भावनिक ऐक्य असणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव तत्कालीन सिनेमाकारांनाही होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या हिंदी सिनेमांमध्ये नव्या दिशा धुंडाळण्याची ओढ दिसते, सत्शील, प्रामाणिक नायक दिसतात, देशातल्या तत्कालीन समस्यांवर भाष्य दिसतं, त्यांच्यावर फिल्मी स्वरूपाचे का होईना, उपाय योजण्याचे प्रयत्न दिसतात. नवस्वतंत्र देशातल्या नवसृजनाच्या ऊर्मी या काळात इतक्या उफाळलेल्या होत्या की आजही १९५० आणि १९६०चं दशक हे व्यावसायिक हिंदी सिनेमाच्या इतिहासातलं सोनेरी पर्व मानलं जातं. कथानकं, अभिनय, दिग्दर्शन आणि भारतीय सिनेमाची ओळख असलेलं संगीत या सर्वच पातळ्यांवर हिंदी सिनेमाची अव्वल दर्जाची कामगिरी या काळात घडली आहे.
दिलीप कुमार हे या काळाचे महानायक होते. त्यांच्याबरोबर राज कपूर आणि देव आनंद यांनीही हिंदी सिनेमा गाजवला. त्या दोघांचा अभिनयाचा स्वतंत्र बाज होता. राज कपूर यांनी दिग्दर्शक-नायक म्हणून सामाजिक आशयावर आधारलेल्या संगीतमय कलाकृती केल्या. देव आनंद यांची गुलछबू प्रेमवीर अशी प्रतिमा प्रबळ असली तरी या काळात त्यांनी गुरुदत्त यांच्यासारख्या दिग्दर्शकांच्या साथीने क्वचित वाममार्गाकडे लागणारा स्खलनशील पण उमद्या मनाचा नायक साकारला होता. पण, या काळाच्याच नव्हे, तर भविष्यातल्या हिंदी सिनेमाच्या नायकांच्या अभिनयावर प्रभाव टाकणारा नायक दिलीप कुमार हाच होता. प्रेक्षकांच्या नजरेतून हिंदी सिनेमाचा नायक कायम आदर्शच असतो, तो जे करतो ते बरोबरच असतं, हे ओळखून व्यक्तिरेखा निवडून त्यातून प्रेक्षकांवर काय ‘संस्कार’ होईल, याचं भान बाळगणारे अभिनेते होते ते.
पारशी नाटकांमधून स्फुरलेल्या आणि असंख्य गाणी असलेल्या त्या वेळच्या सिनेमांमध्ये अभिनयाचा बाज तद्दन नाटकी होता. अशोक कुमार यांनी त्या अभिनयात पहिल्यांदा सहजता आणली. पण, सिनेमासारख्या क्लोजअप घेऊ शकणार्‍या, चेहर्‍यावरची रेष अन् रेष दाखवणार्‍या माध्यमात नाटकी अभिनय करण्याची गरजच नाही, सहज संयत अभिनयही प्रभावी पद्धतीने करता येऊ शकतो, हे अधिक प्रभावीपणे दिलीप कुमार यांनी दाखवून दिलं. त्यातून एका अर्थी त्यांनी हिंदी सिनेमाच्या नायकाच्या अभिनयाचं व्याकरण घडवलं, तेच व्याकरण गिरवून पुढे अमिताभ बच्चनपासून शाहरूख खानपर्यंत अनेक अभिनेते सुपरस्टार बनले. त्यांनी दिलीप कुमार यांचं घराणं कधीच नाकारलं नाही, उलट ते कौतुकाने शिरोधार्य मानलं. त्याचबरोबर दिलीप कुमार यांनी नायकाची उदात्त, विशिष्ट जीवनमूल्ये मानणारी आणि अस्सल भारतीय अशी एक प्रतिमा प्रेक्षकांच्या नजरेत ठसवली, हे अधिक महत्त्वाचं.
पडद्यापलीकडच्या ‘भूमिकां’मधूनही दिलीप कुमार यांनी कायम नेहरूंच्या भारताची कल्पना जागी ठेवली. आपण स्टार आहोत, लोकांमध्ये आलो, मिसळलो, तर आपल्या ग्लॅमरचं वलय कमी होईल, असा विचार न करता, ते सामाजिक कामांमध्ये सक्रिय राहिले. सिनेमातल्या प्रसिद्धीचा प्रभाव चांगल्या पद्धतीने, चांगल्या कामांसाठी वापरला.
नेहरूंच्या कल्पनेतला एकात्म, प्रगतिशील, आधुनिक विचारांचा भारत उद्ध्वस्त केला जात असल्याच्या काळात दिलीप कुमार यांचा स्मृतिभ्रंश बळावत गेला, हा एक विलक्षण योगायोग. वयाच्या ९८व्या वर्षापर्यंत जगण्याचं सामर्थ्य असलेल्या त्यांच्या देहाची अवस्था या काळात विकल होत गेली आणि मातीतून जन्मलेला नवभारताचा सच्चा पुत्र पुन्हा मातीत मिसळून गेला…
युसूफखान सरवरखान पठाण या देहाची इतिश्री झाली…
…नेहरूंच्या भारताचा नायक असलेल्या दिलीप कुमारचेही अवतारकार्य संपले का, तोही मातीत मिळाला का, हे मात्र येणारा काळ ठरवणार आहे… आपण ठरवणार आहोत.

Previous Post

कसा पण टाका…

Next Post

गोष्ट मातृदिनाच्या बापाची

Next Post

गोष्ट मातृदिनाच्या बापाची

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.