कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षं आषाढी वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत खंड पडला. पण विठूभेटीसाठी आसुसलेले लाखो वारकरी यंदा आषाढी वारी चालत आहेत. वारकर्यांच्या मनातली ही भावना ‘पंढरीच्या पांडुरंगा’ या नव्याकोर्या म्युझिक व्हिडिओद्वारे मांडण्यात आली असून मराठी बिग बॉसच्या तिसर्या सीझनचा विजेता विशाल निकम या म्युझिक व्हिडिओद्वारे विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन झाला आहे.
या अनुभवाबद्दल विशाल म्हणाला, माझ्यावर हरिपाठ, कीर्तन यांचे संस्कार लहानपणी झाले आहेत. वारकरी कुटुंबातील असल्यामुळे माऊलींचे नामस्मरण, पंढरीला जाणे हे ओघानं आलंच. कुठेही प्रवास करताना, राम कृष्ण हरी हा जप माझ्या मनात सुरू असतोच. या गाण्याचं चित्रीकरण करताना चंद्रभागेत स्नान… वारकर्यांसोबत अनवाणी प्रवास… खूप सकारात्मक अनुभव येत गेले. हे गाणं मी अक्षरशः जगलो आहे असं म्हटलं तरी चालेल. हे गाणं महाराष्ट्राची वारकरी परंपरेचा वारसा जपणारे आहे. ‘बिग बॉस’मुळे, माझे आणि माऊलींचे काय नाते आहे याची माझ्या चाहत्यांना कल्पना आहे. ‘बिग बॉस’ विजेतेपद मिळाल्यावर जे चाहते भेटायला यायचे त्यातील बहुसंख्य लोक माऊलींची मूर्ती मला देऊन जायचे. माऊलींच्या आणि चाहत्यांच्या आशीर्वादामुळेच हे गाणं करण्याची संधी मला मिळाली. सर्व प्रेक्षकांना हे गाणं खूप आवडेल याची मला खात्री आहे.
दोन वर्षांत अडतीस गाण्यांची निर्मिती केलेले आणि मोठ्या मराठी म्युझिक चॅनलमधील मांदियाळीत एकमेव मराठी निर्माते असलेले साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकने या म्युझिक व्हीडिओची निर्मिती केली आहे. ते या गाण्याची जन्मकथा सांगताना म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्रातून अनेक संगीतकार, गीतकार आम्हाला त्यांची नवीन गाणी पाठवत असतात. दिग्दर्शक नवनाथ निकम याने संगीतकार विशाल भांगे यांचे गाणं (ऑडियो स्क्रॅच) मला पाठवलं, तेव्हा या गाण्याचा भक्तिमय सूर आणि प्रवीण भुसे यांचे शब्द मनाला भावले. आम्ही हे गाणे प्रवीण कुंवर यांच्याकडून गाऊन घेतलं. गाणं तयार झाल्यावर यातील प्रमुख भूमिकेसाठी आमच्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव आलं, ‘विशाल निकम‘. विशालची विठ्ठलभक्ती, त्यांचं माऊलीसोबतचे नातं प्रेक्षकांनी बिग बॉसमध्ये पाहिलं होतं. तो नाही म्हणाला असता तर हे गाणं आम्ही तयार केलं नसतं. पण सुदैवाने त्यालाही हे गाणं आवडलं आणि आम्ही दोन दिवसांत पंढरपूरमध्ये हे गाणं चित्रित केलं. ‘पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला, तुझ्यामध्ये जीव माझा रंगला, दंगला’ असे भावगर्भ शब्द आणि तितक्याच श्रवणीय संगीतानं हा म्युझिक व्हिडिओ सजला आहे. या गाण्यात वारकर्यांच्या मनातली विठ्ठलाप्रति असलेली आर्तता नेमकेपणानं मांडण्यात आली आहे. त्यामुळे, आषाढी एकादशीची वारी सर्व माऊलीभक्त अनुभवत असताना, त्यांना आणि जे वारीला गेले नाहीत त्यांना विठ्ठलभक्तीत न्हाऊन निघालेला हा म्युझिक व्हिडिओ मनाला शांतता आणि आनंद देऊन जाईल, अशी खात्री आहे.‘
– संदेश कामेरकर