हातात महिन्याचा पगार आला का त्या व्यसनापायी त्यातला किती भाग खलास होतो नि किती सुखरूप घरी येऊन पत्नीच्या हातात पडतो, याची आई आजीला पहिल्या तारखेच्या सुमाराला काळजी वाटायची.
– – –
फार मोठा नाही, पण छोटा छान धक्का देण्याचं प्रबोधनकारांचं लेखनतंत्र वाचताना मस्त आनंद देतं. `माझी जीवनगाथा` या आत्मचरित्रातला जीवनकथेचा प्रवाह नव्या वळणावर आलेला असताना अकराव्या प्रकरणाच्या सुरुवातीला हा आनंददायी धक्का प्रबोधनकारांचं मोहक रूप दाखवतं. ती सुरुवात अशीय,
`या व्यसनापायी पुष्कळ वेळा सांसारिक अडचणी उत्पन्न झाल्या नि होत असत. पण ते न सुटता उलट वाढतच गेले. ते व्यसन मी सोडावे, म्हणून मात्र एकाही स्नेह्याला आणि घरातील आजी, आई नि पत्नी यांना सांगवे ना. त्या व्यसनाविषयी गौरवपर उद्गार काढायचे.`
इथेच न थांबता ते पुढे आणखी इंटरेस्टिंग लिहितात, `हातात महिन्याचा पगार आला का त्या व्यसनापायी त्यातला किती भाग खलास होतो नि किती सुखरूप घरी येऊन पत्नीच्या हातात पडतो, याची आई आजीला पहिल्या तारखेच्या सुमाराला काळजी वाटायची. माझ्या हापिसात महिपतराव तावडे हेड ड्राफ्ट्समन होते आणि ते दादरच्या कुंभारवाड्यात रहात असत. दर पहिल्या तारखेला आजी मला न कळता अगदी सकाळीच तावड्यांकडे जायची नि सांगायची, `हे बघा महिपतराव, आज पहिली तारीख. पगार होणार. तेव्हा दादाला गप्पा गोष्टीत गुंगवून गिरणढोळा (ग्रँट रोड) कडूनच घरी घेऊन या. गिरगावकडे जाऊ देऊ नका.` तावड्यांची ही युगत नेहमीच यशस्वी होत नसे. बहुतेक मलबार हिल उतरून विल्सन कॉलेजपाशी आलो का सटकलोच सॅण्ढर्स्ट पुलावरून लॅमिंग्टन रोडवरच्या माझ्या `पिठ्यात`. `पिठा` हे नाव आजी आईनेच दिलेले होते. पहिल्या तारखेला घरी यायला उशीर झाला का त्या म्हणत, `सटकलाच अखेर आपल्या पिठ्याकडे.`
हे व्यसन नेमकं कोणतं आहे, याचं गुपितही प्रबोधनकार त्यांच्याच फर्मास शैलीत उलगडून सांगतात, `ते माझे हयातीला चिकटलेले व्यसन म्हणजे बुकबाजी उर्फ ग्रंथसंग्रह. या व्यसनापायी मी शेकडो रुपयांची खैरात केली. तो माझा `पिठा` म्हणजे त्याकाळी लॅमिंग्टन रोडवर असलेले मे. एस. गोविंद अँड सन्स बुकसेलर्स यांचे दुकान. तेथे विलायत अमेरिकेतून दर आठवड्याला नानाविध विषयांवरील लहानमोठे ग्रंथ विक्रीला येत असत.`
पुस्तकाच्या या दुकानाचे मालक गोविंदराव प्रबोधनकारांचा फार मान द्यायचे. प्रबोधनकार दुकानात येताच गोविंदराव इतर ग्राहकांना सहकार्यांकडे सोपवून त्यांच्या सेवेत जायचे. नवी पुस्तकं आणून दाखवायचे. प्रबोधनकारांनी पुस्तकं निवडली की किंमत न देताही खुशाल घेऊन जायला सांगायचे. पगाराच्या दिवशी प्रबोधनकार विचारायचे, `काय गोविंदराव, किती झाले बिल?` महिनाभराची पुस्तकखरेदी कितीही झालेली असली तरी गोविंदरावांचं उत्तर असायचं, `किती का असेना, तुम्हाला त्याची पंचाईत कशाला? सवडीने द्यायची असेल तेवढी रक्कम द्या, जमा होईल.` प्रबोधनकार ७५ रुपये पगारातले जमेल तितके म्हणजे २०-३० रुपये द्यायचे. ते देताना बिल बाकी असलं तरी नव्या पुस्तकांची खरेदी व्हायचीच.
इतर व्यसनांपेक्षा हे बुकबाजीचं व्यसन भयंकरच होतं. खर्चिक तर होतंच, पण काही केल्या सुटत नव्हतं. पुस्तकाची किंमत कितीही असेना, ते संदर्भासाठी आवश्यक वाटले, तर प्रबोधनकार लगेच खरेदी करायचे. ते खाण्यापिण्याच्या आणि कपड्याच्या खर्चापेक्षा दहापट खर्च पुस्तकांवर करायचे. नव्या ग्रंथाविषयी कळलं की ऑफिस सुटताच पळत गोविंदरावांच्या दुकानात जायचे. त्यांच्याकडे नसेल तर तो ग्रंथ दुसरीकडून मागवून द्यायचे. अगदी युरोप अमेरिकेतूनही मागवायचे. त्यामुळे प्रबोधनकारांचं खासगी ग्रंथालय विविध विषयांवरचं संदर्भालयच बनलं होतं. वेद आणि प्राचीन संस्कृती, इतिहास, तत्त्वज्ञान, इंग्रजी काव्य अशा अनेक विषयांवरचे जगप्रसिद्ध लेखकांचे सातआठशे ग्रंथ त्यांच्या संग्रही होते. त्यात अमेरिकेच्या रॅशनल पब्लिकेशन सोसायटीचं सगळं साहित्यही होतं.
रावबहादूर शंकर पांडुरंग पंडितांच्या `वेदार्थ यत्न` या मासिकाचे काही जुने सुटे अंक प्रबोधनकारांना जुन्या पुस्तकांच्या दुकानात सापडले. त्यातून त्यांना ऋग्वेदाविषयी जाणून घेण्याची, प्रबोधनकारांच्या शब्दात `चटक` लागली. त्याच्या आधारे त्यांनी या विषयावरच्या पुस्तकांचा माग काढायला सुरुवात केली. प्रख्यात जर्मन वैदिक विद्वान मॅक्समुल्लर यांचे ग्रंथ मिळवून वाचले. एका जुन्या लायब्ररीत त्यांना राजारामशास्त्री भागवतांचे ऋग्वेदाच्या एका समासावर लिहिलेल्या इंग्रजी टीकेचं फाटकं पुस्तक सापडलं. तेही अभ्यासून काढलं. या अभ्यासात त्यांना उडॉल्फ रॉल्फ या जर्मन विद्वानाच्या ऋग्वेदावरच्या चिकित्सक इंग्रजी टीकेचा संदर्भ सापडला. ते त्यांनी खूप शोधलं पण कुठेच सापडलं नाही.
असंच त्यांना न सापडलेलं पुस्तक म्हणजे मद्रासच्या शामाशास्त्रींचा कौटिलीय अर्थशास्त्राचा मूळ संस्कृत ग्रंथ. सहा जून १९१७ला पुण्यात डॉ. भांडारकर इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. त्या समारंभात या ग्रंथाचं प्रकाशन झालं होतं. त्याची बातमी प्रबोधनकारांनी वाचली होतीच. त्यांना गोविंदरावांच्या दुकानात या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतराचं जाडजूड पुस्तक मिळालं. त्याचा अभ्यास करताना त्यांना मूळ संस्कृत पुस्तक Dाभ्यासण्याची अनिवार इच्छा झाली. त्यासाठी त्यांनी मुंबईतली पुस्तकांची सगळी दुकानं पालथी घातली. तिथे पुस्तक मिळालं नाही, तेव्हा त्यांनी थेट शामाशास्त्रींनाच पत्र लिहिलं. त्यावर शास्त्रींनी दिलेल्या उत्तराने त्यांची निराशाच झाली, ‘या पुस्तकाच्या अवघ्या ५५० प्रती छापल्या होत्या. त्या भांडारकर संस्थेच्या स्थापनेच्या दिवशीच संपल्या. आता माझ्याजवळ एकही प्रत शिल्लक नाही.’
उडॉल्फ रॉल्फची ऋग्वेद टीका आणि शामाशास्त्रीचं कौटिलीय अर्थशास्त्र या दोन पुस्तकांसाठी प्रबोधनकार आटापिटा करत होते. व्यसनच इतकं भयंकर होतं की पुस्तकं मिळाल्याशिवाय राहवत नव्हतं. शेवटी त्यांनी बडोद्याला जायचं ठरवलं. महाराजा सयाजीरावांसारखा व्यासंगी आणि विद्वानांना आश्रय देणारे सत्ताधीश असल्याने बडोदा हे तेव्हा विद्येचं भक्कम केंद्र बनलं होता. तिथल्या स्टेट लायब्ररीत ही दोन्ही पुस्तकं हमखास पहायला मिळतील याची त्यांना खात्री होती. सोबत नेहमीप्रमाणे त्यांचे जानी दोस्त बाबूराव बेंद्रे होतेच.
लायब्ररीत गेल्यावर तेथील मुख्य ग्रंथपाल जनार्दन कुडाळकर यांनी दोन्ही ग्रंथ समोर ठेवले. कुडाळकर हे दीर्घकाळ राजग्रंथालयाचे क्युरेटर म्हणून काम करत होते. ही लायब्ररी सयाजीरावांच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहातून उभी राहिली होती. उडॉल्फ रॉल्फच्या पुस्तकाची प्रत मिळणं शक्य नव्हतं. कारण ते पुस्तक जुनं होतं आणि त्याची नवी आवृत्ती नव्हती. त्यामुळे प्रबोधनकारांनी त्यातले काही तपशील लिहून घेतले. बाबूराव बेंद्रे यांनी डिक्टेट केलं आणि प्रबोधनकार शॉर्टहॅण्डमधे नोंदवून घेतलं. सलग दोन दिवस बसून त्यांनी जवळपास सगळं पुस्तक उतरवून काढलं.
आता प्रश्न कौटिलीय अर्थशास्त्राचा होता. त्याची प्रत काहीही करून उपलब्ध करून देण्याची गळ त्यांनी ग्रंथपाल कुडाळकरना घातली. त्यांनी प्रबोधनकारांना भूर्जपत्रांचं वाचन संशोधन करणार्या दाक्षिणात्य शास्त्रींच्या दालनात नेलं. तिथे बरेच शास्त्री अभ्यास करत होते. त्यातल्या मुख्य शास्त्रींना कुडाळकर म्हणाले, ‘हे पहा शास्त्री, हे आमचे मोठे अभ्यासू दोस्त आहेत. त्यांना शामाशास्त्र्यांचं कौटिलीय अर्थशास्त्राची संस्कृत प्रत हवी आहे. काय करता बोला?’
कुडाळकर ग्रंथालयाचे प्रमुख होतेच. ते स्वतःही उत्तम लेखक आणि संशोधक होते. त्यामुळे शास्त्रीमंडळी त्यांच्या शब्दाबाहेर नव्हती. मुख्य शास्त्रींनी प्रबोधनकारांचा पत्ता लिहून घेतला. म्हणाले, ‘कधी परत जाणार तुम्ही मुंबईला? चार दिवसांनी ना? ठीक आहे. तुम्ही दादरला जाताच त्या पुस्तकाची व्हीपी घेऊन पोस्टमन तुमच्या दाराशी आलाच समजा.’ आणि घडलंही तसंच. चार दिवसांनी दादरला परतताच प्रबोधनकारांना घरच्यांनी एक व्हीपी आल्याचं सांगितलं. जवळपास दोन महिने सतत मागे लागून मिळवलेलं पुस्तक हातात आलं.
कौटिलीय अर्थशास्त्राचं मूळ संस्कृत पुस्तक आणि त्याचं इंगजी भाषांतर हे दोन्ही हाती आल्यावर प्रबोधनकारांनी त्याचा समूळ अभ्यास केला. त्याच्या शेकडो नोट्स काढल्या. प्रबोधनकार या ग्रंथाचं वर्णन करतात, ‘इसवी सनापूर्वी अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी विष्णुगुप्त चाणक्याने लिहिलेला तो ग्रंथ जवळजवळ इंडियन पीनल कोडसारखा.’
प्रबोधनकारांचे महाड येथील मित्र प्रा. गोविंदराव टिपणीस यांनी ही पुस्तकं आणि प्रबोधनकारांच्या नोट्स यांचा सविस्तर अभ्यास केला. त्यावर गिरगावच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या हॉलमध्ये आठवडाभर व्याख्यानं दिली. त्याचं रिपोर्टिंग बॉम्बे क्रॉनिकल या इंग्रजी वर्तमानपत्रात दररोज येत राहिलं. त्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष या महान ग्रंथाकडे वेधलं, असं प्रबोधनकार म्हणालेत.