सुरक्षेबाबतच्या ढिसाळपणाचे सगळेच खापर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर फोडणे हा पंतप्रधानांच्या आततायीपणाचा कळस आहे. इतक्या गंभीर विषयात प्रचारकी आणि देशातल्या एका राज्याविषयी उर्वरित देशाच्या मनात शंका निर्माण करणारे, एका राज्याला, तिथल्या जनतेला सरसकट आरोपीच्या पिंजर्यात उभे करू पाहणारे प्रक्षोभक विधान करून पंतप्रधानांनी काय साधले? ही राजकीय अपरिपक्वता आहे की कशाचेही राजकारण करण्याची घातक प्रवृत्ती?
– – –
पंतप्रधान मोदी यांना सुरक्षेच्या कारणांमुळे सहा जानेवारी २०२२ रोजी पंजाबचा दौरा रद्द करून अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरावे लागले. या घटनेबाबत आलेल्या बातम्यानुसार पंतप्रधान तब्बल वीस मिनिटे एका उड्डाणपुलावर अडकून पडले होते. या संपूर्ण काळात त्यांच्याबाबत कोणताही घातपात घडला नसला तरी त्यामुळे या घटनेचे गांभीर्य बिल्कुल कमी होत नाही. आपल्या देशाने राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दुर्दैवी हत्या अनुभवलेल्या आहेत. त्यामुळेच पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या सुरक्षेत कसलीच हेळसांड खपवून घेता कामा नये. अशा घटना गंभीरपणे घेतल्या जाव्यात, त्या घटनांची सखोल चौकशी व्हावी यावर कोणाचे दुमत नसते. पंतप्रधानांची सुरक्षा हा वादाचा विषय देखील होऊ शकत नाही, कोणत्याही परिस्थितीत त्याबाबत हयगय खपवून घेता कामा नये. त्यामुळे पंजाबमध्ये झालेला प्रकार गंभीरच होता, पण पंतप्रधानपदावरील जबाबदार व्यक्तीने त्यावर लगेच ‘मैं भटिंडा एयरपोर्ट पर जिंदा लौटा इसलिए आपके मुख्यमंत्री को धन्यवाद कहना’ असे उपरोधिक आणि पंजाब प्रशासनावर आरोप करणारे तद्दन राजकीय स्वरूपाचे विधान घाईघाईत आतताईपणाने राज्य सरकारच्या अधिकार्यांसमोर करणे हेही गंभीर आणि टाळण्यासारखे होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेमधील त्रुटींची समीक्षाच व्हायला हवी आणि दोषींना शिक्षाच व्हायला हवी, मात्र, त्यांचे बेजाबदार वक्तव्य आज राजकीय चर्चेचा विषय बनून बसले आहे, अनावश्यक ध्रुवीकरण घडवून आणते आहे.
या सगळ्या घटनाक्रमाची सुरुवात होते शेतकरी आंदोलनापासून. पंतप्रधानांनी तब्बल दोन वर्षांपासून दिल्लीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंजाबकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकरी देशबांधवाना ते पंतप्रधान म्हणून सोडा, तर निव्वळ एक माणूस म्हणून देखील सामोरे गेले नाहीत, ना त्यांनी शहीद आंदोलकांसाठी दोन सांत्वनाचे शब्द कधी उच्चारले. उलट शेतकर्यांची ‘आंदोलनजीवी’ अशी हिणकस शेरेबाजीवजा हेटाळणी मात्र त्यांनी भर संसदेत केली होती. पाच जानेवारी २०२२ रोजी मात्र त्यांना अचानक पंजाबची आठवण झाली आणि मी पंजाबच्या बहीण-भावंडाना भेटायला येत आहे असे टिपिकल मोदीशैलीतील प्रचारकी भाषेतील एक ट्वीट त्यांनी केले. अर्थात पंजाबकडे दोन वर्षे ढुंकूनदेखील न बघणारे पंतप्रधान अचानक तिथे भाईयोंबहनोंना भेटायला का निघाले, याचे उत्तर शेंबडे पोर पण देईल. कोरोनाने होरपळत असताना उत्तर प्रदेशाला भेट न देणारे पंतप्रधान हल्ली आठवड्यातले बरेच दिवस उत्तर प्रदेशात मुक्कामी का असतात, याचे देखील उत्तर फारसे अवघड नाही. पंजाबमध्ये अथवा ऊत्तर प्रदेशात निवडणूक नसती तर पंतप्रधानांनी या राज्यांचे दौरे आज देखील टाळलेच असते. पण प्रचारासाठी का असेना, मोदींना पंजाबची एकदा तरी आठवण झाली आणि ते फिरोजपूरमध्ये शासकीय कार्यक्रमांसाठी आणि त्याला जोडून ठेवलेल्या एका प्रचारसभेसाठी सहा जानेवारीला सकाळी दिल्लीहून निघाले आणि भटिंडा विमानतळावर पोहोचले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने फिरोजपूरला जाणार होते. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार हवामान अनुकूल नसल्याने हेलिकॉप्टरने जाणे त्यांना रद्द करावे लागले.
पंतप्रधानपदासारख्या सर्वोच्च सुरक्षेच्या पदाच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना हवामानामुळे हेलिकॉप्टरने जाणे शक्य नसेल, तर साधारण एक अथवा दोन तास वातावरण अनुकूल होण्यासाठी वाट पाहिली जाते आणि वातावरण अनुकूल न झाल्यास नियोजित हवाई सफर रद्द करून पर्यायी मार्ग वापरला जातो. हा पर्यायी मार्ग देखील फार आधीच ठरवलेला असतो व तो देखील उपलब्ध नसेल तर दौरा पूर्ण रद्द केला जातो. मोदींचा हेलिकॉप्टरचा प्रवास रद्द करून पर्यायी मार्गाने दौरा चालू करायचा की तो दौरा पूर्ण रद्द करायचा याबाबतचा सर्व निर्णय एसपीजी ही सुरक्षा यंत्रणा ठरवते. त्यात अगदी स्वतः पंतप्रधान देखील ढवळाढवळ करू शकत नाहीत असे ऐकिवात आहे. मोदींनी रस्तामार्गे जाण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला की तो पूर्वनियोजित पर्याय म्हणून आधीच ठरवलेला होता, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पंतप्रधान रस्तामार्गे जाणार असतील तर त्या रस्त्याच्या दुतर्फा अक्षरश: इंच न् इंच जमीन पिंजून काढावी, असे सुरक्षा नियमावली सांगते. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत ब्लु बुकमधे सर्व नियमावली नमूद आहे. एसपीजी या नियमावलींचे तंतोतंत पालन करते. एसपीजीने एकदा नाही म्हटले की त्यात बदल होत नाही, तिथे सगळा विषयच संपतो. दोनशे किलोमीटर अंतर रस्त्याने पार करण्याचा निर्णय पंतप्रधानही अचानक घेऊ शकत नाहीत. ते रस्त्याने जाणार असतील तर त्याची तयारी काही आठवडे अाधी करावी लागते आणि अशा वेळी आली लहर केला कहर असे चालत नाही. रस्त्याने जाण्याचा निर्णय एसपीजीने ऐनवेळी घेतला असे होऊ शकत नाही. तसा पर्याय आहे हे त्यांनी पंजाब सरकारला नक्कीच काही आठवडे आधी कळवला असणार. मग पंजाब पोलीस व सरकारचा या घटनेत गलथानपणा झाला असेच म्हणता येईल. पण पंजाब पोलीस आणि मुख्यमंत्री मात्र याबाबतीत पूर्ण वेगळी भूमिका मांडत आहेत. त्यामुळेच संपूर्ण सखोल चौकशी झाल्यावरच यात नेमके दोषी कोण आहे हे ठरेल.
आज चित्र असे अस्पष्ट असताना सुरक्षेबाबतच्या ढिसाळपणाचे सगळेच खापर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर फोडणे हा पंतप्रधानांच्या आततायीपणाचा कळस आहे. इतक्या गंभीर विषयात प्रचारकी आणि देशातल्या एका राज्याविषयी उर्वरित देशाच्या मनात शंका निर्माण करणारे, एका राज्याला, तिथल्या जनतेला सरसकट आरोपीच्या पिंजर्यात उभे करू पाहणारे प्रक्षोभक विधान करून पंतप्रधानांनी काय साधले? ही राजकीय अपरिपक्वता आहे की कशाचेही राजकारण करण्याची घातक प्रवृत्ती? याआधी प्राणघातक ठरू शकणारे हल्ले झाले तरी देखील तोंडातून ब्र न काढणारे पंतप्रधानच या देशाने पाहिलेले आहेत. पंतप्रधानांच्या जिवाला २४ तास धोका असतो, हे गृहित धरूनच त्यांना देशातली सर्वोच्च सुरक्षा पुरवण्यात आलेली असते.
इथे आणखी एक गडबड आहे. एखाद्या राज्यात निवडणूक आली रे आली की मोदीजी त्या राज्याची वेषभूषा परिधान करून, त्या राज्यातील महापुरुषांना वंदन करून, तेथील भाषेतील सुभाषिते पाठ करून, स्थानिक देवीदेवतांचा जयघोष करून, लाखो कोटींच्या कागदावरच्या योजनांची भूममीपूजने आयोजित करून एखाद्या मुरलेल्या नटासारखे मुख्य प्रचारकाच्या भूमिकेत अलगद शिरतात… त्यांना एका पक्षाचे प्रचारप्रमुख असण्याचा असा काही छंद जडलेला आहे की ते देशाचे पंतप्रधान कधी असतात, हेच कळेनासे होते. पंतप्रधान देशाचे असतात, त्यांनी एका पक्षापुरते सीमित राहायचे नसते, लोकसभा निवडणुकांचा अपवाद वगळता प्रचारातही फारसे सहभागी व्हायचे नसते, हे सगळे संकेत धुळीला मिळवून ते आसेतुहिमाचल एकमेव स्टार प्रचारक बनूनच अधिक काळ फिरत असतात. देशाच्या सुरक्षा यंत्रणा आणि विशेषकरून पंतप्रधानांची सुरक्षा पहाणार्या एसपीजीसाठी मात्र ते सदा सर्वकाळ पंतप्रधानच असतात आणि प्रसंगी स्वतःच्या प्राणाचे मोल देऊन देखील पंतप्रधानांचा जीव वाचवण्यासाठी एसपीजी कटिबद्ध असते. त्यामुळेच पंतप्रधान पंजाबला जरी २० मिनिटे अडकले तरी पंतप्रधानांच्या दिमतीला असलेल्या पंधरा कोटींच्या कारला साधा ओरखडा देखील आला नाही आणि पंतप्रधान सुरक्षित परतले ते फक्त एसपीजीमुळे. मानवी शारीरिक क्षमता, चपळता, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वापरण्यातील पारंगतता, निरीक्षणक्षमता इत्यादी शेकडो गोष्टींत सर्वश्रेष्ठ असणार्या देशातील तीन हजार कमांडोंना एसपीजीमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाते. वर्षाला सहाशे कोटी खर्च असणारे तीन हजार लोकांचे हे सुरक्षा दल फक्त एकच कामासाठी कटिबद्ध आहे, ते म्हणजे या देशाच्या पंतप्रधानांच्या जीविताची रक्षा करणे. पंतप्रधानांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची अहोरात्र काळजी घेणारी इतकी प्रभावी यंत्रणा सक्षम असताना या देशाचे पंतप्रधान असुरक्षित असूच शकत नाहीत. पंतप्रधान असुरक्षित आहेत म्हणणे हे एसपीजीमध्ये शिर तळहातावर घेऊन कर्तव्य बजावणार्या प्रत्येक जवानाचा अपमान करण्यासारखे आहे.
त्यामुळेच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर उपरोधिक टिप्पणी करण्याएवजी पंतप्रधानांनी आपल्या प्रत्येक श्वासाचे रक्षण करणार्या एसपीजीचे आभार मानले असते तर ते अधिक योग्य आणि त्यांच्या पदाला साजेसे ठरले असते. पण पंतप्रधानांना या घटनेनंतर तसे विधान करावेसे वाटले नाही. कारण विधान करणारी व्यक्ती त्याक्षणी देशाचे पंतप्रधान नव्हती तर भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रचारकाने ते राजकीय विधान केले होते, एवढाच या घटनेचा दुर्दैवी अर्थ आता काढता येईल.