लाख ग्रामपंचायतचं हाफीस. दुपारची वेळ. ग्रामसेवक सातनवरे घोळाच्या काडीने दात कोरत खुर्चीत बसलाय. तोच रस्त्याने जाणारा सदू वाट वाकडी करून मुद्दाम हाफीसात येतो. आजूबाजूला दुसरं कुणी नाही बघून टेबलचं ड्रॉवर उघडतो, आतले कागद उचकवून काही शोधू लागतो.
‘अरे काय शोधतोय? आज पुड्या भेटल्याच नाही. मीच तुला म्हणणार होतो, येतो का घेऊन म्हणून. सकाळपासून आंबल आलाय पार!’ आंबलेल्या चेहर्यानं सातनवरे गुटख्याच्या आठवणीने तळमळतो.
मात्र सदू काही फिरून पहात नाही. तो तिथं शोधल्यावर लाकडी कपाटाची कवाडं उघडतो आणि तिथं काही चाळू लागतो. त्याची ती उचकपाचक बघून सातनवरे टेबलवरचे पाय खाली घेतो नि त्याच्याकडे मान वळवून बघतो.
‘नेमकं तुला पाहिजेय काय? काय शोधतोय तू?’ सातनवरे त्याला पुन्हा विचारतो.
‘म्हणजे तू व्हाट्सअप पाहिलंच नाही वाटतं? तुला हजारदा सांगितलंय, जरा तालुक्यात, जिल्ह्यात काय घडतंय ते बघत जा म्हणून. पण तुझं ध्यान भलतीकडंच!’ मधले काही कप्पे चाळता चाळता सदू बोलतो.
‘अरे पण झालंय काय? नीट काहीतर सांग!’ सातनवरे काहीश्या त्राग्याने विचारतो.
‘अरे काल त्या झिपराळ्या सर्कलला पकडलंय, तो नाही का? मागल्या वेळी तहसील हाफीसला भेटला होता? त्याच्यात तू सगळीच बंडलं हाताजवळ ठेवतो. म्हणून तसलं काही आज पण आहे का? ते उचकून बघतोय!’ सदू त्याला समजावतो.
‘हा, तो आहेच बावळट! तेव्हा त्याला पकडलं तर काय?’ सातनवरे अगदीच सहजतेनं प्रतिप्रश्न करतो.
‘अरे तो आहेच मूर्ख! पण त्या पलीकडल्या बीडीओला सुद्धा पकडलंय! म्हणून म्हणतो सावध रहा!’ सदू समजावू जातो.
‘पण वर आपले आलेत ना पुन्हा? मग घाबरायचं का?’ सातनवरे वर बोट करून खुणावतो!
‘ते आलेत पण लोकं खवळलेली आहेत ना? ती धरून देणारच ना?’ सदू त्याला वास्तव सांगतो.
‘मग रे आता? मी गंज काळजी घेतो. आता तू बघितलंच कुठं काही आहे का ते! पण पकडूच नाही आणि पकडलं तर लगेच सुटका होईल असा जालीम उपाय नाहीय का?’ सातनवरे सदूला विचारतो.
‘आहे, दाढीवाल्या बाबाचा उपाय आहे! आणि वर जालीम आहे!’ सदू ठामपणे दावा करतो.
‘कुठला?’ सातनवरे उत्सुकतेने!
‘रोज १०८ वेळा ‘एक है तो सेफ हैं’ मंत्राचा पाठ करायचा! त्याच्या प्रभावाने अटक करायला येणार्या पोलिसांचं सुद्धा मनपरिवर्तन होईल, इतकं त्यात सामर्थ्य आहे!’ सदू गुरूच्या मुद्रेत सातनवरेला उपदेश करतो.
‘रोज १०८वेळा ना? त्यात काय? मी एक पारघात १०८ वेळा मंत्रजाप करीन! बघच तू!’ बोलता बोलता तो फायलीच्या गठ्ठ्याच्या सुतळ्या ओढतो. त्याला बारीक १०८ गाठणी घालून माळ बनवतो आणि तीच सुतळी घेऊन मंत्र जाप करू लागतो.
‘सुरक्षित भव!’ म्हणून सदू मंत्रदीक्षा द्यायला दुसर्या हाफीसकडे रवाना होतो.
काही वेळ सातनवरे एकटाच मोठ्याने मंत्रजाप करत बसतो. सूर्य कलायला लागलाय, काटे सशागत धावताय, अश्यात खंडू एक मरतुकडा बैल आणि दोन ढेबरे गोर्हे घेऊन हाफीसात घुसतो.
‘अय, अय खंड्या! हे काय चाललंय? ही ढोरं मधी का घालतोय?’ सातनवरे त्याला अडवू बघतो.
त्याने काही कृती करायच्या आत तिन्ही जनावरं आत घुसतात, खंडू खांद्यावर आणलेलं गवताचं ओझं त्यांच्यापुढे टाकतो.
‘हां आता बोल!’ मोकळा झालेला खंडू टेबलावर बसत विचारू लागतो.
‘अरे काय बोलणार? तू जनावरं सरळ हाफीसात घेऊन घुसलाय. यांना बाहेर काढ. मग इथं का आलाय ते सांग!’ सातनवरे चिडून बोलतो.
‘येड्या ते अख्ख्या गावाचे बाप आहेत आणि त्यांना बाहेर घालवायला सांगतो? लाज वाटते का?’ खंडू दरडावून विचारतो.
‘गावाचे असतील पण माझा बाप तर घरीच आहे. मला नवा बाप शोधायची काय गरज? आणि हे…?’ तो रागाने हात झटकतो.
‘तू मान नाहीतर मानू नको! हे गावचे बाप आहेत. तेव्हा हे इथेच राहतील. काय?’ खंडू टेबलावर थाप मारत सांगतो.
‘अरे पण यांना इथंच का आणलंय? गावचे बाप असतील तर चौकात नेऊन बांध. चावडीवर नेऊन बसव. गावच्या गायरानावर नेऊन सोड चरायला! इथंच का आणलंय?’ सातनवरे त्राग्याने विचारतो.
‘पोटगी घ्यायला आलोय आम्ही!’ खंडू शेवट मुख्य कारण सांगतो.
‘पोटगी? कुणाकडून? आणि त्याच्यासाठी हे बैल…?’ चक्रावलेला सातनवरे विचारतो.
‘पोटगी पंतांकडून पाहिजेय!’ खंडू.
‘आता त्यांचा काय संबंध? त्यांनी गोपनीयतेची शपथ घेऊन घसा ओला करायच्या आत बरा आलास तू?’ सातनवरे.
‘संबंध त्यांच्यामुळंच आलाय!’ खंडू.
‘मला तर काही कळेना बाबा! तू म्हणतोय काय? करतोय काय?’ सातनवरे डोक्याला हात लावून मटकन खुर्चीत बसतो.
‘त्यात न कळण्यासारखं आहेच काय? पंतांनी शपथ घ्यायच्या आधी कुणाची पूजा केली?’ खंडू कोडं घालतो.
‘केली असंल बाबा देवादिकाची नाहीतर भुताखेताची! मी का त्यांचा पीए आहे का? मला माहित असायला?’ सातनवरे वैतागून बोलतो.
‘अरे गावमातेची पूजा नाही केली का?’ खंडू.
‘हां, पण तिचं काय?’ सातनवरे अजून बुचकळ्यात पडतो.
‘ती कमळी आणि आमचा हा सर्जा. यांचं आधी…’ तो बोटांची गाठ मारून सांगतो.
‘हातीच्या!! एव्हढंच ना? मग ती गाय घेऊन जायची परत!’ सातनवरे सुचवतो!
‘तिनं तीनदा मान हलवून फारकत घेतलीय! आता नांदायला यायला नाही म्हणते. ही दोन टोणगी पाठीमागं सोडून गेलीय ती! बिनाआयची लेकरं, मी कशी वाढवतो मलाच माहीत!’ खंडू डोळ्याच्या कडा पुसत बोलतो.
‘फारकत घेतलीय? गाईने? काही कागदपत्रांवर लिखापढी झालीय का तशी?’ सातनवरे खोदून विचारतो.
‘ अजून समान नागरी कायदा नाही आला ना? त्याचा गैरफायदा घेतलाय तिनं! फक्त मान हलवून तलाक दिलाय.’ खंडू गाल फुगवून सांगतो.
‘मग आता मी काय करू?’ सातनवरे महत्त्वाचा प्रश्न करतो.
‘तुम्ही पंतांना सांगून पोटगी मिळवून द्या!’ खंडू.
‘पोटगी?’ सातनवरे आश्चर्याने विचारतो.
‘हो, पोटगीच!’ खंडू.
‘मग कोर्टात जायचं! इथं काय यायचं?’ सातनवरे सल्ला देतो.
‘आं! मी येडाय का? मोठी माणसं सांगती नाही का? शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणून? आणि त्याच्यात पंच पंतांच्या इच्छेविरुद्ध काही आदेश देतात का? म्हणून म्हंटलं पंतांना भेटावं.’ खंडू कोड्याचा उलगडा करतो.
‘पण तुझ्या सर्जाला पोटगी का पाहिजे? तो काही कमवीत नाही का?’ सातनवरेला वेगळाच प्रश्न पडतो.
‘जिरायतात तो काय डोंबलाचं कमविल का? हे पोट खपाटीला गेलेलं दिसत नाही का तुम्हाला? इथं अख्खा उन्हाळा राबून पावसानं पिकं वाहून गेली. जी राहिली त्यांना पानं राहिले नाहीत. भुसात आणि तुसात सार्या काड्या आणि माती! त्यानं खावा काय? म्हणलं सोयाबीनचे चांगले पैशे येतील मग त्याला कडबा घेईल तर त्याचेच भाव पडेल. त्याच्यातून मलाच खायला दाणे घ्यायची पंचाईत!’ खंडू कर्मकहाणी सांगतो.
‘म्हणजे तुला पोटगीच पाहिजे तर…?’ सातनवरे!
‘हो, आता कमळी एवढ्या भरल्या घरात आहे तर तिनं पोटगी द्यायला काय हरकत आहे? त्याच्यानं तीन जीव जगत असतील तर वाईट काय?’ खंडूचा रोकडा सवाल!
‘ते देतील असं वाटतं?’ त्यावर सातनवरेची शंका.
‘का देणार नाहीत? ते गावमातेला हिरवा लुसलुशीत चारा देतायत तर मरतुकड्या बापाला आणि बिनकामाच्या भावंडांना पण चारदोन मुठी देतीलच ना?’ खंडू बिनतोड जबाब देतो.
‘ते मरू दे खंडू! पण तुझी जनावरं जर्शी! तिचा आणि त्या गाईचा काही संबंध नाही. हे मलाही माहीत आहे नि सार्या गावाला पण! मग तुला ही जित्राबं पंतांच्या गळ्यातच का बांधायचीय?’ सातनवरे उभा राहून खंडूच्या डोळ्यात डोळे घालून हसत विचारतो.
‘काय आहे नवर्या! गावात ही आरडबेरशी जित्राबं मारायला बंदी आहे ना? ती शेतात राबायच्या कामाची पण नाही आणि मोकळी सोडायची कुठं? गावात सोडली तर सांजच्याला घरी येतील, सोबत गावच्या शिव्या घेऊन! आणि घरी पोसायची म्हणजे दुभत्या जनावराइतकं खाणं त्यांना द्यावा लागंल. एवढी गवतगोळी, चारा आणायचा कुठून? इथं ह्या साली अर्धं पीक वाहून गेलं, उरलं त्याला भाव नाही. मग पोट भरावा की ही जित्राबं पोसावा?’ खंडू बोलत जातो नि सातनवरे मान हलवत जातो.
‘मग मी काय करू आता?’ सातनवरे शेवटचं विचारतो.
‘त्यांनी पिकांना हमीभाव देताना जश्या अटीशर्तीं घातल्यात त्याच प्रकारे अभ्यास करून त्यांना समजावून सांग. गावमाता ठरवताना ठरवलेल्या निकषानुसार हा सर्जा त्यांचा गावपिता आहे आणि ही भावंडं! पोसा म्हणावं त्यांनाही! काय?’ खंडू बोलून निघून जातो.
सातनवरे ‘एक है तो सेफ हैं।’चा जाप करत जित्राबं न्याहाळत बसतो…