राहुल गांधींचं भाषण हे विरोधी पक्षनेत्याच्या एरव्हीच्या चौकटीपेक्षा जास्त आक्रमक होतं. या भाषणात त्यांनी कुठलाही आड पडदा न ठेवता भाजपच्या विचारसरणीवर थेट हल्लाबोल केला. मी बायोलॉजिकल नाही या मोदींच्या विधानाचीही जोरदार खिल्ली उडवली. त्यामुळेच पंतप्रधान मोदीही राहुल यांच्या बाबतीत इतके द्वेषाने बोलताना दिसले. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल यांच्या पहिल्याच भाषणाने भाजपच्या गोटात एवढी खळबळ उडवून दिली आहे.
– – –
‘राहुल विरुद्ध मोदी’ ही डिबेट व्हावी अशी इच्छा निवडणूक प्रचारामध्ये एका संस्थेच्या माध्यमातून पुढे आली होती. त्याबाबत दोघांना निवेदने पण सादर करण्यात आली होती. ही डिबेट काही प्रत्यक्षात आली नाही, पण ती झाली असती तर ती कशी असती, याची पहिली झलक देशाच्या संसदेत पाहायला मिळाली.
विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी आपलं पहिलं भाषण संसदेत केलं आणि त्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह त्यांचे डझनभर मंत्री सातत्याने ऊठबस करताना दिसले. खरंतर सभागृहामध्ये एखाद्या सदस्याच्या भाषणामध्ये आक्षेप घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान उठतात, हे चित्र दुर्मिळातलं दुर्मिळ असतं. त्यातही विरोधी पक्षनेत्याच्या पदाचा एक सन्मान असतो. पण राहुल गांधींच्या भाषणावर आक्षेप घ्यायला सगळ्यात पहिल्यांदा कोण उठलं असेल तर ते पंतप्रधान मोदी. हे चित्र बरंच काही सांगणारं आहे.
एकतर राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाल्यानंतरच या गोष्टीची चर्चा होती की, नाईलाजाने का होईना पण भाजप आणि मोदींना आता राहुल गांधींना आदर द्यावाच लागेल. पण तो देणं हे त्यांच्यासाठी किती अवघड आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे हेच संसदेत पहिल्या भाषणात पाहायला मिळालं.
‘भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नव्हे, नरेंद्र मोदी म्हणजे पूर्ण हिंदू समाज नव्हे, आरएसएस म्हणजे पूर्ण हिंदू समाज नव्हे,’ ही गोष्ट एकदा देशाच्या संसदेत कोणीतरी ठणकावून सांगणं आवश्यक होतं. ती गोष्ट राहुल गांधींनी संसदेत करून दाखवली. राहुल विरोधी पक्षनेते असल्यामुळे काय होऊ शकतं, निर्भीडपणे भाजपच्या विचारसरणीवर ते हल्ला करू शकतात याची पहिली पोचपावती त्यांच्या या विधानातून मिळाली. खरंतर त्यांच्या भाषणामध्ये भगवान शंकराच्या चित्राचा आधार घेऊन ते हिंदू धर्मातली शिकवण समजावू पाहत होते. पण संसदेत फलक दाखवायला मनाई आहे असा नियम पुढे करून लोकसभा अध्यक्षांनी त्यावर आक्षेप घेतला. महादेवाच्या मूर्तीतल्या एकेका प्रतीकाचा आधार घेत खरा हिंदू धर्म काय सांगतो हे राहुल सभागृहात समजावत होते. हिंदू धर्म हिंसेची शिकवण देत नाही तर तो अहिंसा सांगतो, हा त्यांचा मुद्दा होता. स्वतःला हिंदू समजणारे मात्र हिंसेच्या आहारी गेले आहेत असं सत्ताधारी बाकाकडे बोट दाखवून ते म्हणाले… त्यावर भाजपने छाती पिटायला सुरुवात केली की हा सगळ्या हिंदू धर्माचा अपमान आहे. पंतप्रधान मोदी आपल्या जागेवरून उठले आणि हा गंभीर विषय आहे, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक ठरवण्याचा प्रयत्न झाला आहे, असं रागात म्हणून ते खाली बसले. झालं हा जणू भाजपच्या सगळ्या मंत्र्यांना, खासदारांना एक इशाराच होता. कारण त्यानंतर राहुल यांच्या प्रत्येक मुद्द्यावर थोड्या थोड्या वेळाने मंत्री उठून गदारोळ करू लागले.
राहुल गांधी महादेवाचे चित्र दाखवू पाहत आहेत आणि सत्ताधारी बाकाकडून त्याला आक्षेप घेतला जातो आहे, हे गंमतीशीर चित्र या निमित्ताने पाहायला मिळालं.
काँग्रेसच्या चिन्हाचा अभयमुद्रेशी कसा संबंध आहे आणि प्रत्येक धर्मामध्ये ही मुद्रा दडलेली आहे. ‘डरो मत…निर्भयपणे सत्याचा आग्रह धरा’ हाच प्रत्येक धर्माचा संदेश आहे, हे राहुल गांधी एकेक चित्र घेऊन दाखवू पाहत होते. पण त्याऐवजी त्यांच्या भाषणातला एकच मुद्दा पकडून हा हिंदू समाजाचा अपमान राहुल यांनी केला असे चित्र भाजपने रंगवायला सुरुवात केली. लोकसभा निकालानंतर सध्या आपल्याकडे नॅरेटिव्ह हा शब्द खूप चलनात आला आहे. पण हे नॅरेटिव्ह कसं काम करतं याची झलकच भाजपने दाखवून दिली. राहुल गांधींच्या वक्तव्याची मोडतोड करून पूर्ण वक्तव्य न दाखवता काही क्लिप सोशल माध्यमांमध्ये फिरू लागल्या. पण यावेळी काँग्रेस सावध होती आणि त्यामुळे त्यांनी पण याला जशास तसे उत्तर दिले.
विरोधी पक्षनेते म्हणून राहुल यांनी भाषणामध्ये अग्नीवीरचा मुद्दा उपस्थित केला, नीट परीक्षेच्या गोंधळावर सरकारला जाब विचारला, मणिपूरचा प्रश्न मांडला. या सगळ्याची पंतप्रधान आपल्या भाषणात काही दखल घेतील असं वाटलं होतं पण ती अपेक्षा फोल ठरली. त्याऐवजी पंतप्रधानांनी भाषणात राहुल गांधी यांना ‘बालकबुद्धी’ असं हिणवण्यात आपली ऊर्जा खर्च केली. या आधी मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी विरोधी पक्षनेते नसले तरी काँग्रेसचे गटनेते म्हणून विरोधी पक्षाचे नेतृत्व लोकसभेत करत होते. त्यांना देखील मोदी आदराने खरगेजी, अधीरदा असं संबोधित करत होते. पण इथे एकदाही राहुल यांच्या नावाचा साधा उल्लेख मोदींनी केला नाही. केला तर त्या नावात ‘जी’ लावावं लागेल. ज्यांना आपण ‘पप्पू’ म्हणून जनतेसमोर रंगवत आलो आहे त्यांनाच आता आदराने संबोधावं लागतंय याचीच टोचणी बहुदा आतून लागत असावी.
राहुल गांधी यांनी संसदेत अग्नीवीरला शहीदाचा दर्जा सरकार देत नाही, याच्याबद्दल विधान केलं त्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तातडीने बाकावरून उठले आणि राहुल गांधी खोटं बोलत आहेत हे सांगायचा प्रयत्न केला. पण आता उघड होतंय की राजनाथ सिंह यांचंच निवेदन अपुरं होतं त्यातून वास्तव लपवण्याचाच प्रयत्न झाला. सरकार दोन वेगवेगळ्या पद्धतीचे शहीद निर्माण करत आहे, सामान्य जवानाला वेगळ्या सुविधा आणि अग्नीवीरसाठी वेगळ्या सुविधा हा राहुल गांधींचा आरोप होता. त्यावर असा भेद नाही, दोघांना समान गोष्टी मिळतात हे सांगण्याऐवजी राजनाथ सिंह यांनी अग्नीवीरला एक कोटी रुपये सरकारकडून दिले जातात एवढेच सांगितलं. आता लष्कराचे अनेक माजी अधिकारी यात कसा फरक आहे हे सांगू लागले आहेत. एरव्ही टीव्हीवर राष्ट्रवादाच्या नावाने किंचाळणारे, भाजपच्या प्रेमात असलेले लष्करी अधिकारीसुद्धा या योजनेवरून सरकारवर टीका करताना दिसू लागले आहेत.
त्यामुळे राहुल गांधी यांच्या विधानाला सभागृहामध्ये आक्षेप घेणार्या मंत्र्यांचीच पोलखोल होऊ लागली आहे.
एरव्ही सभागृहाचा एक अलिखित नियम आहे की विरोधी पक्षनेता बोलायला उठतो तेव्हा त्याला बोलू दिले जातं, कारण तो संपूर्ण विरोधकांचे नेतृत्व करत असतो. पण राहुल गांधींच्या बाबतीत मात्र एवढी उदारता दाखवणं हे अध्यक्ष महोदयांसाठी पण अवघड होऊन बसलं आहे. राहुल गांधींच्या भाषणातले बाण कसे वर्मी लागले आहेत याचं चित्र नंतर पंतप्रधान मोदींच्या भाषणामध्ये पाहायला मिळालं. जवळपास दोन तास पंधरा मिनिटांच्या मोदींच्या भाषणामध्ये ९९ टक्के वेळ हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याबाबत यांच्यावर खर्च झाला. संपूर्ण भाषणात मोदी राहुल यांना बालकबुद्धी असं म्हणून हिणवत होते. पण बालकबुद्धी म्हणताना ते हे विसरत होते की तेवढ्या वेळा त्यांच्यावर बोलून आपण किती रिसर्च केला आहे, हेच उघड होत होतं.
२०१४च्या निवडणुकीआधीपासून राहुल गांधी यांची ‘पप्पू’ ही प्रतिमा जाणीवपूर्वक तयार करण्यात खूप ताकद भाजपने लावली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेतून ही प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न राहुल यांनी केला आणि आता त्यादृष्टीने दुसरे पाऊल तेव्हा पडलं ज्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेता हे पद स्वीकारलं. लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने जो कौल दिला आहे त्यातूनच भाजपची ही मांडणी लोकांनी स्वीकारली नसल्याचं दिसतं, या निकालाने अहंकारी राजकारणाला चपराक दिली आहे. पण त्यातून कुठलाही बोध घ्यायचाच नाही असं बहुदा भाजपने ठरवल्याचंच दिसत आहे. त्यामुळेच बालकबुद्धी असा उल्लेख करून मोदींनी राहुल गांधींची ही ‘पप्पू’ प्रतिमा पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधींचं भाषण हे विरोधी पक्षनेत्याच्या एरव्हीच्या चौकटीपेक्षा जास्त आक्रमक होतं. या भाषणात त्यांनी कुठलाही आड पडदा न ठेवता भाजपच्या विचारसरणीवर थेट हल्लाबोल केला. मी बायोलॉजिकल नाही या मोदींच्या विधानाचीही जोरदार खिल्ली उडवली. त्यामुळेच पंतप्रधान मोदीही राहुल यांच्या बाबतीत इतके द्वेषाने बोलताना दिसले. नीट परीक्षेच्या गोंधळामुळे देशात २४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे अनेक महत्त्वाच्या परीक्षा रद्द करावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर संसदेचा एखादा दिवस या चर्चेकरता ठेवता आला असता. विरोधी पक्षनेत्यांनी त्याबाबत सरकारला विनंतीही केली होती. पण ही चर्चा काही झाली नाही. मणिपूरच्या मुद्द्यावरही पंतप्रधानांनी लोकसभेत एक शब्द उच्चारला नाही. त्यावर टीका झाल्यानंतर राज्यसभेतला त्यांचा उल्लेख हा केवळ उपचारापुरता दिसला.
पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान संपूर्ण वेळ विरोधक गदारोळ करत होते, घोषणाबाजी करत होते. सुरुवातीला हा गोंधळ नेमका कशामुळे आहे हेच स्पष्ट होत नव्हतं. त्यात सध्या जे काही चित्र संसद टीव्हीच्या कॅमेरातून दिसतं तेवढ्यावरूनच अर्थ लावले जातात. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी आपल्या खुर्चीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झापलं की तुम्ही खासदारांना वेलमध्ये येण्यासाठी भाग पाडत आहात, हे वर्तन बरोबर नाही तुम्हाला शोभा देत नाही, असं म्हटलं त्यानंतर त्यापाठीमागचा नेमका अर्थ काय हे उमगलं नव्हतं. नंतर भाजपच्या इकोसिस्टीमकडून संसदेतले काही व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न झाला, राहुल कशा पद्धतीने खासदारांना इशारा देत होते हे समोर यावं यासाठी हे व्हिडिओ पसरवले गेले. पण त्यातून सत्य समोर आलं ते वेगळंच. मणिपूरमधून दोनही खासदार काँग्रेसचे निवडून आले आहेत. त्यापैकी एका खासदाराला सत्तापक्षाकडून अचानकपणे मध्यरात्री बोलण्याची संधी मिळाली. पण मणिपूरमध्ये योग्य संदेश जायचा असेल तर दोनही खासदारांना बोलू द्या, कारण मुळात तिथला जो संघर्ष आहे तो भौगोलिक आणि दोन जातींमधला आहे. त्यामुळे दोन्ही खासदारांनी बोलणं आवश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न राहुल करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी किमान एक मिनिट या खासदाराला बोलू द्या अशी विनवणी विरोधी पक्षांकडून होत होती. पण ते काही घडलं नाही… हा तुमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. तुम्ही वेळ मॅनेज करायला पाहिजे होती, एवढेच सत्ताधारी पक्षाने सुनावलं. त्यामुळे मग नंतर विरोधी पक्षाकडून घोषणाबाजी सुरू झाली. खरतर मोदींनी एखादा मिनिट मणिपूरच्या खासदाराला दिला असता तर त्यामुळे फार काही बिघडलं नसतं. विरोधकांच्या घोषणाबाजी दरम्यान मोदी हे त्यांना पाण्याचा ग्लास ऑफर करत होते, तर ते कसं विरोधकांना औदार्य दाखवत आहेत असं म्हणत भाजपाने ते व्हिडिओ पसरवण्याचा प्रयत्न केला. या कृत्रिम आणि दिखाव्याच्या औदार्याऐवजी जर मणिपूरच्या खासदाराला एक मिनिट बोलू दिलं असतं तर ते जास्त उचित औदार्य ठरलं नसतं का?
मोदी आता सलग तिसर्यांदा पंतप्रधान झाले आहेत, त्यांची तिसरी टर्म सुरू आहे पण त्यांच्या भाषणात उल्लेख मात्र अजूनही २०१४च्याच आधीचा आहे. काँग्रेसच्या काळावर बोलण्यात ते ऊर्जा खर्च करत आहेत. खरंतर गेल्या दहा वर्षांत जे झालं त्यावर त्यांनी बोलायला हवं. स्वतःच्या सरकारपुढच्या आव्हानांबद्दल बोलायला हवं. आणि एरवी काँग्रेसवर टीका करण्यासाठी राजकीय सभांचं मैदान शिल्लक आहेच की. संसदेमध्ये बोलताना तरी किमान शालीनतेनं बोलता येऊ शकतं
विरोधी पक्षनेता म्हणून राहुल यांच्या पहिल्याच भाषणाने भाजपच्या गोटात एवढी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे संसदेत यापुढे ही लढाई अजून किती रंगतदार होते हे कळेलच.