(जैत रे जैत : डॉ. जब्बार पटेल)
पेडीयट्रीशियन असलेला हा माणूस स्वतःला कलाक्षेत्रात झोकून देतो आणि विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं ‘घाशीराम कोतवाल’सारखं नाटक करायला मिळावं म्हणून नवी नाट्यसंस्था चालू करतो. मोजक्याच सिनेमांमधून सामाजिक, राजकीय, मानवी भावना आणि व्यवहार यांचं यथार्थ दर्शन असलेले मैलाचे दगड- किंबहुना दीपस्तंभ उभे करतो, असा अचाट दिग्दर्शक.
‘घाशीराम कोतवाल’ जितकं वादग्रस्त ठरलं त्यापेक्षा त्या नाटकाचं सादरीकरण हे चाकोरी मोडणारं ठरलं. संगीत नाटकांची परंपरा असलेल्या मराठी रंगभूमीवर अशी ही संगीतिका अद्भुत ठरली. आजही ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या सादरीकरणाला मराठी रंगभूमीवरील एक नवा अध्याय म्हणूनच आदराने पाहिलं जातं.
कदाचित म्हणूनच आपल्या दुसर्या सिनेमासाठी, ‘जैत रे जैत’साठी डॉ. जब्बार यांनी कथा सांगण्याची ही अभिनव पद्धत सिनेमातसुध्दा वापरायचं ठरवलं असावं. कल्पना नाही. मात्र आज ४५ वर्षांनंतरही हा चित्रपट एक कल्ट क्लासिक म्हणून गणला जातो ते त्याच्या आगळ्या वेगळ्या सांगीतिक कथनशैलीमुळे आणि अर्थातच अप्रतिम संगीतामुळे.
मंगेशकर कुटुंबाच्या महालक्ष्मी चित्रद्वारे ‘जैत रे जैत’ची निर्मिती (निर्माती : उषा मंगेशकर) झाली आहे. चित्रपटासाठी हृदयनाथ मंगेशकरांनी, प्रख्यात साहित्यिक गो. नी. दांडेकरांची ‘जैत रे जैत’ नावाचीच कादंबरी निवडली. दिग्दर्शनासाठी त्या वेळी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकामुळे आणि ‘सामना’ या भेदक राजकीय सिनेमामुळे चर्चेत आलेले नव्या दमाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना पाचारण करण्यात आलं. गोनीदांची ‘जैत रे जैत’ ही ठाकर या आदिवासी समाजातल्या लोकांवर, नाग्या या ढोलवादकाच्या अफाट जिद्दीवर आणि सुडावर आधारित होती. सतीश आळेकर, अनिल जोगळेकर यांनी पटकथेत ती आणताना महत्त्वाचे बदल केले आहेत. पण सर्वात महत्त्वाचा बदल- बदल नव्हे स्पर्श आहे तो खुद्द डॉ. जब्बार पटेल यांचा.
कसा? ते बघण्याआधी जैत रे जैतची कथा पाहूया.
महाराष्ट्रातल्या एका भागातल्या ठाकरांची वस्ती ठाकरवाडी. लिंगोबाचा डोंगर असं नाव असलेल्या एका उंच पर्वताच्या सुळक्याखाली असलेल्या या ठाकरवाडीमध्ये बापाप्रमाणे ढोल वाजवण्यात कुशल असलेला आणि बापाच्या मृत्यूनंतर वस्तीचा भगत बनलेला नाग्या. लिंगोबाच्या डोंगरावर बसलेला महादेव, त्या डोंगरात असलेल्या मधमाशांच्या भल्या मोठ्या आग्यामोहोळी पोळ्यांमधली राणी माशी यांच्या कथा लहानपणापासून ऐकून नाग्या भारावून गेलेला आहे. त्याला राणी माशी, महादेव बघायचा आहे. त्यासाठी बापाने सांगितलं तसा पुण्यवंत बनायचं आहे. मात्र नाग्याच्या आयुष्यात असं काही घडतं की याच राणी माशीला डोंगरातून हुसकावून लावण्याचा तो प्रण करतो. या निश्चयात त्याला साथ देते त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी त्याची बायको चिंधी. पण लिंगोबाच्या डोंगरावर चढाई करणं आणि त्या पोळ्यांमधून राणी माशीला पळवणं सोपं नाही. ह्या नाग्याच्या प्रवासात अनेक कर्मकठीण आव्हानं आहेत आणि वाटेत उभा असलेला मृत्यूसुद्धा.
कथा जितकी धाडसाने आणि हिरोइझमने भरलेली आहे त्यापेक्षा पडद्यावर येताना ती अनेक भावना जागवणारी, व्यामिश्र रूपकांनी, गूढार्थाने, अनेक प्रतलांवर समांतर आशयाने सजलेली आहे. हा खास जब्बार पटेल टच म्हणावा की त्यांच्या पटकथा संवाद लेखक आळेकर व जोगळेकर यांचीही त्यात भर असावी?
‘जैत रे जैत’मधला आदिवासी पाडा किंवा ठाकरवाडीचं वातावरण पहिल्या काही मिनिटातच प्रेक्षकांमध्ये भिनायला लागतं. चित्रपट भावणं न भावणं ही गोष्ट अलाहिदा- परंतु त्या मोकळ्या वातावरणाचा आणि नाग्या भगत वाजवत असलेल्या ढोलाचा नाद चित्रपटाचा टोन सेट करून टाकतो. लहानपणीचा निरागस नाग्या मोठा होऊनही आपल्याच मस्तीत, आपल्याच जगात तल्लीन होत ढोल बडवतो आहे. चित्रपटात सूत्रधार म्हणून दिसणारं ठाकरांचं त्रिकूट- दोन बाप्ये आणि एक बाई हे गाण्यातून मधला काळ भरून काढत असतात. त्यांच्या शब्दात- नाग्या वाढला तरी बोलंना, पुण्यवंत व्हायाचं खूळ जाईना.
कथेत नाग्याचं वेगळेपण जाणवायला लागतं. त्याला पुण्यवान व्हायचं आहे. त्याला इतर ठाकरांप्रमाणे राहायचं नाही. पुण्यवान होऊन त्याला राणी माशी देखायची आहे. मग त्यासाठी बापाने सांगितलेली तत्व नाग्या पाळतो. त्याचा हात घेऊन आपल्या छातीवर ठेवणार्या, त्याच्यावर भाळलेल्या चिंधीला तो दूर करतो. कारण तिचा आधीच एकाबरोबर पाट लागलेला आहे. जैत…मधल्या अनेक पदरी रूपकार्थांचे प्रवाह इथूनच सुरू होतात.
आपल्या देशात अनेक आदिवासी जमाती आहेत. काळानुरूप ते नागरी प्रवाहात बिचकत, चुकतमाकत सामील होतायत. इथल्या नागरी संस्कृतीत येताना त्यांच्या प्रथा, श्रद्धा जाणूनबुजून पुसल्या गेल्या, मागास ठरवल्या गेल्या किंवा तो गंड आल्याने त्यांनी जी संस्कृती, धर्म हात देईल त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली. तुमचा देव, तुमचा धर्म तोच आमचा म्हणत नव्याने रुजायला सुरुवात केली, आपली मुळं सोडून. कारण मुळात निसर्गाच्या सान्निध्यात वाढणार्या, निसर्गाच्या कृपेत वाढणार्या, निसर्गाच्या अनेक लेकरांपैकीच आपणही आहोत, ही भावना प्रबळ होती. असं समजणार्या लोकांमध्ये देव, पाप, पुण्य या संकल्पनेचा अभाव, प्रभाव हाच एक अभ्यासाचा विषय आहे. झाडा, फुलां, पानांमध्ये, प्राणी, पक्षी, डोंगर, नद्या, पाऊस, ढग या सर्व निसर्गरूपांमध्ये देवत्व मानणारी माणसं म्हणजे जंगलातले आदिवासी. जगायला लागणार्या गोष्टी देणारा तो देव, अशी साधी पण सच्ची कृतज्ञतेची भावना हळूहळू कर्मकांडात पसरून पाश वाढवते.
‘जैत रे जैत’मध्ये वाडीला भगत होवा की नको हा वाडीसाठी महत्त्वाचं प्रश्न ठरतो. नाग्या नको म्हणत असतानाही मेजवानीसाठी पकडलेल्या उंदरांमधला मोठा वाटा भगताच्या घरी पाठवणे हे विना खळखळ मान्य केलं जातं. देवाचा कोप, नवर्याला टाकून आलेल्या बाईने नाचात सहभागी होणं म्हणजे पाप अशा मानवीय भावनिक दुर्बलतेमधून निर्माण झालेल्या, निसर्गाच्या नितळतेला नागरी गढुळता आणणार्या प्रथाही दिसतात. नाग्याला तिथल्या ब्राह्मणाने सांगितलेले पुण्यवंत होण्याचे उपाय म्हणजे उंदीर खायचा नाही, मोर मारायचा नाही- हे त्याने आज्ञाधारकपणे मान्य केलेत. (एक गंमत, नाग्याचा बापही नाग्याला पुण्यवंत होण्यासाठी काही पथ्य सांगतो, पण ती आचरणाशी जोडलेली आहेत. मात्र ब्राह्मणाने सांगितलेल्या गोष्टी आहाराशी संबंधित आहेत.) नाग्याचा पुण्यवंत व्हायचा, राणी माशी बघायचा अट्टाहास हा या पातळीवर त्याला इतर आदिवासींपासून वेगळं करतो आणि व्हाइट टायगर ठरवतो. पण ते तितकंच आहे का? याचा उहापोह करण्याआधी चिंधी या पात्राला समजून घेणंही तेवढंच महत्वाचं ठरेल.
चिंधी या कथेत नाग्या भगताची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. पाट लावल्यावर नवरा काही कामाचा नाही, तो आपल्याला घाबरतो हे जाहीर करून ती आपल्या घरी, बापाकडे परत आली आहे. हे बापाला तोंडावर सांगताना तिला कसलाही संकोच नाही. तिने नाचात नाग्याला तल्लीन होऊन ढोल वाजवताना बघितलं आहे आणि त्या क्षणापासून ती त्याच्यावर फिदा आहे. काडीमोड घ्यायला लागणारा पैसा तिने मेहनतीने जमवला आहे, त्यावर डल्ला मारणार्या दारुड्या बापावर ती चवताळून जाते. नाग्या जवळ येताच तिच्यातली वाघीण प्रेमदग्ध प्रेमिका होते. माझ्या भोळ्या पाखरा म्हणत साद घालू लागते. नाग्याचा डोळा जायबंदी झालाय हे कळताच त्याच्याकडे तीरासारखी येणारी चिंधी, नाग्याच्या आवशीने तिला घराबाहेर काढायला आकांडतांडव केलं तरी घरातून ती अजिबात निघत नाही. नाग्याची मनोभावे सेवा करते. त्याच्याशी ती इतकी एकरूप झालेली आहे की, नाग्याच्या, राणी माशीला उलथवून लावायच्या अशक्यप्राय बेतात त्याला शेवटपर्यंत साथ देते. चिंधी नसती तर नाग्याला जैत मिळाली नसती हे चित्रपट पाहताना आपण मनोमन मान्य करून टाकतो.
वरवर ही कथा निसर्ग विरुद्ध माणूस किंवा मानवी जिद्दीची कथा वाटली तरी, नाग्या हा त्याच्या कल्पनेत निसर्गाविरुद्ध लढतच नाहीये. ज्या राणी माशीला आपण हात जोडून विनंती केली आणि परवानगी घेतली, तिच्या माशांनी आपल्यावर हल्ला केला, आपला डोळा निकामी केला याचा त्याला सूड घ्यायचा आहे. बापाला नागाने डसल्यानंतर, नाग्याने तळमळीने नागदेवाला विनंती करत बापाला वाचव असं साकडं घातलं होतं. त्या नागदेवानेही काही आपला मंत्र मानला नाही. बापाचा डोळ्यासमोर मृत्यू झाला, त्या क्षणीच नाग्या भगत हा देव या संकल्पनेपासून दुरावलेला आहे. बापाने शिकवलेल्या, प्रत्येकाचा देव असतोय या गोष्टीपासून तुटलेला आहे. मधमाशी, नाग, वाघ इतर हिंस्त्र प्राणी यांच्याकडून आलेल्या आप्तस्वकीयांच्या मृत्यूला पूर्वीपासून आदिवासी लोकांमध्ये नैसर्गिक मानलं जातं. त्यात सुडाची भावना नसते. मात्र या पशूंना घातलेलं देवत्वाचं प्रचंड जोखड स्वतः नाग्याच्या मनावर आहे. ते इतकं आहे की स्वसरंक्षणासाठी त्यांनी केलेल्या नैसर्गिक, भावनाशून्य हल्ल्याला त्याने मानवी विकारांमध्येच तोललं आहे. पाप-पुण्य या काल्पनिक गोष्टींपलीकडे जाऊन त्याला आता राणी माशीचं पोळं उध्वस्त करायचं आहे. देव या कल्पनेला प्रश्न करणं इथपर्यंतच जैत…ची प्रतीकात्मकता आहे का? हा वर आलेला प्रश्न परत उपस्थित होतो.
लिंगोबाचा डोंगर आणि त्यात असलेली राणी माशी हे सर्वसामान्यांवर राज्य करणारे सामर्थ्यवान गारूड आहे. त्या गारुडात ही ठाकरं लीन आहेत. ‘लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला, ठाकर गडी तिथं कधी नाय गेला’ म्हणत महादेवाला घाबरणारे ठाकर नाग्याच्या लिंगोबावर चढाई करण्याच्या कल्पनेला महादेवाचा कोप होईल म्हणून विरोध करतात. आणि नाग्या? तो कोण आहे? पूर्वापार चालत आलेलं वाडीचं भगतपद त्याला लाभलेलं आहे. महादेवाला, राणीमाशीला पुण्यवंत होऊन बघणं हेच त्याचं ध्येय आहे. एकीकडे तो राणीमाशीचा, महादेवाचा चाहता आहे. दुसरीकडे तो ठाकर वाडीचा इन्फ्ल्युएन्सर आहे. यामध्ये ढोल वाजवणं हा ‘बिझनेस’च अत्यंत हुशारीने आलेला आहे. नाग्याचा भ्रमनिरास होतो तेव्हा तो ढोल फोडतो. आता त्या अजस्त्र सुळक्यावर चढून त्याला तिकडून त्या शक्तिमान राणी माशीला हुसकावून लावायचं आहे. हे एकाकी बंड आहे. तेही एका इन्फ्लुएन्सरने केलेलं. एका भक्तीतून जाग्या झालेल्या भक्ताचं. मग त्याचा अर्थ देवत्व या संकल्पनेविरुद्ध घ्या की लोकांवर राज्य करणार्या सामर्थ्यवान सत्तेविरुद्ध.
जैत…ची बलस्थानं ही या अनेकपदरी आशयाखेरीजही अनेक आहेत. अक्षरश: अनेक गुणी रत्नांनी जडलेली टीम आहे चित्रपटाची. एक संगीतिका म्हणून हा चित्रपट कालातीत आहे याची दोन कारणं. एक – कवी ना. धों. महानोर यांची भणाणती गीतं. रानाचा, मातीचा गंध असलेली ही गाणी.. अंग झिम्माड झालं अशा शब्दातून उन्मादाचा प्रत्यय देणारी, मोडून गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी म्हणत उन्मुक्त संचार करणारी, अंगात माझिया भिनलाय ढोलिया असं झिंगणारी, या झांबर्या गर्दीत मांडून इवले घर म्हणत टुकीने नांदणारी चिंधी दाखवणारी गाणी लिहिली आहेत- किंबहुना खरंतर रानपाखरंच चितारलीयत महानोरांनी. त्याला अप्रतिम स्वरसाज चढवलेला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी. त्यांच्या ‘जैत रे जैत’च्या संगीताबद्दल काही लिहिणं हेच अयोग्य ठरेल इतका तो उच्च कोटीचा आविष्कार आहे. गाण्यांसाठी केलेला पारंपारिक आणि आधुनिक वाद्यांचा मेळ अफलातून आहे. आठवा ‘मी रात टाकली’च्या आधीचा संगीताचा तुकडा. तो नुसता ऐकला तरी अंगावर काटा येतो. किंवा ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ सुरू होताना वाजणारे डफ, हलगीचा नाद. इतकं प्रत्ययकारी संगीत नंतर अनेक दशकं बनलं नाही. याशिवाय विनोद प्रधान यांचं छायाचित्रण हे विषयाला प्रामाणिक राहून आणि जास्तीत जास्त प्रमाणात नैसर्गिक प्रकाशस्रोत वापरून केलेलं असल्याने जैत…ला ते अतिशय अस्सल बनवतं. हे चित्रिकरण कर्नाळ्याजवळच्या आदिवासी परिसरात केलेलं आहे. त्यामुळे आपण त्या ठाकर लोकांच्या पाड्यात फिरतोय अशीच अनुभूती चित्रपट बघताना येते.
काही दृश्यचौकटी अविस्मरणीय आहेत. खासकरून गाण्यांच्या. त्यात दिसत राहणारं सूत्रधारांचं त्रिकूट, त्यांच्या आकृतीबंधाच्या रचना सुरेख आहेत. त्यांना गाणी गाताना मुद्दाम फार हालचाली, किंवा फिल्मी नायक नायिकांप्रमाणे फारसा मुद्राभिनय दिलेला नाही. जांभूळ पिकल्या झाडाखाली गाण्यामध्ये नाग्या तरातरा उतरून पुढे चाललाय, त्याच्या मागे मागे चिंधी आणि कॅमेरासोबत त्यांना लांबून न्याहाळताना गाणारे हे तिघे. ‘गोर्या देहावरती’ गाण्यात चिंधी खालच्या वस्तीतून एकटीच वर येते. जिकडे नाच चालू आहे तिकडे ती मागून शिरते. कॅमेरा सूत्रधारांना टिपायचा थांबतो आणि डिफोकस असणारी चिंधी फोकसमध्ये येते. आपल्याच तंद्रीत, हसत ढोल बडवणार्या नाग्याला अनिमिष बघत. पाठी सूत्रधार गातायेत. ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याला सामोरं जातंया आभाळ’… खूप सुंदर दृष्यानुभव, दृश्यबांधणी केली आहे जैत…मध्ये.
अभिनयाच्या बाबतीत जब्बार पटेल यांच्यासारखे दिग्दर्शक कुठेही उणीव भासू देणार नाहीत नि:संशय. स्मिता पाटील ही चिंधीची भूमिका जगलीय हे म्हणणं तोकडं आहे. तिचा वागण्या बोलण्याचा लहेजा, नाग्याची आसक्ती, माया, निष्ठा आणि त्याच्याविरुद्ध कोणी बोललं की चवताळून उठणं. असे चित्रपट पाहिले की स्मिता पाटीलची उणीव प्रकर्षाने भासू लागते. मोहन आगाशे यांचा नाग्या आदिवासी वाटत नाही किंवा ठाकरांमध्ये तो फारच उजवा दिसतो असा आक्षेप आहे. नाग्या भोळा आहे, बिलीव्हर आहे. आणि तो विश्वास तुटल्यानंतर फक्त बदला या भावनेने पेटून उठलेल्या नाग्यामध्ये तो भोळेपणा तरीही आहेच. पण तो प्युरिस्ट आहे. वेगळा आहे इतर ठाकरांपेक्षा. म्हणूनच आगाशे तिथे नाग्या म्हणून शोभतात. निळू फुले, सुलभा देशपांडे, सूत्रधार झालेले चंद्रकांत काळे, श्रीराम रानडे, कामिनी हे कलाकार मजा आणतात. मध्येच ते प्रेक्षकांशी बोलतात. आपलं कामच गाणं गायाचं हाय अशी मल्लिनाथी करतात.
नाटक आणि सिनेमा दोन्ही वेगवेगळी माध्यमं असली तरी त्याचा योग्य मिलाफ ‘जैत रे जैत’मध्ये उत्तमरीत्या झालेला दिसतो. हा जब्बारांच्या इतर सामाजिक राजकीय चित्रपटांपेक्षा (‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’, ‘एक होता विदूषक’) वेगळा फॉर्म घेऊनही आशयाच्या दृष्टीने या सिनेमांपेक्षा थोडा वरचढ आहे असं वाटतं.
डॉ. जब्बार पटेल जेव्हा म्हणतात, ‘कलाकारांनी वर्तमानाचा प्रवक्ता असावं कारण येणार्या पिढीसाठी सिनेमा ही इतिहास असतो.’ तेव्हा एक गोष्ट विशेषत्त्वाने नमूद करावीशी वाटते… भारतात १९७५ला आणीबाणी लादली गेली. ‘जैत रे जैत’ १९७७ला आला. योगायोगाने आणीबाणीही १९७७ला संपली होती. राणी माशीला हुसकावून लावण्याचा संदर्भ इथे गडद होतो. ‘जैत रे जैत’ येऊन आता इतकी वर्ष झालेली आहेत. परंतु भारतातील राजकीय, सामाजिक मानसिकता खरोखर बदलली आहे का हा एक प्रश्न आहे.
आपल्यालाही हा प्रश्न पडला असेल तर त्याचा एक अर्थ असा आहे की नाग्या भगताचा ढोल आपल्याला अजूनही ऐकू येतोय… आणि ऐकू येईल… एक प्रेरणा देत…
कट इट!
– गुरुदत्त सोनसुरकर
(लेखक चित्रपट रसिक, लघुपट दिग्दर्शक आणि जाहिरात व्यावसायिक आहेत)