चार दिवसांपूर्वीच हरिभाऊंका ह्रदयविकाराचो झटको इलो होतो. काल रात्री डॉक्टरांनी हरिभाऊंका तपासल्यान आणि ‘काही तास बाकी आसंत’ असा म्हणान डॉक्टर निघून गेले. हरिभाऊंनंतर तेंच्या घराक कर्तो पुरूष असो कोणी नव्हतोच. कारण तेंची बायको पाच वर्षांपूर्वीच मरण पावली होती. तेंच्या मागून तेंची एक दूरची मेहुणी जी गेल्या पाच वर्षांपासून एकदम जवळची झाली होती आणि तेंचा एक तेवीस वर्षांचा चेडू, सुलोचना. एवढाच काय ता तेंचा कुटुंब.
काही उत्साही मंडळींनी लगेच ‘हरिभाऊ सिरियस’ ‘हरिभाऊ इज टू गो अवे फ्रॉम अर्त’ ‘हरिभाऊ प्लीज डोन्ट गो’ अशा प्रकारच्यो वाह्यात मेसेजेस ‘द रावडी केळुरीकर्स’ या आमच्या गावच्या वॉट्सॅप ग्रुपवर टाकल्यो. वॉटसॅपवरच्यो ह्यो मेसेजेस वाचताक्षणीच नाना देसाई म्हणजे ओरडलेच, ‘शिंच्यानो हयसर आणि कित्या टाकतंत ते? कळले सगळ्यांका.’ पण ‘गावातले काही लोक कामानिमित्त मुंबईक असतंत तेंका कळूक व्हया.’ असा त्या पोरांचा म्हणणा होता.
रात्रीची शिफ्ट करून घरी इलेल्या बर्व्यांच्या विन्याने ह्यो सगळ्यो मेसेजेस नीट न वाचताच आपला सांत्वन व्यक्त करण्याच्या नादात अति उत्साहात येऊन हरिभाऊंच्या जागी ‘नाना देसाई रेस्ट इन पीस, व्ही विल मिस यू’ असो मेसेज टाकून दिलो आणि त्याबरोबर नाना देसायाचो वॉट्सॅपावर जमदग्नी झालो. ‘तुझो बाप रेस्ट इन पीस रांडेच्या! ये इथे पिसडून टाकतंय तुका. रेस्ट इन पीस म्हणता फोफलीचो. अरे शिंच्यो हरिभाऊ सिरियस! माजो खंय रेस्ट इन पीस करतंस?’ त्यानंतर विन्या काकळुतीक येऊन ‘सॉरी सॉरी’ वैगेरे म्हणू लागलो. तेव्हा ह्या प्रकरण मिटला.
त्यानंतर ‘हरिभाऊंच्या कुटुंबाक आधार देण्यासाठी सगळे गावकर्यांनी थयसर हजर आसूक व्हया’ अशो चर्चो त्या ग्रुपावर चालू झाल्यो. पण ‘आता कोरोनाचो काळ चालू असल्यामुळे मोजक्या आणि महत्वाच्या माणसांनीच हरिभाऊंकडे यावे’ असो प्रस्ताववजा ताकीद खुद्द सरपंचांनी त्या ग्रुपावर दिल्यानंतर मात्र कोणीही काहीही बोलूक नाय. पण गावातलीच दोन-तीन टक्के मंडळी जी मास्क घालण्याच्या विरोधात होती, तेंची एक संघटना होती जिचा नाव होता ‘मास्क निषेध संघटना’. त्याच संघटनेच्या अध्यक्षांनी सरपंचांका विरोध केलो. तेंचा स्पष्ट मत होता ‘कोण खयचो तो कोरोना आपल्या आदरणीय अशा हरिभाऊंका बघूक देत नाय! ता कायनाय आपण सगळ्यांनी हरिभाऊंकडे जायचा, गर्दी करून जायचा.’ पण बाकी गावकरी काही तेका बधले नाय आणि सर्वानुमते प्रत्येक घरातून एक याप्रमाण सुमारे पंचवीस माणसा हरिभाऊंच्या घरी काल रात्रीपासून बसलेले होते. म्हणजे ‘अचानक प्राण गेले तर थयसर कोणीच नाय असा होऊक नको’ अशी भावना.
हरिभाऊ सहस्त्रबुध्दे हे आमच्या केळुरीतल्या संगीत नाटकात प्रमुख भूमिका बजावणारे नट. मुंबईच्या नाटक कंपन्यांकडून सुद्धा तेंका आमंत्रणा यायची. त्यामुळे केळुरीतल्या संगीत नाटक मंडळींमधे तेंचो दबदबो होतो. ‘मी मरेन त्या दिवशी माज्या प्रेतासमोर नाट्यसंगीता अवश्य म्हणा,’ ही हरिभाऊंची शेवटची इच्छा तेना पेटीवाल्या केळुरीकर मास्तराजवळ बोलून दाखवली होती. त्यामुळ हरिभाऊंका ओसरीवर ठेवल्यानंतर केळुरीकर मास्तर बेचैन होऊन गाणी कधी म्हणता येतील याची वाट बघू लागलो. ‘नाहीतरी हरिभाऊंचा अर्धा शरीर थंड पडलाहा, त्यामुळे जाण्याची वाट बगण्यापेक्षा आताच काय ता म्हणून घ्या, म्हणजे मग मी पुढचा काम करायस मोकळो!’ असा शांतू भट किरवंताचा मत पडला. त्यामुळे मग केळुरीकर मास्तर पेटी उघडून ओसरीवरती बसलो आणि तेच्या शिष्यांनी नांदी म्हणूक सुरूवात केली. नांदीची जबरदस्त सुरुवात झाली. ‘नमन नटवरा विस्मयकारा। आत्मविरोधी कुतुहलधरा।’ जो तारसप्तकातलो स्वर त्या नांदीक लागला तेना म्हणजे केळुरीतल्या सगळ्या नाट्यकर्मींच्या अंगावर रोमांच उभे राहिले, ती नांदी तेंका एवढी लागली की दामलेबुवा, बाबुराव गोखल्यांपासून ते विसुभाऊ जोश्यांपर्यंत केळुरीतले सगळे संगीतद्न्य हरिभाऊच्या ओसरीवर चडान गाऊ लागले.
कोरोनाच्या काळात गावात नाटका न झाल्यामुळे दोन वर्षांची सगळी एनर्जी ओसरीवर ओसंडून वाहत होती. अंतरो होता न होता ताच विसुभाऊंनी तारसप्तकात अशी आलापी घेतली, की थयसून दालमलेबुवा आणि बाबुरावांनीही सुरूवात केली. आलापी घेता घेता थयसर भलतीच जुगलबंदी सुरू झाली. म्हणजे जसजशी हेंची आलापी तारसप्तकात जायची तसतश्यो हरिभाऊंची सुलू आणि तिची मावशी दोघी मंद्रसप्तकात रडायच्यो आणि जसजशी हेंची आलापी मंद्रसप्तकात जायची तसतश्यो त्यो दोघी तारसप्तकात रडायच्यो. शेवटी ह्या सगळा असह्य होऊन शांतू भट उठलो आणि वराडलो, ‘अरे आता काय नाटकाचो प्रयोग बियोग लावतंत की काय हयसर? उतरा सगळे ओसरीवरून’. इतक्यात ‘निदान भैरवी तरी म्हटली आसती,’ असा सांगण्याचो निष्फळ प्रयत्न केळुरीकर मास्तरान करून पाहिलो. पण शांतू भटावर तेचा काय्यक परिणाम झालो नाय. शांतूभटान गरूडपुराण वाचूक सुरुवात केली.
हळूहळू गावातले बाकीचे लोकसुद्धा हरिभाऊंच्या शेवटच्या दर्शनाक येवक लागले. हरिभाऊंच्या घराभायर मास्क निषेध संघटनेचे कार्यकर्ते एका वेळी चार याप्रमाण गावकर्यांका आत सोडी होते. मावशी सुलूच्या पाठीवर थोपटीत होती आणि सुलूचा रडा वाढवित होती. जोश्यांच्या मधूक सुलूक खांदो देऊची तीव्र इच्छा होत होती. पण बाकी सगळे थयसर असल्यामुळे तो जरा मगेच रवलो. ह्या बाजूक नाना देसाई पाच-पाच मिनिटांनी जाऊन हरिभाऊंच्या नाकाकडे आपली तर्जनी नेई होते आणि त्या बाजूक आदल्या रात्रीच हरिभाऊंच्या घरी इलेले महारथी घोळकी करून उभे होते.
‘सदा हो बघ जिलगो इलो. तोंड पडला हा.’
‘त्या मेल्याचा तोंडंच तसा.’
‘काय रे तेच्या घरात सगळ्यांका कोरोना झालो होतो! हो बरो वाचलो.’
‘हेका बगून कोरोना मेलो आसतोलो.’
ह्या तेंचा चालला होता. तर त्या बाजूक बायलो, त्यो एका बाजूक थोडा रडल्यासारखा करी होत्यो आणि दुसर्या बाजूक,
‘खालच्या हरीचा पोरग्या नाय गो तां?’
‘होय गो त्या भटाच्या मन्याचा हात धरून फिरता गावभर!’
‘भटणीक बाटवतला बहुतेक.’
इतक्यात बाहेरच्या अंगणातून घब्कन काय तरी पडल्याचो मोठ्ठो आवाज इलो आणि सगळेजण बाहेर धावले. हरिभाऊंच्या मानलेल्या भयणीचो वंदूचो गोल-गुबगुबीत घोव चंदू अंगणात घसरून पडलो होतो. ‘अरे देवा! हो पडलो? म्हाका वाटला दारचो फणस-बिणस पडलो का काय?’ जनू नाडकर्णी. इतक्यात सगळ्या कामात आपल्या शरीरापेक्षा जास्त उत्साह दाखवणारो जोश्यांचो अजय चंद्याक उचालूक जाऊ लागलो. ‘अरे अज्या सांभाळून, नाहीतर त्या भरल्या वांग्याक उचलता उचलता तुजी रूमाल रोटी व्होयत.’ पांडू जोश्यान ह्या म्हणायची फुरसत तोच अजयाचो हात चंद्याने धरल्यान मात्र चंद्याच्या वजनान अजयंच खाली कोसळलो आणि जेवढ्या जोरात विजेचे आणि पेट्रोलाचे भाव जनतेवर आदळले तेवढ्याच जोरात स्वत:चा वजन न पेलवल्यामुळे अर्धवट उठलेलो चंद्या अजयावर जाऊन आदळलो. हरिभाऊंची भयण म्हणजे ‘दादा’ अशी आरोळी फोडत ‘किती भलो माणूस होतो माजो दादा.. आसा अजून. म्हणजे थोडो प्राण उरलो हा,’ नाना देसायांनी तिची समजूत काडली. ‘असा काय? असू दे पण केवडो चांगलो होतो माजो दादा. म्हाका दरवर्षी आंबे देई होतो. आता कोण दितोलो म्हाका आंबे!’ वंदू. तिचा ता रडणा बगून चंदूही रडूक लागलो.
दारावरून ‘पोस्टमन’ अशी हाक ऐकू इली. नानांनी पत्र घेतला आणि सुलूची परवनगी घेत पत्र फोडल्यान आणि ता वाचल्यानंतर, ‘अगो मुंबईच्या संगीत मंडळिंनी हरिचो सत्कार करूचो ठरवलो हा परवा.’ ‘अरे बापरे! ह्या म्हणजे भलताच. मरणोत्तर सत्कार जातोलो आमच्या हरिभाऊचो. पण प्रश्न असो हा की आता हो सत्कार स्वीकारतलो कोण?’ जनूनहो प्रश्न टाकलो आणि त्या मरणघराचा रणांगण झाला.
लगेच सुलू, ‘कोण म्हणजे मी स्वीकारतला. लेक आसय तेंची.’
‘तर-तर मी स्वीकारतला तेंचा सत्कार. तुजी आवस गेल्यापासून मीच सांभळला तुमका दोघांका.’ मावशी.
‘वा रे वा ऐकलात काय म्हणजे आम्ही कोणंच नाय! अरे मानलेली म्हणान काय झाला? भयण आसंय मी.’ आत्यासुध्दा मागे रवली नाय. सगळेजणं ओसरीच्या खाली इले आणि तेंका समजावूक लागले. पण ता युद्ध काही केल्या थांबत नव्हता. एवढ्यात ओसरीनजीकच्या खोली भायरसून आवाज इलो, ‘हो सदरो कसो हा सत्कारासाठी?’
वातावरण एकदम शांत झाला, सगळेजण वळाले आणि अवाक् होऊन बगूक लागले. साक्षात यमदूतांका चकवो देऊन यूटर्न मारून इलेले हरिभाऊ आपलो नवीन सदरो न्याहाळीत मुंबईक होणार्या सत्कारासाठी सज्ज होई होते.
– शिवप्रणव आळवणी
(लेखक प्रशिक्षित अभिनेते आहेत)