आज रामप्रहरी सोसायटीत फिरत असताना ‘सायकल पे हसीनों की टोली’ हे आशा, रफी व मन्ना डे यांचे धमाल गाणे ऐकले. ते आहे ‘अमानत’ नावाच्या चित्रपटातले. हा सिनेमा मनोजकुमार आणि साधना यांच्याखेरीज कोणीही बघितला नाही, असे म्हणतात! पण त्यातले हे गाणे मात्र मस्त आहे. त्यात आणखीही चांगली गाणी आहेत. पण या निमित्ताने मला सायकलवरील गाण्यांची आठवण आली. अनेक वर्षांपूर्वी ‘खजांची’ हा चित्रपट पाहिला होता. जुन्या पिढीतील लोकांना त्यातले ‘सावन के नजारे है अहा अहा’ हे जबरदस्त गाणे आठवत असेल! त्यात रमोला आणि पुढे दिग्दर्शक म्हणून नामवंत झालेले एस. डी. नारंग यांची सायकलवर टक्कर होते. रमोला ही मुळात ज्यू होती. ‘खजांची’ मध्ये प्राणदेखील आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मी प्राणला त्याच्या घरी भेटलो असताना, त्याने ‘खजांची’च्या आठवणी काढल्या होत्या. त्यात त्याचा अतिशय छोटासा रोल आहे. प्राण हा मॅट्रिकपर्यंत रामपूरला होता. रामपूर म्हणजे जयाप्रदाचा मतदारसंघ. सपाच्या आझम खानचा इलाका. तर प्राण तिथून दिल्लीला आला आणि फोटोग्राफीच्या दुकानात काम करू लागला. तेथून तो लाहोरला याच दुकानाच्या शाखेमध्ये काम करत होता. ‘लाहोरला आणि दिल्लीला मी सायकल चालवत असे,’ असे त्याने मला सांगितले होते. परंतु जानकीदास या प्रसिद्ध चरित्र भूमिका करणार्या नटाने तर १९३४ ते १९४२ दरम्यान सायकलिंगमध्ये जागतिक विक्रमच नोंदवला होता. जानकी लाहोरचा. १९३६मध्ये हिटलर असताना बर्लिनमध्ये ऑलिंपिक होते, त्यावेळी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचा जानकी हा एकमेव भारतीय सदस्य होता. जानकीने १९४० च्या दशकात सोहराब यांच्यासमवेत भारतीय सायकलिंग फेडरेशनची स्थापना केली होती. ‘खजांची’मध्ये जानकीदेखील होता.
शुभा खोटे ही प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री देखील पोहणे आणि सायकलिंगमधील चॅम्पियन होती. शुभाचे मामा नायमपल्ली हे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते. दुर्गा खोटे ही शुभाची काकू. विजू खोटे तिचा भाऊ. शुभा गावदेवीच्या सेंट कोलंबा स्कूलमध्ये शिकली. विल्सन कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन पदवीधर झाली. तिचे यजमान बलसावर हे नोसिलचे उपाध्यक्ष होते. शुभाने निर्माण केलेल्या ‘चिमुकला पाहुणा’ या चित्रपटात बलसावर यांनी छोटीशी भूमिका केली आहे. शुभाची मुलगी भावना ही नामवंत टीव्ही नटी.
सायकलवर बसून नायिकेने गाणी म्हणत जायचे. नंतर नायक व तिची अपघाताने भेट व मग प्रेम होणे, हा पूर्वीचा फॉर्म्युला होता. हिंदी चित्रपटांत सायकलगीते खूपच गाजली. ‘पडोसन’मधील ‘मैं चली मैं चली देखो प्यार की गली’, ‘अनाडी’मधले ‘बन के पंछी गाये प्यार का तराना’ हे कोणाला आठवणार नाही? सायरा ही विलक्षण खूबसूरत नटी. नूतनच्या चेहर्यावरचे भाव न्याहाळताना, ती खरोखरच पंछी बनून विहार करत आहे, असे वाटे…
‘पलकों की छाँव में’ या चित्रपटात ‘डाकिया डाक लाया’ हे गाणे किशोरने टिपिकल राजेश खन्ना स्टाइलमध्ये गायले आहे. राजेश बस, कारमध्ये सायकलवर वा पायी चालत असताना त्याची स्टाइल एकच असते! ‘प्यासे पंछी’मध्ये ‘प्यासे पंछी नील गगन में गीत मिलन के गाये’ हे गीत मुकेशने मेहमूदसाठी म्हटले आहे, तेव्हा तो सायकलच चालवत असतो. ‘बात एक रात की’मध्ये ‘अकेला हूँ मैं इस दुनिया में’ हे गाणे आठवते. ‘इशारा’मध्ये मुकेश ‘चल मेरे दिल लहरा के चल’ हे धीम्या लयीतील गाणे गातो, तेव्हा आपण जॉय मुखर्जीकडे नाही, तर सायकलकडेच बघत असतो… सुबीर सेनने जेव्हा ‘आस का पंछी’साठी ‘दिल मेरा एक आस का पंछी’ हे गाणे राजेंद्रकुमारकरिता म्हटले, तेव्हा आपण सायकलच्या पायडलकडेच बघत राहतो! कारण ‘गरिबांच्या दिलीपकुमार’चा अभिनय किती वेळ बघायचा, असा प्रश्नच असे!
‘माना जनाब ने पुकारा नहीं’ आणि ‘है मैंने कसम ली’ या गाण्यांचे चित्रण भारी आहे आणि देव पडद्यावर पाहताना आनंदच वाटे. ‘बेवकूफ’ या चित्रपटात तर ‘मायकल है तो सायकल है’ किशोरकुमार- माला सिन्हावर चित्रित झालेले गाणे होते. ‘मेरे अपने’ या चित्रपटात ‘कोई होता जिसको अपना’ या गाण्याच्या चित्रीकरणात विनोद खन्ना आणि योगिता बाली सायकलवरून जाताना दिसतात. त्यावेळी वजनदार योगितामुळे सायकलचे चाक पंक्चर कसे झाले नाही, असा प्रश्न सतावत राहतो.. ‘आरोप’ या चित्रपटात देखील विनोद खन्ना, सायरा सायकलवरून डबलसीट जाताना दिसतात. पैसे मिळवण्यासाठी २४ तास सायकल चालवण्याचा विक्रम करणारा नायक मनोजकुमार, शशी कपूर, जितेंद्र यांनीदेखील साकारला.
डि’सिकाच्या ‘बायसिकल थीफ’ या चित्रपटाचा उल्लेख केल्याखेरीज सायकल हा विषय सफळ संपूर्ण होऊच शकत नाही! हा चित्रपट अभिजात व थोर. अनेक उद्याच्या दिग्दर्शकांना व सामान्यजनांना प्रेरणा देणारा. मात्र चार वर्षांपूर्वी ‘सायकल’ नावाचा एक मराठी चित्रपट मी बघितला, त्याची सुरेख पटकथा अदिती मोघेची होती. त्यात हृषिकेश जोशीने काय काम केले होते! माझा अत्यंत लाडका असा तो नट आणि लेखक आहे. त्याचे वडील चंद्रकांत जोशी हेदेखील चित्रपट दिग्दर्शक. एकेकाळी शिवडी येथील ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षक म्हणून ते काम करत होते.
मी पुण्यामध्ये शाळा-कॉलेजमध्ये शिकत असताना, माझे रोज दहा-वीस किलोमीटर सायकलिंग होत असे. सायकल हाच जीवनाचा आधार होता. सायकलवरून येताजाता गाणी गुणगुणत जाणे, हाच माझा आवडीचा छंद होता. येता जाता भरत नाट्यमंदिर, टिळक स्मारक, बालगंधर्व, प्रभात, डेक्कन, विजय, भानुविलास, अलका, नटराज येथे कोणकोणती नाटके व चित्रपट येणार आहेत, आली आहेत, त्यांची पोस्टर्स आणि बॅनर्स बघणे हा माझा शौक होता. सायकलवरून भटकतच मी गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, ग. ल. ठोकळ, छोटा गंधर्व, जोस्ना भोळे यांची घरे कौतुकाने न्याहाळत असे. लेखक, कलावंत, संगीतकार, गायक यांचे विलक्षण आकर्षण वाटे. टिळक रोडवरून जाताना प्रकाश रानड्यांच्या नीलकंठ प्रकाशनच्या बाहेर थिएटर अॅकॅडमीवाल्यांची गर्दी असे. त्यांचे गप्पांचे फड जमलेले असत. ‘बादशाही’मध्ये मिसळ हाणताना शरद तळवलकरांना मी बघितले आहे आणि सायकलवर टांग मारून चिमणबागेतील घरी जाताना देखील! राजा गोसावींना खजिना विहिरीजवळ ‘श्री स्टार्स’ नाटक कंपनीवाले बाबुराव गोखले यांच्या घराजवळ सिगारेट फुंकत सायकलीवरूनसुद्धा जाताना मी बघितले आहे.
दोन्ही हात मोकळे सोडत सायकल चालवणे किंवा उभे राहून पायडल मारणे, हँडलवर हरभर्याची जोडी ठेवून, हरभरे खात खात, दुकानांच्या पाट्या बघत-बघत, लोकांचे चेहरे वाचत वाचत सायकल चालवणे यासारखा दुसरा आनंद नाही… फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर वा बालभारतीची चढण सायकलवरून पार करणे, ही एक कष्टदायक गोष्ट. पण त्या कष्टातही मिळणारा आनंद जबरीच! झाडाखाली बसून सायकलमध्ये हवा भरणे, पंक्चर काढणे असे उद्योग करणारे लोक होते. त्यांचे काम बघणे हीदेखील मौज वाटे.
सायकल चालवून आपण पर्यावरण संतुलन राखत आहोत वगैरे जाणिवा लहानपणी नव्हत्याच. मात्र सायकल चालवताना स्वत:चे मानसिक पर्यावरण संतुलन चांगले राहत असे… सायकल चालवताना अपूर्व आनंद मिळे. माझे ज्येष्ठ बंधू आजही सायकल चालवतात. त्यांचे एक पासष्टीतले सर्वार्थाने निरोगी असलेले परममित्र आजतागायत फक्त सायकलच चालवतात! आजही मी कधी सायकलवर बसलो की, अक्षरश: रस्त्यावरून नव्हे, तर आकाशातून विहार करत आहोत, अशी भावना उत्पन्न होते. पुणे ते मुंबई वा पुणे ते सातारा सायकलवरून प्रवास करण्याचे माझे स्वप्न मात्र अधुरेच राहिले आहे…
– हेमंत देसाई
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)