युरोपमध्ये ११ जूनपासून युरो कप फुटबॉल स्पर्धेचा रोमांच रंगणार आहे. तसेच, दक्षिण अमेरिका खंडातील कोपा अमेरिका ही अजिंक्यपद स्पर्धादेखील १३ जूनपासून सुरू होत आहे. फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल, इंग्लंड, बेल्जियम, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, कोलंबिया यांच्यासारख्या आघाडीच्या संघांबरोबरच जगातील आघाडीच्या फुटबॉल स्टार्समधील मैदानावरील युद्धच जणू त्या निमित्ताने जगभरातील क्रीडारसिकांना अनुभविण्यास मिळणार आहे. याच स्पर्धांचा हा धावता आढावा…
फुटबॉल… जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ. साहजिकच, फुटबॉलची वर्ल्डकप स्पर्धा म्हटली, की संपूर्ण जगच जणू स्तब्ध होऊन त्याच्या थरारक क्षणांचे साक्षीदार होते. याच वर्ल्डकपखालोखाल कोणती नावाजलेली स्पर्धा असेल, तर ती म्हणजे युरो कप. युरोपमधील देशांची अजिंक्यपद स्पर्धा. यंदा, खरं तर गेल्या वर्षी २०२०मध्ये युरो कप स्पर्धा रंगणार होती. पण, कोरोना संसर्गामुळे ती आता या वर्षी जून-जुलैमध्ये खेळविण्यात येत आहे. नेहमीप्रमाणेच पात्रता फेरींमधून २४ संघ अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरले असून त्यांची प्रत्येकी चार अशी सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यंदा ही स्पर्धा कोणत्या एका देशामध्ये खेळविण्यापेक्षा संपूर्ण युरोपभर खेळविण्यात येत आहे. आणि अंतिम सामना इंग्लंडमधील प्रसिद्ध वेम्ब्ली स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहे.
पात्र संघांची पुढील गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे-
ग्रुप ए – इटली, स्वित्झर्लंड, तुर्की, वेल्स.
ग्रुप बी – बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, रशिया.
ग्रुप सी – ऑस्ट्रिया, हॉलंड, नॉर्थ मॅसेडोनिया, युक्रेन.
ग्रुप डी – क्रोएशिया, चेक रिपब्लिक, इंग्लंड, स्कॉटलंड.
ग्रुप ई – पोलंड, स्लोवाकिया, स्पेन, स्वीडन.
ग्रुप एफ – फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, पोर्तुगाल.
युरो कप या युरोपीय अजिंक्यपद स्पर्धेला १९६० पासून प्रारंभ झाला. दर चार वर्षांनी ही स्पर्धा खेळविण्यात येते. आतापर्यंत जर्मनी आणि स्पेनने प्रत्येकी तीनदा, तर फ्रान्सने दोनदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. रशिया, इटली, चेक प्रजासत्ताक, हॉलंड, पोर्तुगाल, डेन्मार्क आणि ग्रीस या देशांनी देखील युरोचे विजेते होण्याचा बहुमान संपादन केला आहे. वास्तविक, फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम, इटली, हॉलंड, स्पेन आणि पोर्तुगाल हे युरोपमधील पारंपरिक बलाढ्य संघ मानले जातात. परंतु, युरो कप स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकली, तर ग्रीस किंवा डेन्मार्कसारख्या संघांनी बड्या संघांना धूळ चारत अचंबित करणारी विजेतीपदे पटकावल्याचे दिसून येते. तसेच, २०१६ साली झालेल्या स्पर्धेत नवख्या आईसलँड संघाने बलाढ्य संघांचा पाडाव करीत विस्मयकारक आगेकूच केल्याचा इतिहासदेखील ताजा आहे. त्यामुळेच, युरो कप स्पर्धेतील सामने मोठे उत्कंठावर्धक होतात.
युरोपमधील सर्व बडे स्टार फुटबॉलपटू युरो कप स्पर्धेच्या माध्यमातून आपले कौशल्य पणाला लावत असतात. यंदाच्या स्पर्धेत गतविजेता पोर्तुगालचा रोनाल्डो याच्यासह वर्ल्डकप विजेता उदयोन्मुख फ्रान्सचा किलियन एम्बापे आणि करीम बेन्झिमा, इंग्लंडचा हॅरी केन, बेल्जियमचा केव्हिन डिब्रॉयन आणि रोमेलो लुकाकू, पोलंडचे गोल मशीन रॉबर्ट लेव्हानडोस्की, वेल्सचा गॅरेथ बेल, जर्मनीचा थॉमस म्यूलर आणि टॉनी क्रूझ आदी आघाडीच्या खेळाडूंमध्ये यंदाचा युरो कप उंचाविण्यासाठी स्पर्धा असेल.
अखिल विश्वातील फुटबॉलवर युरोपचा दबदबा राहिला आहे. युरोपमधील इंग्लंड, स्पेन, जर्मनी, इटलीमधील व्यावसायिक साखळी स्पर्धा आणि क्लब अतिशय विख्यात आहेत. त्यामधून खेळणे हे जगभरातील प्रत्येक व्यावसायिक फुटबॉलपटूचे स्वप्न असते. कोट्यवधी पौंड, युरोंची खैरात या स्पर्धा आणि खेळाडूंवर होत असते. त्यामुळेच, युरोपमधील फुटबॉलचा महामेरू ठरलेल्या युरो कप स्पर्धेकडे संपूर्ण फुटबॉलविश्व डोळे लावून असते.
यंदाच्या स्पर्धेत इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, स्पेन, जर्मनी आणि पोर्तुगाल अशा क्रमवारीने विजेतेपदासाठी पसंती दिली जात आहे. तरीही, युरो कपमध्ये एखादा धक्कादायक निकाल कायमच सर्वांनाच चकित करून जातो.
लॅटिन अमेरिकेतील घमासान – कोपा अमेरिका कप
पेले आणि मॅराडोना… फुटबॉलविश्वाची दोन दैवतं. त्याचप्रमाणे त्यांच्या ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांचा अखिल फुटबॉलविश्वावर कायम दबदबा राहिला आहे. सध्याच्या काळात अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी हा फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट ठरतो आहे. तसेच, ब्राझीलच्या नेमार याच्या कौशल्याचे जगभरात चाहते आहेत. नुकत्याच झालेल्या स्पेनमधील लीग स्पर्धेत अॅटलेटिको-डी-माद्रिद संघाकडून विजेतेपद पटकाविणारा युरुग्वेचा लुईस सुआरेझ, त्याचाच सहकारी आणि मँचेस्टर युनायटेड क्लबला युरोपा कप स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून देणारा कव्हानी या दोघांचा दबदबा आगामी कोपा स्पर्धेवर राहणार आहे. तसेच, लढवय्या चिली आणि कोलंबिया या संघाकडूनदेखील फुटबॉलमधील आघाडीचे खेळाडू ब्राझील-अर्जेंटिनाला टक्कर देण्यासाठी सज्ज होत आहेत. यंदाच्या स्पर्धेतील संघांची गटवार विभागणी पुढीलप्रमाणे –
ग्रुप ए – अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बोलिव्हिया, चिली, पॅराग्वे, उरुग्वे
ग्रुप बी – कोलंबिया, ब्राझील, इक्वेडोर, पेरू, कतार, व्हेनेझुएला
(ऑस्ट्रेलिया आणि कतार हे दक्षिण अमेरिका खंडात नसले, तरी त्यांना अतिथी संघ म्हणून यंदाच्या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे)
खरं तर कोपा अमेरिका स्पर्धेला प्रदीर्घ असा इतिहास आहे. फुटबॉलचा फिफा वर्ल्डकप १९३०पासून सुरू झाला. पण, कोपा अमेरिका स्पर्धा ही त्या पूर्वीपासून, म्हणजेच १९१६पासून सुरू झाली. आतापर्यंत उरुग्वे संघाने सर्वाधिक १५ वेळा कोपा विजेतेपद पटकाविले आहे. त्याखालोखाल अर्जेंटिनाने १४ वेळा विजेतेपद पटकाविले आहे. विक्रमी वर्ल्डकप विजेतेपदे पटकाविणारा ब्राझीलचा संघ मात्र या क्रमवारीत काहीसा मागे आहे. त्यांना फक्त नऊ वेळाच कोपा विजेतेपद पटकाविता आले आहे. पॅराग्वे, चिली आणि पेरू यांनी प्रत्येकी दोन विजेतीपदे पटकावली आहेत. तर, बोलिव्हिया आणि कोलंबिया यांना एकदा कोपा अमेरिका करंडकावर आपले नाव कोरता आले आहे.
युरो कप स्पर्धेमध्ये काहीसा तांत्रिक आणि व्यूहरचनेवर आधारित खेळ पाहण्यास मिळतो. पण, कोपा अमेरिका स्पर्धेत मात्र अतिशय कौशल्यपूर्ण व शैलीदार खेळ अनुभविण्यास मिळतो. कारण, युरोपीय देश आणि त्यामधील खेळाडू हे अतिशय शिस्तबद्ध वातावरणात सराव करतात. त्यांच्याकडे अद्ययावत प्रशिक्षण सुविधा आणि प्रशिक्षक आहेत. दक्षिण अमेरिकी देशांनी देखील आता या सुविधा आणि तज्ज्ञ मार्गदर्शक आयात करण्यास प्रारंभ केला आहे. पण, दक्षिण अमेरिकी खेळाडू हे स्वभावत: अतिशय मनस्वी असतात. त्यामुळेच, तांत्रिकता आणि व्यूहरचनेमध्ये अडकून पडणे त्यांना प्रसंगी जाचक वाटते. त्यापेक्षा आपल्या कौशल्य आणि प्रतिभेवर ते अधिक विश्वास ठेवतात. फुटबॉल हा आनंदासाठी खेळण्याचा खेळ आहे, यावर त्यांची ठाम श्रद्धा आहे. त्यामुळेच, मैदानावरदेखील कौशल्यपूर्ण लीलया अदाकारी साकारण्यावर त्यांचा भर असतो. पण, या लॅटिन अमेरिकी देशांमधील संघर्ष कधी कधी टोकदेखील गाठतो. फुटबॉलचा सामना अनेकदा फ्री स्टाईल कुस्तीचे मैदान होतो. धसमुसळा खेळ केला जातो आणि प्रसंगी ब्युटिफुल गेम म्हणून गौरविण्यात आलेल्या फुटबॉलला काहीसे गालबोटदेखील लागते. पण, एकूणातच लॅटिन अमेरिकेतील स्पर्धा कायमच संघर्षपूर्ण ठरते. यंदाच्या स्पर्धेत उरुग्वे, ब्राझील, अर्जेंटिना आणि चिली यांना विजेतेपदासाठी पसंती दिली जात आहे.
कोरोना संसर्गामध्ये संपूर्ण जग दुःखाच्या खाईत लोटले गेल्यानंतर आता फुटबॉलच्या जोरावर जग नवीन उभारी घेत आहे. त्यामुळेच, युरो कप आणि कोपा अमेरिका या स्पर्धांच्या माध्यमातून अखिल विश्वाला सेलिब्रेट करण्यासाठी सोनेरी क्षण मिळणार, हे नक्की!
– आशिष पेंडसे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यम सल्लागार आहेत)