प्रिय तातूस,
अरे दिवस कसे भरभर निघून जातायत, मात्र वेळ अजिबात जात नाही. तुम्ही दोघांनी लस घेतली का? ते कळव. अरे आमची पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून आमचा नंबर लागला. अरे पूर्वी स्कूटरचा नंबर लागल्यावर जसा परमानंद व्हायचा, तसा आम्हाला आनंद झाला. मग सगळ्या सोसायटीने आम्हाला पार्टी मागितली. अर्थास वीसवीसचा ग्रुप करून आम्ही ट्रीट दिली. लस फुकटात मिळाली, मात्र सेलिब्रेट करताना खूपच खर्च आला.
अरे अनेकजणांनी हो ना करत वेळ काढला. अरे तातू, सुरुवातीला इस्पितळात सीरिंज घेऊन नर्स वाट पाहात असायच्या. तेव्हा कुत्रंदेखील फिरकायचं नाही. कुणाला कोवॅक्सिन हवी तर कुणाला कोविशिल्ड तर कुणाला फायझर हवी होती. आपल्या बायका कसं दुकानात खरेदीला गेल्यावर कांजीवरम आहे का, गढवाल दाखवा, पटोला आहे का असं भंडावून सोडतात आणि शेवटी रिकाम्या हाताने परततात, तसं अनेकांचं झालं. अरे आपला दत्ता कसा अनेक वर्षं मुली बघत कारण काढून नकार द्यायचा. आता चाळिशी उलटून गेली! आता काय उपयोग?… तसं सोसायटीत अनेकांचं झालंय. ते म्युन्सिपाल्टीचं हॉस्पिटल आहे. आम्ही चांगल्या पॉश हॉस्पिटलमध्येच लस घेणार म्हणणारे सगळे हात चोळत बसलेत.
अरे पोझिशनवाले लोक म्हणतात, सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये लायनीत सगळ्यांबरोबर उभं राहायचं म्हणजे पोझिशन जाते. ही असली खुळं डोक्यात असलेले लोक बघून मला हसावं की रडावं हेच कळत नाही. अरे एकदा मंत्रीपदाची ऑफर आली की शपथ घेऊन मोकळं व्हायचं. मला अमूकच खातं पाहिजे म्हणून कसं चालेल?
तुला एक गंमत सांगतो, अरे आपले आप्पा आहेत ना, ते हल्ली ज्योतिष बघतात. त्यांनी अनेक आमदारांना तुमच्या कुंडलीत मुख्यमंत्रीपदाचा योग आहे सांगितलंय. मात्र हे कुणालही सांगू नका अशी शपथ घालतात. अरे, आप्पांनी आईनस्टाईनला पण तुमच्या हातून मोठ्ठा शोध लागणार आहे सांगितलं असतं.
अरे, मला तर इतका कंटाळा आलाय की कुठेतरी निघून जावं असं वाटतं, पण आता असं निघून जाणं इतकं सोपं राहिलं नाही. घरातून पळून जायचं तरी आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच लस घेतल्याचे सर्टिफिकेट देखील दाखवावे लागते. पोलीस तर पळून जाण्याचे कारणदेखील विचारतात. आणि समाधान झालं तरच परवानगी देतात. अरे परवा मी बीना ट्रॅव्हलची जाहिरात देखील बघितली. ‘उगाच डोक्यात राख घालून घरातून निघून जाऊ नका. ताबडतोब भेटा. आम्ही तुमची विमानाने जाण्या-येण्याची व थ्री स्टार हॉटेलात राहण्याची व्यवस्था करू… मोजक्याच जागा शिल्लक.’
अरे तातू, आपण निघून गेलो तर घरात कोणालाही काही वाटणार नाही असे दिवस आलेत. अरे लहानपणी आपला दत्ता पळून जाणार होता तर बाजूच्या काकूंनी त्याला दशम्या बांधून दिल्या होत्या आणि काळजी घे बाबा म्हणत पाठीवरून हात फिरवला होता. असो. अरे परमेश्वराला पण अवतार घ्यायचा झाला तर आयडी कार्डचा प्रॉब्लेम होणार!
अरे तातू, हल्ली दिवस असे आलेत की कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं काही समजत नाही. समजा सत्ताधारी पक्षाने आंबा गोड आहे म्हटले की विरोधी पक्ष तो कसा उतरलेला आहे सांगणार. नशीब निदान तारीख वार यावरून तरी अजून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत आहे. अरे मध्यंतरी मी मागासलेपणाची एक गोष्ट ऐकली. त्यात गावाकडे अनेक घरी दोन दोन वर्षे उलटली तरी तेच कॅलेंडर वापरतात. इंग्लंड, अमेरिकेत असे घडले तर केवढा गदारोळ होईल म्हणून सांगू. असो.
मी हल्ली बातम्या बघायचे सोडून दिलेय. फक्त मालिका बघतो. त्यांचे खरे तर आपल्यावर उपकार आहेत. अरे इतक्या प्रतिकूल परिस्थितीत या नटनट्या घरदार सोडून, जीव तोडून अभिनय करतात. त्यामुळे आपला दिवस पार पडतो. अन्यथा अक्षरश: बोअर झालो असतो. मात्र अलीकडे बऱ्याच मालिका सुरुवातीला इतकं जुनं सगळं आतापर्यंत म्हणून दाखवतात की कंटाळा येतो. पहिली कशी पास झालो, मग दुसरीत गेलो असं करत करत दहावीत आणून सोडतात. म्हणजे पणजोबांचं लग्न झालं, मग आजोबांचा जन्म झाला. पुन्हा त्यांचं पण लग्न झालं अशी साखळी जोडत जातात. आता हे रोज रोज काय बघायचं. हे म्हणजे पेपरवाल्यांनी काल काय तारीख होती, परवा किती तारीख होती छापायला सुरुवात केली तर काय होईल?
तरी पण एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे ‘बायको अशी हव्वी’ नावाची सिरीयल आलीय. त्यात जाहिरातीमध्ये नवरा ऑफिसातून आल्या आल्या टीपॉयवर पाय ठेवून बायकोला पाय चेपून द्यायला सांगतो. अरे तातू, खरे तर प्रत्येक करारी पुरुषाचे एक स्वप्न असते. असे ऑफिसातून (दिग्विजय करून) परतल्यावर घरी आल्यावर पाय बुडवायला गरम पाणी द्यावं, मग टॉवेलने पाय कोरडे करावेत, खूप काम होतं का असं विचारावं. चहा हवा की सरबत? विचारावं. डोक्याला बाम लावून देऊ का विचारावं.
पण हे मनातल्या मनात ठेवावं लागतं. गेली शंभर दीडशे वर्षे खरे तर स्त्रीमुक्तीच्या रेट्यामुळे सगळे सगळे मराठी पुरुष आतल्या आत गुदमरलेत. त्या असंतोषाला ‘बायको अशी हव्वी’ मालिकेने वाट मोकळी करून दिलीय. खरे तर या मालिकेचा नायक आहे ना त्याचा फोटो असलेले ताईत पण बाजारात आलेत. मात्र मला घरात ही मालिका बघता येत नाही. इतकी दहशत आहे. आम्ही सगळे जण शेजारच्या सोसायटीत पत्ते खेळायला जातोय सांगत ही मालिका बघतो. अजून तरी घरात हे कळले नाही. अरे काही बोलायची सोय राहिली नाही. नाहीतरी एक जुनी म्हण आहे ना…
आपलीच बायको अन् आपलेच ओठ!
तुझाच
– अनंत अपराधी