वाहत्या पाण्यातच निर्माल्याचे विसर्जन करण्याचा अनेकांचा अट्टहास असला तरी ठाणे खाडीत निर्माल्यामुळे प्रदूषण वाढणार नाही याची दक्षता ठाणेकर घेत आहेत. यंदा गणेशोत्सव-नवरात्रीच्या काळात खाडीत तुरळक प्रमाणात निर्माल्य वाहून जाताना दिसले. निर्माल्यातील फुलं, पानं, दुर्वा आदी माश्यांसाठी खाद्य बनू शकतात, असा समज असतो, मात्र प्रत्यक्षात निर्माल्य माश्यांसाठी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. खाडीतील जैवविविधता वाढवली तर नक्कीच पर्यावरणाच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट मानायला हवी. ठाणेकरांनी निर्माल्य खाडीत न सोडता त्याचे खत करण्यासाठी प्राधान्य दाखवलं आहे.
—-
मुंबई शहरालगत असणारं ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या पंक्तीत बसल्यामुळे देशातच नव्हे, तर परदेशात ठाण्याला ओळखलं जात असेल तरी शहराची मूळ ओळख ही निसर्गसंपन्न शहर हीच आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डोंगर तलाव आणि सोबतीला विस्तीर्ण खाडी किनारा. अशी भरभरून दिलेली नैसर्गिक संपत्ती काही शहरांनाच लाभली असावी. खाडीमुळे शहराला वेगळा इतिहास देखील लाभला असून त्याच्या खुणा तोफांचा स्वरूपात बघायला मिळतात. खाडीतील मासे, जलचर, प्राणी पक्षी यांची एक परिसंस्था हळुहळू वाढताना दिसते आहे. गेल्या काही वर्षात ठाणे खाडी संवर्धनाचा दृष्टीने सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात असून प्रदूषणाचा खाईत लोटलेली खाडी पुन्हा पुढच्या काही वर्षांत उभारी घेऊ शकेल.
निसर्गसंपदासमृद्ध ठाण्यात जमिनीचे भाव भलतेच वधारल्यामुळे मोकळ्या जागा शोधाव्या लागत आहेत. सिमेंट काँक्रीटच्या जंगलाचं जाळं खाडीच्या दिशेने वाढते आहे. खाडीत भराव टाकल्याने तिचे पात्र कमी झालेलंही बघायला मिळतं. शहराला सुमारे २७ किमीचा खाडी किनारा लाभला असला तरी ७०-८०च्या दशकातली ठाणे खाडी आता आकुंचन पावली असल्याचे जुने ठाणेकर सांगतात. खारफुटी तोडून तिथे भराव टाकला जातो आहे, तर दुसरीकडे सांडपाणी, रसायन अथवा इतर केरकचरा पाण्यात सोडल्यामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढून, जलचर पक्षी-प्राणी यांच्यासाठी खाडी धोक्याची ठरत असतानाच खाडी संवर्धनासठी ठाणेकरांमध्ये जनजागृती होताना दिसते आहे. याच चांगलं उदाहरण गणेशोत्सव, नवरात्री आदींच्या काळात बघायला मिळतं.
नितळ खाडी
वाहत्या पाण्यातच निर्माल्याचे विसर्जन करण्याचा अनेकांचा अट्टहास असला तरी ठाणे खाडीत निर्माल्यामुळे प्रदूषण वाढणार नाही याची दक्षता ठाणेकर घेत आहेत. पूर्वी श्रावण महिना अथवा गणेशोत्सवाच्या दिवसात खाडीत नजर टाकली की, मोठ्या प्रमाणात निर्माल्य पाण्यावर तरंगताना आढळून यायचे. मात्र, यंदा गणेशोत्सव-नवरात्रीच्या काळात खाडीत तुरळक प्रमाणात निर्माल्य वाहून जाताना दिसले. निर्माल्यातील फुलं, पानं, दुर्वा आदी माश्यांसाठी खाद्य बनू शकतात, असा समज असतो, मात्र प्रत्यक्षात निर्माल्य माश्यांसाठी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. ठाणे खाडीत प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने पाण्यात नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे पारा, शिसे, गंधक यांच्यासारखे जड धातू ही जलचरांसाठी धोक्याची घंटा आहे. काहीवेळा खाडीतील मासे, खेकडे, कोळंबीसारखे जलचर चविष्ट म्हणून खाल्ले जातात. मात्र ते माणसाच्या प्रकृतीसाठी अपायकारक ठरतात. खाडीतील जैवविविधता वाढवली तर नक्कीच पर्यावरणाच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट मानायला हवी. ठाणेकरांनी निर्माल्य खाडीत न सोडता त्याचे खत करण्यासाठी प्राधान्य दाखवलं आहे.
खाडीत तब्बल २२५ पक्ष्यांचा वावर
नैसर्गिक विविधतेमुळे ऋतुमानानुसार ठाणे शहरात अनेक प्रकारचे पक्षी झेपावतात. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे भारताच्या इतर भागांबरोबरच युरोप-आशिया खंडातील विविध पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून आल्यामुळे ठाणे खाडी परिसरात अनेक पक्षांचे मांदियाळी भरताना दिसते, फ्लेमिंगो पक्ष्याबरोबर सीगल, रानबदकं, सँडपायपर, पेन्टेड स्टॉर्क, स्पून बिल यांच्यासारख्या मनोहारी पक्ष्यांसाठी निवारा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे खाडीत तब्बल २२५ प्रकारचे पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने कोपरीतील मलनि:सारण प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाणी सोडल्यामुळे ते जलचरांसाठी पोषक ठरले आहे. खाडीच्या पाण्यात हे पाणी मिसळल्याने या ठिकाणी मासे, चिंबोरी, कोळंबीसारखे जीव वाढत असून अशा जलचरांवर ताव मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षी येताना दिसतात. थंडीच्या दिवसात एकाच वेळी तब्बल एक ते दोन हजार वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे थवे या ठिकाणी बघायला मिळतात.
वर्षाचे बाराही महिने फ्लेमिंगोची नजाकत
परदेशी पाहुणा अशी ओळख असलेल्या फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्याची आता स्थानिक पक्ष्यांमध्येच गणती करावी लागणार आहे. ठाणे खाडीत त्यांचा वर्षभर वावर असून परिसरातील पोषक वातावरणामुळे ठाणे, रायगड (उरण) जिल्ह्यातील खाडी व समुद्रकिनारी मोक्याची जागा बघून ते कायमस्वरूपी मुक्काम ठोकतील अशी शक्यता आहे. गुजरातमधील रण, कच्छ यानंतर आपल्याकडे देखील त्यांचा विस्तार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे खाडी परिसरात हिवाळ्यात देश-विदेशांतील शेकडो जातींचे पक्षी बघायला मिळतात. नंतर उष्मा वाढायला सुरुवात झाल्यावर बहुतांश सर्वच पक्षी मायदेशी अथवा विणीच्या मैदानांवर परतताना दिसतात. परंतु याला काही फ्लेमिंगो आता अपवाद बनले आहेत. पावसाळा संपला की कच्छ तसेच युरोप सैबेरियातून बहुसंख्येने येणारे फ्लेमिंगो आता ठाणे खाडीत तळ ठोकूनच आहेत. काही वर्षांपासून खाडी परिसरात त्यांचं कायमस्वरूपी भिरभरणं सुरू असल्याचे पक्षी अभ्यासक सांगतात. राज्य सरकारने देखील ठाणे खाडीचा काही परिसर फ्लेमिंगोसाठी आरक्षित केला आहे. खाडी परिसरात त्यांच्या आवडीचं शेवाळ, मासे आदी खाद्य विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे ते इकडच्या वातावरणाशी जुळवून घेत असावेत.
– डॉ. प्रमोद साळसकर, (ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ)
२५ वर्षांनी निवटा, तर ४५ वर्षांनी ताम मासा जाळ्यात
ठाणे खाडीत पूर्वी मासेमारीवर अनेक कोळी बांधवांचा चरितार्थ चालत होता. जिताडा, काळा मासा, बोई, कालवे, कोळंबी, निवटे, खेकडे, चिंबोर्या असे विविध प्रकारचे मासे आढळून येत. नंतरच्या काळात अनेक जीव दिसेनासे झाले. खाडीतील जलप्रदूषणामुळे जलचरांनी दुसरीकडे स्थलांतर केलं. मात्र पुन्हा ही जैवसाखळी बहरते आहे. ठाणे खाडीतील प्रदूषण कमी होऊन, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण काही अंशी वाढत आहे. त्यामुळे गडप झालेले मासे परत एकदा जाळयात सापडत आहेत. २५ वर्षांपूर्वी दिसेनासे निवटे मासे खाडीत वावरताना दिसतात, तर ताम हा मासा ४५ वर्षांनी जाळ्यात अडकला होता. निवटा मासा चिखलात इकडून तिकडे सरपटताना आढळतो. ताम मासा रंगाने तांबूस असतो, त्याचे दात मांजरीसारखे असून तो रुचकर लागतो.
– प्रफुल नाखवा, (मत्स्य उद्योजक, ठाणे)
गोल्डन जॅकलची कोल्हेकुई…
ठाणे पूर्वेला स्वामी समर्थ मठाकडे जाणार्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस खारफुटीचे जंगल असून या रस्त्यावर ठाणेकर फिरण्यासाठी येतात. काहीवेळा मुंगूस, घोरपड, साप अशा वन्यजीवांचं दर्शन घडतं, त्यातच आता गोल्डन जॅकल दिसू लागला आहे. अनेकांना कोल्हा बघून कुतूहल वाटत असेल तरी मनात थोडी भीतीही आहे. मात्र हे कोल्हे माणसाची चाहूल लागताच पटकन खारफुटीत पळून जातात. दोन वर्षांपूर्वी मातीचा भराव काढल्याने खारफुटीचं जंगल वाढल्याने यातील जैवसंपदा वाढली आहे. रात्रीच्या वेळी कोल्ह्याचं हमखास दर्शन घडतं. हे कोल्हे मिळेल ते खातात. खाडीत खेकडे, निवटे, वाहून येणारे मृत प्राणी, जैवकचरा, खारफुटीची फळं, कंदमुळं आदी मिळत असल्यामुळे कोल्हे या परिसरात वावरू लागले आहेत.
– अविनाश भगत, (वन्यजीव पक्षी अभ्यासक)