काँग्रेस पक्ष एखाद्या झोपलेल्या हत्तीसारखा आहे. खूप काळ सत्तेच्या सावलीत शांतपणे झोप काढल्यानंतर ही सावली आता कायमची हरवण्याची शक्यता आहे, हे कळायलाही त्याला आठ वर्षे लागली. मात्र, राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर हा हत्ती जागा झालेला दिसतो. भारतीय जनता पक्षासारख्या सामदामदंडभेद गुंडाळून ठेवून बुलडोझरसारख्या अंगावर चालून येणार्या अत्यंत आक्रमक आणि हिंस्त्र पक्षासमोर नेमस्त, सनदशीर राजकारणाचा टिकाव लागणार नाही, हे या पक्षाच्या धुरीणांच्या लक्षात आलेले दिसते. गौतम अदानी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळच्या उद्योगपतीच्या कारभारावर हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने उपस्थित केलेल्या प्रश्नांनी काँग्रेसला नवसंजीवनी दिली आहे. राहुल गांधी फार पूर्वीपासून हे सरकार म्हणजे ‘हम दो, हमारे दो’ यांचे सरकार आहे, अशी थेट टीका करत होते. तेच हिंडेनबर्गच्या आरोपांमुळे अधोरेखित झाल्यामुळे काँग्रेसजन कधी नव्हे ते आक्रमक झालेले दिसतात आणि त्यांनी ‘हम अदानी के हैं कौन?’ या नावाने मोहीम सुरू करून भाजपला रोज तीन प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.
देशातल्या एका प्रमुख उद्योगपतीच्या (जो जगातल्या श्रीमंतांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर होता) व्यवहारांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर इतके गंभीर आरोप होतात की शेअर बाजारात त्याचे एकत्रित बाजारमूल्य ५० टक्क्यांनी कमी होते, त्याचे सगळे शेअर्स कोसळतात, त्याने जारी केलेला एफपीओ मागे घेण्याची नामुष्की येते आणि देशाचे पंतप्रधान मूग गिळून गप्प बसतात. सतत ज्ञानपोयी चालवणारे भाजपचे विद्वान मौनात जातात आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतीय अर्थव्यवस्थेला काही धोका नाही, एलआयसी, स्टेट बँक सुरक्षित आहेत, अशी थातुरमातूर मलमपट्टी करतात, हे चित्र एकाच वेळी विदारक आणि मनोरंजक आहे. विरोधकांनी केलेल्या एखाद्या कोटीच्या कथित गैरव्यवहाराची एकतर्फी माहिती घ्यायची, थेट १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करायचा आणि ईडी-सीबीआयचे ससेमिरे लावून त्यांना तुरुंगात डांबायचे. कोर्टाने एक कोटीचाही गैरव्यवहार झाल्याचे पुरावे नाहीत, म्हणून तोंड फोडले की गाल चोळत दुसर्या एखाद्या नेत्यावर निर्लज्जपणे तोच प्रयोग करायचा, ही भाजपची गेल्या काही वर्षांतली विखारी कार्यपद्धती झाली आहे. इथे हजारो कोटींची चर्चा सुरू असताना ईडी वगैरे तर दूरच, आम्ही किमान चौकशी करतो, असेही कोणी सांगत नाही. सेवक मालकांची काय चौकशी करणार म्हणा! सेबीसारखी स्वायत्त भासणारी संस्थाही चिडिचुप्प आहे. देशातले अनेक पायाभूत प्रकल्प या समूहाच्या ताब्यात दिले गेले आहेत, त्यावर या सगळ्याचा काहीच परिणाम होणार नाही?
एखाद्या उद्योगपतीवर असा आरोप होतो, तेव्हा तो निव्वळ त्या समूहावरचा आरोप नसतो; असे समूह मोठे करणार्या देशाच्या राज्यव्यवस्थेवर, सर्वोच्च नेत्यांवर, अर्थव्यवस्थेवर, नियामक यंत्रणांवरही शिंतोडे उडतात. त्यावर आपले उत्तर काय, तर हा भारतावर हल्ला आहे? याइतका विनोदी बचाव दुसरा नसेल. तुम्ही सगळे नियम, संकेत पायदळी तुडवून एका समूहाला सगळी अर्थव्यवस्था पादाक्रांत करायला मदत करणार, इतरांवर फोन बँकिंगचे आरोप करणारे आपल्या कार्यकाळात गैरव्यवहार करून पळून गेलेल्या आणि उद्योगाच्या बाजारमूल्यापेक्षा अधिक कर्ज सरकारी संस्थांकडून उचलणार्यांची जबाबदारीही घेणार नाही आणि त्यांचे गैरव्यवहार उजेडात आल्यावर तो देशावर हल्ला ठरतो? काय तर म्हणे भारताचा उत्कर्ष जगाला पाहवत नाही, म्हणून सुनियोजित कारस्थान करून हा हल्ला केला आहे. अदानी यांनीही राष्ट्रवादाचा बुरखा घेऊन आरोपांना उत्तर देण्याचे टाळले, तेव्हा हिंडेनबर्गने त्यांच्या साडेचारशे पानांच्या रडारडीच्या चार वाक्यांत चिंध्या केल्या. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, उगाच राष्ट्रवादामागे दडू नका, असे ठणकावले. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताला लाज आणणारा हा हल्लाच आहे, पण तो अदानींच्या सगळ्या उपद्व्यापांकडे दुर्लक्ष करून त्यांना बळ पुरवणार्या सत्ताधीशांनी केला आहे.
या सगळ्यात सर्वात मोठी पंचाईत झाली आहे ती समाजमाध्यमांवरच्या सत्तासमर्थकांची. त्यांनी रविश कुमारने कसा हिंडेनबर्गबरोबर कट रचला, अदानी इस्रायलमध्ये पाय रोवतील, याला कसा आंतरराष्ट्रीय विरोध आहे, वगैरे कल्पनारम्य, बालसुलभ निबंध रचून एकमेकांना पाठवले (हल्ली इतरांना पाठवून त्यांचा बुद्धिभेद करणे अवघड झाले आहे, शहाणे लोक प्रश्न विचारतात). मुळात अदानी यांनी शेल कंपन्या काढून अनेक देशांतून आपल्याच शेअर्सची खरेदी करून, कृत्रिमरित्या तेजी आणून जे काही नियमभंग आणि संकेतभंग केले आहेत, त्याचे काय? ते सगळे खोटे ठरवून या तथाकथित कटाचा पर्दाफाश करायचा असेल तर अदानींनी अमेरिकेच्या कोर्टात हिंडेनबर्गवर खटला भरून ही संस्थाच नेस्तनाबूत करून दाखवली पाहिजे. त्याला सर्वच राष्ट्रभक्तांची साथ असेल.
वास्तवात चित्र असे दिसते आहे की हा फुगा फुटला आहे, हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धुरीणांना लक्षात आले आहे आणि आता ते हात झटकू पाहात आहेत. त्यामुळेच अदानींवर हल्ला हा देशावर हल्ला, अमेझॉन, गुगल, अॅपलमधून नोकरकपात होते, अदानींकडे झाली का (त्यांच्याकडे कर्मचारी किती आहेत, याचा यांना पत्ता नसतो), या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अब्जावधींची कर्जं घेतलीत, अदानींच्या कर्जांवर आक्षेप का (अदानींचा महसूल आणि त्यांच्यावरील कर्ज यांची या कंपन्यांच्या महसूल आणि कर्जाशी तुलना करून पाहिली की आक्षेपांचे कारण समजते), असे फॉरवर्ड मेसेज पाडता पाडता मंडळी एकदम थबकून आता काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, केरळमधले कम्युनिस्ट सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनी कसे १९८९पासून अदानींना मोठे केले, याच्या कहाण्या प्रसृत करू लागली आहेत. मोदींशी अदानींचा संबंधच काय, असे म्हणण्यापर्यंत या अंधमेंदूंची मजल गेली आहे. त्यावर भाजपाच्याच खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी घरचा अहेर देत म्हटले आहे की मोदी सरकारचा खरोखरच अदानींशी काही संबंध नसेल, तर त्यांच्या उपद्व्यापांमुळे भारत सरकारचे, म्हणजे भारतीय जनतेचे जे नुकसान झाले आहे, ते भरून काढण्यासाठी अदानींच्या मालमत्तांचे राष्ट्रीयीकरण करावे, मोदीजींना भारतीय जनता प्रिय आहे की गौतम अदानी प्रिय आहेत, ते दाखवून द्यावे. फारच इभ्रत जायला लागली, तर माकडीण पिल्लू पायाखाली घ्यायला कमी करत नाहीच.
तर सांगायचा मुद्दा म्हणजे, एकेकाळी ‘हम आप के हैं कौन’ या सिनेमाने अतिप्रचंड यश कमावले होते… ‘हम अदानी के हैं कौन’ हा कल्पितापेक्षा अद्भुत सत्यपट त्याहून मोठा ब्लॉकबस्टर ठरेल. पॉपकॉर्न घेऊन बसा… आपल्या हातात असेही यापेक्षा अधिक काय आहे?