उद्धवजी, आपण आज राष्ट्ररक्षणाची लढाई लढत आहात. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा कसा चालेल? १९५६ ते १९६०च्या काळात प्रबोधनकार हाक देत होते `उठ मराठ्या उठ’. आपण पुन्हा ही हाक देत आहात. विजय तुमचाच आहे. फॅसिझम आणि बहुमतवादी राजकारणाची जुगलबंदी बिहारने थांबविली आहे. महाराष्ट्रातील तरुणांनो ही टोळधाड हटवा.
– – –
महाराष्ट्राने अभूतपूर्व व ऐतिहासिक लढा देऊन १०५ हुतात्म्यांचे बलिदान देऊन कॉ. डांगे, साथी एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, दाजिबा देसाई, दादासाहेब गायकवाड, दत्ता देशमुख, प्रबोधनकार ठाकरे इ. बहुआयामी नेतृत्वाला साथ देऊन १९६०मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला. तेव्हा मुंबईची लोकसंख्या होती ४२ लाखांच्या घरात. त्यात मराठी बांधव होते २२ लाख. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मराठी टक्केवारी होती. आता उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिसा यांच्यासह सर्व देशातून नागरिक मुंबईत स्थिरावत आहेत. मराठी टक्का सातत्याने घसरत आहे. शिवसेनेच्या मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड दिल्याने मराठीचा प्रभाव, हस्तक्षेप मुंबई शहरावर बर्यापैकी टिकून आहे. तथापि उद्योग, अर्थव्यवहार, वित्तसंस्था विज्ञान इ. क्षेत्रात मराठी माणसाचा निर्णायक दबदबा राहिलेला नाही. दूरदृष्टी, धमक व चिकाटीच्या जोरावर मराठी माणसाचा शिवसेनारुपी ‘आवाज’ टिकून आहे. मराठीचे हितशत्रू टरकून आहेत. पण ते दबा धरून बसले आहेत. शिवसेनेचे गारुड महाराष्ट्रावर टिकून आहे. पण, काळ दगाफटक्याचा आहे.
२१ जून रोजी नवा सूर्याजी पिसाळ प्रगटला. काही दिवसानंतर सत्तांतर घडले. अर्थात सत्तानाट्याचे अंतिम सूत्रधार मोदी-शहा आहेत, याचा उलगडा देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच केला. बहुसंख्येच्या जोरावर मिळणारे मुख्यमंत्रीपद भाजपाने सोडले. कारण महाराष्ट्रात सत्ता मिळविणे इतके मर्यादित उद्दिष्ट भाजपचे नव्हते आणि नाही! या सर्व प्रक्रियेत सर्वाधिक अनपेक्षित, आश्चर्यकारक व चिंताजनक बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर अद्याप निकाल लागलेला नाही. न्यायव्यवस्थेविषयी जनतेच्या मनातील आदर कमी करणारे, संशय वाढविणारे वर्तन, व्यवहार सर्वोच्च न्यायालयात दिसत आहे. मोदी-शहा जोडीने अन्य संविधानिक संस्थासह, लोकशाहीच्या तिसर्या व चौथ्या स्तंभावरही मजबूत पकड मिळविली आहे असे बोलले जात आहे. त्यात दुर्दैवाने तथ्य असल्याचे आढळून येऊ लागले आहे.
ह्या घुसळणीतून पुढे आलेला सर्वमान्य मुद्दा हाच आहे की, शिवसेना संपविणे हेच भाजपचे अंतिम ध्येय आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रवाह प्रभाव बळकट आहे. शिवसेनाही साडेपाच दशकांपासून या मातीत रुजलेली असल्याने तीही बळकट आहे, दणकट आहे. परिणामी या तीन मोठ्या पक्षांच्या ताकदीपुढे भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळविणे अशक्य आहे. हेच भाजपला उमजलेले सत्य होय आणि मग कुटिल कारस्थाने सुरू झाली. आपला पारंपरिक साथीदार म्हणजे शिवसेना. ही शिवसेना संपविणे हे उद्दिष्ट ठरले. शिवसेनेची पक्षसंघटना मोडीत काढायची आणि मुंबई महापालिकेतील सत्ता घालवायची हा कृती कार्यक्रम ठरला. शिवसेना मुळापासून उखडायची, राज ठाकरेंना हाताशी धरून शिवसेना पक्षसंघटनेला खिंडार पाडायचे. नारायण राणे यांचा वापर प्रहार करणार्या अस्त्रासारखा करायचा. अशाच प्रकारच्या कृती आराखड्यांची निष्ठुरपणे अंमलबजावणी चालू आहे.
तूर्त भाजपचे ध्येय आहे मुंबई महापालिका शिवसेनेकडून हिसकावून घ्यायचे. त्यांचे गणित आहे. उद्धवजींना गर्भगळित करायचे, आदित्य ठाकरे यांना वाढू द्यायचे नाही. म्हणजे शिवसेना संपविण्याचा कार्यक्रम व्यवस्थितपणे आवाक्यात येणार आहे. भाजप मोदी-शहांचे हे मनसुबे इथपर्यंत मर्यादित नाहीत असे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांना मुंबईसह महाराष्ट्र तोडावयाचा आहे. त्यांचे पूर्वसुरी मोरारजी देसाई यांना जे जमले नाही ते आपल्याच मातीतल्या दगाबाज सूर्याजी पिसाळांना हाताशी धरून साध्य करायचे आहे. मुंबई महाराष्ट्राचे वैभव कमी करायचे आहे.
ओएनजीसी, बीपीटी, वेदांता प्रकल्प यांच्याबाबतीतले वर्तन काय सांगते? मुंबईचे व्यापारी महत्व, आंतरराष्ट्रीय शान घालविणे आणि सारी सुबत्ता गुजरातकडे वळविणे, याच नियोजनबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. एकीकडे शिवसेनेची मक्तेदारी संपविणे आणि शिवाजी महाराजांशी मतलबी नाते जोडणे अशा हा दुहेरी सापळा आहे. एकसुरी, अंध व आक्रमक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून छोटी-छोटी राज्ये निर्माण करत जाण्याच्या पद्धतीने भविष्यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा, मुंबईचे स्वतंत्र्य राज्य करण्याचा किंवा ती केंद्रशासित करण्याचा डाव शहा-मोदी आखीत आहेत. हा मनसुबा १९५६-१९६० साली महाराष्ट्राने उधळून लावला होता. ह्या घटनेची पुनरावृत्ती होईलच. आजची शिवसेना मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबादपुरती मर्यादित राहिलेली नसून महाराष्ट्रातील लहानमोठ्या शहरांसह ग्रामीण महाराष्ट्राने ती स्वीकारली आहे. वाढविली आहे. वडापाव खावून! भाकरी व शिदोरी स्वत:ची वापरून!
निरनिराळे प्रकल्प, आस्थापना गुजरातकडे वळविण्याचा जणू सपाटाच शहा-मोदींनी चालविला आहे. मुंबईचे व्यापारी महत्त्व आणि आंतराष्ट्रीय शान पद्धतशीरपणे घालविण्याचे त्यांचे नियोजन आहे. सोयीची बंदरे, विमानतळ, देशाची आर्थिक राजधानी ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. इथे पुन्हा महाराष्ट्राच्या घसरत्या राष्ट्रीय प्रभावाचा मुद्दा आहे.
पुढील ४० वर्षे भाजपच राज्य करेल असा दावा अमित शहा करताना आपण पाहिले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात, `पुढील ५० वर्षे भारतात फक्त भाजप हाच पक्ष असेल.’ भारतीय लोकशाहीसाठी आणि भारत देशासाठी यापेक्षा घातक काहीही असू शकत नाही. म्हणजेच लोकशाही, देशाची अस्मिता, भारतीय राज्यघटना यांच्या रक्षणाची लढाई, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, दोन्ही काँग्रेस यांनी आपल्या खांद्यावर घेतले आहे. काँग्रेस संपली हे मिथक आहे, मृगजळ आहे. उद्धवजी, आपण आज राष्ट्ररक्षणाची लढाई लढत आहात. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा कसा चालेल? १९५६ ते १९६०च्या काळात प्रबोधनकार हाक देत होते, `उठ मराठ्या उठ’ आपण पुन्हा ही हाक देत आहात. विजय तुमचाच आहे. फॅसिझम आणि बहुमतवादी राजकारणाची जुगलबंदी बिहारने थांबविली आहे. महाराष्ट्रातील तरुणांनो, ही टोळधाड हटवा. महाराष्ट्र, पर्यायाने देश वाचवा. अशी ऐतिहासिक कामगिरी महाराष्ट्राने अनेकदा पार पाडली आहे. इतिहासात तशी साक्ष आहे. आताही नव्याने इतिहास घडवण्याची हिंमत ठेवू या.