त्याने आयुष्यभर जमविले असंख्य ग्रंथ
आणि लिहून ठेवली वाचणाऱ्याची रोजनिशी.
त्याच्या घरी उरू नये जागा
‘स्व:’लाच झोपायला किंवा हातपाय पसरायला
निवांत!
तरीही त्याच्या घरी पुस्तके येतच गेली
कितीतरी कुठून कुठून.
आली फुटपाथवरून आणि थेट शिरली त्याच्या अगदी कुशीत मांजरांच्या पिल्लागत.
दाहीदिशांनी विस्तारले त्याचे पुस्तकी जग
जगता जगता चळवळीत आणि लघु-अनियतकालिकांच्या नाक्यावर कविता पिता-भोगता.
पुस्तकांवर पुस्तकांचे ढीग साठत गेले
तसा तो त्यांना घेऊन गेला मुंबईतून दूर कलावंतांच्या भूमीवर.
वाटलं इथे त्याचे वाचनाचे वेड ‘पेण’ खाणार
पण तो सुसाट वाचतच राहिला अधिकाधिक कविताही विसरून की वाचता वाचता कविता लिहून?
हळूहळू पुस्तके उराशी कवटाळून तो झाला एखाद्या समुद्री वादळासारखा शांत धीरगंभीर पोक्त म्हातारा.
ग्रंथांनी त्याला नेहमीच सुख दिले
ग्रंथांनी त्याला दु:खही दिले
पण भाकरीसाठी त्याने कधीही विकले नाहीत आपले जपलेले ग्रंथ!
हरवून गेल्या पुस्तकासाठी एखाद्या लहान मुलासारखा हमसाहुमशी रडणाऱ्या माझ्या मित्रा,
या विकाऊ जगात
पुस्तके राहतील ना रे टिकून जगाच्या अंतापर्यंत?
की विकली जातील पुस्तके भाकरीसाठी देश विकावा सहज तशी?
की वाचणार्याच्या रोजनिशीला घाबरून
जाळून टाकली जातील पुस्तकं
या अघोषित आणीबाणीत?
पुस्तकांचा पोशिंदा गेल्यावर खरे दुःख होते ते पुस्तकांनाच!
कोलमडून जावे घरटे झाडावरचे
आणि विखरून जावीत पाखरे आकाशात
तसा पुस्तकांचा संग्रह विस्कटून जातो
दुसरा घरोबा केलेल्या आईबापांच्या पोरांप्रमाणे.
आपल्या सावत्र भावंडात ती जगतात आपल्या सख्ख्या भावंडांना आठवत.
जगभरातल्या वेगवेगळ्या संग्रहात जगत राहतात
आपला जुना संग्रह स्मरत.
पुस्तके तेव्हा मूक अश्रू ढाळतात
आपल्या मरून गेलेल्या बापासाठी.
निघून गेलेला बाप त्यांना विसरता येत नाही कधीच केव्हा.
मित्रा,
तुझी पुस्तके रडतायेत
तुला येतंय ना ऐकू?
येतंय ना?