‘स्वदेस’ हा प्रेक्षकांना मोहनच्या नजरेतून भारताची ओळख करून देतो. म्हणजे आपलीच ओळख. आणि तीही सावकाश एकेक पैलू घेत. ‘स्वदेस’ संथ आहे म्हणणार्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की ‘स्वदेस’ हा स्थित्यंतराचा प्रवास आहे. तो घडताना दाखवणं हा दिग्दर्शकाचा हेतू आहे. घडलेला दाखवणं नाही.
—-
डिसेंबर २००४. स्वदेसला प्रदर्शित होऊन फक्त एक आठवडा झालाय. ‘समीक्षकांनी नावाजलं तरी प्रेक्षकांनीसुद्धा हा सिनेमा पाहायला हवा’ असं म्हणताना दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या चेहर्यावर काळजी स्पष्ट दिसतेय. त्यांच्या मागे आहे ‘लगान’चं भव्य यश आणि चित्रपटाच्या नायकाच्या मागे भारताचा सुपरस्टार असं वलय.
मग काही दिवसात ‘स्वदेस’ पडला असं बोलण्यात येऊ लागलं. साधारण एकवीस कोटींचं बजेट असलेला शाहरुखचा सिनेमा फक्त जवळपास पस्तीस कोटींचीच मजल गाठू शकला.
कारण?
पिक्चर स्लो होता.
प्रचंड काळ गेलेला आहे आपल्या देशात, हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकाला थोड्या संथ गतीच्या चित्रपटांशी जुळवून घ्यायला. ‘पिक्चर सिलो (स्लो) है यार’ म्हणत पब्लिक बाहेर पडलं की पिक्चरचा कपाळमोक्ष ठरलेला.
‘स्वदेस’ येऊन अनेक वर्ष झाली. अध्येमध्ये ‘स्वदेस’ प्रेक्षकांना का पसंत पडला नाही यावर चर्चा होत राहिली, पण या सर्व गोष्टीत ‘स्वदेस’चा आत्मा मात्र आपल्या अनेकांकडून दुर्लक्षित राहिला हे सत्य आहे.
२००१चा गोवारीकरांचा ‘लगान’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला होता. अशी फिल्म येऊन ती इतकं यश संपादन करेल आणि थेट ऑस्कर पुरस्कारांचा दरवाजा ठोठावेल इतकं कोणी स्वप्नात देखील पाहिलं नसेल. त्यामुळे ‘लगान’नंतर गोवारीकर काय आणतायत याची उत्सुकता आणि नायक शाहरुख आहे हे कळल्यावर दुगुनी उत्सुकता, अशी गत प्रेक्षकांची झाली असावी. चित्रपटाची प्रदर्शनपूर्व पोस्टर्स ही सुंदर आणि कुतूहल वाढवणारी होती.
गोवारीकर यांना कथेची प्रेरणा ही अरविंदा पिल्लालामारी आणि रवी कुचीमंची या भारतात परतून आलेल्या एनआरआय दांपत्याकडून (यांनी नर्मदा खोर्यात श्रमदानातून एका दुर्गम आदिवासी भागातल्या शाळेत वीज आणली.) मिळाली. ‘स्वदेस’ आहे मोहन भार्गव या मूळच्या भारतीय आणि आता अमेरिकेत नासा या वैज्ञानिक आणि अंतराळ संशोधन, मोहिमा करणार्या संस्थेत काम करणार्या तरुणाची गोष्ट. मोहनचे आईवडील काही वर्षांपूर्वी भारतात एका अपघातात निर्वतल्यानंतर आता तो एकटा उरला आहे. नासामध्ये त्याची प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नियुक्ती झालीय. अशात त्याला आईवडिलांच्या स्मरणदिनी आपल्या दाईची, कावेरी अम्माची आठवण येते. खरं तर अनेक दिवसांपासून त्याला कावेरी अम्माला भेटावसं वाटतंय. तिला दाई म्हणणं त्याला आवडत नाही. ती त्याची दुसरी आईच आहे. बॉसकडून दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन मोहन भारतात येतो. कावेरी अम्माला शोधतो. ती ज्या गावात, चरणपूरमध्ये आहे तिथे तिच्यासोबत राहतो. जसजसा मोहन चरणपूरमधल्या लोकांच्या, त्यांच्या आयुष्याच्या, जगण्याच्या प्रवाहात सामील होऊ लागतो, तसतशी त्याची दोन आठवड्यांची सुट्टी दीर्घ होऊ लागते. कावेरी अम्मा जिच्याकडे राहतेय ती मोहनची कधी काळची बालमैत्रीण गीता, तिचा लहान भाऊ चिकू, गावातले इरसाल तसेच भोळेभाबडे नमुने या सगळ्यात मोहन गुंतत जातो आणि आपल्याच मुळांना आपल्या मशागतीची गरज आहे हे कळताच भारतात परतण्याचा निर्णय घेतो. पण हा निर्णय तात्काळ नाही. आणि सोपा तर अजिबात नाही. मोहन हा अनेक वर्ष अमेरिकेत राहिलेला आणि आता अमेरिकेचं नागरिकत्व सन्मानाने जवळपास हातात असलेला तरुण आहे. नासासारख्या निव्वळ नामांकित नव्हे तर बलाढ्य संस्थेत तो अतिशय महत्त्वाच्या आणि उच्च पदी आहे. ते सर्व सोडून परत भारतात येण्याचा निर्णय सोपा नी फिल्मी नक्कीच नाही.
गोवारीकर एक दिग्दर्शक म्हणून अगदी सुरुवातीपासूनच प्रचंड काळजीपूर्वक हे मांडत राहतात. सुरुवातीचा थंड आणि उदास मोहन. त्याला सुट्टी मिळेल का हा प्रश्न पडलाय. त्याचा नासामधला सहकारी मित्र त्याला सांगतो, सुट्टी मागण्याकरता यापेक्षा उत्तम वेळ नाही कारण प्रोजेक्ट पूर्ण करायला अजून अठ्ठावीस आठवडे आहेत. मोहनची सुट्टी मंजूर होते आणि जसं त्याला विमानातून भारताचं पहिलं दर्शन होतं त्याची कळी खुलत जाते. ‘स्वदेस’ संथ आहे म्हणणार्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की ‘स्वदेस’ हा स्थित्यंतराचा प्रवास आहे. तो घडताना दाखवणं हा दिग्दर्शकाचा हेतू आहे. घडलेला दाखवणं नाही.
मोहन भारतात आल्यावर एक कॅराव्हान घेतो ज्यात राहणं, प्रातर्विधी, झोपणं ह्या सगळ्या सुविधा असतील कारण गावात काय आणि कशा गोष्टी असतील याबद्दल तो साशंक आहे. हे मित्राला सांगताच तो मित्र त्याला ‘यू अमेरिकन’ असं गमतीत म्हणतो आणि मोहन ओशाळतो.
‘स्वदेस’ हा प्रेक्षकांना मोहनच्या नजरेतून भारताची ओळख करून देतो. म्हणजे आपलीच ओळख. आणि तीही सावकाश एकेक पैलू घेत. स्वदेसच्या प्रत्येक प्रसंगात लेखक-दिग्दर्शक टीमने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रतीकांमधून, दृष्यात्मक बांधणीमधून किंवा मग सरळ संवादांमधून.
अगदी पहिल्याच प्रसंगात, मोहन भार्गव जेव्हा नासाच्या प्रोजेक्ट मीटिंगमध्ये नव्या उपग्रहाची माहिती देत असतो तेव्हा त्याला तिथला एक पत्रकार या प्रोजेक्टवर इतका खर्च करणं न्याय्य आहे का, असं विचारतो. तेव्हा उत्तरादाखल मोहन येत्या काही वर्षात बीजिंगपासून दिल्ली ते अनेक आंतरराष्ट्रीय शहरात निर्माण होणार्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याच्या धोक्याबद्दल सांगतो आणि हे ओढून ताणून आणलेलं वाटत नाही हे विशेष.
भारतात आल्यानंतर चरणपूरसारख्या छोट्या गावात गोवारीकर, मोहनला आणि आपल्याला मुद्दाम नेतात. खरा भारत हा खेड्यात वसलेला आहे हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य आपल्याला इथे नव्याने समजू लागतं. इथले पोस्ट मास्तर निवारण यांच्या म्हणण्यानुसार इथे नो बँक, नो आयएसडी असं हे गाव आहे. अर्थात, हा काळ भारतात नुकतीच इंटरनेट क्रांती होण्याचा आहे. हा काळ सामान्यांना न परवडणार्या टॉकटाइमचा आहे. थ्री जी, फोर जी शब्द क्षितिजापल्याड असल्याचा आहे.
मोहन एका प्रसंगात या पोस्ट मास्तरांशी बोलताना ऊन सहन न होऊन संभाषण आवरतं घेत तिथून निघतो. या दृश्यात फार ठळक असं काही न दाखवता बोलता बोलता मोहन, वर आकाशात बघत कपाळावरचा घाम पुसून घाईघाईत वळतो, इतकंच असलं तरी असे बारकावे मोहनचा ‘स्वदेस’मधला प्रवास कुठून सुरू होतो हे दाखवणार्या खुणा आहेत.
या पोस्टमास्तर निवारण साहेबांना ईमेल माहीत नाही. आणि जेव्हा मोहन त्यांना हे सांगतो तेव्हा अगदी निरागसपणे ते म्हणतात, ‘इकडे पण ईमेल आलं तर बरंच होईल. मला लोकांच्या घरोघरी जाऊन चिठ्ठ्या टाकायची गरज नाही.’ यात आपल्या आणि एकंदरीत पोस्टखात्याच्या अस्तित्वाचं काय होईल अशी पुसटशी भीतीही त्यांच्या मनात नाही. मुळात हा माणूस पैलवान गडी आहे. मोहनच्या हेतूबद्दल कळताच फार विचार न करता मोहनबरोबर ठामपणे उभा राहणारा आहे. तुम्ही ठाकूर असूनही मोहनबाबूंच्या शाळेत सर्व जातीच्या मुलांनी एकत्र शिकावं या मागणीला पाठिंबा का देताय असं पंचायतीमधल्या एकाने विचारताच निवारण गुरगुरत म्हणतो, ‘जो सही है हम वही कर रहे हैं.’
गोवारीकर ‘स्वदेस’मधून अनेक मुद्द्यांना स्पर्श करतात. निव्वळ स्पर्श नव्हे, तर त्या मुद्द्यांची बंद केलेली झाकणं उघडतात. जातीव्यवस्था हा अतिशय ज्वलंत आणि हल्ली परत ऐरणीवर आलेला, भारताला लाभलेला शाप इथे बर्याच सौम्यपणे मांडला गेलाय. सौम्यपणे म्हणण्याचं कारण म्हणजे ‘स्वदेस’मध्ये रक्तपात नाही. शारीरिक किंवा मानसिक हिंसाचार नाही. धर्मावर थेट भाष्य नाही. जातीव्यवस्थेला प्राक्तन मानणारी माणसं आहेत इथे. दोन्ही बाजूला. जो कभी नहीं जाती उसे कहते हैं जाती म्हणणारा गावाचा प्रतिष्ठित असामी मुनिश्वर असो की आमच्या मुलांनी शिकून काय करायचं असं म्हणणारे गावकुसाबाहेरचे लोक असोत. आधी सहज म्हणून आणि गीताच्या शाळेची जागा पंचायतीने धान्याचं गोडाऊन म्हणून वापरायला काढू नये म्हणून शाळेसाठी मुलं जमवायला मोहिमेवर निघालेला मोहन हळूहळू हे विदारक वास्तव बघत बदलत जातो. गावाबाहेरच्या अस्पृश्य माणसाच्या मुलांना शाळेत पाठवा म्हणून सांगायला गेलेल्या मोहनला तो माणूस आणि त्याची बायको, त्यांच्या मुलीकडे बोट दाखवत म्हणतात आता या मुलीचं लग्न होईल, तेव्हा त्या कोवळ्या जिवाकडे बघून मोहन अवाक होतो. हे सगळं त्याच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. खुद्द गावचा सरपंच नातींच्या प्राथमिक शिक्षणातच खुश आहे. स्त्रीने शिकून काय उपयोग ही मानसिकता गावातली माणसं कसलाही अपराधी भाव न बाळगता निरागसपणे व्यक्त करतात. मग त्या गावकर्यांच्या लहान मुलींबद्दल असोत की, चक्क गीतासारख्या तिथल्या शाळेच्या शिक्षिकेबद्दल.
गीताला बघायला आलेला मुलगा आणि त्याचे आईवडील स्पष्ट सांगतात, आमचा चांगला व्यवसाय आहे. लग्नानंतर मुलीने नोकरी केलेली आम्हाला चालणार नाही. अर्थात गीता बाणेदारपणे ते स्थळ नाकारते. गंमत म्हणजे तिने आपल्याला नाकारलं आहे हेच त्या मुलाला अविश्वसनीय वाटतं.
सुरुवातीला हे सगळं गमतीत घेणार्या मोहनला आपल्या आणि इथल्या परिस्थितीमधली भयंकर तफावत डाचू लागते. संवेदनशील मनाचा मोहन आपल्या परीने गावातल्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करू लागतो. मग ते ‘ये तारा वो तारा’ सारख्या गाण्यातून असो की ‘मैं नहीं मानता हमारा देश महान है’ अशा संवादातून.
मोहनच्या या दोन्ही वेळेला व्यक्त होण्यामागे, लेखक दिग्दर्शकाने अत्यंत हुशारीने विणलेले प्रसंग आहेत. शाळेसाठी घराघरात जाऊन मुलं गोळा करणार्या मोहनला जेव्हा जात आणि बलुतेदारीसारख्या गोष्टीमुळे गावात आणि एकंदरीत समाजातच असलेल्या भेगा दिसतात, तेव्हा रात्री सर्व गावासाठी असलेल्या सिनेमा शो वेळी तो वीज गेल्याची संधी साधून सगळ्या लहान मुलांसमोर ‘समझो सबसे पहले तो, रंग होते अकेले तो, इंद्रधनुष बनता ही नहीं’ म्हणत नाचतो. त्यांना एकत्र आणतो आणि त्यांचा शाळेत येण्याचा रस्ता सुकर होतो.
दुसर्या प्रसंगात, जेव्हा शाळेच्या उद्घाटन समारंभात मोहनचे विचार ऐकायला गावातले वजनदार लोक उत्सुक असतात तेव्हा मोहन त्यांच्या भारतीय परंपरा वगैरे वल्गनांना आव्हान देतो, नव्हे सुरुंग लावतो. ‘जिकडे आपण कुठे कमी पडतोय असं दिसतं तिकडे लगेच आपण परंपरा वगैरे कारणं देऊ लागतो. अमेरिका हा यशस्वी लोकांचा देश आहे कारण तिकडे अशा गोष्टींची ढाल करून नाकर्तेपणा लपवणारी माणसं नाहीत,’ असं म्हणून तो तिथून निघून जातो.
मोहनच्या या उद्वेगाला एक कारणही आहे. ते म्हणजे आदल्या रात्री त्याने अनुभवलेला खरा देस. त्याला कावेरी अम्माने गीताच्या एका जमिनीच्या भाडेवसुलीसाठी कोडी नावाच्या गावी मुद्दाम पाठवलेलं आहे. तिथे गीताच्या कुटुंबाची जमीन हरिदास नावाच्या एका इसमाने शेतीकरीता घेतली आहे. पण भाडं काही दिलेलं नाही. आधी ट्रेनमधून, मग बसमधून, मग बोटीतून असा प्रवास करत मोहन त्याच्या चरणपूरमधल्या मित्राबरोबर, मेलारामबरोबर हरिदासच्या घरी कोडीला पोहोचतो. तिथली हरिदास आणि त्याच्या कुटुंबाची दैन्यावस्था पाहून मोहन हबकतो. त्यात हरिदासची कथा अजूनच मन हेलावणारी आहे. हा हरिदास मूळचा विणकर. मशीनचे कपडे येऊ लागल्याने पोटावर पाय आलेला. म्हणून ही जमीन भाड्याने घेऊन शेतीत उतरलेला. पण गावच्या लोकांनी वाळीत टाकलेला. कारण? विणकराने विणकामच करावं. दुसरा व्यवसाय केला म्हणून पीक चांगलं येऊनही त्याची कोंडी केली गेलीय. ‘मेरे आँसूओं का स्वाद तो मेरे मन का नमक ही जानता है’ म्हणत अश्रू ढाळणार्या फाटक्या हरिदासकडून मोहन काय वसूल करणार? मोहन निघताना त्याच्या हातात काही पैसे कोंबून निघतो खरा; पण अजून एक हृदय विदीर्ण करणारा अनुभव त्याची वाट पहात असतो. येताना बोटीत ऐटीत उभा असणारा मोहन परतताना मात्र बोटीत विमनस्क बसला आहे. तिथून मग ट्रेनने परत येताना, त्याच्या खिडकीजवळ एक लहान मुलगा पाणी विकायला येतो. चाराण्याचा एक मातीचा कप भरून पाणी. एका लहान मुलाला पोटासाठी ते काम करावं लागतंय हे बघून मोहन इतका हादरलाय की तो यांत्रिकपणे तो मातीचा कप घेतो. संपूर्ण चित्रपटभर डिस्टिल्ड पाणी पिणारा मोहन भार्गव त्या मुलाने दिलेल्या कपातलं पाणी विद्ध चेहर्याने पितो. राजकुमार सिद्धार्थप्रमाणे मोहनने ही सगळी दु:खं पहिल्यांदाच बघितली आहेत. त्याच्या मनात ती घुसली आहेत. म्हणूनच परंपरेच्या नावाची बुजगावणी उभी करून शोषक व्यवस्थेचा शाप राजरोस लोकांनी मिरवावा हे त्याला पटत नाही. मोहन कोडीवरून चरणपूरला येतो तोच एक बदललेला माणूस बनून. (गोवारीकर आणि बारकावे याचं अजून एक उदाहरण म्हणजे, हरिदासची दैन्यावस्था दाखवतानाच, त्याची दोन लहान मुलं आणि त्याच्या बायकोच्या कडेवर तिसरं बाळ हे सुद्धा दाखवलेलं आहे. आवक आणि संतती नियमन याचा आपल्याकडे अजिबात विचार केला जात नाही.)
मोहनच्या सहनशक्तीचा कडेलोट व्हायला हे समर्पक प्रसंग आणि गीत आलेलं आहे. दसर्याच्या दिवशी रावण दहन होण्याआधी रामलीलेच्या गाण्यातून मध्येच मोहन सुष्ट आणि दुष्ट याची मूळ सांगड आणि समजूत मांडताना म्हणतो, ‘मन से रावण जो निकाले राम उनके मन में है.’ तरीही रावण दहन झालं आणि आपलं कार्य संपलं या आविर्भावात गावची पंचायत पारावर मशालीच्या उजेडात भजन गात बसलीय हे पाहताच मोहन खवळतो. आणि तिथेच तो गावासाठी काही करण्याचा निर्णय घेतो.
आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला चित्रपटाची गोष्ट संपताना भावनोत्कट किंवा श्वास रोखून ठेवणार्या शेवटाची इतकी सवय झालीय की मोहनने गावकर्यांच्या मदतीने गावात वीज आणली तिकडेच चित्रपट संपला असा ग्रह करून मग उरलेला चित्रपट प्रेक्षकांना वाढीव वाटू लागतो. खरं म्हणजे ‘लगान’सारखा क्लायमॅक्स देणार्या दिग्दर्शकाकडून ही अपेक्षा असणारे प्रेक्षक तेव्हा भरपूर होते ही वस्तुस्थिती आहे. पण ‘स्वदेस’ वेगळा ठरतो तो इथेच. गावात वीज आणल्यानंतर मोहनला परत अमेरिकेला जावं लागतं. त्याची ती कमिटमेंट आहे. त्याच्यावर प्रेम करणार्या गीता, कावेरी आणि चरणपूरमधल्या लोकांना सोडून. तो निघताना त्याला आपली संस्कृती म्हणून गीताने दिलेल्या पेटीत या इथल्या मातीतल्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात मोठी गोष्ट त्याला सतत अमेरिकेला स्थायिक होण्याचं स्वप्न बघणार्या मेलारामने दिलीय. अवर लॅम्प गिविंग लाईट टू नेबर्ज हाऊस म्हणत मेलाराम अमेरिकेला जायचं नाकारतो. थोड्या अपराधी भावनेनेच मोहन अमेरिकेत पोहोचतो.
आणि मग सुरांचा जादुगार ए. आर. रहमान त्याच्या पोतडीमधलं खास काहीतरी काढतो. मोहन नासाला परतला आहे. त्यांच्या उपग्रहाचं यशस्वी उड्डाण झालेलं आहे. पण मोहनला मात्र त्याची मायभूमी शहनाईच्या सुरात बोलावू लागली आहे. ‘ये जो देस है तेरा’ हे गाणं म्हणजे खरं तर ‘स्वदेस’चा अस्सल उच्च बिंदू आहे. मोहनचा भारतात परतायचा निर्णय बळकट करणारी घालमेल आणि मग ठाम निर्णय ही प्रक्रिया या गाण्यात घडते. शेवटी मोहन अठ्ठावीस आठवड्यांचा प्रोजेक्ट संपवून जणू अठ्ठावीस युगांनंतर भारतात येतो आणि या मातीत माखून घेत पोस्टमास्तर निवारणबरोबर कुस्ती खेळतो. एक वर्तुळ पूर्ण होतं.
‘स्वदेस’ हा संपूर्णपणे, एखादा दिग्दर्शक आपल्याला जे म्हणायचं आहे ते किती खंबीरपणे दाखवतो याचं उत्तम उदाहरण आहे. ‘स्वदेस’च्या लांबीवर, हाताळणीवर, शाहरूखच्या वेगळ्या भूमिकेवर खूप टीका झाली. पण गोवारीकर यांनी कुठल्याही बाबतीत तडजोड केली नाही. उलट आज शाहरूख खानच्या उत्तम भूमिकांमध्ये ‘स्वदेस’चा क्रमांक फार वर आहे. अनेकांचं म्हणणं आहे की शाहरूख हा शाहरूख न वाटता मोहन भार्गव वाटतो. हे मात्र पटण्यासारखं नाही. उलट मोहन भार्गव हा शाहरुख (म्हणजे शाहरूखसारखा करिष्मॅटिक) वाटतो असं म्हणायला हवं. कारण शाहरूख खान या अभिनेत्याची सगळ्यात जमेची बाजू आहे ती त्याचा पडद्यावर आणि बाहेर असलेल्ाा चार्म. मोहन भार्गव हा शाहरूख नसता तर ये तारा वो तारा म्हणत एखादा नासाचा प्रोजेक्ट मॅनेजर कसा काय नाचू शकतो हा प्रश्न जास्त ठळकपणे आपल्याला जाणवला असता. मोहन भार्गव शाहरूख नसता तर त्याने चरणपूरच्या लोकांना भारावून टाकलेलं आहे हेही पचायला कठीण गेलं असतं. शाहरुखचे लोकांबरोबर, त्यांच्यामधून प्रवास करतानाचे शॉट्स हे आजही इतकं प्रभावी व्हिज्युअल आहे की या माणसाने बदल आणला आणि तो ते करू शकतो हा विश्वास लोकांमध्ये जागवणारं व्यक्तिमत्त्व हे फक्त त्यावेळी शाहरूख खानचं होतं. गोवारीकरांनी त्याचा अचूक वापर केला. याच बरोबर कावेरी अम्मा करणार्या किशोरी बल्लाळ या कुठेही घिस्यापिट्या, गाजर का हलवा घेऊन उभी असलेली आई नाही ना गायत्री जोशीची गीता ही व्यक्तिमत्त्व नसलेली बॉलिवूड नायिका. कावेरी अम्मा आणि गीता हे मोहनच्या प्रवासाचे साथीदार आहेत, मार्गदर्शक आहेत. कावेरी अम्मा हे भारतमाता या भारतीयांच्या लोकप्रिय मान्यतेच पात्र रूपांतर आहे. जिच्या ओढीने मोहन आलेला आहे आणि इथे येऊन इथल्या लोकांचं आपण काहीतरी देणं लागतो हे त्याला उमजलेलं आहे. चित्रपटातली सगळीच पात्रं अस्सल आहेत आणि मोहनप्रमाणेच ती आपली होतात. गोवारीकर यांच्या चित्रपटात संगीत नेहमीच उत्तम असतं. पण इथे विशेषत: संगीत आणि गाणी, ही पटकथेचा अविभाज्य हिस्सा बनून येतात. रहमान आणि जावेद अख्तर यांनी केलेली जादू आहे ती. त्याचबरोबर संवाद लेखक के. पी. सक्सेना यांनी साधे सुंदर संवाद लिहून जणू या नदीच्या पात्रात अलगद सोडून दिलेत.
‘स्वदेस’मध्ये जुने आणि जानेमाने फिल्म दिग्दर्शक लेख टंडन यांनी दादाजी म्हणून एक सुंदर व्यक्तिरेखा केलीय. हा स्वातंत्र्यसैनिक असलेला माणूस आता गीताबरोबर शाळेत मुलांना शिकवतो आहे. गावात वीज येण्याकरता अथक परिश्रम करणारे दादाजी, वीज आल्यानंतर समाधानाने प्राण सोडतात. त्यावेळी मोहनचा हात हातात घेऊन म्हणतात, ‘तू जेव्हा आलास तेव्हाच मला वाटलेलं, तू बदल आणशील. आता मी सुखाने डोळे मिटेन.’ हा भारताचा पुराणपुरुष आहे. जो नव्या पिढीला विश्वासाने आपला देश, आपला इतिहास देतोय.
‘स्वदेस’मधल्या एका प्रसंगाच्या उल्लेखाशिवाय कितीही लिहिलं तरी अपूर्ण वाटावं असा हा प्रसंग चित्रित केला गेलाय. गावात मोकळ्या जागेत चित्रपट दाखवला जातोय. खालच्या जातीतले लोक, त्यांचा कबिला एका बाजूला आणि वरच्या जातीतले तालेवार व बाकी गावकरी लोक एका बाजूला. ज्या बाजूला खालच्या जातीतले लोक आहेत तिथे चित्रपट फ्लिप होऊन दिसतोय. म्हणजे नावं उलट दिसतायत पण शिक्षणाचा गंध नसल्याने कोणाला फरक पडत नाहीये. खरंतर अनेक वर्ष… जणू अनेक वर्ष या बाजूच्या लोकांना सरळ चित्र बघायची मुभा नाही. कॅमेरा तिथून या बाजूला आणि इथून त्या बाजूला येतो जातो. हे घडत असताना चिकू आणि इतर मुलं मात्र दोन्ही बाजूला पळत जाऊन ही गंमत बघून हसत असतात. ये तारा वो तारा गाणं संपताना हा पडदा खाली जमिनीवर पडतो आणि दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना बघतात. बिमल रॉय, व्ही. शांताराम यांच्या परंपरेत, यांच्या स्कूल ऑफ फिल्ममेकिंगमध्ये शोभावा असा हा प्रसंग.
अशा अनेक गोष्टींकरता ‘स्वदेस’ परत परत पहावा. परत परत जागवावा. तो निव्वळ एनआरआय लोकांसाठीच बनलेला नाहीये. तर तो त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला आपला देश म्हणजे फक्त एक जमिनीचा तुकडा न वाटता, इथली माणसं आपली वाटतात.
वुई, दि पीपल.
कट इट!
– गुरुदत्त सोनसुरकर
(लेखक चित्रपट रसिक, लघुपट दिग्दर्शक आणि जाहिरात व्यावसायिक आहेत)