□ राज्यातून चाइल्ड पोर्नोग्राफीच्या १५ हजार लिंक, २१५ गुन्हे दाखल, १०५ जणांना अटक
■ अश्राप लहान मुलांना असले चाळे करायला लावणारे नराधम तुरुंगात जन्मभर सडण्याच्या लायकीचे… असलं अभद्र चवीने पाहणार्यांच्या विकृतीने महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली…
□ राज्यांची लसखरेदी घटली, राज्यांकडून मागणी नोंदवूनही केंद्राकडून प्रतिसाद नाही
■ लस प्रमाणपत्रावर फोटो झळकवण्याची हौस असलेल्यांचा फोटो आता मृत्यू प्रमाणपत्रांवर झळकवायला हवा.
□ लसीच्या दोन डोसवर थांबता येणार नाही, बूस्टर डोसचीही गरज लागणार : अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया
■ अहो इथे पहिल्या लसीचा पत्ता नाही, दुसरी मिळायची कधी आणि बूस्टरच्या गप्पा मारताय! ती पुढच्या जन्मात मिळेल बहुतेक सगळ्यांना!
□ काश्मिरी जनतेला पाकिस्तानात यायचे आहे की नवा देश हवा आहे : इम्रान खान यांचा सवाल
■ यांच्याकडे आसन डळमळीत झालं की काश्मीर राग आळवायला सुरुवात होते… लगे हाथ बलुचिस्तान, सिंध प्रांत, पंजाब वगैरे सगळ्यांना विचारून टाका हाच प्रश्न.
□ उत्तर प्रदेशात जातीची समीकरणं जुळवण्यासाठी योगी सरकारचा लवकरच विस्तार
■ एक देश, एक संस्कृती, एक धर्म, देश प्रथम वगैरे बंडलबाजीचे काय झाले? एक देश, एक धर्म तर एकच जात का नको?
□ राज कुंद्राने तयार केलेले व्हिडिओ पॉर्न नाहीत : पत्नी शिल्पा शेट्टी हिची धक्कादायक प्रतिक्रिया
■ आता ही प्रतिक्रिया कितीही धक्कादायक वाटली तरी न्यायालयातही हेच सिद्ध होऊन तो बाइज्जत बरी होईल, अशी दाट शक्यता आहेच.
□ अर्थव्यवस्थेसाठी १९९१पेक्षा कठीण काळ येणार आहे : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा इशारा
■ अर्थव्यवस्थेचं माहिती नाही, पण, सामान्य माणसांसाठी आधीच सगळ्यात कठीण काळ आलेला आहे. त्यातून देशाला बाहेर काढण्याची क्षमता असलेले कोणी सत्तास्थानावर दिसत नाहीत, हे अधिक मोठं दुर्दैव.
□ पत्रकार, सरकारचे टीकाकार आणि नागरी समुदायांवर हेरगिरी करणे गैर : अमेरिकेचे मत
■ याला म्हणतात सौ चूहे खाके बिल्ली चली हज. पण, त्यांच्याकडे अशा प्रकरणात सर्वोच्च सत्ताधीशाला पायउतार व्हावे लागले आहे, हेही विसरता कामा नये.
□ राजकीय क्षेत्रापेक्षा विद्यापीठांत अधिक राजकारण : नितीन गडकरी यांची खंत
■ ती खरी असेल तर आधी पुढाकार घेऊन अभाविप बरखास्त करून टाका.
□ केंद्राच्या कोळसा कंपनीकडून महाराष्ट्राला ज्यादा कर आकारणी
■ त्यांचं महाराष्ट्रावर प्रेमच तसं प्रगाढ आहे…
□ ‘देश प्रथम, नेहमीच प्रथम’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी घोषणा
■ लसीचं प्रमाणपत्र असो, पेट्रोल पंपांवरचे बोर्ड असोत की
ऑलिम्पिक यश मिळवणार्या क्रीडापटूचा सत्कार असो- सगळीकडे आपलीच छबी झळकवणार्या व्यक्तीच्या दृष्टीने ‘नेहमीच प्रथम’ काय असणार, ते देश जाणून आहे.
□ मतदारांना पैसे वाटणार्या तेलंगणाच्या खासदाराला तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा
■ पकडा गया वो चोर है… सगळे पकडले गेले असते तर संसदेपेक्षा तुरुंगातली सदस्यसंख्या ज्यादा भरली असती.
□ लडाखच्या दमचोक परिसरात चिन्यांचे पुनरागमन, नव्याने तंबू ठोकले, भारताची डोकेदुखी वाढली
■ अनायसे ढग आहेतच, विश्वगुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याआडून करून टाका सर्जिकल स्ट्राइक!
□ आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी नोटा छापण्याचा विचार नाही : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
■ काकू, नोटा हा शब्दही उच्चारू नका, सर्वसामान्य माणसाचा श्वास अडकतो आणि तुमच्याकडे ऑक्सिजन पुरवण्याचीही क्षमता नाहीये.
□ राष्ट्रीय व राज्य महामार्गांनजीक आता आणखी दारू दुकाने नकोत : भूपृष्ठ वाहतूक खात्याची सूचना
■ म्हणजे दारूसाठी वाढीव पेट्रोल जाळायला लावण्याची आयडिया!
□ नेहरूंच्या शांतिदूत धोरणांमुळे देशाचे नुकसान : राज्यपाल कोश्यारी
■ यांना(ही) लागली नेहरूंची उचकी!