‘इतिहास गवाह है की जब भी कोई नया साल आया है, साल भर से ज्यादा नहीं टिक पाया,’ असले भयानक मेसेजेस मिळाल्याने माझ्या नवीन वर्षाची सुरुवातदेखील ऐतिहासिकच झालेली आहे.
मागचे सहा दिवस हे मेसेजेस डिलीट करण्याचा एक नवीन उद्योग मागे लागलेला आहे. पुढच्या वर्षीसाठी एक संकल्प मी आताच करून ठेवला आहे. नवीन वर्षाचे मेसेजेस फक्त एक जानेवारीलाच स्वीकारले जातील, दोन जानेवारीपासून आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला जाणार नाही असे मेसेजेस ३१ डिसेंबरलाच सगळ्यांना पाठवण्याचा मी विचार केला आहे. तरीही सहा जानेवारीनंतरही जर हे मेसेजेस आले तर काय करायचं याचा विचार मी अजून केलेला नाही. मेसेजेस एवढे दिवस येणार असतील तर नवीन वर्षाची पार्टीदेखील तेवढे दिवस करावी लागणार, नाही का? शिवाय हे मेसेजेस दोन महिने चालू असतात, मग नंतर लगेच मराठी नवीन वर्ष, पंजाबी नवीन वर्ष, बंगाली नवीन वर्ष, कन्नड, तेलगू, असे करत अख्ख्या भारतभरातील नवीन वर्षे मार्च-एप्रिलमध्ये येतात. माझं नवीन वर्ष चांगलं जावं म्हणून किती भाषांतून मला प्रेरणा मिळत राहते. एवढी प्रेरणा आपल्याकडे साठवून काय करायचं म्हणून मी देखील ही प्रेरणा पुढे पाठवते.
नवीन वर्ष सुरू झालं म्हणजे संकल्प करावे लागतात, असं आमचा रद्दीवाला मला सांगत होता. झालं काय की दोन दिवसांपूर्वी मी रद्दी दिली. तेव्हा माझी मागच्या काही वर्षांची संकल्प डायरी त्यात सापडली. दरवर्षी नवीन संकल्प लिहिण्याचे कष्ट मला परवडत नाहीत. त्यामुळे आळशीपणा करायचा नाही असा लिहिलेला संकल्प मी फक्त वर्ष बदलून दरवर्षी तोच ठेवते. माझा नवीन वर्षाचा संकल्प या वर्षी डायरीत जातो आणि पुढच्याच वर्षी बाहेर येतो. रद्दीवाल्याने विचारले, ‘मॅडमजी, वो संकल्प डायरी नहीं है क्या?’
मला वाटलं, याला दुसर्याचा बघून संकल्प लिहून काढायचा आहे, तर म्हणाला, ‘नहीं नहीं, मुझे कोई संकल्प नहीं लिखना है, बल्कि ज्यादा से ज्यादा संकल्प डायरी रद्दी में जमा करने का संकल्प मैंने इस साल किया है.’
संकल्पाची एक मजा आहे. तो नेहमी स्वतःचा अवघड वाटतो आणि दुसर्याचा सोपा वाटतो. मी एक जानेवारीला हा विचार करतच बसलेले होते की कोणता संकल्प करावा. तो विचार करता करता मला झोप लागणारच होती, तर एका मैत्रिणीचा फोन आला. तिने मला संकल्प ठरला का असे विचारले. तिला मी सांगितले की माझा संकल्पच असा आहे की अशा लोकांपासून दूर राहायचे जे मला नवीन वर्षाचे संकल्प विचारतात. मला सांगा, संकल्प म्हणजे काय खायची गोष्ट आहे का, असं बसलं आणि ठरला. कोणते संकल्प थोर आहेत, लोकांना थोर वाटले पाहिजेत हे ठरवणं म्हणजे काय अर्थसंकल्प मांडण्याइतकं सोपं काम वाटलं की काय? त्याकरिता कित्येक वेळा झोप काढण्याचे कष्ट करावे लागतात, तासंतास काम सोडून विचार करावा लागतो. वेळप्रसंगी या विचारात एखादे ऑफिसचे काम राहिले तर बॉसची बोलणी खावी लागतात. या विचारानेच मला संकल्प बनवण्याचा हुरूप आला. आणि मग या वर्षी कुठल्याही कामात चालढकल करणार नाही असा संकल्प मी केला. हा संकल्प लिहून काढून माझ्या डेस्कवर लावावा असेही मनात आले, पण उद्या करूया म्हणून ठेवून दिले.
एका मित्राने नवीन वर्षानिमित्त मला एक लांबलचक मेसेज पाठवला. तुम्हाला जर संकल्प बनवण्यात काही मदत हवी असेल तर मी करू शकतो.
संकल्प अजून तयार नाही, निराश होऊ नका, हा मेसेज वाचा, असे लिहून खाली मोठा मेसेज होता. त्यात संकल्प कसा असावा, सोपा असावा की अवघड वगैरे वगैरे होतं. तुम्हाला जर काही वाईट सवयी असतील तर त्या संकल्प करून सुटू शकतात, असंही त्यात लिहिलं होतं. मी खाली ‘नॉट अॅप्लिकेबल’ असं लिहून पाठवलं. मला वाईट सवयी नाहीत, तू आधी लोकांना असले मेसेज पाठवण्याची वाईट सवय संकल्पाने सोडव असंही लिहिलं. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे एका मित्राने मला ब्लॉक करून टाकले.
नवीन वर्ष म्हटलं की त्याच त्याच विनोदांना ऊत येतो. आता मी झोपायला जाणार आणि एकदम पुढच्या वर्षी उठणार किंवा हा माझा तुला या वर्षातील शेवटचा मेसेज असं म्हणून काहीतरी पाठवतात. अशा लोकांना मागच्या वर्षीची संकल्प डायरी लपवून नवीन वर्षाचे १० संकल्प लिहून काढायची शिक्षा करायला हवी. काही लोकांना गतवर्षीचा आढावा घेण्याची हुक्की आलेली असते. पूर्णत्वास गेलेल्या गोष्टी, राहून गेलेल्या गोष्टी असे शीर्षक देऊन आपल्याला पाठवतात. अरे बाबा, मागच्या वर्षात तुला मुलं व्हायची होती, राहिली, ते संकल्पात कशाला आलं पाहिजे. ‘फॅमिली एक्स्पान्शन’ असा संकल्प करतात का कधी?
केलेल्या गोष्टी, वाचलेली पुस्तकं, पाहिलेले सिनेमे याची यादी देऊन दुसर्यांना न्यूनगंड देणारे तर मला अजिबातच आवडत नाहीत. घरचा अभ्यास करून वर्गात आल्या आल्या बाईंना तो तपासण्याची आठवण करणार्या हुशार मुलासारखे वाटतात.
नवीन वर्षाच्या एका ट्रेंडबद्दल मला हल्लीच समजलं आहे. संपूर्ण जानेवारी महिनाभर म्हणे नवीन वर्ष साजरं केलं तरी चालतं. साजरं करायचं म्हणजे काय, तर रंगीबेरंगी कपडे घालायचे आणि पार्टीत जाऊन नाचायचं. मुळात पार्टीला जाताना कुठले कपडे घालायला हवेत यावरच मला भरपूर प्रश्न आहेत. त्यामुळे एकदा एका पार्टीला मी चक्क साडी नेसून गेले तर परग्रहावरून आलेल्या व्यक्तीगत सगळे माझ्याकडे बघत होते. चिखलात घातलेल्या बुटासारखे काळे गमबूट, तोकडे टॉप्स, केसाला लावायचा बो हातात घालणे वगैरे पार्टीचे कपडे असतात असे मला एका मैत्रिणीने सांगितले. मी तसं सगळं करून गेले तर यावेळी स्टॅन्ड अप कॉमेडियन स्त्री बोलवली आहे का, असे सगळे विचारू लागले. आता बोला.
मुळातच पार्टी वगैरे गोष्टीपासून मी जरा दूर आहे. नाचणं हा तर माझा प्रांतच नाही. पतंग-मांजा, आणि कोळी डान्स याशिवाय कुठलेही नाच मला येत नाहीत. पण, ते नाच केल्यावर मला पार्टीतून बाहेर काढलं होतं. हा आपल्या देशातील लोकांवर शुद्ध अन्याय आहे. आता मी कितीही पाश्चिमात्य नाच केला तरी तो जर कोळी किंवा भांगडा डान्स वाटत असेल तर हा बघणार्याच्या नजरेचा दोष नाही का?
बरं पार्टीला जाऊ नये म्हटलं तर अत्यंत हेटाळणीच्या नजरेने सगळे बघतात. मी पार्टीला जाणार नाही म्हटल्यावर कदाचित पार्टीचे पास घ्यायला पैसे नसावेत म्हणून चार वर्षांपूर्वी ऑफिसमध्ये सगळ्यांनी माझ्या पाससाठी वर्गणी गोळा केली होती.
नवीन वर्ष सुरू होतं म्हणजे नक्की काय नवीन होतं हो? भ्रष्टाचार्यांना पैसे खाण्याची नवीन संधी उपलब्ध होते, नवीन वचने देण्यासाठी राजकारण्यांना अजून एक नवं कोरं वर्ष मिळतं. नवीन वर्ष साजरं केलं नाही तर आपण नव्या वर्षात जाणारच नसतो का? स्वर्गाच्या दाराशी चित्रगुप्त हिशेब मांडीत बसलेला असतो, तसा ३१ डिसेंबरच्या रात्रीचा पार्टीचा पास वाटतो. नो पार्टी, नो एंट्री इन न्यू इयर असेच वाटते. केवढा उन्माद, केवढी दारू, केवढी व्यसनं. सोसायटीमधील आजीसुद्धा मला विचारीत होत्या, ‘ काय केलंस ३१ ला रात्री?’ मी म्हटलं, झोपले. तर म्हणाल्या पार्टीला नाही गेलीस. नाही म्हणल्यावर विचारलं, मग मित्रांकडे गेली असशील. तेही नाही म्हणल्यावर विचारलं, मग हॉटेलात तरी जेवायला गेली होतीस की नाही? ‘नाही’ म्हटलं तर शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला, ‘तब्येत बरी नव्हती का म्हणजे?’
काय असतं नवीन वर्ष नक्की? देश कोणताही असला तरी सगळीकडचा माणूस आशावादी असतो. तो नेहमीच उद्यावर विसंबून असतो. नव्या कोर्या उद्यावर त्याच्या आशा, आकांक्षा अवलंबून असतात. नवीन वर्ष त्याला या आकांक्षा पूर्ण करण्याचं स्वप्न दाखवत असतं. नवीन काहीही मिळणार म्हटलं की माणूस उल्हसित होतो आणि या उल्हासातून जन्माला येते साजरीकरण. आणि इथे तर तास नाही, दिवस नाही तर अख्ख कोरं करकरीत नवीन वर्ष मिळणार आहे. मग, पार्टी, शुभेच्छा, संकल्प हे सगळं सगळं आलंच. निरंतर आहे ती उद्याची आशा.
तेव्हा तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.