भारतात सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारा व्यवसाय म्हणजे शेती आहे. आणि दुसरा म्हणजे बांधकाम क्षेत्र. बांधकाम क्षेत्र ज्या पद्धतीने वाढत आहे, त्या वेगाला तोड नाही. या क्षेत्राने अतिशय वेगात देशभर पाय पसरले आहेत आणि सर्वाधिक रोजगार निर्माण केला आहे. अगदी शेवटच्या थरातल्या मजुरापासून तर बांधकाम व्यवसायिकापर्यंत हे क्षेत्र रोजगार निर्माण करत आहे. वीस वर्षांपूर्वी जी गावे होती, तिथे आता उंचच उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. गाव आक्रसून गेली नी त्यांचे शहरांत, लहान शहरांत रूपांतर झाले. या प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली मध्यमवर्गीय जनता या नव्याने वसणार्या शहरांत येऊ लागली. दोन मजल्यांपासून पन्नास-साठ मजल्यांच्या इमारती उभ्या राहू लागल्या. वरवरच्या मजल्यांवर माणसे घरे घेऊ लागली. सातव्या आठव्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरांपर्यंत माणसे पोहोचणार कशी? तर लिफ्ट्स आल्या, या लिफ्टसनी लोकांना इमारतीच्या तळापासून वरपर्यंत जाण्याची सुविधा केली. या लिफ्ट्सना एलिव्हेटर्ससुद्धा म्हणतात. आपल्या मराठीत ‘उद्वाहन’ म्हणतात, बहुसंख्य सामान्य नागरिक मात्र लिफ्टच म्हणतात.
इमारतींचा अविभाज्य भाग म्हणजे या लिफ्ट्स. या लिफ्ट्स विकणे, बसवणे, दुरुस्त करण्याच्या कामाला मार्केटमध्ये मागणी आहे आणि हीच मागणी हेरून अमित पोवार आणि सचिन खुटाळ हे नवी मुंबईतील दोन मराठी तरुण २०१४ साली या लिफ्टच्या व्यवसायात उतरले. स्वत:चा ‘स्पार्क’ नावाचा ब्रँड त्यांनी उभा केला आहे. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या क्षेत्रांत विविध इमारतींमध्ये, इस्पितळांमध्ये लिफ्टची संपूर्ण यंत्रणा बसविण्याचे काम ते करत आहेत, शिवाय वर्षभराचे एएमसीही (अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट) ते घेतात. आज या दोघांनी या क्षेत्रात उत्तम जम बसवला असला, तरी हा प्रवास काही सोपा नव्हता, म्हणजे व्यवसायाला उत्कर्षाचा काळ आणणे सोपे नसतेच.
अमित आणि सचिन बॅचलर इन इंजीनियरिंगचे पदवीधर, दोघांनीही एकाच महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. अमित यांनी जशी अभियांत्रिकीची पदवी मिळवली तशी ते ‘थायसन क्रुप’ या लिफ्ट मॅन्युफॅक्चरिंग करणार्या एमएनसी असलेल्या कंपनीत कामाला लागले. तिथे जात्याच हुशार असलेल्या अमित यांनी ठसा उमटवला. सुरुवातीला ट्रेनी म्हणून लागलेल्या अमित यांनी पुढे त्या कंपनीत टेक्निकल ट्रबल शूटर, सुपरवायझर, सेल्स एक्झिक्युटिव्ह अशा विविध जबाबदार्या नोकरीच्या चार वर्षांत पार पाडल्या. सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असल्यामुळे कंपनीने अमित यांचे विक्रीकौशल्य वाढावे म्हणून वेळोवेळी प्रशिक्षण दिले. त्यांना कंपनीच्या लिफ्ट्स विकण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपले उत्पादन वा सेवा यशस्वीपणे विकता आली पाहिजे, ते जमले तरच व्यवसाय टिकून राहू शकतो, वाढू शकतो. अन्यथा काही महिन्यांतच गाशा गुंडाळावा लागतो.
अमित यांनी ‘थायसन क्रुप’ कंपनीसाठी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्यामुळे त्यांना या क्षेत्रातील बर्याच गोष्टी समजून घेता आल्या. याचे मार्वेâट लक्षात आले. आपणसुद्धा अशी स्वत:ची कंपनी बनवली पाहिजे, असे त्यांना वाटू लागले आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. कंपनीचा राजीनामा देत नव्या व्यवसायिक आयुष्याला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. अमित हे निम्नवर्गीय कुटुंबातून आले होते. त्यांचे वडील मारुती पोवार ‘ओटीस’ या लिफ्ट बनवणार्या कंपनीमध्येच नोकरी करत होते. त्यांनी उभी हयात या लिफ्टच्या व्यवसायात घालवली होती. नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. प्रॉव्हिडंट फंडाचे जे काही पैसे मिळाले होते, त्यांपैकी चार लाख रुपये परतफेड करण्याच्या अटीवर कर्जाऊ घेतले. सचिन या भागीदारासोबत व्यवसायाचे शिवधनुष्य पेलायचे ठरवले होते आणि अमित यांच्या वडिलांनी त्यांना सक्रीय पाठिंबासुद्धा दिला होता.
व्यवसाय सुरू करणे, त्या निर्णयाप्रत पोहोचणे खूप मोठी बाब असते. अनेकजण व्यवसाय सुरू करण्याचाही निर्णय घेऊ शकत नाहीत. मध्येच घुटमळत राहतात, वेळ दवडतात. अनेकांना पाठिंबा देणारे कुटुंबसुद्धा मिळत नाही, स्वत:च्या जिवावर व्यवसाय करायचा म्हटला की त्या तरुण व्यावसायिकाकडे पुरेसे भांडवलसुद्धा नसते. मात्र अमित सुदैवी ठरले. त्यांना वडिलांबरोबरच आई कल्पना पोवार यांचा कायम सक्रीय आणि मानसिक आधार राहिला आहे.
‘स्पार्क एलिव्हेटर्स’चे काम करताना अमित पोवार मार्केटमधून काम आणणार आणि सचिन खुटाळ ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी पार पडणार अशी विभागणी झाली. त्यामुळे संभाव्य ग्राहकांना शोधणे, त्यांना भेटणे, त्यांची गरज समजून घेणे आणि व्यवहार पूर्ण करून सचिन खुटाळ यांच्याकडे कामाचा अंमल करण्यासाठी काम सोपवणे ही जबाबदारी अमित पोवार यांना पार पाडावी लागे.
सचिन आपली टीम कामाला लावून देत आणि त्यांच्याकडून काम करवून घेत. ग्राहकाला आवडेल असे काम करण्याकडे, ते काम सफाईने पार पडले पाहिजे, याकडे त्यांचा कल असे.
कोणत्याही व्यवसायासाठी पहिला ग्राहक फार महत्त्वाचा असतो. तो मिळवण्यासाठी बर्याच लहान मोठ्या कंपन्या जंगजंग पछाडतात. चातकासारखी वाट पाहतात. एकदा पहिला ग्राहक आला की पुढे सारे जुळून येण्याच्या शक्यता वाढतात. अमित पोवार यांच्या कंपनीलाही पहिला क्लायंट मिळेपर्यंत त्रास झालाच, मात्र या व्यवसायाची एका सरकारी कार्यालयातून मुहूर्तमेढ रोवली गेली. सायन सर्कल येथे असलेल्या कल्पतरू कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे कार्यालय आहे. या कार्यालयाकडून इमारतीला लिफ्ट बसवण्याचे काम अमित यांना मिळाले. हे काम व्यवस्थित पार पाडल्यामुळे त्यांना आत्मविश्वास आला, जो नवख्या व्यवसायिकाला अत्यंत महत्त्वाचा असतो.
त्यानंतर लगेच फार ग्राहक मिळाले असे घडले नाही. अमित यांनी २०१४ साली संभाव्य ग्राहकांना आपल्या व्यवसायाबद्दल माहितीपर मेसेज पाठवण्याला सुरुवात केली. पंधरा दिवसांतून दोनशे अडीचशे जणांना ते असे मेसेज पाठवत असत. तेव्हा इंटरनेट, डेटा, अँड्रॉईड आजच्याइतके जोरावर नव्हते. मात्र हळूहळू त्या मेसेजेसना प्रतिसाद येऊ लागला. ग्राहकांशी मीटिंग ठरू लागल्या. एकेक काम मिळू लागले. इमारतीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांना कुणाच्या तरी ओळखीने भेटणे, त्यांच्याशी लिफ्ट इन्स्टॉलेशन, मेंटेनन्सबद्दल संवाद साधणे असा दिनक्रम सुरू झाला. घेतलेले काम वेळेत पार पाडणे, ग्राहकाला तक्रारीची संधी न देणे अशा कामाच्या पद्धतीमुळे ग्राहक येऊ लागले. हौसिंग कॉम्प्लेक्स, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, इंडस्ट्रीयल कंपनीज, हॉस्पिटल्स, प्रीमियम बंगलोज यांसाठी लिफ्ट विकणे, बसवणे, वर्षभर त्याच्या देखभालीचे काम पाहणे असे काम सुरू झाले. अवघ्या काही वर्षांतच स्पार्क एलिव्हेटर्स हा ब्रँड उदयाला आला. लोकांचा विश्वास यांनी मिळवला.
जशी थायसेन क्रुप, ओटिस, शिंडलर्स या मल्टिनॅशनल लिफ्ट कंपन्या आहेत, तशीच स्पार्क एलिव्हेटर्स ही कंपनी आहे, जी सध्या या कंपन्यांसारखी जगभर काम करत नसेल, मात्र स्वत:च्या कंपनीच्या लिफ्ट्स विकणे ही मोठी गोष्ट आहे, जे अमित आणि सचिन या दोन तरुणांनी आपल्या टीमच्या मदतीने करून दाखवले आहे.
स्पार्क एलिव्हेटर्स आपली लफ्टि अंध व्यक्तींना वापरण्यासाठी सोयीची जावी म्हणून त्यामध्ये ब्रेल लिपीची बटणे देतात, बटण दाबले की कोणते बटण दाबले तो आवाज येतो, जसे दोन आकडा असलेले बटण दाबले की त्यामधून २ किंवा टू असा आवाज येतो, याला व्हॉईस अॅबनोसिएटर सिस्टीम म्हणतात, जी अंध व्यक्तींना लिफ्टमधून प्रवास करताना मदत करू शकते. अशा बारीकसारीक बाबींचा अभ्यास करून आपले उत्पादन अधिकाधिक लोकांना उपयोगी कसे होईल, याबाबत अमित आणि सचिन सजग असतात.
व्यवसायाला मानवतेचा स्पर्श देणे, संवेदनशील असणे उपयोगाचे ठरते. बरेचदा हौसिंग सोसायटीचे पदाधिकारी, ग्राहक लिफ्टची किंमत वाढू नये म्हणून ब्रेल लिपीची बटणे, व्हॉईस अॅ्नोसिएटर सिस्टीम बसवण्यासाठी नकार देतात. तेव्हा अमित कंपनीच्या खर्चाने ते बसवून देतात. वृद्ध, वयस्कर माणसांसाठी हॅण्ड रेल्स बसवून दिले जातात. शक्य होईल तितका सर्व समाजघटकाचा उत्पादन बनवताना स्पार्क एलिव्हेटर्स विचार करते.
ही कंपनी कॅपसुल लिफ्ट्स वा पॅनारोमिक लिफ्ट्स, पॅसेंजर लिफ्ट्स, सर्व्हिस लिफ्ट्स बनवते. विविध कंपन्यांच्या मालाची ने आण करण्यासाठी गुड्स लिफ्ट्स सुद्धा बनवते. रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी मुंबई येथे अमित आणि सचिन यांनीच लिफ्ट बसवली आहे. ही त्यांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी आहे.
अमित यांनी भागीदार आणि टीम यांना सोबत घेऊन उत्तम व्यवसाय उभा केला आहे. आज मोठमोठ्या एमएनसी कंपन्या स्पर्धक असतानाही स्वत:चा ग्राहकवर्ग तयार केला आहे. ते म्हणतात, उत्तम दर्जाची लिफ्ट बनवणे, करारानुसार वर्षभर सेवा पुरवणे, ग्राहकांच्या संपर्कात राहणे, त्यांच्या अडीअडचणीला तातडीने मदत करणे हे त्यांच्या यशाचे गमक आहे. रोहा एमआयडीसी, रायगड, डोंबिवली एमआयडीसी येथील अनेक कंपन्यांमध्ये स्पार्कने लिफ्ट्स बसवल्या आहेत. तसेच अनेक श्रीमंत लोकांच्या बंगल्यांमध्ये त्यांनी कॅप्सुल लिफ्ट्स बसवल्या आहेत. मार्केटमध्ये काम भरपूर आहे, आणि जबाबदारीने ते करणारे लोक तितके नाहीत. जबाबदारीने काम केले की संतुष्ट ग्राहकच आपले नाव इतर ग्राहकांना सुचवतो, हा अनुभव आम्ही गेल्या नऊ वर्षांत घेतला आहे, असे सचिन खुटाळ सांगतात.
अमित यांना पुस्तकांचे वाचन करण्याचा छंद आहे. व्यवसायाशी, व्यवसायिकांशी संबंधित, त्यांच्या जीवनप्रवासाची माहिती देणारी पुस्तके वाचण्यात रस असल्याने या छंदाचाही पुरेपूर उपयोग व्यवसायात करून घेता येतो, असे ते सांगतात. सेल्स आणि मार्वेâटिंगची पुस्तके वाचल्यामुळे ग्राहक कसे मिळवायचे, मिळालेले ग्राहक कसे टिकवायचे याचे ज्ञान अमित यांना झाले आहे, हेच ज्ञान ते त्यांच्या टीममध्ये रुजवण्यासाठी प्रयत्नशील असतात.
आज अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांसाठी स्पार्क एलिव्हेटर्स काम करत आहे. कुठलाही व्यवसाय करण्यासाठी अपार कष्टाची गरज असते, जी या दोन पार्टनर्सनी घेतली. अमित यांच्या पत्नी नेहा या कंपनीत सक्रीय सहभागी नसल्या तरी त्या अमित यांच्या प्रत्येक व्यवसायिक निर्णयात साथ देतात. कुटुंबाचा पाठिंबा असला की व्यवसायातील बाकीच्या गोष्टी जुळवून आणणे शक्य होते, जे अमित यांनी करून दाखवले आहे.