अशी आहे ग्रहस्थिती
राहू – हर्षल (वक्री) मेष राशीत, मंगळ (वक्री)- वृषभेत, केतु- तुळेत, रवि- शुक्र वृश्चिकेत, बुध- धनुत, शनि- प्लूटो मकरेत, नेपच्युन- कुंभेत, गुरु- मीन राशीत, चंद्र मेषेत, सप्तहाच्या मध्यास वृषभेत आणि अखेरीस मिथुनेत. दिनविशेष – ७ डिसेंबर रोजी दत्तजयंती, ११ डिसेंबर रोजी संकष्ट चतुर्थी.
मेष – येत्या आठवड्याच्या सुरवातीचे दोन दिवस जरा सांभाळून राहा. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कुटुंबातील मंडळी, व्यवसायातील भागीदार, यांबरोबरच आपल्या सानिध्यात येणार्या मंडळींशी संवाद साधताना काळजी घ्या म्हणजे झाले. चुकून एखादा गैरसमज निर्माण होऊन एखादी वेगळी घटना घडू शकते. वादाचे प्रसंग घडू शकतात. राहू-हर्षल वाचास्थानात, मंगळ वक्री, त्यामुळे ही स्थिती निर्माण होऊ शकते. बंधू वर्गाबरोबर जमवून घ्यावे लागेल. लेखक, पत्रकार या मंडळींसाठी येणारा काळ चांगला राहणार आहे. दशम स्थानातील ग्रहस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमधून अलगदपणे बाहेर पडाल. कोणतेही काम करताना अति आत्मविश्वास टाळाच. सरकारी कामात चांगले यश मिळताना दिसेल.
वृषभ – आगामी काळात चांगले धन प्राप्तीचे योग आहेत. वारसाहक्क, सट्टा या माध्यमातून चांगला पैसा मिळू शकतो. बेकायदा व्यवहारापासून दूर राहा. काही मंडळींना जिभेचा त्रास होऊ शकतो. मंगळाची अष्टमदृष्टी, बुधावर त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामध्ये अर्धशिशी, मेंदूचे विकार याचा त्रास होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसायाच्या संधी चालून येतील. त्याचा चांगला लाभ घ्या. अचूक निर्णय फायद्याचे राहणार आहेत. आर्थिक बाजू भक्कम रहाणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळवून देणारा काळ रहाणार आहे. फक्त परिश्रम घ्यावे लागतील हे लक्षात ठेवा. सरकारी कामे होतील.
मिथुन – आपली मित्रमंडळी, जवळच्या व्यक्ती, नातेवाईक यांच्यासाठी खूप धावपळ करावी लागणार आहे. स्वतंत्रपणे व्यवसाय करणार्या मंडळींना व्यवसायात चांगली वृद्धी झालेली दिसेल. हातात पैसे खेळते राहातील, पण त्याचा वापर करताना जरा जपूनच करा. पत्नीकडून चांगला लाभ मिळेल. दूरचा प्रवास करणार असाल तर प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात डोकेदुखीचा त्रास उद्भवेल. कोणी काही काळासाठी पैसे मागितले तर स्पष्ट शब्दात नकार द्या. अन्यथा पैसे बुडीत खात्यात गेले म्हणून समजा. आपली गरज पाहून पैसे खर्च करा.
कर्क – आठवड्याची सुरुवात निराशाजनक राहील, थोडीशी चिंता वाढवणारी स्थिती रहाणार आहे. केवळ दोन दिवस मानसिक अस्थिरता राहील. चंद्राचे वृषभेतील राश्यांतरामुळे चिंताग्रस्त स्थिती निवळेल. चंद्र मंगळाबरोबर लाभात. धनेश, पंचमेश आणि लाभेश रवि-शुक्र-मंगळ आणि चंद्र दृष्टियोग. त्यामुळे काही मंडळींची आठवडाभर चांदी होणार आहे. अनपेक्षितपणे लक्ष्मीप्राप्ती होईल. फलप्राप्तीसाठी उत्तम आठवडा राहणार आहे. धार्मिक कार्यात सहभागी होताल. संततीसाठी उत्तम आठवडा राहणार आहे. शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल. मैदानी स्पर्धेत खेळाडूंना यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी बदल होईल, बदली होण्याची शक्यता आहे.
सिंह – आगामी काळात तुम्हाला सकारात्मक रिझल्ट मिळताना दिसतील. प्रॉपर्टी, जमीन तसेच वैद्यकीय व्यवसायात चांगले यश मिळेल. कलाकार मंडळींना उत्तम काळ राहणार आहे. आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर मुलांना शालेय स्पर्धेत चांगले यश मिळताना दिसेल. महिलांनी विशेष करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. दशम भावात असणार्या वक्री मंगळामुळे सरकारी नोकरी करणार्या मंडळींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. एखादी नवीन गुंतवणूक होईल.
कन्या – सर्वच क्षेत्रात यश मिळवून देणारा काळ राहाणार आहे. त्यामुळे समाधान राहील. विवाह जमण्यासाठी उत्तम काळ राहणार आहे. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडून चांगले सहकार्य मिळेल. बुध चतुर्थ भावात असल्यामुळे लेखकांसाठी उत्तम काळ राहणार आहे. व्यापारात वृद्धी होईल. वक्री मंगळाच्या दृष्टीमुळे आपल्या महत्वाच्या कामात निर्णय घेताना वैचारिक गोंधळ होणार नाही याची दक्षता घ्या. बंधू वर्गाकडून सहकार्य मिळेल. आर्थिक बाजू कमकुवत राहील. त्यामुळे चिडचिड होईल. जुनी वसुली येणे लांबणीवर पडेल. गुरुकृपेमुळे कामाचा गाडा चालत राहील, त्याचे समाधान मिळेल. आठवड्याची मेहनत चांगला लाभ मिळवून देईल.
तूळ – शनि आणि गुरुची मार्गी स्थिती त्यामुळे व्यवसायाची गती वाढलेली दिसेल. बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे मदत करणारे हात समोर उभे राहातील. बुधाच्या राश्यांतरामुळे कला, साहित्यप्रेमी, विनोदी लेखन करणारी मंडळी यांच्यासाठी चांगला काळ राहणार आहे. आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर शुभ परिणाम अनुभवयास मिळतील. एखाद्या क्षेत्रात प्राविण्य मिळवाल. काही मंडळींना आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. काही मंडळींना कानाचा त्रास होईल, त्यामुळे काळजी घ्या.
वृश्चिक – नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी यांच्याकडून चांगले सहकार्य मिळणार आहे. अडकून राहिलेली कामे झटपट मार्गी लागलेली दिसतील. विवाहेच्छुक मंडळींचे लग्न ठरेल. गुरु-शुक्र नवपंचम योग त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. नावलौकिकात भर पडेल. राजकीय क्षेत्रात काम करणार्या मंडळींना चांगली प्रसिद्धी मिळालेली दिसेल. संततीला शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल. त्यांनी केलेल्या कार्याला विशेष दाद मिळेल. मंगळ-शुक्र राशी परिवर्तन योग त्यामुळे दाम्पत्य जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायास मिळतील. त्याचा उपभोग घ्या. शनि-मंगळ नवपंचमयोगामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणार्या मंडळींना हा काळ धावपळीचा व संघर्षाचा राहील. त्यामधून यश मिळेल.
धनु – सुखाची पर्वणी घेऊन येणारा काळ रहाणार आहे. अनेक दिवसांपासून नव्या वास्तूची खरेदी मार्गी लागताना दिसेल. नवीन वाहनाच्या खरेदीचे योग जुळून येतील. जिवलग मित्रांच्या गाठीभेटी होतील. स्थावर मिळकतीचे प्रश्न मार्गी लागताना दिसतील. पाच आणि सहा तारखा संततीच्या बाबत असमाधानी स्थिती रहाणार आहे. नोकरी करणार्या मंडळींसाठी येणारा काळ उत्तम राहणार आहे. १५ डिसेंबरच्या आसपास प्रवासाचे बेत आखाल. दाम्पत्य जीवनात आनंदाचे वातावरण रहाणार आहे. अनपेक्षित लाभाचे प्रमाण वाढलेले दिसेल.
मकर – अनेक दिवसांपासून मोठ्या व्यवसायाच्या विचारात असाल तर ते आता मार्गी लागताना दिसतील. एखादी मोठी गुंतवणूक होईल, त्यामधून चांगले आर्थिक लाभ मिळताना दिसतील. सरकारी कामे पुरी होताना दिसतील. लेखापरीक्षण करणार्या मंडळींना उत्तम काळ राहणार आहे. नवीन नोकरीची संधी चालून येऊ शकते. नोकरीच्या निमित्ताने देशांतर्गत प्रवास करावा लागेल. एखादी धार्मिक सहल घडू शकते. कुठे प्रेमप्रकरण सुरु असेल तर ते धागे अधिक घट्ट होताना दिसतील.
कुंभ – उद्योग व्यवसायात भक्कम स्थिती रहाणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होताना दिसेल. अडकलेले पैसे हातात पडतील, त्यामुळे खिशात चांगले पैसे राहतील. वक्री मंगळामुळे घरातील आर्थिक स्थितीत बदल घडून ती बिघडू शकते. दशमातील रवीमुळे सामाजिक क्षेत्रातील आपली पत वाढलेली दिसेल. भागीदार-स्पर्धक यांच्याकडून त्रास होईल. कोर्ट-कचेरीचे निर्णय लांबणीवर पडतील. सट्टा-जुगार यापासून लांब राहा. खेळाडूंना अपयश मिळेल.
मीन – तुम्ही सर्वच बाबतीत आघाडीवर राहताना दिसाल. घरात शुभकार्ये होतील नातेवाईक, मित्रमंडळीच्या गाठीभेटी होतील. साहित्यिक, प्रकाशक यांना चांगला काळ रहाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नवे अधिकार मिळतील. पगारवाढीचा विषय मार्गी लागेल. शनिमुळे अनपेक्षित लाभ पदरात पडेल. वक्री मंगळामुळे कामाचा उत्साह वाढलेला दिसेल. आपला जोश वाढेल, त्यामुळे हातून दोन नवीन कामे होतील. मौजमजेसाठी पैसे खर्च होतील, पण ते जरा जपूनच खर्च करा म्हणजे झाले.