माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या त्या दिवशी सकाळी आला तो काहीतरी नवीन बातमी सांगण्याच्या उद्देश्याने हे त्याच्या एकंदर देहबोलीवरून जाणवत होतं. त्याने आल्याआल्याच राज्यपाल कोश्यारी यांचं नाव घेताच मी त्याला हात जोडून सांगितलं, तो विषय सोडून कोणत्याही विषयावर बोल. तो म्हणाला, ऐकून तर घे. मी म्हटलं, कसंही झालं तरी त्या माणसापेक्षा राज्यपालपद मोठं आहे. त्या पदाचा अपमान होईल, असं काहीही मला ऐकवू नकोस. त्यावर तो म्हणाला, मी राज्यपालपद आणि तो माणूस पहिल्यापासूनच वेगळा मानत आलो आहे. आता नको त्या माणसांच्या गळ्यात नको ती पदं अडकवली मग दुसरं काय होणार! मागे सहा महिन्यांपूर्वी मी एकदा असाच भटकत राजभवनच्या कडेकडेने चाललो होतो. त्यावेळी ते आतल्या हिरवळीवर बागडणार्या मोरांच्या मागे त्यांना एका थाळीतून शेंगदाणे घालत फिरत होते आणि स्वत:ही खात होते. त्याचवेळी त्या मोरांशी ते गप्पाही मारत होते. म्हणजे त्या गप्पाही एकतर्फीच होत्या. मला त्यातलं एक अक्षरही कळत नव्हतं.
तरीही, तुमचं बाबांनो बरंय. तुम्हाला कपडे घालायचा त्रास नाही. तुम्ही प्राणी-पक्षी उघडे फिरलात तरी तुम्हाला कोणी काही बोलत नाही. उलट मनुष्य प्राण्याला कपड्यांचा खर्च असतो. माझंच बघा ना. मला रोज नवीन धोतर लागतं. त्यात कुठे दौर्यावर जायचं असलं तर पंचवीस-एक धोतरजोड्या घेऊन जावं लागतं. तरी अजून बरंय की जीन पँटसारखी धोतरांना भोकं पाडून म्हणजे कात्रीने नक्षीकाम करून ती नेसण्याची फॅशन आलेली नाही… आता त्या मोरांना यातलं काय कळणार! पण मला थोडं थोडं समजलं तसं मी नकळत मोठ्यानं बोललो, करेक्ट… त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला बोलले, आत ये. आज पहिल्यांदा माझ्या विचारांशी विचार जुळणारा माणूस भेटला. मला त्यांनी सिक्युरिटीला सांगून आपला दोस्त आहे अशी थाप मारून आत घेतलं. आम्ही दोघे हिरवळीवर बसलो. मला म्हणाले, काय घेणार? मी म्हणालो, शेंगदाणे चालतील… तसे त्यांनी खारे शेंगदाणे, गोडे शेंगदाणे, बारीक शेंगदाणे अशा शेंगदाण्याच्या व्हरायटीचे डबेच मागवले. म्हणाले, आत काम नसतं तेव्हा हे सात प्रकारचे शेंगदाणे खाऊन मी ‘धुमधडाका’ चित्रपटातली गाणी ऐकत असतो. मला तो तुमचा एकच मराठी चित्रपट त्याच्या नावामुळे आवडतो. त्यातील गाणीही आवडतात. त्याशिवाय युद्धपट पाहातो. त्यातील बॉम्बवर्षाव आणि गोळीबाराचे तोफांचे आवाज ऐकले की माझ्या अंगावर रोमांच येतात. वाटतं, आपणही युद्धावर जावं आणि पराक्रम करावा. पण हे धोतर आड येतं. लहानपणापासून माझी सैनिक होण्याची इच्छा होती. पण नाही जमलं. मग शेंगदाणे खाण्याचा छंद जडला. तो मात्र आजपर्यंत कायम आहे.
माझ्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला मी शेंगदाणे भेट म्हणून देतो. त्यात मोठी पॉवर असते. तूही खा. आता मी राज्यपाल म्हणून बोलत नाही, तर तुझ्यासारखा एक साधा माणूस म्हणून बोलतोय. मला कसलीच पदं आवडत नाहीत. आता वरून गळ्यात मारलंय म्हणून निस्तरतोय. मी लढावू माणूस आहे. फक्त सही करण्यापुरता नाही. माझे स्वत:चे काही विचार आहेत, मतं आहेत. तुझ्यासारखी मला दाद देणारी माणसं भेटतात तेव्हा मी त्यांचा मित्र बनतो. माझ्या मनातलं सर्व काही त्यांना सांगतो. आता तुला म्हणून सांगतो, माझ्या हातात हा देश दिला असता ना तर मी त्याचा इतिहास, भूगोल काय, सर्व चेहरामोहराच बदलून टाकला असता. तुमचे ते केशवसूत की कोण काय म्हणतात ते जुने आहे. ते विसरा… ऐकलंय मी कुठेतरी… मी ताबडतोब उद्गारलो, ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका…’ बस… बस… मीसुद्धा तेच म्हणतो. जुनं सगळं विसरा. युगपुरुष एकच असतो आणि तो युगायुगातून एकदाच जन्माला येतो. जसे आपले मोदी. म्हणून तर त्यांनी माझी अफाट बुद्धिमत्ता लक्षात घेऊन राज्यपाल पदासाठी माझी शिफारस केली. आज माझ्यासारखे अनेक आदर्श भाजपासारख्या पक्षात आहेत म्हणूनच देश इतका पुढे चाललाय. कितीजणांची नावं घेऊ.
महाराष्ट्रात आल्यापासून तर मला भाजपाचा एकेक नेता म्हणजे मोदींच्या आदर्शाचा एकेक तुकडा वाटतो. ते नेहमी तोंडाची बडबड आणि पंखांची फडफड करणारे फडणवीस, ते बावन्न की त्रेपन्नकुळे, ते जीभेची तलवार चालवणारे शेलारजी, ते घोड्यावरून डायरेक्ट कोल्हापुरातून पुण्यात झेप घेणारे चंद्रकांत दादा, ते जळगावचे मल्लकेसरी महाजन, ते तोंडाने घंटीचा आवाज काढणारे नकलाकार मुनगंटीवार, त्याशिवाय गल्लीकुचीत दडून बसलेले असंख्य मोदी-भक्तजन म्हणजे महाराष्ट्राचा चालू इतिहास आहे. इतिहासाला भूतकाळ नसतो. भविष्यकाळ असतो. आज दिल्लीतही बघा, रस्त्यांचा इतिहास बदलणारे गडकरी आहेत, अर्थशास्त्राला स्वत:च्या अफाट बुद्धिमत्तेचे होकायंत्र लावणार्या निर्मला सीतारामन आहेत, पक्षाच्या हितासाठी कटकारस्थाने करून विरोधी सरकारे पाडण्यासाठी नेहमीच सज्ज असलेले वजनदार व्यक्तिमत्वाचे अमित शहा आहेत, चीन-पाकिस्तानला केवळ भरीव बांबूच्या धमक्या देऊन जीव मुठीत धरायला लावणारे राजनाथ सिंह आहेत अशी कितीतरी नावं भारताचा इतिहास बदलण्यासाठी आतूर झाली आहेत. त्यांचा आदर आपण करणार आहोत की नाही, हा माझा सवाल आहे.
उद्या मी राज्यपाल असेन किंवा नसेन, पण महाराष्ट्राचाच काय सार्या देशाचा नवा इतिहास लिहिला जाईल. देशात जागोजागी कमळांची सरोवरे निर्माण करण्यात येतील. त्यापासून भावी पिढ्यांना स्फूर्ती मिळेल. इतिहास, भूगोलाची पुस्तके रद्द करण्यात येतील. ते विषय अभ्यासातून काढून टाकण्यात येतील. त्याऐवजी भविष्यकाळ, गुगल हे विषय असतील. माझ्या अंदाजानुसार भारतातील सर्व राज्ये आणि त्यांच्या सीमा धुसर करण्यात येतील. कोणताही विशिष्ट प्रांत त्यांच्या नावाने ओळखला जाणार नाही. प्रत्येक राज्याला ए, बी, सी, डी, इ, एफ, जी… अशी नावे दिली जातील. प्रत्येक नावापुढे संघ हा शब्द जोडला जाईल. हे ऐकल्यावर माझी सटकली. मी म्हणालो, ही संघीय एकात्मता झाली. तुम्ही प्रत्येक राज्याची अस्मिता पुसून टाकताय. त्यावर कोश्यारी म्हणाले, जिला तुम्ही राष्ट्रीय एकात्मता म्हणता ना ती हीच. त्याशिवाय देशात एक शिस्त यावी म्हणून पुरुषांना खाकी पँट किंवा खाकी धोतर व सफेद सदरा व काळी टोपी घालावीच लागेल. प्रत्येकाच्या हातात नेहमीच स्वसंरक्षणासाठी लाठी किंवा काठी असेल. सर्व स्त्रियांना, मुलींना कंपल्सरी नऊवारी नेसावीच लागेल. त्याशिवाय कपाळाला टिकली लावावीच लागेल. छोट्या टिकलीतही मोठी संस्कृती दडलेली आहे. सुरुवातीला हे सारं कठीण वाटेल, पण नंतर सवय होईल. घे, शेंगदाणे घे…
अखेर मी तिथून सटकलो. आता अलीकडे त्यांच्याबाबत ती घटना घडल्यावर मला आमची ऐतिहासिक भेट आठवली आणि आठवणी ताज्या झाल्या.