राजेश म्हणतोय तसं खरंच चारेक खून झाले असतील तर मयतांची नावं, त्यांची वयं, त्यांचं बॅकग्राऊंड, स्पॉटवर उपस्थित असलेल्या पोलिसांशी बोलून हत्याकांडामागचं सकृतदर्शनी काही कारण दिसतंय का, शेजार्यापाजार्यांशी बोलून त्यांना कुणी संशयीत परिसरात दिसला का अशी सगळी माहिती मिळवणं गरजेचं होतं. राजेश सोबत असल्यानं फोटोंशिवाय यातली काही कामं त्याच्यावरही सोपवता येणार होती.
– – –
१.
‘हॅलो, पोलीस कंट्रोल का?’
‘हो शंभर नंबर…’
‘अं…आं…..’
‘अरे बोला की पुढं…’
‘अहो इकडं लवकर पाठवा कुणालातरी.’
‘कुठं पाठवा? काय झालंय?’
‘साहेब सदाशिव पेठेत दरोडा पडलाय खूप मोठा.’
‘सदाशिव पेठेत… हट काय पण थापा मारू नको… तू जे काय सांगतो ते खोटं निघालं ना तर तिथं येऊन बुटानं मारीन हा सांगून ठेवतोय. शंभर नंबरला खोटा फोन फिरवणं गुन्हाय कायद्यानं. कळलं का?’
‘अहो साहेब मी खरं बोलतोय… आमच्या शेजारच्या बंगल्यात…खून झाल्यासारखा वाटतोय…’
‘खून??’ आता मात्र भांबुर्डे जरा सावध झाले.
‘काय झालंय मला नीट सांग आणि तुला कसं कळलं?’
‘आमच्या शेजारच्या नेनेंच्या बंगल्याचं गेट सताड उघडं होतं. मी ते लावायला गेलो तर धोधो पावसातही घराचं मुख्य दारही उघडं दिसलं मला.’
‘अरे पण मग त्या नेनेंच्या घरातल्यांपैकी कुणाला आवाज दिला का तुम्ही?’
‘हो साहेब. घराची बेल दाबली पण कुणी आलं नाही. डोकावून पाहिलं तर सामानही अस्ताव्यस्त दिसलं. म्हणून बंगल्याच्या मागच्या बाजूला जाऊन खिडकीतून हाका मारायला लागलो तर नेने बाईंना…त्यांना मारलेलं दिसतंय कुणी..’
‘मला एक्झॅक्ट लोकेशन सांगा.’
‘पाराशर बंगला, विजय कॉलनी, खजिना विहिरीजवळ.’
‘ठीके. मी लगेच पाठवतो कुणालातरी.’
भांबुर्डेंचा फोनवर बोलता बोलता मधेच एकदम बदललेला सूर आणि गंभीर झालेला चेहरा बघून बड़े म्हणाले, ‘काय झालं भांबुर्डे? काही वाढीव आहे का?’
‘हा ना, असं वाटतंय च्यायला. पण सदाशिव पेठेत असलं काय होईल यावर माझा तरी काय विश्वास बसना अजून.’
‘अरे पण काय झालंय काय नेमकं?’
‘सांगतो. त्याआधी मला पटकन सांगा, सदाशिव पेठेतला खजिना विहीर एरिया कुणाच्या हद्दीत येईल? विश्रामबागच्या की खडक पोलीस स्टेशनच्या?’
‘अरे तो एरिया तर खडकच्या हद्दीत येतो.’
‘हा परफेक्ट.’ असं म्हणत भांबुर्डेंनी फोन फिरवला.
‘नमस्कार खडक पोलीस स्टेशन. हेड कॉन्स्टेबल दुबे बोलून राहिलो.’
‘नमस्कार दुबे, पीएसआय भांबुर्डे बोलतोय कंट्रोलमधनं.’
‘हा साहेब बोला. काय खबरबात?’
‘मला आत्ता सदाशिव पेठेतून फोन आलता एका दरोड्याची माहिती द्यायला. एक खूनही झाला म्हणत होता स्पॉटवर.’
‘काय? कुठं सदाशिव पेठेत? शंभर टक्के प्रँक कॉल असणार साहेब. अहो गेल्या सहा महिन्यांत काय कमी फोन आलेत होय आपल्याला असले थापा मारणारे. आयला ते गल्लोगल्ली काळे कॉइनबॉक्स सुरू झाल्यापासून तर असल्या भुरट्या कॉलर्सचा ताप लयच वाढलाय.’
‘नाय दुबे मला बी तसंच वाटलेलं स्टार्टिंगला. म्हणून तर त्याला चांगला हाग्या दम भरला. पण हा खोटा कॉल नाही वाटते. तुम्ही स्पॉट लिहून घ्या. पाराशर बंगला, विजय कॉलनी, खजिना विहिरीजवळ.’
‘आयला असंय का?’
‘हा आणि फोन केलेला त्याचं नावय पारखी. तो तिथंच राहतो कुटतरी आजूबाजूला. तुमचे पीआय साहेब असतील तर द्या त्यांना दोन मिनिटं. त्यांच्याशीही बोलतो एकदा. प्रकरण गंभीर असेल तर क्राईम ब्रांचच्याही कानावर घालावं लागेल मला.’
‘अहो नाय ना. आमचे उत्पल साहेब तर बालगंधर्वला गेलेत. तो आज पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे ना तिकडं. तिथं पालकमंत्री बी येणारेत. त्यांची ड्यूटी आहे साहेबांकडे. पण मी वायरलेसवरून साहेबांना अपडेट देतो लगेच आणि धडकतो स्पॉटवर.’
२.
पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात पालकमंत्री उत्तेकरांच्या हस्ते शोधपत्रकारिता पुरस्कारांचं वितरण होतं. त्यामुळं सभागृह शहरातल्या मराठी-इंग्रजी पेपरांच्या बातमीदार-उपसंपादकांनी भरून गेलं होतं.
जनसेवकचा पंचविशीचा क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वे विंगेच्या अंधारात हाताची घडी घालून उभा होता. दीड वर्षापूर्वी देशभर गाजलेल्या शांताबाई गावडे सीरियल किलर प्रकरणात त्यानं केलेल्या बातमीदारीमुळे तो यंदाच्या म्हणजेच १९९२च्या शोधपत्रकारिता पुरस्काराचा मानकरी ठरला होता. पण निलेशचं सगळं लक्ष कार्यक्रमापेक्षा पुढून चौथ्या-पाचव्या लायनीत बसलेल्या मुलीकडे होतं. इतक्यात त्या मुलीनं त्या विंगेतल्या अंधारातही शोधून काढल्यासारखं निलेशकडे बघितलं, त्यांची नजरानजर झाली आणि त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्याचा अंदाज खरा ठरला होता. ती संहिताच होती. तो तिला थेट तीन वर्षांनी बघत होता. संहिता त्याच्याकडे बघून अगदी मनापासून हसली. निलेश मात्र काहीच न सुचून तिच्याकडे नुसता बघत होता. संहिताच्या समोर आपला सत्कार होणार, आपण पुरस्कार स्वीकारणार या विचारानं निलेश अगदी हरखून गेला होता.
इतक्यात ‘धाडधाड धाडधाड…’ निलेशनं चमकून मागे बघितलं. विंगेचं दार कुणीतरी जोरजोरात वाजवत होतं. निलेशनं दार उघडलं.
‘अं… निलेश सर…’
‘अरे राजेश… काय झालं? कुठून येतोयस तू? बस बस इथं,’ निलेश चक्रावून त्याला म्हणाला.
कुणीतरी मारेकरी मागावर असल्यासारखा राजेश घामानं थबथबला होता. त्याला इतकी धाप लागली होती की त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता.
‘निलेश सर तुम्ही चला माझ्यासोबत लगेच.’
‘कुठं? काय झालंय काय नेमकं?’
‘सदाशिव पेठेत खूप मोठा राडा झालाय.’ निलेशच्या खांद्यावर आपला हात ठेवत तो म्हणाला. राजेशच्या बोलण्यातला ताण आणि त्याच्या हाताची आत्ता त्याच्या खांद्यावर असलेली घट्ट पकड निलेशला जाणवली.
‘अरे पण मला आता स्टेजवर…’
त्याला मधेच तोडत राजेश म्हणाला, ‘अहो सर बातमी लय मोठीय. डेडलाइनमध्ये नाही गेली आपल्या तर मॅटर होईल. बाकी सगळं सोडा आणि तुम्ही चला माझ्याबरोबर.’
निलेशला पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करण्यात आलं तेव्हा टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. पण निलेशच्या नावाची घोषणा होऊन दोन मिनिटं होऊन गेली तरी निलेशचा पत्ता नव्हता.
‘अहो निलेश तर बाहेर पडला. आता पाच मिनिटांपूर्वीच मी त्याला आणि फोटोग्राफर राजेशला घाईघाईत जाताना पाहिलं,’ नुकताच सभागृहात आलेला जनसेवकचा पालिका बीट बघणारा रिपोर्टर जायभाय उठून उभा राहत मोठ्यांदा म्हणाला.
त्याबरोबर सभागृहात एकच कुजबूज सुरू झाली. फोटोग्राफरसह निलेश कुठंतरी गेला म्हणजे शहरात काहीतरी गडबड झाली असणार हे ओळखत दैनिक ‘लोकनायक’चा जगदीश सुतार, ‘डेली मेल’चा खत्री आणि सभागृहातले बाकी सगळे क्राईम रिपोर्टर्स तडक एक्झिटच्या दिशेनं धावले.
स्टेजवर पालकमंत्र्यांनी आपल्या पीएला नजरेनंच जवळ बोलवत म्हणलं, ‘जरा बघा हा जनसेवकचा सुर्वे कुठल्या बातमीसाठी स्वतःचा सत्कार सोडून गेलाय. अपडेट द्या मला.’
३.
‘हा आता बोल. काय राडा झालाय नेमका सदाशिव पेठेत?’ सभागृहाबाहेरच्या पार्किंगमध्ये येताच निलेशनं फोटोग्राफर राजेशला विचारलं.
‘सर खून झालेत!’
‘काय? खून झालेत म्हणजे? किती खून झालेत?’ चमकून निलेशनं विचारलं.
‘सर नीट काय माहिती मिळाली नाही. आधी फक्त चोरी झालीय असं वाटत होतं. पण एकाच घरातल्या किमान चार-पाच जणांना खलास केलंय असं कळतंय.’
‘टिप पक्की आहे ना रे? च्यायला, मी इथं पुरस्कार सोडून येतोय तुझ्यासोबत. ते बापट उडायचे नायतर माझ्यावर.’
‘नाही सर. खबर शंभर टक्के खरी आहे.’
निलेशनं एकवार घड्याळात पाहिलं. तडक स्पॉटवर जात मिळेल तितकी माहिती आणि फोटो घेत पुढच्या तासाभरात बातमी फाइल केली तरच ती अंकाच्या डेडलाइनमध्ये लेट सिटी एडिशनमध्ये जाऊ शकली असती. ‘ठीके. चल चल आपण स्पॉटवर जाऊ लगेच. पण तुला स्पॉट माहितीय का नेमका कुठंय ते?’
‘अं… हो सर. खजिना विहीरच्या जवळपास आहे कुठंतरी.’
‘ठिके. बघू तिथं जाऊन आपण.’ पार्किंगमधून आपली एम ५० काढत निलेश म्हणाला.
‘अरे तुझी सायकल राहू दे इथंच. रात्री सोडतो तुला परत. तसंही अंकात इतक्या अर्जंट फोटो जायची शक्यता कमीच दिसतीय. फोटो आत्ता काढ फक्त. डेव्हलप करून उद्या दिलेस तरी चालेल परवाच्या अंकासाठी.’
निलेश असं म्हणताच राजेश निलेशच्या गाडीवर मागे बसला. निलेशनं गाडी गियरमध्ये टाकली आणि ते बालगंधर्वच्या पुलावरून क्राइम सीनकडे निघाले. अवघ्या विशीतल्या राजेशनं शहरात घडलेल्या इतक्या मोठ्या गुन्ह्याची माहिती मिळवून धडपडत येऊन ती निलेशला दिल्यानं त्याला त्याचं जाम कौतुक वाटत होतं.
राजेश म्हणतोय तसं खरंच चारेक खून झाले असतील तर मयतांची नावं, त्यांची वयं, त्यांचं बॅकग्राऊंड, स्पॉटवर उपस्थित असलेल्या पोलिसांशी बोलून हत्याकांडामागचं सकृतदर्शनी काही कारण दिसतंय का, शेजार्यापाजार्यांशी बोलून त्यांना कुणी संशयित परिसरात दिसला का अशी सगळी माहिती मिळवणं गरजेचं होतं. राजेश सोबत असल्यानं फोटोंशिवाय यातली काही कामं त्याच्यावरही सोपवता येणार होती.
‘बरं ऐक. वेळ कमीय आपल्याकडे. कुठला पॉइंट मिस होता कामा नये. तिथं गेल्यावर सांगतोच मी तुला काय काय करायचं ते,’ असं म्हणत निलेश विचारात गढला.
बाहेर पडल्यावर निलेशनं मागच्या बालगंधर्वच्या पुलावरून गाडी घेतली. पावसाळ्याचे दिवस आणि रात्री दहाची वेळ असल्यानं रस्त्यावर शुकशुकाट होता. आठ दिवसापासून पाऊस लागून राहिला असल्यानं नदीला पाणी सोडल्याचं दिसत होतं. सुदैवानं आत्ता पावसानं उघडीप दिली होती. पावसानं की आणखी कशानं रस्त्यावरचे दिवे बंद होते. त्यामुळं एम५०च्या हेडलाइटमध्ये रस्त्याचा आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांचा अंदाज घेत निलेश काहीशी हळू गाडी चालवत होता. ओंकारेश्वरावरून तशीच गाडी पुढे घेत तो एसपी कॉलेजजवळच्या खजिना विहीरीच्या दिशेनं निघाला होता. एरवी गर्दीचा असलेला नागनाथ पाराचा चौकही आत्ता सामसुम होता. निलेशला क्राइम सीनवर पोचायची घाई झाली असली तरी त्याला अचानक दीड वर्षापूर्वीची १७ जानेवारी १९९१ची रात्र आठवली. नैना वाघ हत्याकांडाची टिपही त्याला अशी रात्री उशिराच मिळाली होती. त्या बातमीनं आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडींनी त्याचं नशीब पार बदलून टाकलं होतं.
‘हां सर. इकडे डावीकडे घ्या. खजिना विहिर आणि स्काऊट ग्राऊंडच्या मधल्या एका बोळात काही बंगले आहेत. तिकडं तो स्पॉट असेल असं वाटतंय मला,’ राजेश म्हणाला तसा निलेश एकदम तंद्रीतून बाहेर आला आणि त्याने गाडी वळवली. आधीच पावसामुळं रस्त्यावर शुकशुकाट होता. त्यात दहा वाजून गेल्यान्ां कुणाला काही पत्ता विचारायचा म्हटलं तर आत्ता औषधालाही कुणी रस्त्यावर दिसत नव्हतं. गाडी वळवताच राजेश म्हणाला तसा खरंच एक अंधारा बोळ लागला. निलेशच्या गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात पुढचा थोडा रस्ता सोडता बाकी काहीच दिसत नव्हतं. या बोळात काही बंगले असल्याचं मध्येच मागे पडणार्या काही फाटकांवरून कळत होतं. इतक्यात त्यांना कोपर्यात कुणीतरी वर्दीत उभं असल्याचं दिसलं. त्यांच्याजवळ जात निलेशनं गाडी थांबवली, तर ते खडक पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल दुबे होते.
‘आयला कमाल आहे सुर्वे तुमची. आमची पोलीस टीम घटनास्थळी दाखल व्हायच्या आत तुम्ही पार फोटोग्राफरसहीत स्पॉटवर हजर!’ दुबे गालातल्या गालात हसत म्हणाले.
‘दुबे साहेब नक्की काय झालंय? प्रकरण खरंच वाढीव आहे का?’
‘जी. आमचे पीआय उत्पल साहेब आहेत आत. बाकी टीम येतीय. तोवर आत तुमच्यासारखे कुणी आगाऊ बातमीदार घुसू नाही म्हणून थांबवलंय इथं पहार्यावर.
‘साहेब पाच मिनिटं सोडा आत. पटकन फोटो काढून येतो बगा.’ राजेश गयावया करत म्हणाला.
‘अरे बाबा, तुला असं सोडलं तर मी सस्पेंड होईल. क्राइम सीन आहे हा.’
‘अहो पण तुमची बाकी सगळी टीम यायच्या आत शून्य मिनिटात एकवार जाऊन येतो आत. फटाफट दिसेल तेवढे फोटो मारतो.’
दुबेंचं आणि राजेशचं बोलणं सुरू असताना निलेशचं सगळं लक्ष आतल्या दगडी बंगल्यावर खिळलं होतं. त्या बंगल्याची रचना एखाद्या चौसोपी वाड्यासारखी दिसत होती. घरासमोर मोठं अंगण होतं, तुळशीवृंदावन होतं. बंगल्याच्या दोन्ही बाजूला किमान वीस फूट मोकळी जागा होती, जिथं आंबानारळाची आणि अगदी सुपारी-फणसाची झाडं लावलेली दिसत होती. ते सगळं बघून निलेशला एकदम त्याच्या कोकणातल्या टुमदार घराची आठवण झाली.
‘थँक यू साहेब. मोजून दोन मिनिटांत येतो बगा. तुमचे उत्पल साहेब काही बोलले तर सरळ माझ्यावर ढकला सगळं,’ असा दुबेंना गूळ लावत राजेशनं त्यांना तयार केलं.
‘निलेश सर, चला आत जाऊन येऊ पटकन. हे म्हणतात तसं यांच्या बाकीच्या टीमने येऊन बंगला सील करायच्या आत बघू काय फोटो घावतायत का ते.’ असं राजेश म्हणताच निलेश एकदम भानावर आला. राजेशच्या मागोमाग फाटकातून आत जात तो एकेक पाऊल टाकायला लागला. तो दगडी बंगला वडिलोपार्जित दिसत होता आणि किमान पन्नास-साठ वर्ष जुना वाटत होता. गडबडीत बंगल्याच्या दाराशी पोचलेला राजेश दारात उभा राहून खटाखट फ्लॅश मारत होता.
(निरंजन मेढेकर लिखित ही संपूर्ण कादंबरी अभिनेता नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात स्टोरीटेलवर दहा भागांच्या ऑडिओ क्राइम सिरीजच्या रूपात उपलब्ध आहे.)