शाहू महाराजांचा आदेश ऐकून प्रबोधनकारांनी १९२२च्या शिवजयंतीत सातार्याच्या राजवाड्याच्या पटांगणात तीन दणदणीत व्याख्यानं दिली. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य कुणी आणि कसं संपवलं याचा तो इतिहास होता.
– – –
१९२०मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत छत्रपती शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजी यांच्या राज्यक्रांतीचा इतिहास लिहिण्याची आज्ञा केली. त्यामुळे प्रबोधनकारांनी या विषयावरची आणखी कागदपत्रं मिळवण्याचा सपाटा लावला. शाहू महाराजांचा हा ग्रंथ लवकरात लवकर लिहिण्याविषयी अतिशय आग्रह होता. प्रबोधनकारांना भेटल्यावर प्रत्येक वेळी महाराजांचा पहिला प्रश्न हाच असायचा की ग्रंथ कुठवर आला? त्यावर काम सुरू आहे, असं उत्तर देत प्रबोधनकारांनी जवळपास दीड दोन वर्षं टोलवली. विषय महत्त्वाचा असल्यामुळे ते त्याची विश्वासार्ह साधनं गोळा करण्यात गुंतले होते. पण १९२२च्या एप्रिल महिन्यात या कामाला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
कर्मवीर भाऊराव पाटील तेव्हा सातार्याच्या सत्यशोधक चळवळीत सक्रिय होते. ते प्रबोधनकारांना मार्गदर्शक मानत. त्यांनी प्रबोधनकारांना शिवजयंतीनिमित्त सातार्यात व्याख्यान द्यायला बोलावलं होतं. प्रबोधनकार बंगलोर मेल या ट्रेनने सातार्याला निघाले होते. गाडी पुणे स्टेशनवर पोचली होती. गाडी सुटायला वेळ असल्याने ते प्लॅटफॉर्मवर फेर्या मारत होते. तेव्हा एक शिपाई आला आणि त्याने शाहू महाराजांनी भेटायला बोलावलं असल्याचा निरोप दिला. महाराज पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर होते. महाराजांचा आदेश असल्यामुळे त्यांनी हमालाला बोलावलं आणि सांगितलं, लगेज बाहेर काढ नि माझी वाट पाहात येथेच थांब. गाडी गेली तर पहिल्या फलाटावर ये.
प्रबोधनकारांनी महाराजांना मुजरा केला. महाराजांनी विचारलं, कुठं निघालास? प्रबोधनकारांनी सातार्यात शिवजयंती उत्सवात व्याख्यान द्यायला जात असल्याचं सांगितलं. त्यावर महाराज म्हणाले, `अरे, आता कितींदा तुम्ही सोळाशे सत्ताविसाच्यासाली शिवाजी जन्मला, हे पालुपद गात बसणार? माझी आज्ञा आहे तुला, तेथे तो सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास इत्थंभूत सांगून दे त्या सातारच्या मावळ्यांना भडकावून.` प्रबोधनकार उत्तरले, आज्ञा शिरसावंद्य! महाराज घरातल्या एका लग्नासाठी बडोद्याला चालले होते. त्यांनी प्रबोधनकारांना सांगितलं, पाच सहा दिवसांनी मुंबईला परत येईन. तिथं येऊन मला भेट.
तेव्हा सातारा परिसरात जोशात असणार्या ब्राह्मणेतर पक्षाने तीन दिवसांचा शिवजयंती उत्सव साजरा करण्याचं आयोजन केलं होतं. त्यात सत्यशोधक जलसे, पोवाड्यांच्या स्पर्धा असे उपक्रम होते. तिन्ही दिवस संध्याकाळी प्रबोधनकारांची व्याख्यानं हे त्याचं प्रमुख आकर्षण होतं. सातारच्या राजवाड्यासमोरच्या विस्तीर्ण पटांगणात त्याचं आयोजन केलं होतं. राजवाड्याच्या पायर्या हाच स्टेज बनला होता. पायर्यांवर टेबल ठेवून त्यावर प्रबोधनकारांना उभं केलं होतं. सगळं मैदान श्रोत्यांनी भरलं होतं. लाऊडस्पीकर नसला तरी प्रबोधनकारांना कमावलेला आवाज शेवटच्या माणसापर्यंत पोचत होता. भास्करराव जाधवांसारखे इतिहासाचे जाणकार लोकनेते अध्यक्ष होते.
प्रबोधनकारांनी तीन दिवस ओघवत्या आक्रमक शैलीत सातार्यातल्या ब्राह्मणी कारस्थान्यांनी छत्रपती प्रतापसिंहांना हाल हाल करून देशोधडीला लावलं त्याची दुर्दैवी कहाणी सांगितली. त्याविरोधात स्वामीनिष्ठ रंगो बापूजीने केलेला संघर्ष सांगितला. प्रतापसिंह महाराजांची बदनामी करत आजवर मांडल्या गेलेल्या इतिहासापेक्षा हा वेगळा इतिहास होता. सातार्यात साधारण शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या घटना प्रबोधनकार सातारकरांच्याच समोर जाग्या करत होते. भक्कम पुरावे, आवेशपूर्व शैली आणि महाराष्ट्र स्वाभिमानाची आग ही प्रबोधनकारांच्या वक्तृत्वाची वैशिष्ट्यं या भाषणात दिसली नसती तरच नवल. ब्राह्मणेतर पक्षाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे बहुजन चवताळून उठले. एक दोन वेळा ब्राह्मणी कंपूने सभेत गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना लगेच धडा शिकवण्यात आला.
या व्याख्यानांचा प्रभाव फक्त सातारा परिसरातच नाही तर महाराष्ट्राच्या इतर भागांत देखील पडल्याचं दिसतं. त्याचं उदाहरण म्हणून दोन पोवाडे सांगता येतील. या व्याख्यानांना उपस्थित असलेल्या दोन शाहिरांनी केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर दोन पोवाडे रचले. त्यावरून हा विषय श्रोत्यांना किती जिव्हाळ्याचा वाटला असेल, याचा अंदाज बांधता येतो. सातार्यातील निनाम पाडळी गावचे शाहीर सदानंद आणि आताच्या सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव येथील शाहीर तुकाराम अशी त्यांची नावं आहेत. त्यांनी फक्त सातार्यातच नाही तर खाली कोल्हापूर बेळगावपर्यंत आणि वर अहमदनगरपर्यंत गावोगाव पोवाड्याचे कार्यक्रम केले. त्यामुळे बहुजन समाजापर्यंत हा इतिहास रंजक पद्धतीने पोचला. शाहीर तुकाराम यांचा पोवाडा पुस्तिकारूपाने प्रकाशित झाला होता. तर शाहीर सदानंद यांचा पोवाडा `शिवछत्रपती` या पुण्याहून काही काळ प्रकाशित होणार्या दैनिकाच्या ७ नोव्हेंबर १९२२च्या अंकात प्रकाशित झाला होता. प्रबोधनकारांनी हे दोन्ही पोवाडे रंगो बापूजी चरित्रग्रंथात आवर्जून प्रकाशित केले आहेत.
`कै. प्रतापसिंह महाराज सातारकर यांचा पोवाडा` या नावाने प्रकाशित असलेल्या शाहीर तुकाराम य्ाांच्या पोवाड्याच्या सुरुवातीलाच प्रबोधनकारांचा उल्लेख आहे, तो असा,
`भिक्षुकशाहीचे बंड। नव्हे थोतांड। भटांवर कुभांड। नाही घेत। सांगतो खरे देवाचि शपथ। शिवजयंतीच्या उत्सवांत। ठाकरे यांनि सांगितली मात। तीच मी करतो जनां श्रुत।`
शाहीर सदानंद यांचा `निःशस्त्र प्रतिकार` नावाचा पोवाडा अधिक सविस्तर आहे. पोवाड्यातल्या घटनाक्रमाची वैचारिक पार्श्वभूमीही त्यात येते. त्याची भाषा अधिक कडक आहे. उदाहरणादाखल,
`सन अठराशेंएकुणचाळीस। प्रतापसिंहास। भटाचा फांस। कसा बनला। नातुकंपूच्या ऐका लीला। प्रतापसिंहाच्या अमदानीला। उच्चनीच भेद नष्ट झाला। धर्माची मोकळीक सगळ्याला। पहावेना मुळीं ब्राह्मणाला। नातूशाहीला वायू झाला। दुष्ट लोकांनी कट केला।`
या पोवाड्यांविषयी प्रबोधनकारांनी मांडलेलं मत महतत्त्वाचं आहे, `शहरी पांडित्याच्या काटकोन चौकोनातून त्या काव्यरचनेची किंमत ठरवण्यापेक्षा नुसती व्याख्याने ऐकून त्यातला तपशील स्मरणाने पोवाड्यात बिनचूक गुंफण्याचे कौशल्य मात्र वाखाणण्यासारखेच होय.`
श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा हे साप्ताहिक त्या काळात अत्यंत लोकप्रिय होतं. त्यांच्या बातमीदाराने पाठवलेले या व्याख्यानांचे सविस्तर वृतांत तीन आठवडे सलग छापण्यात आले. त्यामुळे हा इतिहास महाराष्ट्रभर पसरला. तोवर लपवला गेलेला हा इतिहास ऐकून अनेकांना धक्का बसला. त्यात प्रसिद्ध संपादक संदेशकार अच्युतराव कोल्हटकर देखील होते. तेव्हा ते `टिळक` नावाच्या साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी १७ आणि २५ जून १९२२च्या अंकात हे वृत्तांत प्रसिद्ध केले. त्यावर त्यांनी एक संपादकीय स्फुटदेखील लिहिलं. त्यात ते लिहितात, `प्रतापसिंह महाराजाना पाजी बाळाजीपंत नातू आणि विश्वासघातकी आप्पासाहेब भोसले यांनी गादीवरून कसे काढले. या हकिकतीचा पूर्वभाग आम्ही गेल्या अंकात दिलेला आहे. हा वाचून ज्यांना संताप येणार नाही, जो रागाने खवळ्रून जाणार नाही. ज्याचे डोळे क्रोधाने लाल होणार नाहीत, असा मनुष्य अस्तित्वात असणे अशक्य आहे. रा. रा. ठाकरे यानी सांगितल्याप्रमाणे जर सातारचे इंग्रज रेसिडेंट यांनी महाराजांना ऐन रात्री पलंगावरून खेचले असेल, जर महाराजांना नुसत्या चोळण्यानिशी पालखीत बसावे लागले असेल, जर त्यांना लिंबास जनावरांच्या मुतारीच्या घाणीत उतरावे लागले असेल, जर राजकन्या गोजराबाई हिची तेथे अकाली प्रसूति झाली असेल आणि जर मेण्यातल्या मेण्यात बाळासाहेब सेनापतीचा मुडदा पडला असेल, तर आम्ही म्हणतो कीं असल्या निर्दयी कृत्यांस इतिहासात जोड सांपडणेच कठीण आहे… प्रतापसिंह राजा, तुझे राज्य परत देणे हे आमच्या हाती नाही व तुला परत सजीव करणे हेहि आम्हास शक्य नाही. परंतु अजूनहि तूं आम्हास प्रिय, वंद्य व संस्मरणीय आहेस. पाजी बाळाजीपंताने व विश्वासघातकी आप्पासाहेबाने पीडलेल्या तुझ्या आत्म्याबद्दल रोज क्रोधाचा तीव्र श्वास सोडल्याखेरीज एकहि महाराष्ट्रीय रहाणार नाही.`
अच्युतराव फक्त इतकं करून थांबले नाहीत, तर जेव्हा जेव्हा प्रबोधनकारांना भेटत तेव्हा पहिला एकच प्रश्न विचारत, `काय बाबा, आमच्या रंगो बापूजीचे काय केले?` अगदी त्यांच्या अकाली मृत्यूपर्यंत त्यांनी हा पाठपुरावा कायम ठेवला. त्यामुळे रंगो बापूजी ग्रंथात प्रबोधनकारांनी त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं आहे.
ही व्याख्यानं प्रबोधनकारांनी पुढे `प्रबोधन`च्या अंकात प्रसिद्ध केली. त्यामुळे ती आणखी गाजली. प्रबोधनकारांनी याचं एक छोटं पुस्तकही काढलं. `सातार्याचे दैव की दैवाचा सातारा` असं खास ठाकरे खाक्याचं शीर्षक त्याला दिलं होतं. त्यातल्याच दुसर्या व्याख्यानाचं शीर्षकही असंच लक्षवेधी होतं, `हिंदवी स्वराज्याचा खून.` प्रबोधन लघुग्रंथमालेत पुण्याहून १९२५मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याची दुसरी आवृत्ती कोल्हापूरच्या दासराम बुक डेपोने प्रसिद्ध केली होती. या ग्रंथातले सुरुवातीचे दोन परिच्छेद इथे आवर्जून देत आहे. त्यात आकर्षक ठाकरी शैलीचा प्रत्यय तर येतोच. पण त्याचबरोबर समकालीन विषयांना इतिहासाशी जोडून त्याला अधिक प्रत्ययकारी बनवण्याचं कौशल्यही दिसतं. आवर्जून वाचावेत असे हे उतारे,
`बांधवहो, आपण सातारकर असल्यामुळें आपल्याला सातारचा अभिमान असणें योग्य आहे. क्षमा करा, मला तितका त्याचा अभिमान नाही. सातारा ही पापभूमी आहे. सातारा ही हिंदवी स्वराज्याची र्हासभूमी आहे. रायगडावर उदय पावलेल्या हिंदवी स्वराज्याचा सूर्य ह्या सातार्यास अस्त पावला. रायगडाला जन्माला आलेल्या स्वराज्याच्या नरडीला नख देऊन भिक्षुकशाहीनें सातार्यास त्या स्वराज्याचा मुडदा पाडला. दिल्लीच्या मोंगल बादशाहीच्या सिंहासनाला गदगदा हालविणार्या, इतकेच नव्हे, तर अटकेपार रूमशामच्या बादशाही तक्ताचा थरकांप उडविणार्या हिंदवी स्वराज्याचे रक्त ह्या सातारच्या पापभूमीवर सांडलेले आहे. शिवछत्रपतीच्या विश्वव्यापी मनोरथाचा ज्या भूमींत नायनाट झाला, त्याच भूमीवर उभें राहून आजच्या मंगलप्रसंगीं पुण्यश्लोक शिवरायाचें गुणगायन करण्यापेक्षां आमचें हिंदवी स्वराज्य कां नष्ट झाले, त्याच्या गळ्याला कोणकोणत्या अधमांनी नख लावले आणि भिक्षुकशाहीनें कोणकोणती घाणेरडीं कारस्थानें करून आमच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मुडदा या सातार्यांत पाडला, त्याचा आज जर आपण इतिहासाच्या आधारानें विचार केला, तर सध्यांच्या स्वराज्योन्मुख अवस्थेंत आपल्याला आपल्या कर्तव्याचीं पावलें नीट जपून टाकितां येतील.
स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असली तात्त्विक पुराणें सांगणारे टिळकानुटिळक आज पैशाला खंडीभर झाले आहेत. परंतु त्याच जन्मसिद्ध हक्कावर रखरखीत निखारे ठेवण्यास ज्या हरामखोरांची मनोदेवता महाराष्ट्रद्रोहाचा व्यभिचार करण्याच्या कामी किंचितसुद्धां शरमली नाहीं, त्याचा खराखुरा इतिहास उजेडांत आणणारे मात्र आपल्याला मुळीच भेटणार नाहींत. आज स्वराज्य शब्दाचें पीक मनमुराद आलेलें आहे. फंडगुंडांच्या पोतड्या भरण्यासाठीं स्वराज्य हा एक ठगांचा मंत्र होऊन बसला आहे. परंतु स्वराज्य म्हणजे काय याची व्याख्या मात्र कोणीच स्पष्ट करीत नाहीं. अशा प्रसंगी आपले हिंदवी स्वराज्य आपण कां गमावले, याचा नीट विचार केल्यास सध्यां महाराष्ट्रभर धुमाकूळ घालीत असलेल्या राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यविषयक चळवळीत ब्राह्मणेतर संघाने किती जपून वागलें पाहिजे ह्याचा खुलासा तेव्हांच होईल.`
प्रबोधनकारांनी लिहिलेला सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून `प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी` या चरित्राचा उल्लेख करता येतील. पण हा जवळपास पाचशे पानांचा ग्रंथ वाचण्यास वेळ नसेल किंवा त्याचा परिचय करून घ्यायचा असेल तर `सातार्याचे दैव की दैवाचा सातारा` हे छोटेखानी पुस्तक लगेच हातात घ्यायला हवं. आपल्या prabodhankar.com या वेबसाईटवर ते वाचण्यासाठी उपलब्ध आहे. इतर कुणी नाही, तर सातारकरांनी तर ते वाचायलाच हवं.