आमचा वॉर्ड तसा आकाराने लहान असला तरी जागतिक विषयावर चर्चा चालू असते. युक्रेन आणि पुतीन या विषयावर तर आमच्या दोन बिल्डिंगमध्ये मतभेद आहेत. पुतीनच्या हट्टी स्वभावामुळे लाखो रशियन सैनिक मेले असं काहींना वाटतं, तर नाटोच्या चुुगलखोरपणामुळे हे सर्व घडलं, असं काहीजणांना वाटतं. आता घरात बसून किंवा सोसायटीतल्या सोसायटीत एवढं ज्ञान मिळत असताना कोण कुठे जाईल? अरे, रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग गेली तरी आपले लोक आपल्या नव्या घराचे बांधकाम जिथून दिसेल अशीच जागा भाड्याने घेतात (मागे मी एकदा एक पीजे ऐकला होता, `मराठी माणसाला फारसा डिंक लागत नाही, का तर म्हणे तो एकाच जागी चिकटून असतो).
– – –
प्रिय तातूस,
खूप दिवस सारखी तुझी आठवण काढावी असे वाटत होते. मार्च महिना तर बघता बघता निघून गेला. आर्थिक गोष्टींचा विचार करता करता सबंध आयुष्याचा रिटर्न भरायची वेळ आली तर काय होईल असे सारखे वाटत राहते. नदीला जसं आपण उगाच वहावत गेलो वाटतं तसं मला हल्ली वाटतं! काहीकाहीवेळा सोसायटीतले लोक `अनंतराव तुम्ही कवी व्हायला पाहिजे होतात’ असे म्हणतात. तसंतर मला देखील लोकांना एवढे पुरस्कार वगैरे मिळतात हे बघून आपण शक्यता असूनही मोठे झालो नाही याची खंत वाटते. डिपार्टमेंटच्या परीक्षा देण्यात माझा बराच वेळ वाया गेला असे आता वाटते. काहीवेळा तर आपण थोडे उशिरा जन्माला आलो असेही वाटते.
तर प्रथम नवीन वर्षाच्या तुला शुभेच्छा! तिकडे विदेशात मरणाची थंडी पडते आणि नवे वर्ष कसे काय साजरे करतात कळत नाही. अरे आपल्याकडे आंब्याचा घमघमाट सुरू झाला की नवीन वर्ष येतं! तुला सांगतो, इतकी वर्षे तू न विसरता नेमाने आंब्याची पेटी पाठवतोस याचं आमच्या घरात सर्वांनाच कौतुक वाटतं. परवा बाजारात चौकशी केली तर हापूसच्या फोडी दीडशे रुपये डझन आहेत कळले. थोडे दिवस थांबलात तर शंभर रुपयापर्यंत खाली येईल असे म्हणतात. सरकार स्थापन करतांना आमदारांचे भाव वाढतात आणि पुढे कमी कमी होत जातात तसंच काहीसं आहे. त्यात `आम’ शब्द आहे याचे मला आश्चर्य वाटते! गंमत म्हणजे, आंबा असो की आमदार, दोन्हीकडे पेटी आवश्यक. तू पेटी पाठवायचे विसरशील म्हणून मी हा विषय काढला असे घरच्यांना वाटेल, पण तू पाठवतोस त्याचे मोल कसले करायचे? त्यामागची भावना महत्वाची! अरे आपल्यावर असे संस्कार झालेत की लग्नात देखील काही मागितले नाही (आता न मागता सर्व मिळाले ती गोष्ट निराळी).
वसंताची मुलगी इंग्लंडला असते, त्यांचे केव्हाच आंबे खाऊन झाले म्हणे. हल्ली सगळ्या नंबर एकच्या वस्तू परदेशात जातात. आपण तिकडे असतो तर आपल्यालाही चांगलं स्थळ मिळालं असतं असं लोकांना वाटतं ते काही चुकीचं नाही म्हणा. मला सुधा मूर्तींच्या द्रष्टेपणाचं कौतुक वाटतं! अरे तिकडचा जावई पण असा निवडला की जो पुढे पंतप्रधान होणार! जावई तिकडचा असला की व्हिसाचा प्रॉब्लेम येत नाही म्हणतात. मला मागे परदेश प्रवासाचा योग आहे सांगितलेले, तेव्हा आम्ही नेपाळला जाणार होतो. पण तिथल्या सरकारचाच काहीतरी गोंधळ झाला मग आम्ही बॉर्डरवरून परतलो. लोक काय काय एकेक प्रदेशातल्या गमती जमती सांगतात. दत्तूचा जावई नॉर्वेत असतो. तिकडे म्हणे किलोमीटर क्षेत्रात फक्त दहा-बारा माणसं राहतात. हल्ली भारतात फक्त गर्दी बघायला येणार्या पर्यटकांची संख्या वाढलीय असं छापून आले होते (आता छापून काय येईल सांगता येत नाही, आज ज्यांचा मोठा फोटो येतो ते उद्या तुरुंगात असतात), असो.
अरे मला तर अजून कवठे महांकाळला कसं जायचं ते पण माहित नाही. आपल्याकडे पुनर्जन्मावर विश्वास असल्याने काही वेळा खूप आधार वाटतो, पण बायका सात जन्म वगैरे मागतात, त्यामुळे काहीवेळा विरस होतो. आयुष्यात बदल हवासा वाटत राहतो. हे कबूल करायला लाज कशाला वाटायला पाहिजे? शेवटी लग्नाच्या गाठी कुठे बांधल्या असतील, काही सांगता येत नाही. अरे आमच्या ओळखीचे एक भटजी आहेत, इतकी लग्न लावली पण बिचार्यांचा अजून कुठे जमत नाही (सोसायटीतली वात्रट मुलं त्यांना हीच शिक्षा आहे म्हणतात).
लग्नावरून आठवलं, नानाचा मुलगा आहे ना, त्याची पहिली बायको निघून गेली. आता लोक सांगताना पण मख्खपणाने एखाद्याची गाडी निघून गेली सांगावं तसं सांगतात. तर त्याला पहिल्या बायकोची खूप आठवण येते मग तो रडायला आमच्याकडे येतो (त्याचं दुसरं लग्न झालंय, मात्र पहिल्या बायकोचं नाव सुद्धा काढलेलं तिला चालत नाही). थोडा वेळ रडून झालं की चहा घेऊन निघून जातो. आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खूप गप्पा मारतात अनेकजण, पण घराघरात या मुस्कटदाबीच्या घटना चालू आहेत त्यावर मात्र बोलत नाहीत.
तर लग्नसराई अगदी जवळ येतेय आदर्श पत्नीची तुमची अपेक्षा काय? असं मुलाखतीत एका लेखकाला विचारल्यावर `प्रेयसी निघून गेल्यावर पाठीवरून हात फिरवत धीर देणारी अशी पत्नी हवी,’ असे क्रांतिकारक विचार मांडले. एकमेकांना समजून न घेतल्यामुळे आताची परिस्थिती उद्भवली, असं परवा आमच्या सोसायटीची व्याख्यानमाला असते तिथे वत्तäयांनी प्रतिपादन केले. ‘बदलत्या अर्थव्यवस्थेत आजच्या विवाहसंस्थेपुढील आव्हाने’ असा परिसंवादाचा विषय होता. खरं तर आमचा वॉर्ड तसा आकाराने लहान असला तरी जागतिक विषयावर चर्चा चालू असते. युक्रेन आणि पुतीन या विषयावर तर आमच्या दोन बििंल्डगमध्ये मतभेद आहेत. पुतीनच्या हट्टी स्वभावामुळे लाखो रशियन सैनिक मेले असं काहींना वाटतं, तर नाटोच्या चुुगलखोरपणामुळे हे सर्व घडलं, असं काहीजणांना वाटतं. आता घरात बसून किंवा सोसायटीतल्या सोसायटीत एवढं ज्ञान मिळत असताना कोण कुठे जाईल? अरे, रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग गेली तरी आपले लोक आपल्या नव्या घराचे बांधकाम जिथून दिसेल अशीच जागा भाड्याने घेतात (मागे मी एकदा एक पीजे ऐकला होता, `मराठी माणसाला फारसा डिंक लागत नाही, का तर म्हणे तो एकाच जागी चिकटून असतो).
तर तातू आंब्याच्या विषयावरून आपण किती जागतिक परिस्थितीकडे येऊन पोहोचलो, असे उगाचच वाटत राहते. आपण जिथे राहतो ती जागा भले लहान असली तरी विचार मोठे असावे लागतात, असे एक सुभाषित आहे (तरी पण पायाची साईज जेवढी आहे त्याच मापाचे बूट घ्यावेत).
सध्या सगळीकडे मराठी भाषा अभिजात होण्याबद्दल हाकाटी चालू आहे. आभिजात झाल्यावर नक्की काय होणार हे कुणालाच माहीत नाही. एसएससीला म्हणे आणखीन एक विषय येणार आहे `अभिजात मराठी’ असा ! खरं तर आहे तीच भाषा आपण बोलत राहिलो तरी खूप झालं, अशी आता वेळ आलीय. मराठी एकदा अभिजात भाषा झाली की आपली सर्व जुनी पुस्तके कविता वगैरे अभिजातमध्ये अनुवादित कराव्या लागणार असे म्हणतात. त्यामुळे सर्व ठिकाणी अनुवादकांची निकड भासणार म्हणतात. अर्थात एक गोष्ट खरी आहे, याचा परिणाम म्हणून एमएला मराठी घेणार्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढेल अशी काळजी वाटतेय.
अरे तातू कानावर काय काय ऐकू येतं काही सांगता येत नाही.
अभिजात भाषेचा निर्णय दसर्याला होणार! दिवाळीला होणार! नवीन वर्षात होणार! पाडव्याला होणार! असं होत होत एक एप्रिलच्या मुहूर्तावर मराठी भाषा माणसांना फूल करणार वाटतंय…
तुझा
अनंत अपराधी