छे छे छे! बावनकुळे नाही म्हणाले तसं… म्हणजे मिंधे गटाला फक्त ४८ जागा देऊ आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत. ते जे विधान केलं ते अठ्ठेचाळीसकुळे यांनी केलं. बघा हवं तर चेक करून. बावनकुळे काही खुळे नाहीत, काय तोंडाला येईल ते बोलायला! ते फार हुशार आणि चतुर लोकप्रतिनिधी आहेत. अठ्ठेचाळीसकुळे आणि बावनकुळे हे जुळे भाऊ असले तरी दोघांमध्ये चालण्या-बोलण्यात फरक आहे. बावनकुळे यांचा जन्म १३ जानेवारी १९६९ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. अठ्ठेचाळीसकुळे यांचा जन्म अगदी काल-परवा झालाय. पण तरीही त्यांना जुळे भाऊ म्हटलं जातं. आता असं आहे की मिंधे गटात स्वत: फेकनाथ मिंधे, ४० आमदार आणि १० अपक्ष असे मिळून ५१ कुळे आहेत. या एकावन्नखुळेंचं आणि बावनकुळेंचं तसं सख्य आहे. त्यामुळे `बावनकुळे यांच्या वक्तव्यात काही दम नाही. ४८ जागा घ्यायला आम्ही काय मूर्ख आहोत? त्यांना हे अधिकार कोणी दिले?’ असा प्रश्न एकावन्नपैकी एक संजय शिरसाट खुळे यांनी विचारल्यावर चेवेंद्र गंगाधरराव यांना एकदम ठसका लागला. ते बिचारे आधीच आपल्या घरातलं एक कोटीचं सप्रेम भेट प्रकरण निस्तारता-निस्तारता हैराण झालेले. त्या पुन्हा ही ४८ कोटींची भर. `च्यायला हे आपलेच लोक असं करायला लागले तर व्हायचं तरी कसं! अरे बाबा, प्रदेशाध्यक्ष पदावरच्या इसमानं अशा खर्या गोष्टी राजकारणात बोलायच्या नसतात. आपल्या मनात काय आहे हे जनात सांगायचं नसतं. म्हणजे या मिंध्यांच्या चिंध्या आपण करणारच आहोत पुढे कधी तरी. पण ती वेळ आज आलेली नाहीय. बावनकुळेजी, ताबडतोब खुलासा करून टाका.’
मग खुलासा आला की `पक्षाच्या बैठकीत कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना २४० जागा लढण्याचा विचार व्यक्त केला होता. मात्र निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून आपल्या कार्यकर्त्यांत उत्साह रहावा, यापुरतेच ते मर्यादित होते. शिंदे गटाला अधिक जागा मिळतील. भाजप आतापासून निवडणुकीची तयारी करत आहे, त्याचाही फायदा शिंदे गटात होईल…’ आता बावनकुळेंची ही सारवासारव त्यांच्या पक्षातील कार्यकत्यांचा उत्साह कमी करणारी आहे, हे त्यांना कळत नाही का? तर कळतं. पण वरून हाग्या दम मिळालेला असणार. आयला खरं तर बावनकुळे हा मनमोकळ्या मनाचा आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. ओठात एक आणि पोटात दुसरं, असं त्याना करता येत नाही. आपल्या कार्यकर्त्यासमोर त्यांनी स्पष्ट आणि सत्य भूमिका मांडली होती. पण दम मिळाल्यावर आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. आपण तसं बोललोच नाही, ते विधान आपला जुळा भाऊ अठ्ठेचाळीसकुळे याने केलं असावं, अशी सारवासारव त्यांना करावी लागली. हा जो त्यांचा जुळा भाऊ आहे, तो त्यांच्या मनात आहे. त्याला आपल्या भावावर म्हणजे बावनकुळेंवर मात करायची असते. पण बावनकुळेंना ठाऊक आहे की आपण अठ्ठेचाळीसकुळेला असा मोकळा सोडला तर आपलं प्रदेशाध्यक्षपद जाणार आणि एकदा ते गेल्यावर उद्या कोणीही उठून त्या चंपाजींच्या अंगावर शाई फेकली तशी आपल्याही शर्टावर फेकायला लागेल. त्यापेक्षा खुलासा केलेला बरा. मरा लेको, आपल्या कार्यकत्यांना सतरंज्या उचलायला ठेवायचं असेल ठेवा… मला काय करायचं! ट्वेंटी-ट्वेंटी मॅच जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनो त्यागाची तयारी ठेवा, अशी भाषणं करा आणि मग आपला `कसबा’ करून घ्या…
अहो चेवेंद्रजी, ते महाविकास आघाडीवाले सगळे एकत्र येऊन आता महाराष्ट्रात जागोजाग सभा घेणार आणि खोके सरकार-खोके सरकार म्हणून बोंबा मारणार, हे तुम्हाला माहित आहे ना? तुम्ही डोकीवर हॅट, डोळ्यांवर कमळगुलाबी गॉगल आणि तोंडात पुरणपोळीचा चिरुट घेऊन मिंधेंच्या गुप्त गाठीभेटी घेतल्या. रात्री-अपरात्री त्यांच्या एकावन्न खुळ्यांना सुरत-गोहाटी-गोवा फिरवून मुंबईत आणलंत, आपल्या जुन्या मित्राचा बदला घेण्याकरता काळ्या टोपीला हाताशी धरलंत आणि आपलं हे सरकार आणलंत तर मिळालं काय तुम्हाला? तर उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं तुम्हाला दिल्लीवाल्यांनी, म्हणजे रिक्षावाल्याच्या हाताखाली विमानाच्या पायलटानं काम करायचं! तुम्हाला काय स्वत:चा कणाबिणा आहे का नाही? तुमच्या या अशा लाचार वागण्यामुळे आपल्याच पक्षात किती अस्वस्थता आहे महाराष्ट्रात, तुम्हाला ठाऊक आहे का? अहो मी बरोबर बोललो होतो. ४८ जागा एवढीच लायकी आहे त्यांची त्यातले ८ तरी निवडून येतील की नाही, याची शंका आहे. मग ४८पेक्षा जास्त देऊन आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचा? घ्या… घ्या… हवं ते करा… मरा लेको!
चेवेंद्रजी, माझं ऐका… हां हां मी बावनकुळेच बोलतोय… जे ५१ उद्धवजींचा विश्वासघात करू शकतात. ते आपलाही करू शकतात. आपण त्यांना ईडीबिडीची धमकी दिली म्हणून ते आपल्यात आलेत, एवढंच. एवढे सगळे उपद्व्याप करून आपण त्यांना आत घेतलेय तर त्यांनी खरं तर आपण जे देऊ त्यात समाधान मानलं पाहिजे जागा वाटपाच्या वेळी ते `निम्म्या-निम्म्या घेऊ’ असं म्हणाले तर तुम्ही देणार? बरं समजा त्यांना आपण निम्या जागा दिल्या तर त्यातल्या निम्म्या तरी निवडून येतील का? म्हणजे एकूण २८८ जागांपैकी त्यांना १४४ दिल्या, तर त्यातले किती निवडून येतील. जेमतेम ५० आणि आपल्या १४४पैकी जास्तीत जास्त १००. म्हणजे दोघांच्या मिळून एकूण होणार १५०. आणि महाविकास आघाडी एकत्र लढून यावेळी २००पर्यंत मजल गाठण्याची शक्यता अगदी तटस्थ निरीक्षकांनी सुद्धा व्यक्त केलीय. म्हंजे मग पुन्हा आपल्या बोडक्यावर `मविआ’चं सरकार बसणार. तेव्हा मी म्हणतो, आत्मचिंतन नंतर करण्यापेक्षा आताच केलेलं बरं. आणि `मविआ’वाले परत आले तर आपल्याला थोडेच सोडणार आहेत? ते मिंधे गटाच्या तर हात धूवून स्वच्छ केलेले सरनाईक, त्या गवळी बाई, गुलाबराव, गोगावले-बिगावलेंना परत चिखलात लोळवतील. अपक्षांपैकी दगाबाजांना ते सोडणार नाहीत. मिंधेंची परिस्थिती अदानीसारखी होईल. हे बुडीत जाणारे मिंधे शेअर्स आपण विकत घेतलेत खरे, पण त्यांची किंमत जर आपणच वाढवून ठेवली तर हे आपल्यासुद्धा विकून खायला कमी करणार नाहीत.
चेवेंद्रजी, २०२४मध्ये केंद्रातसुद्धा आपलं सरकार नसेल, असं राजकीय तज्ज्ञ म्हणताहेत, देशभरचे विरोधक एकत्र येऊ लागलेत. काँग्रेस पण त्यांना जाऊन मिळणार बहुतेक. आपण गांधी परिवाराला संपवण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण राहुल गांधी काही हटायला तयार नाही. `भारत जोडो’ आता तो मनुष्य `विरोधक जोडो’च्या तयारीत आहे आणि अमितजींनी ईडी-सीबीआय जरी सगळ्या विरोधकांच्या मागे सोडली तरी आता कुणी घाबरायला तयार नाहीत. आपण तरी कुणाकुणाला किती दिवस तुरुंगात ठेवणार? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की महाराष्ट्रात मविआ महाविकास आघाडी आणि केंद्रात पण विरोधकांची आघाडी असं झालं की आपलंही काही खरं नाही. सोमय्या, दरेकर-बिरेकर, तुमचे उजवे हात गिरीशी महाजन यांचे हाल कुत्रा खाणार नाही आणि तुमच्या घरचं एक कोटीचं बॅग प्रकरणसुद्धा पुन्हा उघडतील ते लोक. पुरणपोळ्याऐवजी सुरणपोळ्या खायची वेळ येईल तुमच्यावर.
…तेव्हा माझ्यावर तुम्ही अठ्ठेचाळीस-कुळेला सोडलंय खरा… पण मी पुन्हा सांगतो की ४८पेक्षा जास्त जागा मिंधे गटाला मिळाल्या तर आपणही मिंधेगटासहीत बुडणार. नुस्ते बुडणार नाही, गळ्यापर्यंत बुडणार आणि प्रत्येक वेळी तरी किती बाहेर काढायचे वो?