मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला. गिरगांवात मराठी टक्का घसरला. अशी बोंब मारणार्या मराठीद्वेष्ट्यांनी पाडव्याला येऊन पाहावे. लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणार्या मराठी मनाचे त्यांनी अवलोकन करावे.
स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येते. सकाळी आठ वाजता गिरगावातील फडके श्री गणपती मंदिरापासून निघालेली यात्रा दुपारी तीन वाजता प्रिन्सेस स्ट्रीट येथे समाप्त होते. हे दीड कि.मी.चे अंतर पार करायला तब्बल सात तास लागतात. यात्रेचे शिस्तबद्ध नियोजन असल्यामुळे लाखोंच्या गर्दीतही कुठे अनुचित प्रकार घडल्याचे ऐकिवात नाही.
यात्रा ठाकूरद्वार नाक्यावर आली की तिचे सभेत रूपांतर होते आणि प्रमुख वक्ते मार्गदर्शनपर भाषण करतात. या सभेसाठी मान्यवर व्यक्तींना आणण्याची कठीण जबाबदारी माझ्यावर असे, कारण काही वर्ष प्रतिष्ठानचा मी उपाध्यक्ष होतो. खरे तर पाडव्याच्या दिवशी महनीय व्यक्ती बाहेरचे कार्यक्रम न घेता घरी राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांना घेऊन येणे कठीण जाते. वैयक्तिक मैत्रीखातर सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेबांनी माझे निमंत्रण स्वीकारले. वेळ नसतांनाही ते जळगाव येथून विमानाने आले आणि यात्रा संपताच पुन्हा विमानाने घरी गेले. निकम साहेबांना काळ्या कोटात पाहण्याची लोकांना सवय. पण यात्रेच्या ठिकाणी साहेब चक्क भगवी वस्त्रे परिधान करून आले. अशा रूपात पाहून क्षणभर लोक अचंबित झाले. पुढच्या क्षणी सर्वांनाच आनंद झाल्याचे दिसले. लोकांनी हात उंचावून टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली.
राज्याचे मा. पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनाही एकदा कार्यक्रमाला घेऊन येण्याचा माझ्यावर प्रसंग आला. मित्राच्या खाजगी गाडीतून आम्ही चर्नी रोडजवळ आलो, तेव्हा यात्रेच्या गर्दीमुळे पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवला होता. वाहतूक पोलिसाने सभास्थानी गाडी नेण्यास मनाई केली. गाडी इथेच ठेवून पायी चालत जाण्याचे त्याने फर्मावले. मी खाली उतरून त्याला ओळख सांगितली. त्याने गाडीत डोकावून पाहिले आणि खात्री करून घेतली. इनामदार साहेब कडक शिस्तीचे भोक्ते, ते चकार शब्द बोलेनात आणि मीच बोलतोय! पोलिसाने समजून उमजून बॅरिकेडस बाजूला केल्या आणि रस्ता मोकळा करून दिला.
‘राम, राम, मंडळी… या पांडू हवालदाराचा सर्वांना साष्टांग नमस्कार आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,’ असे म्हणून साहेबांनी भाषणाला सुरुवात केली. इनामदार असल्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांना इमानदारीत ड्युटी करावी लागली. त्यामुळे कुठेही गडबड गोंधळ न होता लोक शांतपणे भाषण ऐकू शकले.
असेच प्रमुख वक्ते म्हणून एकदा डॉक्टर तात्याराव लहाने यांना बोलाविण्याचे ठरले. त्यांना आणण्यासाठी गाडी हवी होती. म्हणून करेल वाडीतील सुवर्णकार गिरीश देवरूखकर यांच्या घरी गेलो. त्यांच्या मुलाची सासू आली होती. त्या म्हणाल्या व्वा..! लहाने येणार असतील तर मी नक्कीच येईन उद्या यात्रेला. ते मोठे डॉक्टर आहेत; गेल्या वर्षी त्यांनी माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन केले. एक दमडी घेतली नाही.
मग मी त्यांना इथे घेऊन आलो तर चहापाण्याची व्यवस्था होईल काय? मी.
हो.. त्यात काय एव्हढं! मी कांदेपोहेसुद्धा करीन. सासू म्हणाली.
दुसर्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता मी आणि देवरुखकर गाडी घेऊन जे.जे. रुग्णालयात पोहचलो.
डॉ. लहाने रुग्णांची नेत्रतपासणी करत होते. ऑपरेशनच्या प्रतीक्षेत बसलेल्या रुग्णांच्या डोळ्यात औषधाचे थेंब टाकून मी लगेच येतो, असे म्हणत घाईघाईने ते गाडीत बसले. सकाळी अकरा वाजता आम्ही ठाकूरद्वारला आलो, तेव्हा नुकतीच यात्रा आली होती. लहाने व्यासपीठावर येताच डॉक्टर आले दारी.. तरी डोळे दाखवून घ्यावे, असे वाटल्याने यात्रेतील सोंगाडे, गोंधळी, वारकरी यांनी व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला. ज्यांना जमले नाही त्यांनी खालूनच डोळे मारायला सुरुवात केली. डावा डोळा मिटून उजवा डोळा पुन्हा डावा.. असे आँखो आँखो में सुरु झाले. लहाने म्हणायचे बघतो.. थांबा.. बघतो.. गर्दी कमी होऊ द्या, मग बघतो.. पण कोण ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यात्रेतील एक वासुदेव चिपळ्या वाजवीत चक्क व्यासपीठावर आला. त्याने डॉक्टरांना डोळे वटारून दाखवले. डोळ्यासाठी कोणती औषधे घ्यावीत, एका दिवसात किती गाजरे खावीत, यावर प्रश्नोत्तरे झाली. लहाने यांचे भाषण कधी होते आणि ते खाली कधी येतात याची लोक वाट पाहात होते.
भाषण झाल्यावर लहानेंना चहाची तलफ आली. समोर सनशाईन हॉटेल होते पण तेथे गेलो असतो तर पुन्हा लोकांच्या ‘डोळ्यात’ आले असते. म्हणून लगेच गाडी काढली आणि देवरुखकरांच्या घरी निघालो. कांदेपोहे आणि चहापानाचा बेत काल ठरला होता, पण घरी गेलो तेव्हा दाराला टाळे लावले होते. ते बघून देवरुखकरांचे टाळकेच फिरले. त्यांनी चौकशी केली तर बायको आणि मुलाची सासू प्रतिष्ठानच्या यात्रेत सामील झाल्याचे समजले. त्यांनी मोबाईलवर संपर्क केला तर पलीकडून ढोलताश्याच्या आवाजाने बोलणे ऐकू येत नव्हते. मी थोडा वेळ त्यांची वाट पाहिली आणि माझ्या घरी फोन लावला. बराच वेळ रिंग वाजत राहिली म्हणून शेजारी फोन केला, तर ते म्हणाले, तुमची बायको आणि मुलगी यात्रेत गेलीत. मुलीच्या मोबाईलवर संपर्क केला तर पुन्हा वाजंत्रीचा आवाज. हॅलो… हॅलो… म्हणता मेलो… मेलो… म्हणायची वेळ आली. सारी कुटुंबेच प्रतिष्ठानच्या यात्रेत सामील झाली होती.
मी बराच प्रयत्न करून हतबल झालो. अखेर डॉक्टरांची माफी मागितली. आपण जे.जे.जवळ हॉटेलमध्ये चहा घेऊ म्हणालो आणि त्या दिशेने निघालो. वाटेत लहाने म्हणाले, माझ्या ऑफिसमध्ये चला, मीच तुम्हाला चहा पाजतो.
आम्ही खजील झालो. डॉक्टरांचा चहा घेताना जीभ भाजली. देवरुखकरांचे ते कांदेपोहे आणि कसलं काय? बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात.