□ माझा भाऊ घाबरणारा नाही – प्रियंका वाड्रा.
■ आता या चोरांना कोणीच घाबरणार नाही देशात. अति झालं आणि हसू आलं.
□ अदानींच्या कंपनीसाठी कोकणात २८४ हेक्टर जमिनी बळकावल्या; विनायक राऊत यांनी कागदपत्रेच दाखवली…
■ वर त्यांचे सेवक बसले आहेत, इथे त्या सेवकांचे चाकर बसले आहेत… गतिमान कारभार म्हणतात तो हाच!
□ ईव्हीएमविरोधात विरोधक एकवटले.
■ विरोधकांमधली फाटाफूट आणि लाथाळी कायम राहिली तर सत्ताधार्यांना ईव्हीएमचीही गरज नाही, हे आता तरी लक्षात आले असेल का पक्के?
□ स्कूल बस महागणार; पालकांच्या खिशाला फटका.
■ मोदीकाळात देशात काय स्वस्त झाले आहे? स्कूलबसचा अपवाद कसा असेल?
□ नद्यांचा विकास करताना झाडांचा बळी देऊ नका – आदित्य ठाकरे.
■ आदित्यजी, मुळात यांची नद्यांचा विकास ही कल्पनाच नद्या आणि झाडं या दोन्हींचा बळी घेणारीच आहे.
□ पाच वर्षांत टीबीमुळे मुंबईत ११ हजार ७९६जणांचा मृत्यू.
■ तरी बेअक्कल लोक पानमावे, गुटखे खाऊन गावभर पचापचा थुंकायचे थांबत नाहीत.
□ लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारावेत – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड.
■ जज्जसाहेब, पोटावर पाय का आणताय त्यांच्या? नोकर्या जातील ते असं काही करू लागले तर.
□ ‘जोडे मारो’ आंदोलन करणार्या सत्ताधार्यांची विधानसभा अध्यक्षांकडून कानउघाडणी.
■ असल्या आंदोलनांतून कुणाचा अवमान होत नाही का?
□ विधान भवनाच्या पायर्यांवर रंगले घोषणायुद्ध; ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’.
■ बोके हयात आहेत तोवर त्यांची या घोषणेपासून सुटका नाही.
□ वीजबचतीच्या नावाखाली उद्याने व मैदानातील दिवे रात्री बंद.
■ ही बचत लोकांच्या जिवावर आणि वित्तावर बेतेल हो एखाद्या रात्री! इतर ठिकाणचे दिवे पाजळणं कमी करा आणि इथले लावा.
□ अजून किती शेतकर्यांच्या आत्महत्यांची वाट बघणार?- अंबादास दानवे.
■ शेवटचा शेतकरी आत्महत्या करेल, तेव्हाच तर कंत्राटी शेतीचा मार्ग मोकळा होईल ना?
□ मिंधे सरकार झोपलेय… कर्नाटकने सोलापूरकरांचे पाणी पळवले; राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जयंत पाटील यांचा आरोप.
■ झोपलेले नाहीत ते, गतिमान जाहिराती आणि इतर बरंच काही छापण्यात मश्गुल आहेत.
□ ‘नैना’विरोधात रायगडातील २३ गावे रस्त्यावर.
■ नैना ठग लेंगे ठग लेंगे हे गाणं त्यांच्या बाबतीत वेगळ्या अर्थाने खरं झालंय तर काय करतील?
□ मोदींना झोप येत नसल्यामुळेच ते राग-राग करतात – अरविंद केजरीवाल यांचा टोला.
■ राग राग करतात की रागा रागा (राहुल गांधी यांच्या नावाचे लघुरूप) करतात?
□ समृद्धी महामार्गात एक हजार कोटींचा घोटाळा – काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा आरोप.
■ फक्त…?
□ या देशात चोराला चोर म्हणणे हा गुन्हा झालाय – उद्धव ठाकरे यांची जळजळीत प्रतिक्रिया.
■ मोदी सरकारवर टीका करणार्यांना लवकरच श्वास घ्यायलाही बंदी घालतील हे उद्धवजी!
□ ईडी, सीबीआयविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका.
■ याचिकाकर्त्यांच्या मागे आता ईडी, सीबीआय लागणार…
□ सूड आणि बदल्याचे राजकारण हाच पंतप्रधान मोदींचा अमृतकाल – संजय राऊत.
■ देशासाठी हा विषकाल ठरतो आहे पण.
□ सडेतोड निकाल देणार्या न्यायमूर्तींकडील प्रकरणे दुसर्या खंडपीठाकडे वर्ग; हायकोर्टाच्या रोस्टरमध्ये अचानक बदल.
■ तिथलेही मोदीभक्त जागे झाले तर… या वाळवीने देश पोखरला सारा.
□ अर्ध्या तिकिटात महिला सुसाट; आठवडाभरात ७५ लाख महिलांनी केला एसटीने प्रवास.
■ पूर्ण तिकीट देणार्यांना बसायला जागा मिळाली नसेलच, किमान उभं तरी राहायला मिळतंय का?
□ राज्यात विकासाऐवजी गुन्ह्याचा वेग वाढला – अजित पवार यांचा सरकारवर घणाघात.
■ चोर चोर मौसेरे भाई म्हणतात ते काय उगाच!
□ माझ्यावरील आरोपांचे कोणतेही पुरावे नाहीत – अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण.
■ तरीही इतका काळ तुरुंगात डांबून ठेवलंच ना तुम्हाला? सगळ्यांचे कणे मोडण्यासाठीचे डावपेच आहेत हे.
□ हे सरकार सत्ताधार्यांची खासगी प्रॉपर्टी आहे का?- उपसभापतींना डावलल्यामुळे विरोधक आक्रमक.
■ त्यांना अख्खा देश हीच आपली प्रॉपर्टी वाटू लागला आहे.
□ भाईंदरमध्ये पिंजरा लावला डुकरासाठी, अडकला बिबट्या.
■ डुक्कर बाहेरून टुक टुक करून गेलं असणार बिबट्याला!