• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हे राम!

मर्मभेद

marmik by marmik
July 3, 2026
in मर्मभेद
0
हे राम!

साडेतीन दशकांपूर्वी बाबरी मशीद नावाची वादग्रस्त वास्तू कोणी पाडली, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा सगळे चिथावणीखोर कानावर हात ठेवू लागले, ते मराठी बोलणारे शिवसैनिक होते, असं सांगू लागले. हे कानावर आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबईतून गर्जले होते की तसं असेल तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे…! आज पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे… त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी गद्दारी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी ही आता ‘बाबर जनता पार्टी’ झाली आहे, असे जनतेच्या प्रचंड प्रतिसादात ठणकावत आहेत…काळाचे एक आवर्तन पूर्ण झाले आहे…प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराच्या नावाने इतकी वर्षे देशाला ठगणारे लोक देशाच्या श्रद्धेचा एक केंद्रबिंदू असलेल्या त्या मंदिरालाही सोडत नाहीत, तेही लुटण्यात मग्न आहेत, हे पाहून देश अवाक् झालेला आहे.
‘राम के नाम’ हा आनंद पटवर्धन यांचा खळबळजनक माहितीपट. प्रभू रामचंद्र हे सर्वसामान्य भोळ्या भाबड्या भारतीयांसाठी आदर्श पुरुष, आदर्श पती, आदर्श मुलगा आणि देशाचं एक परमोच्च श्रद्धास्थान असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिवार आणि भाजप यांच्यासाठी हा पहिल्यापासूनच एक निव्वळ राजकीय विषय होता, हे या माहितीपटाने अधोरेखित केलं होतं. भारतीयांच्या श्रद्धा चेतवताना या परिवाराने गावखेड्यात सगळ्या धर्मांचे, पंथांचे, जातींचे लोक एकमेकांना भेटल्यावर ‘रामराम’ ही जी साधीसुधी गोडव्याची, जिव्हाळ्याची हाक मारायचे, ती संपवली आणि ‘जय श्रीराम’चा उग्र नारा समाजात फूट पाडण्यासाठी वापरला. सात्विक तेजाने उजळलेली सीतारामांची मंदिरं, तिथले शांत, संयत भक्तिभावाचे वातावरण लोप पावले आणि सीता-राम यांच्या नशिबात पुन्हा एकदा ताटातूट आली. धनुर्धारी एकाकी रामांची प्रतिमा प्रबळ करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने देशातील बहुसंख्याकांची जनभावना, श्रद्धा, आस्था यांचा विचार करून निकाल दिला आणि अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग खुला झाला. पक्षीय भेदाभेदापलीकडे सर्वसामान्यांनी एकत्रपणे येऊन जी अस्मितेची लढाई लढली, तिची परिणती एका पक्षाने सगळे श्रेय हडपण्यात झाली. या आंदोलनाचं पितृत्त्व घ्यायलाही नकार देणार्‍या विचारधारेच्या मुखंडांची हिंमत इतकी वाढली की बाल रामचंद्राचे बोट धरून तेच त्याला मंदिरात विराजमान करायला निघाले आहेत, असं चित्रण करतानाही कोणाला शरम वाटली नाही. अर्थात, त्याचा फटका त्याच वेळी बसला. खुद्द अयोध्येतच भाजपचा पराभव झाला. अनेक धर्मक्षेत्रांमध्ये त्यांच्या उमेदवारांना धूळ चाखावी लागली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीत निसटता विजय मिळाला, तोही निवडणूक आयोगाच्या कृपेने मिळाला, अशी चर्चा कायमच होत राहिली.
बघा बघा, मुघलांनी आपली किती मंदिरं पाडली, याबद्दल उठता बसता जन आक्रोश वगैरे करून दाखवणार्‍या या परिवाराने त्याआधी किती राजांनी मंदिरं पाडली, ते कधी सांगितलं नाही. मुघलांना दिशादर्शन करणारे कोण होते, कुठे किती संपत्ती दडली आहे, हे सांगणारे कोण होते, ते सांगितलं नाही. मंदिरांच्या नावाखाली सगळ्या धर्मावर वेटोळे घालून कोण बसले होते, शोषणाच्या उतरंडीच्या सर्वोच्च स्थानावर कोण होते, याची कधी चर्चाच केली नाही. अर्थात, मंदिर उभारल्यानंतर काही वर्षांतच ते उघडे पडले आहेत. मंदिराच्या रूपाने आपण कसे एक दुकानच उभारले आहे, हे या परिवाराचेच सदस्य अयोध्येत दाखवत आहेत. रामाला आम्ही घेऊन आलो, असा उन्मत्त दावा करणारे आज त्या रामाचे देऊळ दिवसा ढवळ्या लुटत आहेत.
बाबर जनता पार्टीचा हा पॅटर्न काही नवा नाही.
यांना इतिहासाशी, देवाधर्माशी काहीही देणं घेणं नाही. पुरातन वास्तू, मंदिरं यांचं जतन करण्याची कळकळ किंवा बुद्धीही यांच्यातही नाही. ‘तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ असं तुकोबारायांसारख्या संतांनी कितीही सांगितलं तरी देवाला सगुण साकार रूपात पाहण्याची आस बाळगणारे देवाचे भक्त तीर्थक्षेत्री येणार, तिथे भक्तिभावाने दान करणार, हे लक्षात घेऊन तिथे धर्माची दुकानं उघडण्याचं काम ज्यांनी शतकानुशतकं केलं आहे, त्यांचेच हे वैचारिक वंशज आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्रांचं पावित्र्य हिरावून घेणारा भोंगळ विकास करत सुटायचं, कॉरिडॉर बनवत सुटायचे, त्यानिमित्ताने एकाच राज्यातले व्यापारी, कंत्राटदार यांचं भलं करायचं आणि दिल्लीतल्या सर्वोच्च नेत्यांच्या वर्तुळातल्या चमच्यांची सोय लावायची, हा सगळा उद्योग सगळ्याच तीर्थस्थळांवर बेबंदपणे सुरू आहे. ज्यांना माणसांच्या बाबतीत संवेदना नाहीत, ते पर्यावरणाबद्दल कसली संवेदना बाळगणार! करताहेत बांधकामं, बांधतायत रस्ते, खचवतायत हिमालय! सामान्यजन मरतील तर मरू देत. त्यांना मोक्ष मिळाला, म्हणून हेच कोकलून सांगतील.


अयोध्येतही हाच सगळा प्रकार सुरू आहे. तिथे कोणी, किती आणि कसे खाल्ले आहे, ते पाहिले की सश्रद्ध माणसाचा देवावरचा विश्वास उडेल? देवाच्या मंदिरात खुद्द देवालाच लुटणारे सैतान नेमले गेले आहेत आणि देव त्यांना शिक्षाही करत नाही? गोरगरीबांनी अक्षरश: पोटाला चिमटा घेऊन दानधर्म केला आहे. कुणी शेत विकलं, कुणी घरातलं मंगलकार्य सोडून देवाला दान दिलं, त्या सगळ्यावर या हरामखोरांनी रामाच्या नावाने डल्ला मारावा? चांदीच्या विटा, सोन्याचे दागिने, रोख रक्कम सगळं हडप करावं!
आता उत्तर प्रदेश सरकारने चौकशीचं ढोंग उभं केलं आहे, पण त्यात मूळ गुन्हेगार मोकाट सोडून चिरकुट साथीदारांना अडकवण्याची पूर्ण तयारी दिसते आहे. शिवाय, दिल्लीतून ज्यांची या सगळ्यावर देखरेख करण्याची जबाबदारी होती, त्यांनी इथल्या झळा अधून मधून स्वदेशाच्या भेटीवर येणार्‍या पंतप्रधानांना लागू नयेत, यापुरती बांधबंदिस्ती करण्यापलीकडे काहीच केलेलं नाही. या अपहाराची दिल्लीत कुणाला काही कल्पनाच नव्हती, असा बनाव उभा केला की त्यांची जबाबदारी संपली.
प्रभू श्रीरामांच्या नावाने देशातल्या बहुसंख्याकांची अस्मिता चेतवून, त्यांच्या नावाने राजकारण करून देशात निरंकुश सत्ता मिळवण्यापर्यंतची मजल ज्यांनी मारली, त्यांनीच ‘राम का नाम बदनाम’ करणारे दरोडे घालावेत आणि वर या गैरप्रकाराबद्दल बोलून प्रभू श्रीरामांना बदनाम करू नका, असा उलटा दम भरावा!
हे उफराटं चित्र पाहून प्रत्येक रामभक्त ‘हे राम’ म्हणून हळहळत असेल!

Previous Post

तीर्थापेक्षा सज्जन श्रेष्ठ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.