
तीर्थी धोंडा पाणी ।
देव रोकडा सज्जनी ।।१ ।।
मिळालिया संतसंग।
समर्पिता भले अंग ।।२ ।।
तीर्थी भाव फळे।
येथे आनाड ते बळे ।।३ ।।
तुका म्हणे पाप।
गेले गेल्या कळे ताप ।।४ ।।
प्रस्तुत अभंगात तुकोबाराय सज्जनाची महती सांगतात. सज्जन माणूस हा तीर्थापेक्षा श्रेष्ठ असतो असं त्यांचं म्हणणं आहे. इथे सज्जन हा शब्द संतांच्या संदर्भात आलेला आहे. तुकोबारायांच्या या अभंगातलं पहिलं चरण सगळीकडे प्रसिद्ध आहे. तीर्थात फक्त दोनच गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे धोंडा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी. त्या दगडाला लोक देव समजतात आणि पाण्याला तीर्थ समजतात. एवढ्या उघड आणि रोखठोक भाषेत तुकोबाराय तीर्थयात्रेतला फोलपणा दाखवून देतात. तुकोबारायांचा हा अभंग म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि कबीर या दोन संतांच्या ओव्या आणि दोह्यांचे एकत्रित सार आहे.
जत्रा मे फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी।
दुनिया भई दिवानी, पैसे की धुलधानी ।।
हा कबीरांचा दोहाच तुकोबारायांच्या प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणात संक्षेपाने आला आहे. एखाद्या ठिकाणी एक धोंडा आणि पाणी ठेवून त्यालाच देव आणि तीर्थ बनवलं जातं. हा केवळ पैसे उकळण्याचा प्रकार असतो.
तुकोबारायांच्या मते खरा देव हा सज्जनांच्या ठिकाणी असतो. इथे सज्जन म्हणजे संत. संत आणि तीर्थ यांची तुलना प्रस्तुत अभंगात तुकोबारायांनी केलेली आहे. हीच तुलना ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर माऊलींनीही केलेली आहे. तीर्थाच्या ठिकाणी असणारी न्यूनता संतांच्या ठिकाणी नाही हा त्या ओव्यांचा आशय आहे. गीतेच्या बाराव्या अध्यायात सोळाव्या श्लोकावर भाष्य करताना या ओव्या आलेल्या आहेत.
अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः। सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्त स मे प्रियः।।१६ ।।
या श्लोकात आदर्श सज्जनाची म्हणजेच पर्यायाने संतांची लक्षणं सांगितली आहेत. ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, जो त्याच्या शुचित्वाविषयी दक्ष असतो, आकाशासारखा उदासीन असतो आणि कर्माच्या अहंकाराचा त्याग करतो तोच देवाचा प्रिय भक्त आहे. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानदेवांनी जाणीवपूर्वक तीर्थाच्या तुलनेत संतांची श्रेष्ठता दाखवून दिलेली आहे.
मोक्ष देऊनी उदार। काशी होय कीर।
परि वेचावे लागे शरीर। तिये गावी ।।
अर्थ – काशीत मोक्ष मिळतो पण त्यासाठी तिथं मरण यावं लागतं.
गंगा शुची होये। पापताप जाये।
परि तेथ आहे। बुडणे एक ।।
अर्थ – गंगेत शुचित्व येतं आणि पापतापही जातात पण त्यासाठी तिथं बुडावं लागतं.
हिमवंती दोष जाये।
परि जीवितासि हाणि आहे।
तैसे शुचित्व हे नव्हे। सज्जनाचे ।।
अर्थ – हिमालयात दोष जातात पण त्या ठिकाणी जीवित्वाला हानी पोचण्याचा धोका असतो. सज्जनाच्या शुचित्वाला ही मर्यादा नसते.
खोलिये पारु नेणिजे। तर्ही संती न बुडीजे। वरि रोकडाचि लाहिजे। न मरता मोक्षु ।।
अर्थ – संतत्वाची खोली गंगेपेक्षा अधिक असली तरी तिथे बुडण्याचा धोका नसतो आणि न मरताही रोकडा मोक्ष मिळतो.
संतांचेनी अंगलगे। पापाते जिणणे गंगे। तेयाचेनि संगे। शुचित्व कैसे ।।
अर्थ – संतांच्या सहवासाने गंगेलाही इतरांना शुचित्व देण्याचं सामर्थ्य मिळतं.
ज्ञानेश्वरीतल्या या ओव्यांचा अर्थ मुळातून समजून घेण्याची गरज आहे. इथे माऊली तीर्थाचं माहात्म्य नाकारत नाहीत पण संतांची श्रेष्ठता सांगून त्याची न्यूनता दाखवतात.
१) काशी – मरणोत्तर मोक्ष देत असल्यानं शरीरनाशाची न्यूनता
२) गंगा – बुडण्याच्या भीतीची न्यूनता
३) हिमालय – जीवित्वाच्या नाशाची न्यूनता
लोक तीर्थाला जातात ते पाप धुण्यासाठी. त्यालाच पापक्षालन म्हणतात. त्यासाठी दोघांची मदत घेतली जाते. एक तीर्थाची आणि दुसरी संतांची. तीर्थाच्या ठिकाणी पापक्षालन होतं पण त्याला मर्यादा आहेत असं सांगून माऊलींनी संतांचा महिमा सांगितला. मुळात यातून तीर्थाची जरुरी नाही हेच माऊलींना सांगायचं होतं. तेच त्यांनी सूचक स्वरूपात मांडलं. त्यांचा हाच विचार पुढच्या काळात कबीरांनी आणि तुकोबारायांनी अधिक स्पष्ट आणि रोखठोक स्वरूपात मांडला. त्यांनी तीर्थात खर्या अर्थाने पापक्षालन होत नाही हेच दाखवून दिलं. तीर्थात पापक्षालन होत असतं तर तीर्थाच्या पाण्यातील जलचरही पवित्र आणि पुण्यवान मानावे लागतील असा युक्तिवाद त्यांनी केला.
तुका म्हणे सुसर जळी।
कावळी का न न्हाती ।।
असा तुकोबारायांचा सवाल आहे. विविध तीर्थाच्या ठिकाणी लोक पापक्षालनासाठी स्नान करतात. केवळ स्नान केल्यानं मनाची मलीनता आणि पापबुद्धी धुतली जात नाही. पापक्षालनासाठी खरंतर अनुतापाच्या भावनेची गरज असते. केलेल्या पापाविषयी जर चित्तात अनुतापच नसेल तर ते पाप जाणारच नाही.
अनुतापे दोष ।
जाय न लागता निमिष ।।१ ।।
परि तो राहे विसावला।
आदी अवसानी भला ।।२ ।।
हे चि प्रायश्चित।
अनुतापी न्हाय चित्त ।।३ ।।
तुका म्हणे पापा।
शिवो नये अनुतापा ।।४ ।।
तुकोबाराय या अभंगात अनुतापाचा महिमा सांगतात. अनुताप म्हणजे प्रामाणिक पश्चातापाची भावना. केलेल्या अपराधाविषयी अनुतापाची भावना निर्माण झाली तर माणूस सहजासहजी पाप करत नाही. त्यामुळे अशी भावना असणं म्हणजे पापबुद्धीचा समूळ नायनाट करणं. जिथे अनुताप आहे तिथे पाप स्पर्शही करत नाही असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. अनुतापाच्या तीर्थात स्नान करणं हेच खरं प्रायश्चित आहे असं तुकोबा म्हणूनच म्हणतात. तुकोबारायांच्या काळात प्रायश्चित म्हणून यज्ञयागादी कर्मकांडासह तीर्थात स्नान करण्याचीही तजवीज होती. तुकोबाराय मात्र तीर्थातल्या स्नानाऐवजी अनुतापाच्या स्नानाचा तर्कशुद्ध मार्ग प्रतिपादन करताना दिसतात.
अनुतापाची प्रामाणिक भावना निर्माण व्हायची असल्यास त्यासाठी संतसंगतीची गरज आहे. प्रस्तुत अभंगाच्या दुसर्या चरणात तुकोबाराय तेच सांगतात. ‘मिळालिया संतसंग। समर्पिता भले अंग ।।’ असे तुकोबांचे शब्द आहेत. त्यामुळेच तीर्थापेक्षा संतसंगती महत्त्वाची आहे हा ज्ञानोबारायांनी मांडलेला विचार इथे प्रकट होताना दिसतो. संतांमुळे तीर्थालाही पावित्र्य येतं. तीर्थाच्या ठिकाणी बहुतांश लोक पापक्षालनासाठी येतात. त्यामुळे तीर्थक्षेत्रं म्हणजे पापी लोकांची केंद्रं असतात. नेमक्या त्याच ठिकाणी आलेल्या लोकांना संतसंगतीची सर्वाधिक जरुरी असते. त्यामुळेच नामदेवराय आणि ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रा केली. ही तीर्थयात्रा त्यांच्या पापक्षालनासाठी नव्हती तर ती लोकांच्या मनात अनुतापाची भावना निर्माण करून त्यांना सन्मार्गाला लावण्याची होती. त्यामुळेच त्यांच्या दर्शनाने गंगाही पावन झाली अशी कथा आहे. या कथेचा बोध एवढाच की संतसंगतीत तीर्थाच्या ठिकाणी आलेल्या लोकांचाही उद्धार होऊ शकतो. पण तीर्थाच्या ठिकाणी संत अपवादानेच जातात. त्यामुळे पापक्षालनासाठी तीर्थाचा नव्हे तर संतसंगतीचा मार्ग अवलंबण्याची गरज आहे.
तीर्थाच्या ठिकाणी पुरोहितांची दुकानदारी चालते. त्यांचा हा बिनभांडवली धंदा आहे. लोक तीर्थाच्या ठिकाणी श्रद्धेने येतात. पण त्यांचं पापक्षालन झाल्याची कोणतीही खूण दिसत नाही. ‘पाप गेल्याची काय खूण। नाही पालटले अवगुण ।।’ असं तुकोबा म्हणतात. संतांच्या संगतीत मात्र अनुतापाची भावना निर्माण होऊन पाप निघून जातं.
धन्य आजी दिन।
झाले संतांचे दर्शन ।।१ ।।
झाली पापातापा तुटी।
दैन्य गेले उठाउठी ।।२ ।।
संतांच्या दर्शनानंतर पाप आणि ताप निघून जातात. इथे दर्शन म्हणजे केवळ बघणं अथवा पाया पडणं नव्हे. दर्शन म्हणजे तो विचार अंतरात मुरणं. संत हे माणसाच्या बदलावर विश्वास ठेवतात. त्यामुळे अगदी दुष्ट माणूस असला तरी त्याला सुधारण्याचा तळमळीने प्रयत्न करतात. तीर्थात फक्त भाविकाचा भाव वाढतो पण संतांच्या संगतीत आनाडही सन्मार्गाला लागतो.
तीर्थी भाव फळे। येथे आनाडही बळे ।।
तीर्थाचा आणखी एक दोष म्हणजे त्यामुळे अहंकार वाढतो. ‘करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती वो’ असं निळोबाराय म्हणतात. त्यामुळेच वारकरी संप्रदायाला तीर्थाटन मंजूर नाही. पण, मग त्यांनी पंढरीचा महिमा का सांगितला, असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. तो सांगण्याचं कारण म्हणजे पंढरीत लाभणारा संतसंगतीचा लाभ. पंढरपुरात संतांचे अभंग कानावर पडतात. त्यांच्या अभंगावर भजन-कीर्तन केलं जातं. त्यातून संतांचा विचार अंतःकरणात रुजतो. त्यातून अनुतापाची भावना निर्माण होते आणि खर्या अर्थाने पापक्षालन होतं. इतर तीर्थाटनाने अहंकार निर्माण होतो तर संतविचारावर आधारित वारी केली की मनातला अभिमान निघून जातो. ‘उठाउठी जाय अभिमान। सांगा ऐसे स्थळ कोण ।।’ असा प्रश्न तुकोबाराय विचारतात आणि ‘ते या पंढरीस घडे। खळा पाझर रोकडे ।।’ असं उत्तर देतात.
वारकरी संप्रदायाने तीर्थाविषयी सांगितलेला दृष्टिकोन किती महत्त्वाचा होता याची साक्ष आता आपल्याला राम मंदिरात झालेल्या चोरीवरून पटलेली आहे. संपूर्ण देशाच्या राजकारणात जे केंद्रस्थानी होतं त्याच मंदिरात कोटीकोटींचा भ्रष्टाचार व्हावा हे भयंकर आहे. लोक पापक्षालनासाठी आणि काही वेळा भाबड्या श्रद्धेनेही दानपेटीत पैसे आणि इतरही मौल्यवान गोष्टी टाकतात. त्याचा विनियोग देवासाठीच होत असेल अशी त्या भाबड्या मनाची अपेक्षा असते. वास्तवात तसं काहीच घडत नाही. उलट चोर्यामार्यांचे प्रकार वाढतात. अनेकदा देवांचे सोन्याचांदीचे मुकुट, मूर्ती आणि कळसही गायब होतात. त्याचा तपासही लागत नाही. ही झाली छुपी चोरी. पुरोहितांनी यजमानांकडून वसूल केलेली दक्षिणा ही तर उघड केलेली चोरी असते. मुळात हातपाय मजबूत असलेल्या पुरोहितांना दानधर्म करण्याची गरजच नाही. त्यांनी कष्ट करून उदरनिर्वाह करावा. दानधर्म करायचा असेल तर गाडगेबाबा म्हणतात त्याप्रमाणे तो आंधळ्या पांगळ्या लोकांना करावा. चुकीच्या ठिकाणी होणारा दानधर्म संतांना मंजूर नाही.
करी आणिकांचा अपमान।
खळ छळवादी ब्राह्मण।
तया करिता दान।
जाती उभयता नरकामध्ये ।।१ ।।
तुकोबाराय म्हणतात की जो अनेकांचा अपमान करतो आणि छळ करतो असा दुष्ट ब्राह्मण आणि त्याला दान करणारा यजमान दोघेही नरकात जातात.
तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या अखेरच्या चरणात म्हणतात की पाप गेल्याची खूण म्हणजे त्याचा ताप जाणं. ताप म्हणजे त्रिविध ताप. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तीन ताप आध्यात्मात सांगितलेले आहेत. या तीनही तापाचं मूळ म्हणजे मानसिक अशांतता. एकदा मन प्रसन्न असलं की मग त्याची पाप करण्याची वृत्ती आपोआप संपते. तेच संतांच्या संगतीत घडतं. त्यामुळे तीर्थाटन टाळून संतविचारांचा संग करणं महत्त्वाचं आहे. आता आपल्याला संतांची संगत मिळवायची असल्यास त्यांच्या गाथा वाचणं गरजेचं आहे. आता जे तथाकथित भोंदू स्वतःला संत मानतात ते खरे संत नाहीत. जे खरे वारकरी संत आहेत त्यांची संगत लाभायची असल्यास त्यांचा विचार आत्मसात करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांचे अभंग समजून घेऊन आचरणात आणणं गरजेचं आहे.

