
अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीमुळे देश-परदेशातील रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. या प्रकरणातील टिनू यादव, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, करुणेश पांडे, सुभाष श्रीवास्तव, रामशंकर मिश्रा या आठ जणांना अटक झाली. परंतु त्यांचे म्होरके मात्र मोकाटच आहेत.
राम मंदिर आंदोलनात सुरुवातीपासून असलेले संतोष पांडे यांनी एका मुलाखतीत या चोरीसंबंधी बर्याच धक्कादायक माहिती उघड केल्या आहेत. ते स्वतः एक कारसेवक होते. ते म्हणतात, ‘राम मंदिर निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वस्वाचा होम केला. माझ्या घरादारावर बुलडोझर चालवला गेला. मी चार गोळ्या खाल्ल्या. १७ हाडे मोडली आणि तीन वेळा ‘रासुका’ लागला. या सर्व आंदोलनात १९० कारसेवक शहीद झाले. त्यांच्या कुटुंबाला कुणी विचारत नाही. त्यांची घरे उद्ध्वस्त झाली. मात्र भाजपा आणि संघवाल्यांनी आपले ‘महाल’ बांधले. रामाच्या नावाने सत्तेवर आले. सत्ता मिळताच राम मंदिराची लूट केली, असा कृतघ्नपणा या लोकांनी केला.
राम मंदिर ट्रस्टमध्ये १५ सदस्य आहेत. परंतु समितीचे सरचिटणीस चंपतराय बन्सल, विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा, गोपाळ राव आणि गोविंद गिरी यांचेच ट्रस्टवर वर्चस्व आहे. त्यांना हात लावण्याचा कुणी प्रयत्न करीत नाही. कारण त्यांच्यामागे भाजपाची ‘महाशक्ती’ आहे. असा आरोप दुबे यांनी केला आहे. ट्रस्टच्या चौकडीनेच चोरी केली आणि आता या चोरांनीच चौकशीसाठी एसआयटी नेमली. चंपतराय आणि डॉ. मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. पण दोघांनीही त्यांच्यावरील चोरीचा आरोप फेटाळण्याचा निर्लज्जपणा केला आहे.
मूळ अयोध्यावासीयांना विस्थापित करून जवळ-जवळ अर्ध्या अयोध्येवर गुजराती व्यापार्यांनी कब्जा केला आहे. राम मंदिराचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी संघात ‘नमस्ते जी’ म्हणण्याचा प्रघात होता. राम मंदिर आंदोलन सुरू झाल्यानंतर संघवाले ‘जय श्रीराम’ म्हणू लागले. राम मंदिर लुटल्याची चर्चा देशभर झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उपरती झाली. ‘या चोरीमुळे रा. स्व. संघ दुःखी आहे. पण या मागे हिंदुधर्माला जे बदनाम करण्याचे षडयंत्र करीत आहे ते हिंदुंनी हाणून पाडावे’ असे आवाहन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. तर त्यांचे मत तेच माझेही मत आहे असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले.
१९८९ साली अयोध्येत राममंदिराचे शिलापूजन झाले. त्यासाठी देश-परदेशातून सव्वा कोटी शिला आल्या होत्या. त्यात १,२५० रामशिला या सोने, चांदी आणि हिरे माणकांनी जडवलेल्या होत्या. कार्यशाळेत तिहेरी सुरक्षेच्या देखरेखीखाली त्या ठेवल्या होत्या. तरी २००२ मध्ये या १,२५० शिला तेथून गायब झाल्या. २००२ पासून ही लूट सुरू झाली. चंपताराय बन्सल हे विश्व हिंदू परिषदेचे- ते ट्रस्टचे सरचिटणीस झाले आणि त्यांचे नशीबच उघडले. ट्रस्टच्या चाव्या त्यांच्याकडे गेल्या, चोराच्या हाती खजिना गेला. राम मंदिराच्या आंदोलनात डॉ. अनिल मिश्रा कुठेही नव्हते. पण संघाशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे तेही ट्रस्टी बनले. मंदिरासाठी लागणारी वाळू, लोखंड, सिमेंट, संगमरवर याचा सर्व व्यवहार त्यांच्या ‘खास’ देखरेखीखाली झाला. राम मंदिर बांधकामावर अभियंता असलेल्या दीनानाथ वर्मा यांनी सगळा भांडाफोड केला आहे.
राम मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी तेथील आजूबाजूची मंदिरे पाडण्यात आली. परिक्रमा पथात येणारी सगळी मंदिरे उद्ध्वस्त केली. पण गाजावाजा होऊ नये म्हणून खजुरवाली मशीद मात्र पाडली नाही. चंपतराय यांनी तेथील राम फकिरे मंदिर चार कोटींना खरेदी केले. मंदिराशेजारी असलेली जागा २३ कोटी रुपयांत खरेदी केली. चंपतराय, डॉ. अनिल मिश्रा आणि गोपाळ राव यांच्या आशीर्वादाने अयोध्याच्या परिसरात पंचतारांकित हॉटेल्स उभी राहिली. अयोध्येतील चोरीनंतर आता बद्रिनाथ आणि केदारनाथ मंदिरातील देणगी चोरी देखील उघडकीस आली आहे. या मंदिर समितीच्या अध्यक्षाचे स्वीय सहाय्यक व कर्मचारी यांच्यावर गैरकारभाराचा-चोरीचा आरोप भैरव सेना या धार्मिक संघटनेचे अध्यक्ष संदीप खत्री यांनी केला आहे.

राम मंदिरातील देणगी चोरीमुळे देशातील श्रद्धाळू रामभक्तांचा विश्वासघात झाला असतानाच अयोध्या विकास प्राधिकरण कार्यालयाचा जिना ढासळला आहे. भक्कम चौफेर विकासाचे दावे करणार्या भाजपाची पोलखोल झाली आहे. विकासाला भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळे अयोध्येतील मंगलमय परिसर अमंगल वाटू लागलाय. राम मंदिर देणगी घोटाळा हा हिंदुत्वाच्या भाजपाच्या अंजेडावर एक कलंक आहे असे मत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मांडले आहे. कारण त्यांना चिंता आहे ती २०२७ साली होणार्या विधानसभा निवडणुकीची.
भाजपाला रामाचे नाव फक्त सत्ता मिळवण्यासाठी वापरायचे असते. भाजपचे हिंदुत्व म्हणजे ‘मुँहमे राम आणि मंदिर चोरीचे काम’ आहे. तर ‘मुँहमे राम, बेरोजगारांना काम आणि शेतमालाला हमीभाव’ हे शिवसेनेचे हिंदुत्व आहे. राम मंदिराचा खजिना लुटणारे, दान-देणग्यांवर दरोडा घालणारे हे ‘हिंदुधर्माचे रक्षक नाहीत तर भक्षक’ आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी हिंदु-मुस्लीम दंगल घडवून आणणे, लव्ह जिहादसारखी प्रकरणे, हिजाब प्रकरण उभे करणे हा भाजपचा खरा अजेंडा आहे. ‘हिंदू खतरे में है’ अशी आरोळी देत बहुजन तरुणांचे माथ्ो भडकवण्याचे काम भाजपा, संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी हिंदू संघटना करतात. अयोध्येतील सारे लुटारू हिंदू आहेत. यात जर कुणी खान, शेख असता तर भाजपासहित सर्व बोलघेवड्या हिंदू नेत्यांनी केवढा गहजब केला असता. समस्त मुस्लीम समाजाला वेठीस धरून आरोपीच्या पिंजर्यात उभे केले असते. हिंदुत्वाचे आम्ही खरे रक्षक आहोत असा टेंभा मिरवला असता. टीव्ही चॅनेल्सवर चर्चा घडवून आणल्या असत्या आणि समाजमाध्यमावर बदनामी केली असती.
श्रीमत् भगवत गीतेच्या (अध्याय ४, श्लोक ७ वर) श्लोकात श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले आहे की, ‘जेव्हा जेव्हा संसारात धर्माचे पतन होते आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा धर्मरक्षा आणि धर्मपुर्नस्थापनेसाठी मी अवतार घेतले’. राम मंदिरावर दरोडा घातल्यामुळे हिंदू धर्म संकटात आहे. तेव्हा हिंदू धर्मरक्षणासाठी शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रणागंणात उतरले आहेत. भाजपासारखे शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी नाही. महाराष्ट्रातील आणि देशातील हिंदूंवर जेव्हा जेव्हा संकटे आली, हिंदू धर्माला धोका निर्माण झाला, हिंदूंवर अन्याय झाला तेव्हा-तेव्हा शिवसेनेने हिंदू धर्म वाचवण्यासाठी आणि हिंदूंचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या खेपेस देखील हिंदू समाजाला जागे करण्यासाठी मुंबईतील दादर येथील पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिरासमोर गेल्या रविवारी महाआरती व हनुमान चालीसा पठन शिवसैनिकांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘रामरक्षा’ आंदोलन एकजुटीने अलोट गर्दीत भर पावसात केले गेले. राम सर्वांचा आहे. आम्हाला रामाची रक्षा करायची आहे. शिवसेनाप्रमुखांनी ७०-८०च्या दशकात हिंदूंना जाग आणली होती. आता पुन्हा त्याची गरज आहे. आज हिंदूंना संमोहित केले जातेय. या संमोहनातून बाहेर या. तुमचा गैरफायदा घेतला जातोय. भोळेपणा सोडून द्या. तुम्ही कट्टर कडवट रामभक्त व शिवभक्त आहात. जय शिवराय, जय सियाराम म्हणा आणि जे राम मंदिराची तिजोरी चोरताहेत त्यांना जाब विचारा. त्यांना तडीपार केल्याशिवाय स्वस्थ बसू नका अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेनेने काँग्रेसच्या कच्छपी लागून हिंदुत्व सोडले आणि मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांना उद्धवजींनी तिलांजली दिली, असा आरोप भाजपच्या गोटातून केला जातो. काँग्रेस आणि शरद पवारांच्या भीतीने उद्धव ठाकरे राम मंदिर निर्माणाच्या उद्घाटनाला अनुपस्थित राहिले. आता शिवसेना पक्ष संपत असताना हे ‘रामरक्षा’ आंदोलन नाही, तर पक्षरक्षणासाठी उद्धव ठाकरेंच्या हालचाली आहेत असे बेछूट, बेलगाम आरोप भाजप व शिंदेसेना करीत आहेत. त्यांना या रामरक्षा आंदोलनात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून मुंबईतील तमाम हिंदूंनीच उत्तर दिले आहे.
शिवसेनेने हिंदूरक्षणासाठी अनेक आंदोलने केली, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून हिंदूधर्म विरोधकांशी दोन हात केले असा इतिहास आहे. १९६८ साली कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरून वाद उपस्थित झाला होता. हिंदूंना पूजा अर्चा करण्यावर प्रशासनाने बंदी घातली होती. तेव्हा शिवसेनेने आंदोलन केले. १९७०च्या दशकात जळगाव-भिवंडी जातीय दंगलीत हिंदूंचे रक्षण केले. पंजाबमध्ये ८०च्या दशकात खलिस्तानवाद्यांनी उच्छाद मांडला होता, हिंदूंवर अत्याचार सुरू होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंना धीर दिला. गोध्रा हत्याकांडाच्या वेळी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक देऊन हिंदू एकजूटीचे दर्शन घडवले. १९९०-९१साली लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा काढली. तेव्हा सर्वार्थाने पाठिंबा दिला. कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुंदरसिंह भंडारी यांनी पत्रकारांना ते कारसेवक मराठी बोलत होते, ते शिवसैनिक होते, असे त्यांनी उत्तर दिले. तेव्हा बाळासाहेब मुंबईत त्वरित म्हणाले होते की ते कारसेवक माझे शिवसैनिक असतील तर त्याचा मला गर्व आहे. त्यांनी भाजपाच्या नेत्यांसारखे पळपुटे धोरण स्वीकारले नाही. पार्ले पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा हक्क सहा वर्षांसाठी हिरावून घेतला होता. देशातील हे एकमेव उदाहरण आहे.
बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर मुंबईसह ठिकठिकाणी दंगली उसळल्या. तेव्हा हिंदूंच्या जीवाचे आणि मालमत्तेचे रक्षण शिवसेनेने केले. तेव्हा हे कथित हिंदूंचे नेते आणि त्यांच्या संघटना या बिळात लपून बसल्या होत्या. विस्थापित काश्मिरी पंडितांना शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रात आधार दिला. आज भाजपा बारा वर्षे सत्तेत असूनही काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुर्नवसन झाले नाही. भाजपला फक्त निवडणुका जिंकण्यासाठी, हिंदूंची मते मिळवण्यासाठी हिंदुत्व हवे असते. एकदा सत्ता मिळाली की हिंदुंना वार्यावर सोडले जाते. भाजपाशासित राज्यांतील अयोध्या, उज्जैन, बद्रीनाथ, केदारनाथ आदी हिंदू मंदिरातील तिजोरी लुटण्याचे आणि जमिनी हडप करण्याचे प्रकार सुरू आहेत. भाजप व संघवाले हे ‘हिंदू धर्मरक्षक’ नाही तर ‘भक्षक’ आहेत. शिवसेनेने उगाच हिंदू-मुस्लीम वाद कधी निर्माण केला नाही. भाजपप्रमाणे राजकीय स्वार्थासाठी देशात जातीय दंगली घडवल्या नाहीत. पण जेव्हा-जेव्हा हिंदू समाज व धर्मावर अत्याचार झाले तेव्हा हिंदू धर्म रक्षणासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. ‘रामरक्षा’ आंदोलन हाही हिंदू एकजुटीसाठी पुन्हा पुकारलेला एल्गार आहे.

