
सध्याच्या डिडिटल युगात संगणक, इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहार हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. घरगुती कामांपासून ते व्यवसाय, शिक्षण, बँकिंग, खरेदी, हे सगळे काही आता डिजीटल माध्यमातून होत आहे. पण जशी सोय वाढली, तसेच धोकेही वाढले. या धोक्यांपैकी एक अत्यंत गंभीर आणि धोकादायक प्रकार म्हणजे ‘मालवेअर फसवणूक’.
मालवेअर म्हणजे काय?
‘मालवेअर’ हे संगणकाला हानी पोहोचवण्यासाठी तयार केलेले असते. हे मालवेअर संगणकात शिरल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, पासवर्ड, फोटो, फायली चोरू शकतो किंवा तुमचा संपूर्ण संगणकच बंद पाडू शकतो. अनेकदा हा मालवेअर न कळतच संगणकात प्रवेश करतो. यातील सर्वात भयानक प्रकार म्हणजे ‘रॅन्समवेअर अॅटॅक’.
रॅन्समवेअर हा मालवेअरचाच एक प्रकार आहे. या अॅटॅकमध्ये हॅकर तुमच्या संगणकातील सगळी माहिती लॉक करतो किंवा एन्क्रिप्ट करतो. त्यानंतर ती माहिती परत मिळवण्यासाठी तुमच्याकडून पैसे मागितले जातात, यालाच ‘खंडणी’ म्हणतात. बहुतेक वेळा हा
अॅटॅक फसव्या लिंक, ई-मेलच्या माध्यमातून केला जातो. तुम्ही ती लिंक उघडताच, काही सेकंदांत तुमचा संगणक हॅकरच्या ताब्यात जातो.
गीता थिटे यांच्या गोष्टीतून आपण हा प्रकार जाणून घेऊ या.
नवी मुंबईतील खारघर परिसरातील बंगला. सकाळची वेळ होती. रस्त्यांवर थोडी-फार वर्दळ सुरू होती. आपल्या छोट्या
ऑफिसमध्ये गीता थिटे संगणकासमोर बसून काम करत होत्या. गीता जिद्दी महिला होत्या. आयुष्यात काहीतरी मोठं करायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, हा त्यांचा निर्धार होता. घरच्या जबाबदार्या सांभाळत त्यांनी ‘फ्रोजन फूड स्टार्टअप’ सुरू केला होता. त्यांच्या पदार्थांना लोकांची पसंती मिळू लागली होती. ‘आपला ब्रँड आता भारताबाहेरही पोहोचायला हवा…’ म्हणून त्यांनी जोरात प्रयत्नही सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला. स्वतःचा अधिकृत ई-मेल आयडी तयार करून त्यांनी देश-विदेशातील कंपन्यांशी संपर्क सुरू केला. जर्मनी, जपान, दुबई अशा अनेक देशांमध्ये त्यांचा संवाद वाढत होता. एक दिवस, दुपारी काम करत असताना त्यांच्या ई-मेलवर एक नवीन मेल आला.Subject -Global Promotion Opportunity. ते पाहून गीता आनंदून गेल्या होत्या. उत्सुकतेने त्यांनी मेल उघडला. वंडर मार्ट नावाच्या कंपनीकडून तो मेल आलेला होता. त्यात लिहिलं होतं. ‘आम्ही तुमच्या उत्पादनांना जागतिक स्तरावर प्रमोट करू शकतो. कोणतेही शुल्क नाही. फक्त खालील लिंकवर क्लिक करून तुमची माहिती भरा.’ हे वाचून गीता थोडा वेळ विचारात पडल्या होत्या. ‘अरे वा, इतकी मोठी संधी आणि ती देखील मोफत, हे त्यांच्या मनात आलं. पण, हे खरंही असेल, आयुष्यात कधी कधी रिस्क घ्यावीच लागते, असा विचार करून त्या लिंकवर त्यांनी क्लिक केलं. त्यांनी ती लिंक उघडताच त्यांच्या संगणकाची स्क्रीन अचानक काळी झाली. अरेच्या, हे काय झालं? असे म्हणत गीता घाबरून गेल्या, काही सेकंदांत स्क्रीनवर एक मेसेज झळकला… ‘तुमच्या सर्व डेटावर आमचा ताबा आहे. डेटा परत हवा असेल तर खंडणी द्या.’ हे वाचून गीता थरथर कापू लागल्या होत्या. नाही… नाही… हे शक्यच नाही, असे त्या घाबरून म्हणाल्या. संगणकावरच्या आपल्या फाईल्स उघडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण सगळं लॉक झालं होतं. हजारो ग्राहकांची माहिती, लाखोंच्या व्यवहारांचे रेकॉर्ड, महत्त्वाची कागदपत्रे, हे सारे सगळं एका क्षणात गायब झाले होते.
इतक्यात त्यांना त्यांच्या कंपनीचा आयटी तज्ज्ञ विशाल याचा फोन आला. गीता यांनी रडत रडतच तो फोन उचलला, ‘विशाल, प्लीज लवकर इकडे ये, काहीतरी भयंकर झालंय, काय झालंय, ते तू विचारत बसू नकोस, असशील तसा लगेच इकडे ये…
विशाल लगेचच ऑफिसमध्ये पोहोचला. ‘शांत व्हा गीता मॅडम… आधी मला सगळं सांगा.’ गीता यांनी घाबरत-घाबरत सगळी गोष्ट त्याला सांगितली. विशाल गंभीर झाला, म्हणाला, मॅडम, हा रॅन्समवेअर अॅटॅक आहे. तो खूप धोकादायक असतो.’
‘म्हणजे? आपला डेटा परत मिळणार नाही का?’ गीता यांनी हताश होऊन त्याला विचारले.
‘घाबरू नका. आपण प्रयत्न करू. पण सर्वात आधी पोलिसांत तक्रार करणे गरजेचे आहे.’
गीता आणि विशाल तातडीने सायबर पोलिसांकडे गेले. तक्रार नोंदवली गेली. सायबर तज्ज्ञांनी तपास सुरू केला. काही दिवसांच्या तपासानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. ‘हा हल्ला परदेशातून म्हणजे युगांडामधून करण्यात आला होता.
‘माझ्यासारख्या छोट्या व्यवसायावरही एवढा मोठा हल्ला कसा झाला’ असे गीता यांनी पोलिसांना विचारले. तेव्हा सायबर अधिकार्याने शांतपणे सांगितलं, ‘मॅडम, आजकाल कोणताही व्यवसाय छोटा नाही. डिजिटल जगात प्रत्येकजण लक्ष्य होत आहे.’ ही घटना हा गीता यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. काही दिवस त्या खूप निराश झाल्या होत्या, खचून गेल्या होत्या. पण त्यांनी स्वतःला सावरलं. एका क्लिकमुळे गीता यांचे जग काही काळासाठी संपूर्ण बदलून गेलं.
हे डिजिटल जग खूप मोठं आहे आणि तितकंच धोकादायकही आहे. अनोळखी लिंकवर कधीही क्लिक करू नका. कारण एक चुकीचा निर्णय आयुष्यभराचा धडा देऊन जाते.
अशी घ्या काळजी
१) अँटीव्हायरस वापरा – तुमच्या संगणकात चांगले आणि अपडेटेड अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असणे अत्यंत आवश्यक आहे.
२) बॅकअप ठेवा- महत्त्वाच्या फाईल्सचा नियमित बॅकअप घ्या. तो ऑफलाइन किंवा वेगळ्या ड्राइव्हमध्ये साठवा.
३) फायरवॉल वापरा- फायरवॉल तुमच्या संगणकात अनधिकृत प्रवेश रोखतो.
४) अपडेट्स करा- ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा. जुन्या सिस्टीममध्ये सुरक्षा कमतरता असते.
५) अनोळखी लिंक टाळा- कोणतीही अनोळखी लिंक, ई-मेल किंवा अॅटॅचमेंट उघडण्यापूर्वी दोनदा विचार करा.
६) मजबूत पासवर्ड वापरा– पासवर्ड नेहमी गुंतागुंतीचा ठेवा आणि तो कुणालाही सांगू नका.
७) क्लिक करण्यापूर्वी- कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी दोनदा विचार करण्याची सवय लावा. सतर्कता, माहिती आणि योग्य उपाययोजना यांच्यामुळेच आपण सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहू शकतो.

