• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खिळवून ठेवणारे रहस्यनाट्य!

marmik by marmik
May 8, 2026
in तिसरी घंटा
0

इंग्लंडच्या प्रतिभासंपन्न रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती, ज्यांची ओळख उभ्या दुनियेत ‘क्वीन ऑफ क्राइम’ आहे, त्यांच्या पुस्तकांना आजही सर्वाधिक मागणी आहे. त्यांच्या पुस्तकांच्या खपाची तुलना म्हणे बायबल आणि शेक्सपिअरच्या पुस्तकांसोबतच होऊ शकते. अगाथा ख्रिस्ती यांच्या दहा कादंबर्‍या मराठी वाचकांसाठी प्रा. मधुकर तोरडमल यांनी अनुवादित केल्यात. त्यांच्या थरार उडविणारी कथानके आजही वाचकांना खुणावतात. त्यांच्या ‘माऊस ट्रॅप’ या विश्वविक्रमी नाटकाचे प्रयोग आजही अव्याहत सुरू आहेत. याच कथानकावर आधारित शिरीष देखणे लिखित ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ हे थरारनाट्य रंगभूमीवर आलंय.
पडदा उघडतो आणि मध्यभागी दोन सावल्या नजरेत भरतात. पावसाळी वातावरण. रात्रीचा प्रहर. ध्वनी-प्रकाशाचा गूढ खेळ आणि खून होतो. इथपासून ते शेवटच्या प्रसंगापर्यंत खुनी कोण याचा हादरून सोडणारा प्रवास होतो. या कथानकातील प्रत्येक जण खुनी असल्यागत वाटतो. पण त्यामुळे कथानक अधिकच गोंधळून टाकणारे बनते. ही याची वनलाइन!

सुभेदार गेस्ट हाऊसमधलं हे नाट्य. एक जुनाट ऐतिहासिक वाटणारा हा वाडा, ज्याचे रूपांतर गेस्टहाऊसमध्ये केलेलं. ओळखपाळख नसणारे सातजण एकेक करीत इथे येतात. या गेस्ट हाऊसची मालकी चित्रा आणि विनय या दोघा तरुण दांपत्याकडे आहे. इथे अमित देसाई हा यशस्वी आर्किटेक्ट कम् शेफ आलाय. अमित आणि चित्रा या दोघांचे जुने संबंध असल्याचे उघड होते. त्यामुळे नवरा विनय वैतागलेला. दोघे एकत्र भेटल्याने काहीसा तणाव.

बॅनर्जी नावाचे एक गृहस्थ जे सतत ‘गुमनाम है कोईऽऽ’ हे गाणं गुणगुणताहेत. त्यामुळे त्यांना खुनी कोण आहे याची कदाचित कल्पना असावी, असे वाटत राहाते. मिसेस टिकेकर आणि मिस सपना याही या गेस्ट हाऊसमध्ये काही कारणांमुळे पोहचलेल्या. त्या दोघींच्याही हालचाली तशा संशयास्पदच. मेजर थोरात हे आणखीन एक वैशिष्टपूर्ण व्यक्तिमत्व. हे सातजण या गेस्ट हाऊसमध्ये वादळी संकटांमुळे अडकलेले. यात भर म्हणजे तडफदार इन्स्पेक्टर भोसले इथे येतात. कोल्हापूरात कांचन नाईक हिच्या खुनाची चौकशी करतात. त्यांची वैयक्तिक तपासयंत्रणा सुरू आहे. एकेका जणांची ते तपासणी करतात. भर पावसात, वादळात त्यांची इथे उपस्थिती हादरून सोडणारी. पोलिसांच्या कार्यक्षमतेचे दर्शन घडविणारी. ‘कांचन नाईकप्रमाणे आता इथे या वाड्यातही कुणाचा तरी खून होणार आहे. तेव्हा सावध. खुनी कोण? याचा शोध लवकरच लागेल’.- असे सांगतात आणि सारे चक्रावून जातात. त्यातच एक विचित्र घटना अखेर घडते. मिसेस टिकेकर यांचा खून होतो. आश्चर्य म्हणजे तो इन्स्पेक्टर भोसले जवळ असताना होतो. आता पुढली कुणाची पाळी? या प्रश्नामुळे घबराट उडालेली. खरा खुनी कोण? त्याने खून का केला? पोलिस कोणत्या निकषांपर्यंत पोहचतात? हे गेस्ट हाऊस सुरक्षित आहे काय?- असे अनेक प्रश्न उभे राहतात, संशयाची सुई यातल्या प्रत्येकावर फिट्ट बसते. त्याला पूरक संदर्भ मिळतात खरे पण… हे गूढ, थरार सस्पेन्स नाट्य असल्याने प्रत्यक्ष प्रयोगाला ‘हजेरी’ लावणे उत्तम. नाहीतर उत्कंठा संपेल. शेवटी हा उंदीर पकडण्याचा पिंजरा किंवा सापळा आहे. त्यात कोण अडकणार हे प्रयोगात शेवटच्या क्षणी कळते. त्यातून रसिकांना हडबडून जाणं भाग पडतं.

कलाकारांची ताकदीची टीम ही या नाटकाची एक जमेची बाजू. कारण यातील प्रत्येकावर ‘खुनी’ असल्याचा संशय हा पदोपदी वाढतो. पात्रनिवड अचूक आणि त्याचे सादरीकरणही पुरेपूर पटणारे. या गेस्ट हाऊसचे मालक विनय सुभेदार याच्या भूमिकेत सौरभ गोखले याची संशयी प्रवृत्ती अन् तणावाखालचे वर्तन नजरेत भरते. त्याची पत्नी चित्राच्या भूमिकेत मृण्मयी गोंधळेकर शोभून दिसते. भूतकाळातलं प्रेमप्रकरण आणि वर्तमानातलं जगणं हा फरक दिसतो. खुनामुळे उडालेली घबराट उत्तम. मिसेस टिकेकरच्या भूमिकेत विनिता दाते आहेत. निवृत्त न्यायमूर्ती असल्याने न्यायदान करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. आवाजातील चढउतार नाट्यपूर्ण़ जो संशय अधिक गडद करणारा आहे. चित्राचा बॉयप्रâेंड अमित देसाई हा अंगद म्हसकर याने चांगला उभा केलाय. गेटअप शोभून दिसतो. मिसेस सपना जगतापच्या भूमिकेत सना कुलकर्णी आणि मेजर थोरात बनलेले रोहित देशमुख यांचीही सोबत यात आहे.

गेस्ट हाऊसमध्ये तपासयंत्रणा चालविणारे इन्स्पेक्टर भोसले यांच्या भूमिकेत रुबाबदार शंतनू मोघे यांनी यातील नाट्याची पकड मजबूतीने पेलली आहे. मालिका, चित्रपटातून खास नाटकासाठी त्यांनी वेळ राखून ठेवलाय, हे महत्त्वाचे. त्यांच्या कसदार अभिनयाला दाद मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला हा अष्टपैलू अभिनेता. दोन योगायोग. एक त्यांचे वडील श्रीकांत मोघे यांनीही यापूर्वी छत्रपती शिवरायांची भूमिका केली होती. आणि शंतनू यानेही केलीय. बापलेक छत्रपती बनले! दुसरा योगायोग म्हणजे धि गोवा हिंदू असोसिएशनच्या निर्मितीखाली ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकाचे हजारो प्रयोग वडिलांनी केले. नाटक गाजविले. आता त्याच नाट्यसंस्थेचे हे नाटक शंतनू करतोय. इन्सपेक्टर भोसले लक्षवेधी झालाय. ‘सफरचंद’ नाटकानंतरचं हे त्यांचं नवं रूप गुंतवून ठेवतं.
नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या पावसातला पाहुणा आिण जेवणावळ या दोन गूढकथांवर आधारित ’शूऽऽ घाबरायचं नाही’ हे नाटक, डॅनी रॉबिन्सन यांच्या मूळ कथानकावरलं दोन वाजून बावीस मिनिटांनी हे नाटक, हिचकॉकचं थ्रिल जिवंत करणारे ’अ परफेक्ट मर्डर’, नीरज शिरवईकर याचे ’यू मस्ट डाय’ अशा नाटकांनी थरारनाट्याचे दालन समृद्ध करणारे दिग्दर्शक विजय केंकरे यांनीच ‘सुभेदार गेस्ट हाऊस’चे दिग्दर्शन करून आणखीन एका नाट्यकृतीला आकार दिलाय. थरारक नाट्यदिग्दर्शनातला हुकमी एक्का अशी पदवी त्यांना बहाल केली तर ती उचित ठरेल. प्रत्येक संहितेतील उत्कर्षबिंदू परिणामकारकपणे उभा करण्याचे कौशल्य दिसते. या नाट्यातही पहिल्या प्रसंगापासून शेवटच्या क्षणापर्यंत गूढता वाढविणारी पकड आहे. तांत्रिक बाजूंचीही चांगली जुळवाजुळव केलीय. प्रत्येक कलाकारावर परिश्रम घेतल्याचे जाणवते. नाट्य कुठेही रेंगाळणार नाही याची पूरेपूर दक्षता दिग्दर्शनात दिसते.

सोलापूरचे नाटककार शिरीष देखणे यांची ही संहिता. याचे कूळ आणि मूळ जरी परकीय असले तरीही बाज मराठमोळा आहे. कोल्हापूरची पार्श्वभूमी मुद्दाम निवडली आहे. त्यामुळे आपल्या मातीतली घटना वाटते. देखणे यांच्या काही एकांकिका लक्षवेधी असून उत्कृष्ट नाट्यसंहितेसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यात वैशिष्टपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्यात नाटककारांचा महत्त्वाचा वाटा आहे. सस्पेन्स शेवटपर्यंत टिकविला आहे. भाषा ओघवती व पकड घेणारी. त्यात कृत्रिमता जराही नाही. पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक अधिक प्रभावी ठरतो.

नेपथ्याला टाळी घेणार्‍या परंपरेतले नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी सुभेदार गेस्ट हाऊस अप्रतिम साकारले आहे. रेनकोट ठेवण्याचा स्टँड गूढता वाढवतो. खुर्च्या, टेबल, दरवाजे त्यावरले नक्षीकाम हे वातावरणनिर्मिती करते. सारा श्रीमंती थाट. नेपथ्यासोबत शीतल तळपदे यांचा प्रकाशयोजनाही कथानकाला अनुरूप आहे. अजित परब यांचे संगीतही चांगले आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषा भूमिकेला न्याय देणारी. अन्य तांत्रिक बाजूही जमल्या आहेत.

धि गोवा हिंदू असोसिएशन कला विभाग या संस्थेचा वाटचालीचा उल्लेख केल्याशिवाय मराठी नाटकांचा इतिहास पूर्ण होणार नाही. दर्जेदार नाटकांची निर्मिती संस्थेने केली आहे. १९५६ साली कलाविभागाची स्थापना झालीय. आज सत्तर वर्षे उलटली तरी रंगठसा कायम आहे. रंगतपस्वी दामू केंकरे यांचा वसा त्यांचे चिरंजीव विजय केंकरे आज चालवित आहेत. निर्मितीमूल्येही नोंद घेण्याजोगी आहेत. कुठेही तडजोड केलेली नाही.
खरा खुनी कोण? त्याने का खून केलाय? याचा तर्क, अंदाज हा रसिक दोन अंकातून पक्का मनात बांधतात. पण बहुतेकांचे तर्क फसवे ठरतात. कारण दृष्टीनेच सारी मांडणी संहितेत तसेच सादरीकरणात करण्यात आलीय. गूढ आणि चक्रावून सोडणारे वळण हेच या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. परकीय कथानकांवर गाजलेल्या संहिता मराठीत येत आहेत, त्यातून तरुण नाटककारांना संधी मिळते ही देखील एक सकारात्मक घटना आहे.

कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नाटकांना(च) मराठी रसिक गर्दी करतो, असा एक समज होता आणि आजही काही प्रमाणात तो आहे. आपलं नाटक ‘स्थळ – दिवाणखाना’ यातून बाहेर कधी पडणार? असाही सवाल अधून-मधून विचारला जातो. पण बदलत्या काळात सस्पेन्स, थ्रिलर विषयांवरल्या नाटकांनाही तिकीट विंडोवर चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणूनच गेल्या काही वर्षांत अशा विषय-आशयावरील नाट्यकृती रंगभूमीवर येत आहेत, वेगळा ठसा उमटवत आहेत. त्याच वाटेवरले हे ‘सुभेदार गेस्ट हाऊस’. जे ‘गुमनाम है कोईऽऽऽ’ म्हणत दोन तास निश्चित खिळवून अन् हादरून ठेवेल, यात शंकाच नाही!

सुभेदार गेस्ट हाऊस
लेखन- शिरीष देखणे
दिग्दर्शन- विजय केंकरे
नेपथ्य- प्रदीप मुळ्ये
प्रकाश- शीतल तळपदे
संगीत- अजित परब
वेशभूषा- मंगल केंकरे
गीत- वैभव जोशी
सूत्रधार- राजेंद्र पै / श्रीकांत तटकरे
निर्मिती- धी गोवा हिंदू असोसिएशन/
संकल्प चित्र.

Previous Post

रविवार…मटन वार!

Next Post

सायबर जगातली खंडणीखोरी

Next Post
सायबर जगातली खंडणीखोरी

सायबर जगातली खंडणीखोरी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.