
बरीचशी शाकाहारी मंडळी स्वत:ला उच्च दर्जाचे समजत असतात तर मांसाहार करणार्याला तुच्छ. मांसाहार करणार्यांना कधी आध्यात्मिक पाप-पुण्याची भीती दाखवली जाते तर कधी शाकाहार कसा चांगला आहे आणि मांसाहार कसा मानवास घातक आहे हे दर्शवणारा कुठला तरी अर्धवट शास्त्रीय माहिती असलेला तथाकथित मेडिकल रिपोर्ट तोंडावर फेकला जातो. कधी मानवाच्या दातांच्या ठेवणीवरून मनुष्यप्राणी हा मुळात शाकाहारी आहे, असा निष्कर्ष काढला जातो. मांसाहार करणार्या लोकांना कोणते आजार होऊ शकतात त्याची यादी दिली जाते. (हेच रोग ‘शुद्ध-शाकाहारी’ लोकांना का होतात? ह्या प्रश्नाला सोईस्कररीत्या टाळले जाते.) कट्टर ‘मटन-प्रेमी’ लोक मात्र शाकाहारी लोकांच्या असल्या भावनिक आवाहनांना दात कोरण्याच्या काडीएवढीही किंमत देत नसतात. मांसाहारी लोक शाकाहारी लोकांना कधीच मांसाहार करण्यासाठी आग्रह करत नाहीत. पुष्कळजण तर ‘शाकाहार केंव्हाही चांगला’ असा उघड शाकाहाराचा पुरस्कार करतात. आधीच सगळे मांसाहारी पदार्थ महाग झालेत. त्यात ह्यांनी खायला सुरुवात केली तर मग किमती गगनाला भिडतील- अशी त्यांना रास्त भीती असावी!
पुष्कळ लोकांसाठी रविवार हा ‘मटन वार’ असतो. त्यांना रविवारी मटन खाल्ले नाही तर तो रविवार वाटतच नाही! पण मटणाच्या दुकानातून मटन आणणे ही सुद्धा एक कला आहे. गेलो दुकानात- ‘एक किलो मटन द्या’ असे सांगितले, पैसे दिले आणि घरी आलो- इतके सोपे नसते ते. चला तर आज रविवार आहे असं समजू या आणि आपण मटन आणायला सोबतच जाऊया!
मटन आणायला जायचे तर काही पूर्वतयारी आवश्यक असते. मटन घ्यायला एक योग्य आकाराचा स्टीलचा डबा घ्यावा. तो ठेवल्यानंतरही आजूबाजूला जागा उरेल अशी मोठी अपारदर्शक व पर्यावरणस्नेही अशी ‘ज्युट’ची पिशवी घ्यावी. तुम्ही रविवारी सकाळी मटन आणायला जाता- ही गुप्त वार्ता शेजारच्या जैन भाभीला अगोदरच लागलेली असते. ती तुम्हाला तिच्या गॅलरीतून, चिखलात लडबडलेले डुक्कर पाहिल्यासारख्या नजरेने, पहात असते. तिच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे करून आपण तिला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात ‘भाजी आणायला चाललोय मंडईत’ असे सोसायटीच्या गेटवर अर्धवट झोपेत असलेल्या वॉचमनला, त्याने न विचारताच सांगून टाकावे! कोणती ‘भाजी’ आणणार ते भाभीला आणि त्या वॉचमनला सुद्धा माहीत असते! परत येताना गेटजवळच्या बाकड्यावर समोरच्या विंगमधले रिटायर झालेले जोशी काका पिशवीची झडती घेणार असतात- त्यासाठी मंडईतून येतानाच पिशवीत मटन असलेला डब्बा सर्वात खाली ठेवावा. बाजूला कांदे-बटाटे आणि वरून पालकाची जुडी ठेवावी. काकांनी ‘काय आणले’ विचारले की ‘काही नाही हो! भाजी आणली पाहा’ असे म्हणून वरची पालकाची जुडी दाखवावी. ‘लै महाग झाली हो!’ असे म्हणून लगेच सटकायचे! खरंतर मटन आणण्याला काही कायद्याने (अजून तरी) बंदी नाही, आपण डंके की चोट पे मटन आणूच शकतो- पण भोचक शेजार्यांशी असे लपून-छपून व्यवहार करण्यात एक वेगळीच खुमारी असते- नाही का? तसेही रविवारी सकाळी तुम्ही प्लॅस्टिकच्या काळ्या पिशवीतून अमृत जरी आणले तरी तुम्ही मटनच आणले असेल अशी ह्या शाकाहारी शेजार्यांची पक्की खात्री असते. त्यांच्या पोटदुखीत अजून भर कशाला पाडा म्हणून हा उपाय, बाकी काही नाही!
तर अशा तर्हेने येण्या-जाण्याचा बंदोबस्त केला की आपण ‘ग्राऊंड-झीरो’वर प्रस्थान करावे. अशी ‘खाट्-खुट’ची दुकाने साधारण गावाच्या एका टोकाला असतात. शहरात मंडईला लागून असली तरी सुद्धा एका टोकाला सगळी एकत्रच असतात. काही दुकाने फक्त कोंबड्या म्हणजे चिकन विकतात. तर काही ठिकाणी मटन-चिकन दोन्ही मिळते. कोंबड्यांच्या दुकाना पुढे लोखंडी तारेच्या पिंजर्यात पांढर्या
ब्रॉयलर, देशी आणि गावठी अशा तीन प्रकारच्या कोंबड्या किलोच्या हिशोबाने विक्रीस ठेवलेल्या असतात.
चला पुढे, हे पाहा आपले मटणाचे दुकान आले. समोरच पाहा कसे दोन बोकड कापून उलटे लटकवून ठेवलेले आहेत. किचनच्या ओट्यासारख्या ह्या फरशीवर एका लाकडी ओंडक्याला समोर घेऊन उस्मानभाई त्या दोन बोकडांच्या मधून आपल्याला हातातला सुरा दाखवत ‘आओ साब’ म्हणून स्वागत करत आहेत. हे आमचे ‘फॅमिली-खाटिक’! आमचे वडील आणि उस्मानभाईंचे वडील एकेकाळचे जिगरी दोस्त. वडिलांसोबत लहानपणी इथे आल्यावर छोटा उस्मान बोकडांसोबत खेळत बसलेला दिसायचा. कालांतराने राजगादीसारखा तो ओंडका उस्मानभाईच्या हाती आला. राजदंडासारखा तो भला मोठा सुरा आणि ती ‘कानस’ अशी हत्यारे हाती आली. कानशीवर सुरुक-चुरूक असा आवाज काढत दोन-तीनदा धार काढली की सपासप उस्मान भाईच्या हातातला सुरा चालतो. निष्णात सर्जनसारखे बरोबर मांस कापले जाते. कोणते हाड कुठे कापायचे, कोणते अर्धेच कापायचे हे त्यांना अनुभवाने बरोबर माहीत असते. धार नसलेले हत्यार वापरले तर हाडांच्या बारीक अणकुचीदार कपच्या थाळीत येतात.
मटन घेताना बोकड जास्त वजनाचा नसावा. त्याला चरबी जास्त असते आणि मटन वातड लागते. मध्यम आकाराचा बोकड चवीला चांगला लागतो. काही ठिकाणी बकरा म्हणून मेंढा कापला जातो. शेपटीवरून ही लबाडी ओळखता येते म्हणून शेपटी कापलेली असते. काही दुकानात बोकडाऐवजी बकरी कापली जाते. ते मटन शिजता शिजत नाही आणि वातड लागते. हे मटनविक्रेते सकाळी एकच बोकड कापतात. त्याचा ‘कपुरा’ म्हणजे वृषण बकरीला अलगद वरून मागच्या पायामध्ये लावतात आणि बकरीचे मटन बोकडाचे आहे असे सांगतात. म्हणून नेहमी खात्रीच्या मटन विक्रेत्याकडूनच मटनखरेदी करावी.
मटणाचे बरेच भाग असतात. काहींना मांडीचे भाग आवडतात तर काहींना चाप. काहींना मऊ मटन पाहिजे असते, तर काहींना हाडे. तुम्हाला मटन बिर्याणी करायची असेल तर मांडीचा भाग घ्या. सूप करायचे असेल तर छातीकडचे ‘चाप’ उत्तम. मानेकडचा भाग झणझणीत रस्सा बनवण्यास फायदेशीर असतो. खिमा बनवण्यासाठी खांद्याजवळचा मऊ भाग कापला जातो. मटन कापताना कापणार्याच्या हाताकडे घारीसारखी नजर ठेवावी लागते. नाहीतर तो इकडचे-तिकडचे नको असलेले भाग जादूगर हातचलाखी करतात तशा बेमालूमपणे मिसळतो! खमके गिर्हाईक तिथेच तराजूत हात घालून ते नको असलेले मटन बाजूला काढतो.
‘भैय्या! ये क्या डाला? मांडीका बोला तो?’ गिर्हाईक वैतागून म्हणते.
‘ये नरम है, टेस्ट आयेगा!’ मटनवाला
‘मेरेकू जो चाहिये वो दे दो ना, नही तो पैसा नही दूँगा!’ गिर्हाईक लटक्या रागाने म्हणते.
‘पैसा वैâसे नही देगा? पैसे के लिये तो जान से मारा उसकू!’ मटनवाला बोकडाकडे बोट दाखवत म्हणतो.
असे संवाद ऐकू येत असतात.
खूर-मुंडी, रक्ती-मुंडी, पाया, वजडी, ़फेफसा, इत्यादि पूर्वी ‘वेस्टेज’ ह्या प्रकारात मोडणारे भाग आजकाल ‘स्पेशल’ समजले जातात. पूर्वी हे भाग खूप स्वस्त मिळत असल्यामुळे गरीब लोक हेच भाग खाण्यासाठी पसंत करत असत. पण आता ‘स्पेशल’ म्हणून अजून चढ्या भावाने विकल्या जातात. आता तर हे भाग ‘तारांकित’ हॉटेलमध्ये ‘दलित फूड डेलिकसी’ ह्या गोंडस नावाने सर्व केले जातात! कधीकाळी मजबुरीमुळे खाल्ले जाणारे हे पदार्थ आता महागड्या थाळीत सजवले जात आहेत. कोणे एके काळी फाटकी वस्त्रे वापरणे हीन दर्जाचे समजले जायचे. आता फॅशन म्हणून चांगले कपडे फाडून वापरले जातात! काल-चक्रात कोणत्या काळी कोणती गोष्ट वर जाईल आणि कोणती खाली येईल ह्याची कल्पनाही करता येणार नाही.
चला, पुन्हा मटनाकडे वळू. आता आपल्यासाठी मांडीचे हाडासकट मटन, थोडे चाप आणि थोडे नरम असे मटन घेऊ. चवीपुरती कलेजी घेऊ. वजन करून झाल्यावर वरून ‘थोडी चरबी टाक’ म्हणून सांगू! घरी गेल्यावर मटन ग्रेवीसाठी थोडे मटन बाजूला काढावे आणि थोडे बिर्याणीसाठी वापरावे. हाडांच्या ‘नळी’मधली ‘कॅडबरी’ लहानपणी खूप आवडायची. ती ताटावर ठोकून ठोकून नळीतून फुंकणीसारखे आरपार दिसेपर्यंत चोखायची! (दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार सिनेमात मटन खाण्याचा बहारदार सीन आहे.)
आपलं देशी मटन खाताना ते इंग्रजी खाण्यापिण्याचे एटिकेट्स थोडावेळ बाजूलाच ठेवावे. कालवणात मस्तपैकी भाकरी चुरून खावी. तिखटजाळ रस्सा ठसका लागेपर्यंत प्यावा. कुत्र्यासारखी सुळयाखाली नळी चावून फोडून टाकावी. बिर्याणीचा भात पोट तुडुंब भरेपर्यंत खावा. त्यातल्या लवंगा बाजूला काढून ठेवाव्या. शेवटचा घास खाल्ला की त्या तोंडात चघळत चरबीने चिक्कट झालेल्या हातावर पाणी सोडावे.
एक मसाला पान खाऊन संपेपर्यंत अनावर झालेल्या झोपेला आवरायचा मुळीच प्रयत्न न करता बसल्या जागी डुलकी लागली की आपला रविवार सार्थकी लागला हे समजावे!चालत असतो, नाही!
