
महात्मा फुलेंच्या विचारांवर उभी राहिलेली आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात बहरलेली ब्राह्मणेतर चळवळ हीच खरी शेतकर्यांची चळवळ असल्याचं प्रबोधनकार मांडतात. त्यामुळे ते शेतकर्यांचे स्वराज्य समजावून सांगताना या चळवळीची साधकबाधक चर्चा करतात. इथं शेतकर्यांविषयी लिहिताना एरव्ही टाळल्या जाणार्या या विषयाचं महत्त्व अधोरेखित होतं.
शेतकर्यांचे स्वराज्य` या प्रबोधनकारांच्या पुस्तकाची पहिली पाच प्रकरणं आपण आतापर्यंत पाहिली. त्यानंतरचं ब्राम्हणेतर चळवळीचा जमाखर्च हे प्रकरण तत्कालीन राजकीय आणि सामाजिक संदर्भात आधीच्या मांडणीचा विस्तार करतं. ब्राह्मणेतर चळवळ ही शेतकर्यांची खरी चळवळ असल्यामुळे शेतकर्यांच्या उन्नतीचा विचार करताना तिच्या वाटचालीची चिकित्सा प्रबोधनकारांना आवश्यक वाटते. प्रबोधनकार स्वतःला स्वतंत्रमतवादी म्हणवून घेत असले आणि त्यांना कोणत्याही एका पक्षाच्या विचारधारेत अडकवणं शक्य नसलं तरी त्या वेळच्या समाजासाठी ते ब्राह्मणेतर चळवळीचाच एक भाग होते. त्यामुळे ते अप्रत्यक्षपणे स्वतःच्या वाटचालीचाही मागोवा घेताना दिसतात.
शहरातल्या राजकीय किंवा सामाजिक चळवळींचा शेतकर्यांशी काहीच संबंध आला नाही, हे वास्तव प्रबोधनकारांनी सुरुवातीला मांडलंय, काँग्रेस, होमरूल, समाजसुधारणा वगैरे शहरी शहाण्यांच्या चळवळी गेली ४०-५० वर्षे शहरोशहरी कितीहि मोठा गाजावाजा करीत असल्या तरी मागासलेल्या खेडवळ शेतकर्याच्या आत्मप्रबोधनाची खरीखुरी टिकाऊ कामगिरी ब्राम्हणेतर चळवळीनेच केलेली आहे. आगरकर, रानडे प्रभृति समाजसुधारकांची सामाजिक सुधारणेची दृष्टीसुद्धा शहरी पांढरपेश्यांच्या क्षितिजापुढे कधीच गेली नाही. याचा परिणाम असा झाला कीं, शैक्षणिक चतुराईपासून तो ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या वेदान्तापर्यंत शहरी शहाण्यांची हालचाल मुल्खमैदानी गर्जना करू लागली, तरी शेकडा ९५ बहुजन समाज अंतर्बाह्य स्थितीत मातीच्या ढेकळाप्रमाणेंच हतसंज्ञ पडून राहिला… शहर्यांच्या शहरी चळवळी खेडवळांवर बाण्डगुळाप्रमाणे मनमुराद चरत, पण खर्याखोट्या शत्रुमित्राची पारख करण्याची आत्मशक्ति खेडवळांमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न मात्र कधीच कोणी केला नाही.
आधीच्या प्रकरणांसारखंच प्रबोधनकार याला फक्त महात्मा जोतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांचा अपवाद असल्याची मांडणी करतात. ब्राम्हणेतर चळवळ मागासलेल्या बहुजनसमाजाची खास चळवळ असल्यामुळे, या शहरी बाण्डगुळ्यांना तिच्याशी स्वतःचा प्रत्यक्ष संबंध जोडण्याचा यत्किंचितहि अधिकार नाही, असंही ते बजावतात. त्याचं कारणही ते सांगतात, हिन्दुस्थानातील पूर्वीची मुसलमानी साम्राज्यसत्ता झाली काय, किंवा आताची ब्रिटिशसत्ता झाली काय, देशाच्या गुलामगिरीचीं ही बाह्य व हंगामी कारणे होत. परंतु या सर्व कारणांचे मूळ महाकारण अथवा ब्रम्हगाठ म्हणजे भटाभिक्षुकांची धर्मोक्त सत्ता हेच असल्यामुळे, तेच प्रथम ठेचण्याची ब्राम्हणेतर चळवळीने दूरदृष्टीची व धडाडीची लगबग केली. आत्मोद्धाराच्या मार्गातला भयंकर भुजंग म्हणजे भिक्षुकशाही भट, हा शेकडो शतकांचा ऐतिहासिक सिद्धान्त शहरी भटेतर शहाण्यांच्या गळी उतरत नसला, तरी ब्राम्हणेतर पुढार्यांनी तो बिनचुक अंदाजून, त्या सापाचे विषारी दात पाडण्यासाठी ब्राम्हणेतर चळवळीचा शिस्तीचा आणि शिकस्तीचा उपयोग केला.
गरीब, अशिक्षित शेतकर्यांच्या विचारांमध्ये क्रांती घडवून आणण्याचं काम छत्रपती शाहूंनी केलं. त्यासाठी त्यांनी सत्यशोधक जलशांचा उपयोग केला. शहरातल्या पांढरपेशांनी कितीही नाकं मुरडली तरी शेतकर्यांची पहिली आवड ही तमाशाच. ते प्रबोधनकार त्यांच्या शैलीत सांगतात, सापाला पुंगी, हरणाला गायनाची गुंगी, भट देशभक्ताला फंड, वृत्तपत्राला वर्गणीदार, कोल्हापूरला शर्यतीचे घोडे, पुणेकर भटाना टिळकी धोंडे, कायस्थ प्रभूंना हुंड्याचे हंडे, ‘बामनेतरी’ मराठ्यांना सरकारी नोकर्या, याज्ञिक भटाना बोकडी कोहळा आणि क्षात्रजगद्गुरूला लग्नाचा सोहाळा, तद्वत शेतकर्याला तमाशाचा जिव्हाळा मोठा.
पण या तमाशात छत्रपती शाहूंनी नांदीपासून भरतवाक्यापर्यंत क्रांती सुचवली. त्यानुसार तमाशात पुराणातल्या कथांच्या जागी प्रबोधन आलं. त्याच्या विषयांची यादीच प्रबोधनकारांनी दिलीय, विद्येचे महत्त्व, शेतकर्यांना ठकविणार्यांच्या उघड गुप्त लीला, मद्यपान निषेध, ब्राम्हणांच्या वर्चस्वाचा दांभिकपणा,फंडगुंडांचा धुडघूस, बालविवाह निषेध, विधवा केशवपनाचा राक्षसीपणा, असले जिव्हाळ्याचे सामाजिक सुधारणेचे विषय संगीतमिश्र सवाल-जबाबांच्या आणि सोंगांच्या रूपाने शेतकर्यांपुढे मांडण्याची सत्यशोधक जलशांनी सुरुवात करताच, महाराष्ट्रातील खेडीपाडी सामाजिक सुधारणेच्या नव्या विचारांनी भारून गेली.
जलशांमुळे शेतकर्यांनी व्यसनं सोडली. न्हाव्यांनी विधवांचं केशवपन करण्यास नकार दिला. शाळा आणि विद्यार्थ्यांची वाढ झाली. पुरोहितशाहीच्या विरोधात शेतकर्यांमध्ये जागृती झाली. प्रबोधनकार सांगतात, शहरांतल्या परिषदांनी झालं नाही, ते जलशांनी घडवलं. अनेक गावं शेटजी भटजींच्या अत्याचारांतून मुक्त झाली. बालविवाह, हुंडा बंद पडला. प्रबोधनकार सांगतात ते खरं मानलं तर, ` सत्यशोधक जलशांनी मागासलेल्या खेडवळात धार्मिक स्वातंत्र्याचा इतका जोरदार पुरस्कार पैâलावला की, मराठे आणि तत्सम जातीत गेल्या १० वर्षात भटाकडून लागलेले लग्न हजारात एकादेच सापडेल.`
इतकं यश मिळूनही या चळवळीचं ध्येय ठरलं नाही. तिची घटना ठरली नाही. तिला छत्रपती शाहूंच्या नंतर नेतृत्व मिळालं नाही. शेतकर्यांच्या प्रचंड शक्तीचा उपयोग कसा आणि कुठे करायचा हे या चळवळीला लक्षातच आलं नाही. छत्रपतींच्या मृत्यूनंतर ब्राह्मणेतर चळवळीत बजबजपुरी माजली, त्याला कारणीभूत महाराजांचा आंधळा लोकसंग्रह होता, असं प्रबोधनकार सांगतात. त्याविषयी ते एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवतात, लोकसंग्रहाच्या बाबतीत टिळक आणि शाहू छत्रपति हे दोघेहि लोकोत्तर पुरुषोत्तम एकसारखे चुकले. दोघेहि मोठे बण्डखोर चळवळ्ये. अचाट क्रान्ति घडविण्याच्या कामात दोघेहि दांडगे महत्त्वाकांक्षी. दोघांनाहि लोकसंग्रहाचा मोठा हव्यास. पण आपल्या प्रभावळीत जमणार्या लोकांच्या पात्रापात्रतेची कसोटी दोघांपैकी एकानेहि कधी कसाला लावली नाही. हवे ते बाजारबुणगे जमत गेले, यजमानांच्या मोकळ्या थैल्यावर बाण्डगुळाप्रमाणे चर चर चरले, आणि यजमानाचा अंत होताच त्याच्या नावाने घंटा बडवून बडवेगिरी करीत बसले.
ब्राह्मणेतर चळवळीत छत्रपती शाहू महाराजांच्या काळातच मराठा–मराठेतर दुही माजली. त्याला मराठ्यांच्या स्वजातिवर्चस्वाचा भटी मद कारण ठरला. महाराजांनीही क्षात्रजगद्गुरू प्रकरणात क्षत्रिय म्हणजे मराठे असं घोषित केलं. सत्यशोधकी विचारांचा प्रभाव असलेल्या विवेकवाद्यांना हे सगळं पटणं शक्य नव्हतं. त्यातून महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर या चळवळीतल्या भेगा वाढत चालल्या. त्यातून अनेक विरोधाभास समोर आले, अशी मांडणी प्रबोधकारांनी केलीय. उमरावतीच्या ब्राम्हणेतर काँग्रेसमध्ये तर ब्राम्हण वगळून बाकीची सारी दुनिया चुटकीसरशी ब्राम्हणेतर दालनात आणून बसविली. त्यामुळे, शेतकर्यांच्या मुंड्या मुरगळणारे गुजर मारवाडी, देशाला दारूबाज बनविण्याचा राजरोस मला घेणारे सोमयाजी पारशी, आणि कजेदलालीच्या घरटात त्याला पिळून त्याच्या सर्वस्वनाशाच्या पिठावर आपल्या वैभवाच्या भाकर्या थापणारे कायदेबाज वकील कोंबडे, वगैरे शेतकर्यांचे खास शत्रू त्यांचे पुढारी बनले. कसाईच गोरक्षणाच्या चळवळीचे सूत्रधार बनल्यावर परिणामांची कल्पना वाटेल त्या रेम्या डोक्याने करावी. ब्राम्हणेतर चळवळीने ब्राम्हणांच्या सर्वदेशी वर्चस्वाला कायमचे गाडल्यामुळे, जातीने ब्राम्हण नसलेल्या शेटजी, भटजींचे आयतेच फावले.
त्यात माँटेंग्यू चेम्सफर्म योजनेनंतर झालेल्या स्थानिक कॉन्सिल निवडणुकांतल्या राजकारणाची भर पडली. प्रबोधनकार लिहितात, ब्राम्हणेतरी चळवळीने आपल्या मराठशाही मदाच्या धुंदीत भावी लोकशाहीच्या शेतकर्यांच्या स्वराज्याच्या मूळतत्त्वाला घातक अशा एका महापातकाला नव्यानेच जन्म दिला आहे. आजपर्यंत शेतकर्याला मातीला मिळविणार्या अनेक व्यसनांच्या ‘बाज्या’ उत्पन्न झाल्या. पण ही नवीन बाजी त्या सर्वांवर ताण करून शेतकरी-स्वराज्याच्या योजनेची भ्रूणहत्या केल्यावाचून राहणार नाही. ही नव्या पातकाची नवी बाजी म्हणजे इलेक्शनी व्होटबाजी ही होय.
निरक्षर शेतकर्यांना मतदानाचं महत्त्व कळत नसल्यामुळे पैसे देऊन किंवा दारू वाटून मतं विकत घेण्याची स्पर्धा सुरू झाली. परिणामी लायक पण गरीब उमेदवाराला कॉन्सिलचा दरवाजा बंद झाला. शिवाय तेव्हाचा अस्पृश्य वर्गही चळवळीपासून दूर झाला. त्यात सरकारी नोकरी हेच ब्राह्मणेतर चळवळीचं ध्येय असल्याचं मराठा तरुणांसमोर मांडलं जाऊ लागलं. प्रबोधकारांना हे चळवळीचं अधःपतन वाटल्यास आश्चर्य नाही. केवळ बहुजनांच्या जागृतीसाठी सरकारी नोकरी सोडणार्या प्रबोधनकारांना त्यासाठी चळवळीच्या पुढार्याचे कान धरण्याचा अधिकारही होता. ते त्यांनी अगदी सविस्तर केलेलं आढळतं.
प्रबोधनकार सांगतात, सामाजिक सुधारणा, धार्मिक स्वातंत्र्य, बौद्धिक परिणति वगैरे चट सार्या गोष्टी सरकारी नोकर्यांच्या खैरातीची यक्षिणीची कांडी फिरताच चुटकीसरशा घडून येतील, या कल्पनेत ते दंग झाल्यामुळे, त्यांनी ब्राम्हणेतर चळवळीचे निशाण आता फक्त सरकारी नोकर्यांच्या प्राप्तीवर रोखून धरले आहे. पण जो इमानी सरकार सेवक, तो इमानी जन सेवक राहू शकत नाही आणि जो इमानी जनसेवक, तो सरकारला प्रिय असत नाही. शासित शास्त्याना समानप्रिय असा प्राणी सशाच्या शिंगाइतकाच दुर्मीळ… प्रश्न इतकाच उरतो की जनसेवेची घमेंड मारणार हे वीर महावीर सरकारी सेवावृत्तीचे पट्टेदार बनल्यावर जनसेवा व समाजसेवा कशी काय करणार? ब्राम्हण नोकरशाही रयतेच्या हिताकडे पाहत नाही. ब्राम्हण अधिकार्यांकडून रयतेला त्रास होतो, न्याय मिळत नाही, जुलूमहि होतो म्हणून बहुसंख्यांक ब्राम्हणेतर जनतेच्या कळवळ्याचे ब्राम्हणेतर अधिकारी शेंकडा ५० ते ७५ प्रमाणात जर सरकारी नोकर्यांचे पट्टेदार बनतील तर, रयतेची आबादानी होईल; हा एक मुद्दा नोकर्याभिलाषी मराठे पुढारी नेहमी पुढे आणतात. या मुद्द्यात मनुष्यस्वभावाचे जितके अज्ञान आहे, तितकेच वस्तुस्थितीचेहि आहे.
सरकारी नोकर्यांत गेलेले ब्राह्मणेतर शेतकर्यांचं भलं कसं करणार असा प्रश्न प्रबोधनकार उभा करतात, सरकारी नोकर्यांच्या सर्व जागा भरगच्च भरून आपल्या विवक्षित समाजांचा सर्वांगीण आत्मोद्धार करण्याची शेखी मिरवणारे पुढारी लोक कसल्या शेणामेणाचे पुतळे असतात आणि नोकर्यांच्या हुलकावण्या दाखवून ते आपल्या समाजबांधवांच्या जागृतीचा आपल्या स्वतःच्या हळदकुंकवासाठी वâसा उपयोग करून घेतात, याची स्पष्ट जाणीव शेतकर्यांना होणे शेतकर्यांच्या स्वराज्याच्या चळवळीला अत्यंत जरुरीचे आहे. प्रश्न हाच उरतो कीं सरकारी कुत्तेगिरीचे पट्टे गळ्यात अडकविल्यानंतर हे श्वानवृत्तीचे समाज आपला सामाजिक आत्मोद्धार करून स्वराज्याला पात्र कसे होणार?
मुळात इंग्रजी सत्तेचं मर्म कारकुनीत नाही. ते त्यांच्या व्यापारात आहे. अशा वेळेस छत्रपती शिवरायांचा मराठा या कमी महत्त्वाच्या कामात अडकला तर ते इंग्रजांना हवंच आहे, त्यामुळे मराठ्यांनी शेती सोडू नये, असा वेगळाच मुद्दा प्रबोधनकार मांडतात. त्यासाठी प्रबोधनकार त्यांच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचं उदाहरण ठेवतात. या समाजाने कारकुनीपणासाठी शेती सोडली आणि लष्करी बाणाही. या समाजाची दुर्दशा सांगतच ते या प्रकरणाचा शेवट करतात, तो असा – शेतकी किंवा इतर स्वतंत्र उद्योगधंदा करणारे लोक दुर्गादेवी दुष्काळाच्या दुकानात सापडले तरी त्यांची कळण्या कोंड्यावर जगण्याची हिंमत असते. परंतु ठरावीक तनख्यावर जगणारा कारकून वर्ग तनखा नसला तर सुबतेच्या दिवसातच भिकेला लागतो. कारकुनी पेशाचा दुसरा भयंकर दोष म्हणजे ठराविक कामाचा ठराविक दाम घेण्याची सवय किंवा सवलत हाडीमासी खिळल्यामुळे, साहस, धडाडी, महत्त्वाकांक्षा, काटकपणा, स्वार्थत्यागबुद्धी, इत्यादि आत्मोन्नतिपोषक गुणांचा या वर्गात खडखडाट होतो. अर्थात् असल्या बिनसाहसी अल्पसंतुष्ट मानवपुत्रांची संख्या राष्ट्रात वाढविणे, हे अखंड गुलामगिरीचेच चिन्ह होय. अशा अवस्थेत, अर्थोत्पादक स्वतंत्र उद्योगधंद्याकडे आणि विशेषतः शेतीकडे तरुणांची मने वळविण्याऐवजी त्यांना कारकुनी पेशाचे व्यसन लावणारांनी आपल्या आत्मघातकी चळवळीचा नीट विचार करावा.
