
गणपतीबाप्पा
दणदणाट डीजेचा ऐकून
मोठे कान असून बसले
हृदय माझे विशाल असून
ते सुद्धा खूप धडधडले

गोंगाट आणि ध्वनिप्रदूषण
वैताग त्यांनी आणलाय मला
कधी यातून सुटका होते
हाच विचार छळतो मला
येताना नि जातानाही
मनात असते मोठी भीती
खड्यांनी या दणके बसती
खड्डे तरी चुकवू किती?
गणेशभक्त
नको बाप्पा लक्ष देऊस
ऐकणार नाही तुझे कोणी
अचकट विचकट रोंबासोंबा
आणि गाती कर्कश गाणी

सुंदर, सुबक मूर्ती आणून
घरी आम्ही पुजू तुला
मनोभावे पूजा करू
प्रिय मोदक देऊ तुला
आरती, गाणी, सुस्वर भजने
फुगड्यांनीही रात्र जागवू
अकरा दिवस सुखी रहा
तुझ्यासाठी सर्व मागवू
पुणेकर
इतकी वर्षे सुस्त होतो
आता मात्र झोप उडाली
डीजेच्या या आवाजाने
कानांची या काशी झाली

आम्ही सारे मूळचेच शहाणे
असे समजून कसे चालेल
विद्यानगरी पुण्याचीही या
लाज राखा कोण बोलेल?
उत्सव शांततेने व्हावा
हीच आमची असे इच्छा
कर्णकर्कश डीजेचा त्या
विरोध करील तोच सच्चा
मुंबईकर
उत्सव म्हणजे नुसता गोंगाट
लाऊडस्पीकरचाही आवाज
कशालाही नाही धरबंद
डीजेने या विटला समाज

दणदणादण आवाजाने
पेशंटलाही बसती धक्के
हार्ट पेशंट असला जर तो
मुकाट खाई डीजे बुक्के
आवाजाने किती मरती
कुणालाही नसे फिकीर
जो तो आपला स्वार्थ बघून
राजकारणाची मारी लकीर
लोकमान्य टिळक
कशासाठी कुणासाठी
सुरु केला गणेशोत्सव
आज त्याला पाहून वाटते
धागडधिंग्याचाच हा उत्सव

माझा हेतू होता फक्त
देशभक्तांनी एक व्हावे
इंग्रजांना या देशातून
अगदी लवकर हाकलून द्यावे
इंग्रज गेले, आपले आले
गणेशोत्सव तसाच राहिला
फक्त गोंगाट, हल्लागुल्ला
स्वर्गातून मी स्वतः पाहिला
