विजय पेंडसे ह्या मराठी माणसाचे नाव आणि त्याने भारतीय अवकाश संशोधन प्रगतीत दिलेले योगदान फार थोड्या लोकांना माहीत आहे. सुदैवाने तो मला मित्र मानत असे. आम्ही पुणे विद्यापीठ जिमखान्याकडून बरोबर क्रिकेट खेळलो. तिथे आमची ओळख झाली, पुढे तिचे मैत्रीत रूपांतर झाले. स्कायलार्क क्रिकेट क्लबकडून जिल्हा पातळीवर आम्ही क्रिकेट खेळत असू.
एखादी मध्येच सुट्टी आली किंवा शनिवार रविवार मॅच नसेल तर आम्ही काही मित्र स्कुटरवरून कुठंतरी भटकायला जायचो. असेच एकदा पोलादपूरला एका मित्राच्या नातेवाईकांकडे गेलो होतो. तिथे विजयने आश्चर्याचा धक्का दिला. मी एआरडीईच्या नोकरीचा राजीनामा दिलाय, हे त्याने इतक्या सहजपणे सांगितले की ते मेंदूत शिरायला वेळ लागला.
विजयला बीएससीत फर्स्ट क्लास मिळाला होता. नंतर त्याने एक वर्ष एका रासायनिक ़कंपनीत नोकरी केली. मग त्याने पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. तिथे फिजिकल केमिस्ट्री या विषयात तो नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लासमध्ये पास झाला. त्याला पीएचडी करायची होती. तो तेव्हाच्या विभाग प्रमुखांकडे गेला. त्यांनी विजयला काहीतरी थातुरमातुर कारण देऊन नकार दिला. काही दिवसांनी त्यांच्या
बॅचमधील एका ढ मुलाला, केवळ त्याचे आजोबा बनारस हिंदू विद्यापीठात त्यांच्याबरोबर शिकत होते या कारणास्तव, पीएचडीसाठी मार्गदर्शन करायचे ठरवले. तेव्हा विजयने परत पीएचडीच्या वाट्यास जायचे नाही असे ठरवले.
त्याच वेळी पुण्यातील एआरडीईमध्ये (आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट) भरती करायची जाहिरात आली होती. तिथे अर्ज केला. तो निवडलाही गेला. त्यावेळी ही संस्था गावाबाहेर, म्हणजे पाषाण तळ्याच्या परिसरात होती. तिथे विजय रोज बसने जायचा. त्यांना बुधवारी अर्धा दिवस सुट्टी असे. शैक्षणिक सुट्टीच्या काळात मी जर फील्डवर्कसाठी गेलो नसेन तर आम्ही साडे तीनचा सिनेमा बघायला जात होतो. दुसर्या महायुद्धासंबंधित सिनेमांची तेव्हा लाट आली होती. ते आणि अनेक हिंदी सिनेमा आम्ही त्या काळात बघितले.
एआरडीईमध्ये ज्युनियर सायंटिस्ट पदावरील व्यक्तींना आळीपाळीने ओपनिंग आणि क्लोजिंग ड्युटी करावी लागत असे. विजयवर एकदा अशीच क्लोजिंग ड्युटी आली होती. सगळेजण निघून गेल्याशिवाय विजयची सुटका होणार नव्हती. रघु नावाचे त्याचे एक वरिष्ठ ऑफिसची वेळ संपली तरी काम करीत बसले होते. ते गेल्याशिवाय विजयची सुटका होणार नव्हती. विजय थांबला. साधारणपणे अर्ध्या तासानंतर दोन माणसं रघुंना भेटायला आली. एक लांब केस वाढवलेला मद्रासी आणि एक गोरा टकल्या माणूस. ’पेंडसे, हे दोघं इस्रोमधून आले आहेत. त्यांनी काही धोकादायक पदार्थ बरोबर आणलेत. ते नष्ट करायचे आहेत.’ विजयने त्या दोघांना टेस्टिंग रेंजवर नेले आणि त्या पदार्थांची विल्हेवाट लावली. त्या रात्री त्याला घरी यायला खूप उशीर झाला.
त्याच सुमारास वृत्तपत्रांमधून इस्रोत शास्त्रज्ञ/अभियंते यांची भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी जाहिरात आली होती. विजयने तसेच त्याच्या आणखी एका सहकार्याने अर्ज पाठवला. तो सहकारी निवडला गेला पण त्याने ती नोकरी स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा विजयची त्या पदावर नेमणूक झाल्याचे विजयला कळवण्यात आले. वडिलांनी तुला हवे ते कर, असे सांगितले. तेव्हा विजयने आधी एआरडीईचा राजीनामा दिला आणि नंतर आम्हा मित्रांना सांगितले. तो आम्हाला धक्काच होता.
‘अरे, तू आणि इतर मित्रांच्या आग्रहाला बळी पडून विचार बदलू नये, म्हणून मी असे केले,’ असे त्याने मला नंतर सांगितले. मला त्याच खरे कारण माहीत होते. तो ज्या माणसाच्या हाताखाली काम करीत होता, तो वृत्तीने हलकट होता. केवळ आपण त्रास देऊ शकतो म्हणून तो विजयला त्रास देत असे. मलाही पुढे या प्रकारच्या त्रासाला कंटाळून विद्यापीठाची आणि नंतर म. फुले संग्रहालयाची नोकरी सोडावी लागली होती.
विजयने त्रिवेंद्रमला जायचे ठरवले. त्या काळात त्रिवेंद्रमला जाणे आजच्याइतके सोपे नव्हते. खूप आडनिडा प्रवास होता. दोन तीन वेळा गाड्या बदलाव्या लागत असत. त्रिवेंद्रमला पोहोचल्यावर विजयला एक इस्रोत काम करणारा माणूस भेटला. तो ज्या हॉटेलमध्ये रहात असे तिथेच विजयही राहू लागला. त्याला सुरुवातीला थुंबा इक्वेटोरियल
रॉकेट लाँचिंग स्टेशनवर काम करायचे होते. हे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र त्रिवेंद्रम पासून बरेच दूर होते. विजय हा पहिल्यापासून अत्यंत शिस्तीचा माणूस. त्याने आजूबाजूच्या माणसांचे, केरळी स्त्रियांचे केलेले वर्णन वाचताना आपण ते दृष्य बघतोय, असे वाटते. त्याने त्या काळातले अनुभव लिहिताना स्वत:च्या फजितीची माहितीही दिली आहे.
इथे त्याला एआरडीईत आलेला गोरा टकल्या माणूस भेटला. त्याचं नाव पद्मनाभन्. त्याने विजयला ‘तू गोवारीकर यांच्याकडे काम करायचंय’ अशी माहिती दिली. पायरो वसंत गोवारीकर यांच्याशी त्याची ही पहिली भेट. गोवारीकरांनी त्याला पायरोलॅबमध्ये इ.व्हि.ए. बाबू नावाच्या माणसाच्या हाताखाली काम कर, असे सांगितले. काम त्याचे त्यानेच शोधायचे होते. जवळजवळ महिनाभर विजय काम शोधत होता. तो जे काम करू का? असे विचारत असे त्ो आधीच दुसर्या कुणाला सांगितलेले असे. एक दिवस विजयला बरीच खोकी एका बाजूला रचून ठेवलेली दिसली. ती ज्या कंपनीची होती, त्या कंपनीच्या माणसांनी येऊन ती उघडणं अपेक्षित होते. दोन महिने झाले तरी ती माणसे काही आली नव्हती. तेव्हा बाबूंच्या परवानगीने विजयने ती खोकी उडली. ते डीटीए (डिफरन्शियल थर्मल अॅनॅलिसिस) यंत्राचे सुटे भाग आहेत हे विजयच्या लक्षात आले. त्याने ते यंत्र जोडले आणि सुरू केले.
तिथून विजयची उचलबांगडी दूरवर असलेल्या एका इमारतीत झाली. तिथेही त्याला नुसतं बसून राहावं लागत होतं. त्याचं डीटीए मशीन सोडून इतर कुठल्याही यंत्रणेला हात लावायची त्याला परवानगी नव्हती. आजूबाजूला सगळे मल्याळम बोलत. विजयच अस्तित्व त्यांना जाणवत नसे. कणबूर नावाचे एक मराठी अधिकारी एक दिवस तिथे आले. त्यांना जे काम करून हवं होतं ते करण्यासाठी लागणारी उपकरणे वापरायला विजयला बंदी होती. त्याचे म्हणणे ऐकून कणबूर त्याच्याशी न बोलताच तिथून निघून गेले. तेव्हा इस्रोत नोकरी पत्करली ही आपली चूक झाली की काय अशी भावना विजयच्या मनात डोकावून गेली.
दरम्यान त्यांच्या लॅबमध्ये सोमशेखरन नावाचा इंजिनिअर आला. त्याची आणि विजयची मैत्री जमली. सोमशेखर मल्याळी ख्रिश्चन असूनसुद्धा त्याच्याशी कुणी बोलत नसे, कारण तो पूर्वाश्रमीच्या दलित कुटुंबातील होता. सोमशेखरच्या रुपाने विजयला मन मोकळे करता येईल असा एक मित्र मिळाला. कणबूरांकडे त्रिवेंद्रम मधली सगळी मराठी माणसं अधूनमधून जमत. तिथल्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी कणबूर खूप परिश्रम घेत. त्यामुळे विजयची रिझर्व्ह बँक आणि इतर क्षेत्रातील मराठी माणसांशी ओळख झाली.
१९७४ साली कणबुरांनी इस्रोच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि खाजगी क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या सेंड ऑफ पार्टीच्या वेळी खूप उशीर झाला म्हणून विजयची चुळबूळ सुरू झाली. शेवटची बस चुकवून चालणार नव्हते. ते गोवारीकर यांच्या लक्षात आले. त्यांनी विजयला, तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला सोडतो, असे सांगितले. पहाटेच्या स्रुमारास त्यांनी त्यांच्या गाडीतून विजयला त्याच्या घरी सोडले. या घटनेनंतर विजय हा गोवारीकर यांच्या खास मर्जीतील माणूस आहे, असा इस्रोतील लोकांचा समज झाला. तेव्हापासून त्याच्याशी सगळे लोक नीट वागू लागले.
वेलीसारख्या पठारावरील ठिकाणावर टर्ल्सपासून दूर असलेल्या ठिकाणी नुसते बसून राहणे विजयला मानवत नव्हते. आपण ही नोकरी स्वीकारली ही चूक झाली की काय असे निराशाजनक विचार त्याच्या मनात डोकावू लागले होते. त्यातच त्रिवेंद्रममधून मराठी माणसे कमी होऊ लागली होती. तेव्हा त्याने त्याचे वरिष्ठ बाबू यांच्याकडे एक महिना रजेचा अर्ज दिला आणि मी पुण्याला जात आहे, बहुदा परत येणार नाही, असे सांगून तो निघाला. दोन दिवसानंतर त्याच्या हाती एक खलिता पडला. त्यात त्याची रजा मंजूर झाली
असून त्याची नवी नेमणूक स्प्रॉब सेंटरला झाल्याचे नेमणूक पत्र होते. स्प्रॉब म्हणजे
सॅटेलाईट प्रॉपेलंट बूस्टर- घन इंधनी प्रक्षेपण केंद्र, हे श्रीहरिकोटा येथे होते. त्याच वेळी रेल्वेच्या कर्मचार्यांचा संप सुरू झाला. बर्याच अडचणी पार करून विजय श्रीहरिकोटाला पोहोचला. तिथे अजून सगळेच अर्धवट अवस्थेत होते. संपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीची सुरुवात होती ती. इमारतींना छपरं नव्हती. फर्निचरचे काम चालू होते. राहण्याची सोय नव्हती. सुलूरपेठ या गावी राहून रोज प्रवास करून कामं करावी लागत होती. काही दिवसांनी कर्मचार्यांना क्वार्टर मिळाले.
डॉ. एस.के. मुजुमदार दर शनिवार रविवार श्रीहरिकोटा येथे येऊन कामं करीत असत. त्यामुळे स्थानिक कर्मचार्यांना शनिवार रविवार सुट्टी गमवावी लागत असल्याने त्यांच्यात असंतोष होता. विजयने ही परिस्थिती मुजुमदारांच्या कानावर घातली. त्यानंतर मुजुमदार यांनी मी लौकरच श्रीहरिकोटा येथे राहायला येणार आहे, असे सांगून कर्मचार्यांना आश्वस्त केले. मुजुमदार यांचे विजयाबद्दल मत काहीसे पूर्वग्रहदूषित असावे. त्रिवेंद्रमला विजयने याचा अनुभव घेतला होता. एकदा असेच मुजुमदार श्रीहरिकोटा येथे आले असताना त्यांनी सगळ्यांना त्यांना कुठल्या गोष्टींची गरज आहे, असे विचारले. सर्वांनी आपापल्या याद्या मुजुमदार यांच्याकडे दिल्या. ते विजयला म्हणाले, पेंडसे, सगळ्यांनी आपापल्या याद्या दिल्या, तुमची यादी यात दिसत नाही, नुसते बसण्यासाठी पगार घेता का? काम करीत जा. विजयचा संयम सुटला. तो ताडकन म्हणाला,’ माझ्या प्रयोगशाळेत मशीनचे सुटे भाग आहेत, ते जोपर्यंत जोडून होत नाहीत तोपर्यंत मला काय हवं ते कळणार नाही. नंतर मी यादी देईन. हे तुमच्या डोळ्यात धूळ फेकतात. याद्या देतात आणि पत्ते खेळत वेळ घालवतात.’ विजय असं काही बोलेल हे कुणालाच अपेक्षित नव्हतं. सगळे थक्क झाले. यानंतर मात्र मुजुमदारांनी विजयला बोलणे बंद केले.
१९७८मध्ये एस एल व्ही ३च्या चाचण्या सुरू झाल्या. स्वत: एपीजे अब्दुल कलाम या चाचण्या करताना उपस्थित होते. या आधी सतीश धवन यांच्या उपस्थितीत झालेल्या चाचण्यात एसएलव्ही थ्रीच्या उड्डाणात काही अडथळे आले होते. त्यातील द्रव इंधन दुसर्या आणी तिसर्या टप्प्यातील सांध्यांमधून गळत होते. तिथे रोकॅसिन नावाचा रबरासारखा एक पदार्थ बसवला तर ही गळती थांबवता येईल असे विजयला वाटत होते. त्याने ती चाचणी केली. त्यासाठी सीआरएसएफने एक शार्पशूटर निवडला. त्याने पंधरा फूट अंतरावरून त्या पदार्थावर गोळी झाडली. ती गोळी त्या पदार्थाने अडवली. तेव्हा रोकॅसिन वापरून ही गळती थांबविण्यात यावी असे ठरले. यासाठी विजयचे कौतुक झाले.
रोहिणी अग्निबाण प्रक्षेपणाचे वेळी स्थानिक कोळी लोक अग्निबाणाचे भाग आमच्या झोपड्यांवर पडून नुकसान झाले म्हणून नुकसानभरपाई वसूल करीत असत. एसएलव्ही थ्री पडले असते तर हाहा:कार माजला असता. त्याच सुमारास सागरी वादळाने देशाच्या पूर्व किनार्यावर धुमाकूळ घातला. त्यावेळी या मच्छीमारांचे आणखी उत्तरेस पुनर्वसन करण्यात आले. १९९४मध्ये विजयची पत्नी ज्योत्स्ना हिला अमेरिकेत फिजिओथेरपिस्ट म्हणून नोकरी मिळाली. ती शिकागोजवळ ओकेमॉस येथे राहात होती. मुलाची अकरावी झाल्यानंतर १९९५मध्ये विजयने इस्रोचा राजीनामा दिला आणि तो मुलासह अमेरिकेस रवाना झाला.
हा लेख विजयशी झालेल्या गप्पा, आमचा पत्रव्यवहार, त्याचा प्रदीर्घ लेख यांचे सार आहे. त्याचे तीस वर्षांचे कर्तृत्व इतक्या कमी शब्दात मांडणे, ही कसरत त्रयस्थपणे करणे, मला जमेल तसे मी केले आहे.
