• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

विक्रमवीर मुख्यमंत्री महोदय,पाठिंब्याची आठवण ठेवा!

योगेश वसंत त्रिवेदी चौफेर

Marmik Team by Marmik Team
July 31, 2026
in भाष्य, विशेष लेख
0
विक्रमवीर मुख्यमंत्री महोदय,पाठिंब्याची आठवण ठेवा!

भारतीय जनता पार्टी ही खरंच भारतीय इव्हेंट पार्टी झाली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मागच्या महिन्यात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला आणि आता ‘९२ लाख नकोशा झालेल्या लाडक्या बहिणीं’चे लाडके ‘देवाभाऊ’ यांचा, वसंतराव नाईक यांच्यानंतरचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहिल्याबद्दल गौरव करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने पुन्हा पुन्हा इव्हेंट करण्याचा मोका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मिळतोय आणि त्यायोगे ‘मी साहेबांच्या किती जवळचा आहे’ हे दाखवून देण्याची अहमहमिका लागली आहे.

एका वाहिनीवर प्रश्नांचा भडिमार करणार्‍या पत्रकारांना तात्काळ कवेत घेऊन मुख्य प्रवक्तेपदावर विराजमान करण्यात आले, इतकेच नव्हे तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून सुद्धा आणले. बिच्चारे निष्ठावंत कार्यकर्ते बसले झेंडे फडकवित आणि सतरंज्या उचलीत. मुळात २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत मोदी यांची पंतप्रधानपदाची आणि फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची स्थिर ठेवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्याची आर्जवे करण्यात आली होती. अर्थात या गोष्टीची भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना अजिबात जाणीव नाही. राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा विरोधक नसतो अथवा मित्र नसतो, हे खरे असले तरी किमानपक्षी नैतिकतेचा टेंभा मिरविणार्‍यांनी जाणीव ठेवणे आवश्यक आहे. २०१९पर्यंत तब्बल पाच वर्षे उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळेच हे सरकार टिकले.

२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द न पाळल्यामुळे शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस मिळून महाविकास आघाडी सत्ताधारी होऊ शकते, असे सूतोवाच केले होते. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी वरळीच्या नेहरु केंद्रात झालेल्या बैठकीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे नेतृत्व स्वीकारावे लागले. परंतु २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भल्या पहाटे होशियारी दाखवत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांना राजभवनावर अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. परंतु अजितदादांनी सूत्रे स्वीकारली नाहीत म्हणून फडणवीस यांच्या नावावर महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीतले ‘तब्बल’ ऐंशी तासाचे मुख्यमंत्री म्हणून विक्रम नोंदविला गेला. अर्थात त्याचा भाजपनेत्यांनी इव्हेंट साजरा केला नाही. परंतु ज्या प्रदीर्घ कारकीर्दीच्या विक्रमात उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्याचा वाघाचा (सिंहाचा) वाटा आहे, ते कबूल करण्याचा मनाचा मोठेपणा भाजपनेत्यांमध्ये अजिबात नाही, हेच दिसून येते. केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्याखाली असलेल्या सरकारने कलम ३७० रद्द करण्याचा घेतलेला निर्णय असो अथवा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शेतकर्‍यांना देण्यात आलेली कर्जमाफी योजना; या निर्णयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांचा विद्यमान सत्ताधीशांना विसर पडला असला तरी देशातील १४० कोटी आणि राज्यातील १३ कोटी नागरिकांना तुम्ही फसवू शकत नाही.

पूर्वीच्या काळी झालेल्या प्रकल्पांची बरोबरी आताच्या प्रकल्पांशी होऊच शकत नाही. आता घाईघाईने, त्वरेने होत असलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर त्यांची काय अवस्था होत आहे ते मिसिंग लिंक, अक्वा मेट्रो लाईन ३, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग यांच्यावरुन दिसून येते. कोकणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यापासून दीपक केसरकर यांच्यापर्यंत सगळ्यांनी जी वक्तव्ये केली ती चीड आणणारीच होती. हिंदवी स्वराज्य संस्थापक गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा होत असलेला अपमान, राज्यातील शेतकरी, कामगार, महिला, आदिवासी, बेरोजगार तरुणांना त्यांच्या विकासासाठी कोणतीही ठोस ग्वाही सरकार देऊ शकत नाही. उशिरा आलेल्या पण एकाच आठवड्यात मुंबई सह महाराष्ट्रात अतोनात नुकसान करून गेलेल्या पावसाने सरकारला अक्षरशः उघडे पाडले आहे. जेमतेम १४ दिवस पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केवळ ९७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सोडल्या तर १३ कोटी नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली, असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

नरेंद्र मोदी यांनी १९५२ ते २०२६ या काळात पंतप्रधान म्हणून विक्रम नोंदविला असल्याचा डांगोरा पिटला तरी १९४७ पासून १९५२ पर्यंत पंडित जवाहरलाल नेहरु हेच संवैधानिक पद्धतीने भारताचे पंतप्रधान होते हे नाकारता येणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नावावरचा विक्रम असल्याचे धडधडीत असत्य सर्वत्र पसरविण्यात येत आहे. ‘विक्रम विक्रम म्हणून करा जरी धोशा, पण १३ कोटी नागरिकांच्या पूर्ण करा अपेक्षा’, हेच महत्त्वाचे आहे. देवाभाऊ, आपण उद्धव ठाकरे यांचा उदास, निराश, वैफल्यग्रस्त असा उल्लेख जरी करीत असलात तरी उद्धव ठाकरे यांनी तब्बल पाच वर्षे दिलेल्या पाठिंब्याची आठवण ठेवाल आणि चांगल्या कामात उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे योगदान निश्चित असल्याचे मान्य कराल, अशाr अपेक्षा व्यक्त करतो.

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

Previous Post

बेरोजगारांना लॉजिस्टिक क्षेत्र खुणावतंय!

Next Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post
फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.