(पूर्वार्ध : एका पतपेढीच्या व्हॅनवर पडलेल्या दरोड्याचा तपास करताना इन्स्पेक्टर साळवे यांना खात्री होती की यात पतपेढीमधल्या कोणाचा तरी हात निश्चित आहे. दरोड्याच्या आदल्या काही दिवसांमध्ये एका माणसाला दिला जाणारा फॉर्म,
मॅनेजरच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये सापडलेली लिंबं यांच्यामधून त्यांच्या मनात काही धागेदोरे जुळले… पुढे काय झाले? या कथेचा पहिला भाग वाचण्यासाठी इथं क्लिक करा….
कथेचा पुढील भाग वाचा…)
पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर साळवे यांनी संपूर्ण टीमला केबिनमध्ये बोलावले. टेबलवर बँकेचे ते अर्धेमुर्धे भरलेले लोन फॉर्म आणि परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजचे स्क्रीनशॉट्स पसरलेले होते. वातावरणात एक प्रकारचा गंभीर तणाव होता. साळवे टीमकडे पाहत म्हणाले, ‘टीम, काल बँकेतून लोनचे फॉर्म घ्यायला आलेला जो माणूस होता ना… तो फक्त चौकशी करायला आला नव्हता. त्याच्या हालचाली, त्याचा वावर आणि त्याची ती सतत फिरणारी नजर… मला तो माणूस अत्यंत संशयास्पद वाटतोय. तो बँकेची किंवा एखाद्या मोठ्या व्यवहाराची रेकी करायलाच आला होता, असा माझा ठाम अंदाज आहे.’
कॉन्स्टेबल कदम यांनी पुढे होऊन विचारले, ‘पण साहेब, त्याने फॉर्मवर नाव-पत्ता तर सगळा खोटाच लिहिला असणार. मग त्याला शोधायचं कसं?’
‘त्याचसाठी आपण इथे जमलोय,’ साळवे टेबलावर हात ठेवत म्हणाले. ‘आपल्याकडे सध्या सगळ्यात मोठा पुरावा आहे तो म्हणजे त्या बँकेचे आणि परिसराचे सीसीटीव्ही फुटेज. आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यापर्यंत पोहोचणार आहोत.’
साळवे यांनी टीमला कामाची विभागणी करून दिली. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर रस्त्यावरील सीसीटीव्ही
ट्रॅक करत पोलीस रामवाडीतील एका गल्लीत पोहोचले. तिथल्या एका दुकानदाराला फोटो दाखवताच तो म्हणाला, ‘हा तर किशन वर्मा! पाच नंबरच्या खोलीत राहतो.’
पोलिसांनी पाच नंबर खोलीवर छापा टाकली. किशन वर्मा एकटाच होता. त्याच्या पँटच्या खिशात पतपेढीचे दोन कोरे लोन अर्ज सापडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. ‘साहेब, मला काहीच माहीत नाही!’ किशन घाबरून ओरडला. ‘माझा मित्र गणेश राय याने मला सांगितले होते की मॅनेजरशी त्याची ओळख आहे. तो मला एक लाखाचे लोन काढून देईल. माझी बहीण गावी लग्नाला आहे, मला पैशांची गरज होती. म्हणून मी त्याच्या सांगण्यावरून फॉर्म आणायला गेलो होतो.’
‘मग तू दोन वेळा फॉर्म का आणलास? आणि हे फॉर्म अजून कोरेच कसे आहेत?’ साळवे यांनी विचारले.
‘सोमवारी मी फॉर्म आणला, पण गणेश म्हणाला दोन प्रती भरू. एक लाखाची एक अन् एक दोन लाखाची. गुरुवारी मी दुसरा फॉर्म आणला. गणेश सकाळी १० वाजता माझ्या खोलीवर आला, त्याने फॉर्म घेतला, मला जेवण आणायला पाठवले. मी परत आल्यावर मला फॉर्म परत दिले आणि नंतर भरू असे सांगून जेवणाचे पार्सल घेऊन तो साडेअकरा वाजता निघून गेला.’
इन्स्पेक्टर साळवे यांनी किशनकडून ते दोन कोरे फॉर्म घेतले. फॉर्म हाताळताना साळवे यांच्या अनुभवी बोटांना काहीतरी वेगळे जाणवले. कागदाचा वरचा भाग चांगला होता, पण खालील अर्धा भाग थोडा भिजून वाळल्यासारखा आणि खडबडीत वाटत होता, म्हणून त्यांनी पतपेढीतून दुसरे कोरे फॉर्म मागविले. ते आणि किशनकडे मिळालेले फॉर्म यात फरक जाणवत होता. ती गोष्ट साळवे यांना खटकली होती.
‘मोरे! हा कागद घेऊन आत्ताच्या आत्ता फॉरेन्सिक लॅबमध्ये पळा!’ साळवे ओरडले.
काही तासांतच फॉरेन्सिक लॅबमधून फोन आला. साळवे तातडीने लॅबमध्ये पोहोचले. लॅबचे इनचार्ज डॉ. शामसुंदर यांनी तो कागद ‘एक्स-रे लाईट बोर्ड’वर लावला आणि लाईट ऑन केली. लाईट ऑन होताच कागदावरील अदृश्य अक्षरे स्पष्ट दिसू लागली! लिंबाच्या रसाने लिहिलेला गुप्त मेसेज प्रकाशामुळे स्पष्ट दिसत होता!
पहिल्या कागदावर लिहिले होते : आज गाडी जाणार आहे, पण कॅश कमी आहे. सिक्युरिटी पण कडक आहे. आज काही नको.’
दुसर्या (गुरुवारच्या) कागदावर लिहिले होते : ‘आज १२ वाजता ५० लाख घेऊन गाडी मेन ऑफिसला निघणार आहे. नेहमीचा सिक्युरिटी रजेवर आहे. बदली सिक्युरिटी वयस्कर आहे, वेपन नाही. आज गेम करा! तीन दिवसांनी गिरणीवाडीतील बंद गोडाऊनमागे रात्री आठ वाजता पैशांसह भेटा. तिथे वाटणी करू.’
‘डॉक्टर, हे कसं शक्य आहे? साध्या डोळ्यांनी हा कागद अगदी कोरा दिसत होता!’ साळवेंनी विचारले.
‘साळवे साहेब, याला फॉरेन्सिक सायन्सच्या भाषेत ‘अदृश्य शाई’ किंवा ‘सिम्पथेटिक इंक’ म्हणतात,’ डॉ. शामसुंदर यांनी समजावून सांगायला सुरुवात केली.
‘पण हे नक्की काम कसं करतं, डॉक्टर? कुठली शाई वापरलीय यात?’ साळवे यांनी विचारले.
‘यामध्ये ‘लिंबाचा रस’ वापरला गेला आहे,’ डॉ. शामसुंदर शास्त्रीय भाषेत सांगू लागले, ‘बघा, लिंबाच्या रसात मुख्यत्वे सायट्रिक अॅसिड आणि पाणी असते. जेव्हा कोणी लिंबाच्या रसाने कागदावर लिहितो, तेव्हा त्यातील अॅसिड कागदाच्या सेल्युलोज तंतूंना रासायनिकदृष्ट्या अंशतः कमकुवत बनवते. लिंबाचा रस सुकल्यानंतर तो पूर्णपणे पारदर्शक होतो, ज्यामुळे साध्या डोळ्यांना किंवा नेहमीच्या प्रकाशात कागदावर काहीच दिसत नाही.’
‘मग आता हे लिहिलेलं अचानक कसं दिसू लागलं?’ साळवे यांनी आश्चर्यान्ो विचारले.
‘हा फॉरेन्सिकमधील ‘थर्मल डिकंपोझिशन’चा म्हणजेच ‘औष्णिक विघटना’चा भाग आहे साळवे साहेब!’ डॉ. शामसुंदर पुढे म्हणाले, ‘जेव्हा या कागदाला हलकी उष्णता दिली जाते किंवा ठराविक तीव्रतेच्या अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाखाली धरले जाते, तेव्हा लिंबाचा रस असलेल्या भागातील सायट्रिक अॅसिडचे ऑक्सिडायझेशन होते. त्या भागातील कार्बनची संयुगे पेटून न उठता करपतात आणि कार्बनचे सूक्ष्म अवशेष कागदावर मागे राहतात. त्यामुळे तो भाग तपकिरी-पिवळसर होतो आणि अदृश्य झालेली अक्षरे स्पष्ट वाचता येतात!’
‘अद्भूत! म्हणजे चोराने मोबाईल टाळण्यासाठी आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी विज्ञानाचा हा खेळ वापरला होता तर!’ साळवे कपाळावर हात मारत म्हणाले.
‘अगदी बरोबर! पण साळवे साहेब, हा मजकूर सध्या फक्त या लाईट बोर्डवरच दिसत आहे. कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यासाठी आपल्याला या हस्ताक्षराची ‘फिंगरप्रिंट’ किंवा ‘डिजिटल इमेज’ हवी लागेल,’ डॉ. शामसुंदर यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला.
‘म्हणजे? कोर्टात हे कसं सिद्ध करणार आपण?’ साळवे यांनी विचारले.
डॉ. शामसुंदर यांनी लॅबमधील हाय-रिझोल्यूशन कॅमेर्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, ‘मी काय करतो, या लाईट बोर्डवर दिसणार्या संपूर्ण मजकुराचा आणि हस्ताक्षराचा हाय-कॉन्ट्रास्ट मॅक्रो फोटो काढतो. या फोटोमध्ये प्रत्येक अक्षराची वळणे, कट आणि लिहायची पद्धत अत्यंत स्पष्ट दिसेल. मी या डिजिटल इमेजची एक ‘फॉरेन्सिक फोटोग्राफी प्रिंट’ तयार करून त्यावर माझे लॅब सर्टिफिकेट देतो.’
साळवे यांच्या चेहर्यावर डिजिटल इमेजचा प्लॅन ऐकून समाधान दिसले.
‘आणि पुढे काय करायचे साहेब?’
डॉक्टरांनी विचारले.
‘पुढे सोपं आहे डॉक्टर!’ साळवे उत्साहाने म्हणाले, ‘तुमच्या या फोटो प्रिंटच्या आधारे मला आता फक्त संशयिताचे ‘नमुना हस्ताक्षर’ घ्यायचे आहे. मी त्याला पोलीस ठाण्यात आणून काहीतरी निमित्त काढून त्याच्याच हाताने एक अहवाल लिहून घेईन. मग ती हस्तलिखित प्रत आणि तुमची ही फोटो प्रिंट, दोन्ही आपल्या ‘हस्ताक्षर तज्ज्ञाकडे’ पाठवून देईन. एकदा का दोन्ही अक्षरांची वळणे जुळली की कोर्टात हाच आमचा सर्वात भक्कम आणि पक्का पुरावा ठरेल!’
‘परफेक्ट साळवे साहेब! ही घ्या तुमच्या डिजिटल इमेजची प्रिंट आणि लॅब रिपोर्ट आता पकडा त्या घरभेद्याला!’ डॉ. शामसुंदर यांनी फोटो प्रिंट साळवे यांच्या हातात सोपवली.
‘थँक्यू डॉक्टर! विज्ञानाने आज पोलिसांचा तपास खरोखरच सोपा केला!’ असे म्हणून साळवे ती फोटो प्रिंट घेऊन तातडीने पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले.
आता मुख्य सूत्रधार बँक मॅनेजर होता हे सिद्ध झाले होते. पण मुख्य चोराला पकडण्यासाठी आणि त्यांनी लंपास केलेले ५० लाख रुपये हस्तगत करण्यासाठी
मॅनेजरला आत्ताच अटक करणे चुकीचे ठरले असते. मॅनेजरला अटक झाली की बाकीचे साथीदार पळून जातील म्हणून साळवे यांनी एक युक्ती आखली. मॅनेजरला त्याचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले. तो आल्यावर साळवे यांनी त्यांच्या नाटकाचा प्रयोग रंगवला. ‘अहो मॅनेजर साहेब, आमचा रायटर कुठेतरी निघून गेलाय! तुमचा एवढा मौल्यवान वेळ वाया जातोय. थांब, मी त्या रायटरची कानउघाडणीच करतो!’ साळवे कर्मचार्यांवर खोटेच ओरडले.
मॅनेजर म्हणाला, ‘नका ओरडू त्यांच्यावर साहेब. काही हरकत नाही, मी माझ्या स्वतःच्या हाताने जबाब लिहून देतो. त्यात काय एवढं? कसं लिहायचं ते सांगा फक्त.’ मॅनेजरने स्वतःच्या हस्ताक्षरात संपूर्ण जबाब लिहून सही केली. साळवे यांनी त्यांना चहा पाजला आणि ते जणूकाही आपले
प्रतिष्ठित मित्र असल्यासारखेच त्यांना वागवले. ते गेल्यानंतर तो कागद आणि
फॉरेन्सिक लॅबमधील लिंबाच्या रसाने लिहिलेला कागद हँडरायटिंग एक्सपर्टकडे पाठवला. दोन्ही अक्षरे एकाच व्यक्तीची असल्याचे त्यांनी प्राथमिक तपासणी करून सांगितले. आता साळवे यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली. मॅनेजरच्या घराभोवती, रस्त्यावर साध्या गणवेशातील पोलीस तैनात करण्यात आले.
ठरल्याप्रमाणे तीन दिवसांनी, म्हणजे रविवारी संध्याकाळी आठ वाजता मॅनेजरला त्याच्या साथीदारांना गिरणीवाडीतील बंद गोडाऊनमागे भेटायचे होते. रविवार सकाळपासूनच पोलिसांची टीम गिरणी परिसरात दबा धरून बसली होती. संध्याकाळी सात वाजता मॅनेजर घरातून किराणा मालाची मोठी पिशवी घेऊन मोटरसायकलवरून निघाला. वॉकी-टॉकीवर साळवे यांना क्षणाक्षणाची माहिती मिळत होती. गोडाऊनच्या परिसरात चार तरुण संशयास्पदरीत्या फिरत होते. त्यांच्याजवळ एक मोठी बॅग होती.
साडेआठच्या सुमारास मॅनेजर तिथे पोहोचला. गाडी पार्क करून तो त्या चार तरुणांना भेटला. चोरांनी पैशांची बॅग पुढे केली आणि ते सर्व जण गोडाऊनच्या अगदी मागे अंधारात बसले.
‘साहेब, सर्व आरोपी एकत्र आले आहेत!’ दबा धरून बसलेल्या पोलिसांचा इशारा मिळाला.
‘अटॅक!’ साळवे गरजले.
चारही बाजूने पोलिसांनी गोडाऊनला वेढा घातला आणि क्षणाचाही वाव न देता सर्व पाच जणांवर झडप घातली! बॅग उघडून पाहिली असता त्यात पतपेढीचे शिक्के असलेल्या ५० लाखांच्या नोटांचे बंडल चमकत होते!
पोलीस ठाण्यात आणल्यावर सुरुवातीला मॅनेजर आणि ते चारही चोर नाटक करू लागले. पण जेव्हा साळवे यांनी पोलिसांचा ‘खाक्या’ दाखवला आणि थर्ड डिग्रीचा वापर केला, तेव्हा मॅनेजर साळवे यांचे पाय धरून रडू लागला.
‘साहेब! माफ करा साहेब! माझ्याकडून चूक झाली!’
‘उठ! आणि सरळ सांग काय प्रकार आहे हा!’ साळवे कडक आवाजात म्हणाले.
मॅनेजर रडत रडत सांगू लागला, ‘साहेब… माझे एका बारबाला असलेल्या मुलीवर प्रेम जडले होते. माझ्या बायकोला हे माहीत नव्हते. ती मुलगी मला ब्लॅकमेल करून पैशांसाठी त्रास देत होती. माझे सर्व उत्पन्न तिच्यावर उधळले जायचे. मी प्रचंड कर्जात बुडालो होतो. सावकारांनी मला शेवटचा अल्टीमेटम दिला होता.’
तो पुढे म्हणाला, ‘एक दिवस बारमध्ये माझी या चौघांशी ओळख झाली. हे दोघे-दोघे मिळून लहान-सहान चोर्या करायचे. मी टीव्हीवर वेबसीरिज आणि ‘क्राइम पेट्रोल’ पाहतो. त्यावरून मला ही आयडिया सुचली. मोबाईल वापरला की पोलीस लोकेशन ट्रॅक करतात, म्हणून मोबाईल टाळायचा ठरवले. मला माहित होते की लिंबाच्या रसाने लिहिलेले कागद सुकल्यावर कोरे दिसतात. म्हणून मी लिंबाच्या रसाचा वापर केला.’
‘आणि त्या दोन गाड्यांचे काय रहस्य आहे?’ साळवे यांनी विचारले.
तेव्हा एका चोराने कबुली दिली, ‘साहेब, पोलिसांना भरकटवण्यासाठी आम्ही एकसारख्या दिसणार्या दोन चोरीच्या पल्सर गाड्या वापरल्या होत्या! एक गाडी पतपेढीपासून व्हॅनचा पाठलाग करत निघाली. ती गाडी मुद्दाम कॅमेरे संपतात तिथे वळून झोपडपट्टीत निघून गेली, जेणेकरून पोलीस तिच्या मागे जातील.’
‘आणि दुसरी गाडी?’
‘दुसरी पल्सर घेऊन त्यातील दोघे आधीपासूनच झाडीत लपून बसले होते साहेब! त्यांनी व्हॅन लुटली, पैसे घेतले आणि तिथल्याच दाट झाडीत लपले. पोलीस आले, त्यांनी पंचनामा केला आणि निघून गेले. पोलिसांचा पंचनामा झाल्यावर तब्बल दोन तासांनी आम्ही झाडीतून बाहेर आलो. कपडे बदलले, दुधाच्या दोन मोठ्या किटल्यांमध्ये पैसे भरले आणि आधीच आणून ठेवलेल्या यामाहा बाईकवरून दूधवाल्याच्या वेशात पसार झालो! आम्हाला माहीत होते की पोलीस घटनेच्या वेळेचेच सीसीटीव्ही पाहतील, दोन तासांनंतरचे फुटेज कोणी चेक करणार नाही!’
मॅनेजर पुन्हा गयावया करत म्हणाला, ‘आम्ही किशन वर्मा या भोळ्या मुलाचा बकरा म्हणून वापर केला, जेणेकरून मेसेज त्याच्यामार्फत पोहोचेल आणि आमच्यावर संशय येणार नाही. साहेब, आम्ही खूप हुशारीने प्लॅन केला होता…’
इन्स्पेक्टर मदन साळवे हसले आणि मॅनेजरच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ‘आयडिया खरोखरच भन्नाट होती मॅनेजर साहेब! पण तुम्ही फक्त नाण्याची एकच बाजू पाहिली… पोलिसांची दृष्टी ३६० अंशांची असते, ते सर्व बाजूने विचार करतात. तुम्ही विचार केलात की पोलीस फक्त ‘घटनेच्या वेळेचे’ आणि ‘घटनेच्या ठिकाणाचे’ सीसीटीव्ही चेक करतील. पण पोलीस कधीही एका जागी थांबत नाहीत. घटना घडण्याआधी आठ दिवस पतपेढीत कोण आले? आणि घटना घडल्यानंतर दोन तासांनी परिसरात काय हालचाली झाल्या? हे शोधणे म्हणजे ‘कनेक्टिंग द
डॉट्स’. तुम्ही वेळेची मर्यादा आखली होती, पोलिसांच्या तपासाला मात्र मर्यादा नसते! कायम लक्षात ठेवा,’ असे म्हणून आरोपींना गजाआड करण्याचा इशारा हवालदारांना करत साळवे साहेब हसत आपल्या गाडीकडे निघाले.

